काळाच्या ओघात बदल स्वीकारणारेच टिकून राहतात हा आदिम नियम व्यवसायातही लागू होतो. जगभरातील अनेक बलाढ्य कंपन्या बदल न स्वीकारल्यामुळे कशा लयास गेल्यात याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. मात्र बदलते तंत्रज्ञान आणि याच्यानुसार बदलणार्या संधींना अगदी तत्परतेने जोखून आपल्या क्षेत्रात घट्ट पाय रोवून राहणार्या कंपन्या तशा मोजक्याच असतात. अशीच एक यशोगाथा असणार्या टि-सिरीज कंपनीने आपल्या वाटचालीतील एक महत्वाचा टप्पा नुकताच पार केला आहे. युट्युबवर २० कोटी सबस्क्रायबर असणारे जगातील पहिले चॅनल बनण्याचा पराक्रम या कंपनीने केला आहे. पार अगदी पारंपरीक लाला टाईपच्या धंद्यापासून ते आजच्या डिजीटल विश्वातील ग्लोबल बिझनेसपर्यंतचा टि सिरीजचा प्रवास हा बदलांना स्वीकारण्याची महत्ता पुन्हा एकदा अधोरेखीत करणारा ठरला आहे. कधी काळी कॉपी राईट कायद्यातील चोरवाटांचा वापर करून यशाच्या पायर्या चढणार्या सिरीजने आज डिजीटल विश्वात स्वत:च्या कॉपी राईटसाठी उभारलेली तटबंदी ही देखील अभ्यासण्याजोगीच आहे.
भारतीय चित्रपट आणि संगीत क्षेत्राच्या इतिहासात गुलशन कुमार या हिकमती माणसाला टाळता येणार नाही. अवघ्या ४१ वर्षाच्या आयुष्यात गुलशन कुमारने जे काही केले ते ना कुणाला ना पुसता आले, ना त्याच्या पुढे जाता आले. अगदी जुगाड पध्दतीत काही हजार रूपयांमध्ये सुरू केलेला या माणसाचा व्यवसाय हा अब्जावधींच्या पलीकडे गेला. आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी संगीत, चित्रपट, धार्मिक कार्यक्रम आदी अनेकविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक यश मिळविले.
सत्तरच्या दशकाच्या अखेरीस ग्रामोफोनची सद्दी संपून कॅसेट प्लेअरचा जमाना सुरू असतांना दिल्लीतल्या दरियागंज भागात फळांच्या ज्युसचा व्यवसाय करणार्या गुलशन कुमार दुआ या पंजाबी तरूणाच्या वडलांनी कॅसेट रेकॉर्ड आणि विक्रीचा नवीन धंदा सुरू केला. जेमतेम विशीत असणार्या गुलशन कुमारला काही काळातच यात प्रचंड संधी दिसून आली. यातूनच सुपर कॅसेट इंडस्ट्रीज आकारास आली.
त्या काळात एचएमव्हीसह अन्य कंपन्या ऑडिओ कॅसेटच्या व्यवसायात प्रस्थापित मानल्या जात होत्या. मात्र त्यांच्या कॅसेटच्या ध्वनीमुद्रणाचा दर्जा तितकासा चांगला नव्हता. अर्थात, त्यांचे मूल्य देखील तुलनेत जास्त होते. मात्र त्यांच्याकडे चित्रपटांच्या गाण्याचे कॉपीराईट असल्यामुळे ग्राहकांना कोणताही पर्याय नव्हता. गुलशन कुमार यांनी यावर एक तोडगा शोधून काढला. त्यांनी हिंदी चित्रपटांमधील हिट गाण्यांना नवोदित गायकांकडून गाऊन घेत त्यांच्या कॅसेट बाजारात आणल्या. आजच्या भाषेत बोलायचे तर हे त्या काळातील कव्हर व्हर्जनच होते. अतिशय स्पष्ट व सुश्राव्य असे ध्वनीमुद्रण आणि अर्थातच किफायतशीर मूल्यामुळे या कॅसेटस्नी बाजारात क्रांती केली हे सांगणे नकोच….
ऐशीच्या दशकाच्या मध्यापर्यंत सुपर कॅसेट इंडस्ट्रीज टि-सिरीजमध्ये परिवर्तीत झाली. ( यातील टि हे आद्याक्षर त्रिशुलपासून घेण्यात आले होते. ) दिल्लीतील दरियागंजचा गुलशन कुमार नोयडामार्गे थेट मुंबईच्या मायानगरीत येऊन पोहचला. १९८८ साली आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या गाण्यांचे अधिकार टि सिरीजला मिळाले. यामुळे अर्थातच त्यांची सुरूवात चांगली झाली. महत्वाकांक्षी गुलशन कुमारने यानंतर लागलीच ‘लाल दुपट्टा मलमल का’ हा चित्रपट देखील काढला. याची गाणी गाजली असली तरी याला फारसे यश लाभले नाही.
दरम्यान, ९० साली आलेल्या ‘आशिकी’ने मात्र सिरीजला खर्या अर्थाने ब्रेक दिला. या चित्रपटाच्या तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त कॅसेट खपल्या (हा विक्रम नंतर कुणीच तोडू शकला नाही !) बॉलिवुडच्या इतिहासात आशिकीतील गाणी हा एक मैलाचा टप्पा ठरला. अर्थात, म्युझिक इंडस्ट्रीजमध्ये गुलशन कुमारला स्थैर्य प्रदान करण्यातही आशिकीचाच हातभार होता हे सांगणे नकोच ! यानंतर गुलशन कुमारने अक्षरश: हात लावला तिथे सोने केले. भारतीयांची धर्माविषयची आस्था पाहता त्याने धार्मिक गाणी, स्तोत्र, मंत्र आदींच्या कॅसेट आणल्या. याला देखील तुफान प्रतिसाद लाभला. अत्यंत धर्मपरायण असणार्या गुलशन कुमार यांनी वैष्णोदेवीच्या भंडार्यासह अनेक धार्मिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. याच्याशी संबंधीत शेकडो कॅसेटस् त्यांनी पब्लीश केल्या.
सर्वात महत्वाचे म्हणजे अनुराधा पौडवाल, कुमार सानू आदींसह अनेक गायक-गायिकांना त्यांनी संधी दिली. नव्वदच्या दशकाच्या मध्यापर्यंत ‘गुलशन कुमार म्हणजे यश’ हे समीकरण बनले. प्रचंड गतीने धावणारे गुलशन कुमार हे बॉलिवुडमधील जीवंतपणीची दंतकथा बनले. मात्र, डॉन दाऊदचा साथीदार अबू सालेम याने मागितलेली दहा कोटींची खंडणी न दिल्याने त्याला भर दिवसा गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
एक झंझावात अवघ्या ४१ व्या वर्षी थांबला. यामुळे गुलशन कुमार यांच्या साम्राज्याचे काय होणार याची चिंता सर्वांना होती. मात्र त्याचा अवघ्या २० वर्षे वय असणार्या भूषण या मुलाने आपले काका किशन कुमार यांच्यासह सिरीजची सूत्रे हाती घेतली. यानंतर काय झाले तो इतिहास आपल्या समोर आहेच. आता युट्युब वर सिरीजने २० कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केल्याने पुन्हा एकदा हिकमती गुलशन कुमार आणि त्यांच्या मुलाची यशोगाथा जगासमोर आली आहे.
वास्तविक पाहता गुलशन कुमार यांची हत्या झाली त्याच कालखंडात कॅसेट इंडस्ट्री उतरणीला लागली होती. काही वर्षातच सीडी प्लेअर आले. याच्या सोबतीला आलेल्या इंटरनेटने मनोरंजनाची व्याख्याच बदलून टाकली. २००५ साली आलेल्या युट्युबच्या माध्यमातून संगीत, चित्रपट आणि एकूण मनोरंजनासाठीचा ग्लोबल मंच उभा राहिला. याच्याच जोडीला फेसबुक, ट्विटर आदींसारखे सोशल मंच लोकप्रिय झालेत. हे सर्व बदल भूषण कुमार यांनी जाणीवपूर्वक अभ्यासून यातील संधी शोधल्या. टि सिरीज कंपनीने १३ मार्च २००६ रोजी युट्युबवर अकाऊंट सुरू केले असले तरी पहिला व्हिडीओ मात्र २०१० साली अपलोड करण्यात आला. दरम्यान, कंपनीने युट्युबच्या विरूध्द कॉपीराईटचा खटला देखील दाखल केला. यात सेटलमेंट झाल्यानंतर युट्युबवर टि सिरीजचे अकाऊंट सक्रीय करण्यात आले. यातूनच आता ही कंपनी युट्युबवरील सर्वात मोठे इन्फोटेनमेंट चॅनल बनले आहे. जगभरातील मोठमोठ्या म्युझिक कंपन्या, चित्रपट निर्मिती करणारे स्टुडिओज, अन्य प्रॉडक्शन कंपन्या, विविध सेलिब्रीटीज, राजकारणी, खेळाडू आदींपेक्षा किती तरी पटीने जास्त सबस्क्रायबर्स हे युट्युबने मिळविल्याची बाब लक्षणीय अशीच मानावी लागणार आहे. टि सिरीजच्या ग्रुपमध्ये २९ विविध चॅनल्सचा समावेश असून यात धार्मिक, मनोरंजनपर गाणी, चित्रपट, ट्रेलर, चित्रपटातील सीन्स, प्रोमोज आदींचे नित्यनेमाने अपडेशन्स सुरू असते. यातील कॉंटेंट हे रसिकांच्या पसंतीस उतरल्यामुळे आज डिजीटल विश्वात टि सिरीज अव्वल स्थानी आरूढ झाले आहे.
टि सिरीजकडे सध्या हिंदीसह अन्य भाषांमधील तब्बल १ लाख ६० हजार गाण्यांचे अधिकार आहेत. याच्या जोडीला दोन हजारांपेक्षा जास्त चित्रपटांचे भंडार सुध्दा त्यांच्याकडे आहे. ऑडिओ कॅसेटनंतर सीडीचे युग सुरू झाले. मात्र काही वर्षातच स्मार्टफोन आल्याने सीडी देखील लयास गेल्या. डिजीटल स्टोअरेज आणि इंटरनेटवर सुलभ पध्दतीत उपलब्ध असणार्या पायरसीमुळे जगभरातील विविध म्युझिक कंपन्या अक्षरश: जेरीस आल्या. मात्र या संक्रमणाच्या काळातही टि सिरीज टिकून राहिली. कारण भूषण कुमार यांनी अतिशय चाणाक्षपणे सर्व बदल हेरून आपल्या स्ट्रॅटेजीजमध्ये सुसंगत असे बदल केले. आज टि सिरीजच्या व्यवसायात विलक्षण वैविध्य आहे. हेच डायव्हर्सीफिकेशन अनेक आघात पचवून देखील या कंपनीला शिखरावर नेणारे ठरले आहे. कालौघात या कंपनीचा बिझनेस हा फिजीकल वरून डिजीटल वर शिफ्ट झाला आहे. अर्थात, आधी प्रत्यक्षात ऑडिओ कॅसेट विक्रीपासून सुरू झालेल्या व्यवसायात गुलशन कुमार यांनी झपाट्याने वैविध्य आणले. यातूनच त्यांनी विविध प्रॉडक्ट लॉंच केलेत. अर्थात, हे सर्व मार्ग पारंपरीक व्यवसायाचेच होते. तर त्यांचे पुत्र भूषण कुमार यांनी याला डिजीटल आयाम दिला.
आज टि सिरीजचे बहुतांश उत्पन्न हे डिजीटल माध्यमातून येत आहे. यात सर्वात मोठा वाटा हा अर्थातच युट्युबचा आहे. या माध्यमातून टि सेरीजला वर्षाला तब्बल सुमारे ७२० ते ७५० कोटी रूपये मिळत असल्याचे अनेक रिसर्च फर्म्सने जाहीर केले आहे. यात दिवसेंदिवस वाढ होतच राहणार आहे. याच्या जोडीला म्युझिक लेबल, रेडिओ स्टेशन्स, व्यावसायिक वापर यातूनही ही कंपनी पैसे कमावते. तर अलीकडेच त्यांनी स्पॉटीफाय या म्युझिक स्ट्रीमींग कंपनीशी एक्सक्लुझीव्ह करार करून उत्पन्नाचा एक नवीन मार्ग शोधला आहे. मध्यंतरी तर अगदी विवाहाच्या व्हिडीओ एडिटींगसाठी टि सिरीजची गाणी वापरण्यासाठी सुध्दा पॅकेज या कंपनीने जाहीर केले होते. अर्थात, आपल्याकडे असणार्या कॉंटेंटची पुरेपूर किंमत वसूल करण्याचे मॉड्युल भूषण कुमार यांनी विकसित केल्याचे दिसून येत आहे. यात त्यांनी आपल्या चित्रपटांसाठी नेटफ्लीक्स, अमेझॉन प्राईम आदींसारख्या ओटीटी मंचांसोबत देखील करार केला आहे. अर्थातच, बिझनेसचे डिजीटल मॉड्यूल त्यांनी पूर्णपणे आत्मसात केले आहे.
टि सिरीजच्या यशाने काही बाबी प्रामुख्याने अधोरेखीत झाल्या आहेत. एक तर भारतीय मनोरंजनपर कॉंटेंटला वैश्वीक अपील असल्याचे या कंपनीने सिध्द केले आहे. भारतीयांचे धर्मपरायणता ही ऑडिओ-व्हिज्युअल स्वरूपातही तितकीच लोकप्रिय असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. कारण टि सिरीजच्या २० कोटी युजर्सपैकी सर्वाधीक साडे सहा कोटी हे त्यांच्या धार्मिक चॅनलला आहे. कधी काळी इंटरनेट विश्वात इंग्रजी, चिनी, स्पॅनीश आदी भाषांचा दबदबा असल्याचे मानले जात होते. मात्र हिंदी आणि मराठीसह अन्य भारतीय भाषांमधील कॉंटेंटच्या मदतीने टि सिरीजने घेतलेली भरारी ही आश्चर्यकारक अशीच आहे. अर्थात, यातून भारतीय भाषांची डिजीटल विश्वातही महत्ता स्पष्ट झाली आहे. युट्युबवर आत टि सिरीज पहिल्या क्रमांकावर असून दुसर्या आणि पुढील क्रमांकाच्या युट्युब चॅनल्सवर त्यांनी प्रचंड आघाडी घेतली आहे. मध्यंतरी PewDiePie या तेव्हा पहिल्या क्रमांकावर असलेल्या चॅनलशी लोकप्रियतेत टि सिरीजची जोरदार टक्कर झाली होती. मात्र आता या कंपनीने निर्विवाद आघाडी घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एक मनोरंजक बाब म्हणजे युट्युबच्या ‘ग्लोबल रँकींग’मध्ये ‘सेट इंडिया’ तिसर्या; ‘झी म्युझिक कंपनी’ नवव्या; ‘सोनी सब’ एकोणाविसाव्या; ‘शेमारू फिल्मी गाने’ एकविसाव्या क्रमांकावर आहेत. म्हणजे भारतीय लोक युट्युवर सर्वाधीक वेळ हा मनोरंजनपर कॉंटेंटवर व्यतीत करत असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, टि सिरीजचे यश हे काळाच्या ओघात परिवर्तनशीलता स्वीकारल्यामुळे मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. कधी काळी ट्रेडींगच्या स्वरूपातील या कंपनीचे काम आता जवळपास पूर्णपणे डिजीटल प्रकारात शिफ्ट झालेले आहे. मात्र काळाचा ओघ घेण्याची दृष्टी, यानुसार केलेले बदल आणि बदलांमधील संधी याच्यामुळे गुलशन कुमार आणि त्यांचे पुत्र भूषण कुमार यांनी काळाच्या ओघातही टिकून राहणारा नव्हे, प्रचंड गतीने वर्धीष्णू होणार्या एका ग्लोबल ब्रँडची निर्मिती केली.
अर्थात, टि सिरीजचे आजचे यश हे इंटरनेटच्या लहरींवर स्वार होऊन आणि युट्युब सारख्या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या डिजीटल मंचाच्या माध्यमातून मिळाल्याची बाब देखील विसरता येणार नाही. डिजीटल माध्यमे आणि याच्यातील ब्रँडस बाबत सजगपणे अभ्यास करणार्यांसाठी टि सिरीज पेक्षा चांगले उदाहरण दुसरे असूच शकत नाही. हीच परिवर्तनशीला मेनस्ट्रीम मीडियाने दाखविली तर डिजीटल युगाची आव्हाने लिलया पेलून यात देखील यशाच्या नवीन संधी मिळतील हे देखील तितकेच खरे…! यासाठी गरज आहे ती नव्याने स्वीकार करण्याची. टि सिरीजने पारंपरीकतेला नव्या युगाचा साज चढवून मिळवलेले यश हे याच अर्थाने अभूतपुर्व असेच मानावे लागणार आहे. ‘बदलला तोच टिकला….आणि टिकला तोच जिंकला’ हे सूत्र टि सिरीजने दाखवून दिल्याचे कुणालाही नाकारता येणार नाही.