‘साईमत’च्या सभागृहात आज ‘स्प्रिंग, समर, फॉल, विंटर…अँड स्प्रिंग’ हा जीवनावर बुध्द तत्वज्ञानाच्या अंगाने आणि ऋतुंच्या विलोभनीय प्रतिकातून भाष्य करणारा चित्रपट पुन्हा एकदा पाहिला. अर्थात आज याचविषयी.
चित्रपट पाहतांना अनेक विविध पध्दतीने सर्च करण्याचा मी अवलंब केला आहे. या अनुषंगाने बौध्द तत्वज्ञानावर आधारित चित्रपटांचा शोध घेतांना ‘स्प्रिंग, समर, फॉल, विंटर…अँड स्प्रिंग’ हे लांबलचक आणि विचित्र नाव समोर आले. नावावरून हा चित्रपट वर्षभरातील ऋतुचक्रावर आधारित असावा असा समज झाला. पाहिल्यानंतर यात ऋतुंच्या बदलत्या अंगाने मानवी जीवनातील घटनांचे मार्मिक चित्रण करण्यात आले आहे. तिन्ही बाजूंनी डोंगरांची वेढलेल्या तळ्यात तरंगत्या बौध्द मठात याचे कथानक सुरू होते. अर्थात हा मठ आणि त्याचा भोवताल याच्या बाहेर चित्रपट जातही नाही. यात एक बौध्द भिक्षु आपल्या एका बाल शिष्यासह राहत असतो. तो मुलगा बालसुलभ चिकित्सक नजरेने आपल्या भोवती पाहतो. यातून प्राण्यांना इजा पोहचवण्याची कृती त्याच्या हातून घडते. यामुळे गुरू त्याला याची कठोर शिक्षा देत कर्माचा सिध्दांत शिकवतो.
पुढच्याच अर्थात ग्रीष्म ऋतुत हा बालक पौगंडावस्थेत दाखवलाय. वयानुसार त्याच्यातील कामभावना जागृत होत असतांनाच योगायोगाने एका रूग्ण किशोरीला तिची आई चांगले लागावे म्हणून त्या मठात सोडते. अर्थात जे अपेक्षित आहे तेच घडते व त्या दोघांमध्ये शरीरसंबंध होतो. गुरू जे झाले ते नैसर्गिक असल्याचे सांगत शिष्याला तृष्णेबाबत सावधगिरीचा इशारा देतो. मात्र तो आता पेटून उठलेला असतो. यामुळे मठातील बुध्दमुर्ती पाठीला बांधून तो तेथून पलायन करतो. शिशिर ऋतुत तो आपल्या पत्नीचा खुन करून मठात आश्रयासाठी येतो. तो आत्मघाताचा प्रयत्न करताच गुरू त्याला झेन मास्टरप्रमाणे झोडून काढतो. त्या खुन्याला शोधण्यासाठी पोलीसह येतात. हे सारे पाहून गुरू स्वत:ला संपवतो. नंतर हिवाळ्यात तोच व्यक्ती जो आता प्रौढ झालेला असतो, शिक्षा भोगून पुन्हा मठात येतो. आपल्या गुरूची महत्ता लक्षात घेत तो मठात राहून विविध ध्यानपध्दती करतो. दरम्यान, एक महिला बहुदा अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आपल्या मुलास मठात सोडून पळतांना बुडून मरण पावते. शेवटच्या भागात तो व्यक्ती गुरू तर त्या महिलेने सोडलेला मुलगा शिष्याच्या भुमिकेत आपल्याला दिसतो.
चित्रपटातील सर्वात महत्वाचा घटक अर्थातच निसर्ग आहे. मुळातच चित्रपटाच्या नावानुसार यात वसंत, ग्रीष्म, शिशिर, शीत आणि वसंत या ऋतुंच्या प्रतिकाचा उपयोग करून मानवी जीवनातील एका वर्तुळाचा प्रवास दाखविला आहे. बुध्द तत्वज्ञानात हिंदूंप्रमाणे जीवनचक्र मानलेले आहे. याचाच अर्थ असा की मानवी जीवनात जीवन-मृत्युचा फेरा अटळ आहे. या तत्वज्ञानात कर्माचा सिध्दांतही मानण्यात आला आहे. परिणामी प्रत्येक कर्म आणि त्यातून बनणारे बंधन हेदेखील आलेच. या बाबींचा विचार करता ‘स्प्रिंग समर फॉल विंटर अँड स्प्रिंग’ या चित्रपटात या सर्व बाबींचा अगदी समर्पक उपयोग करण्यात आला आहे.
यातील पहिल्या भागात आपल्या शिष्याप्रती कठोर भासणारा गुरू हा त्याला जीवनातील कर्माच्या बंधनाचीच जाणीव करून देतो. तो मुलगादेखील प्रौढावस्थेच याचे परिमार्जन करण्यासाठी डोंगराच्या शिखरावर मैत्रेयाची प्रतिमा स्थापित करतांना आपल्या पाठीला अवजड घरोट बांधतो. कर्माच्या या बंधानासोबत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील टप्पेही सुचकपणे दाखविण्यात आले आहे. म्हणजे निसर्ग, ऋतु आणि मानवी जीवनातील चक्राची अभुतपुर्ण गुंफण करत किम की-दुक या दिग्दर्शकाने ही अजोड कलाकृती तयार केली आहे.
ऋतुमानानुसार बदलणारा निसर्ग, त्यानुसार बदलणारा तरंगता मठ, कुंपण नसणारे दार, त्याला लागून असणारे जंगल, तेथील वाहता प्रवाह, धबधबा, डोंगरावरील शिखर, तेथून दिसणारा मठ, जंगलातील बुध्दाचा विशाल पुतळा, तेथून त्या तळ्याचे दृश्य…या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ही अगदी परिपुर्ण आणि सौदर्ययुक्त आहे. प्रत्येक ऋतुच्या रंगात रंगणारा तरंगता मठदेखील असाच मनावर अमीट छाप सोडतो. याची सिनेमॅटोग्राफी तर लाजवाब. यातील पात्रांचे एकमेकांशी फारसे संवाद नाहीतच. चित्रपट संथ वाटला तरी कथानक, त्यातील तत्वज्ञान, दृश्य आणि त्याला असणारे साजेसे संगीत एक प्रकारचा मेडिटेटिव्ह इफेक्ट देतात. विविध पात्रांनीही आपली भुमिका व्यवस्थित वठविली आहे. प्रारंभी हे कथानक शेकडो वर्षांपुर्वीचे वाटते. मात्र मॉडर्न वस्त्रांमधील तरूणी आणि त्यानंतर पोलिस आणि त्यांच्याकडील बंदुका, मोबाईलफोन आदींमुळे ते आधुनिक काळातील असल्याचे समजते. अर्थात काळ कोणताही असला तरी यातील संदेश कालातीत आहे.
‘स्प्रिंग, समर, फॉल, विंटर…अँड स्प्रिंग’मध्ये बर्याच बौध्द प्रतिकांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे बदलत्या ऋतुनुसार तरंगत्या मठात पक्षी, मांजर, कोंबडा, साप व कासव आदी प्राण्यांचा वावर दाखविण्यात आला आहे. त्या तरूणास कामज्वराने पछाडल्यानंतर भोवतीही याला अनुसरून प्रतिके दाखविण्यात आली आहेत. खरं तर कोरियन बौध्द तत्वज्ञान हे ‘झेन’ या शाखेला जवळचे आहे. यामुळे यात अनेक दृश्यांमध्ये ‘झेन’ झळकतो. अगदी कुंपण नसुनही असणारा दरवाजा हा याचेच प्रतिक आहे. आत्महत्या करून स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न करणार्या शिष्याला बदडून काढणारा गुरूदेखील ‘झेन मास्टर्स’च्या पठडीतील वाटतो. खरं तर हा गुरू जेवढा तत्वज्ञान जाणतो तेवढेच तो मनोविकारही जाणून असतो. यामुळे नैराश्याच्या गर्तेत असणार्या तरूणीची व्याधी काम संबंधाने दुर पळाल्याचे त्याच्या क्षणात लक्षात येते. आपल्या शिष्याने केलेले शरीरसंबंध हे नैसर्गिक असल्याचे तो स्पष्ट मान्य करतो. मात्र यासाठी त्याच्या मनात निर्माण झालेल्या तृष्णेबाबत तो सावधगिरीचा इशारा देतो. आपल्या पत्नीचा खुन करून आल्यानंतर संतापाने खदखदणार्या त्या तरूणाला शांत करण्यासाठी ‘ह्दय सुत्रा’ला चाकुने खरडून तयार करत तो त्याच्यातील पुर्ण हिंसा आणि संतापाचा निचरा करतो. अर्थात आपल्या शिष्याला आत्मघातापासून परावृत्त करणारा गुरू स्वत: त्याच मार्गाने स्वत:ला संपवितो. कोरियन बौध्द परंपरेत स्वत:ला अग्नीच्या हवाली करून शरीर अनंतात अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र हा गुरू दु:खी मनाने स्वत:ला पेटवून घेतो हे त्याच्या अश्रुंवरून दिसते. याचाच अर्थ तोदेखील संसाराच्या बंधनातून मुक्त झालेला नसतो. किंबहुना आपण यातून सुटू न शकल्याचे शल्य त्याला बोचत असावे.
ऑस्कर वाईल्ड यांच्यानुसार ‘प्रत्येक संताला भुतकाळ असतो तर प्रत्येक पाप्याला भविष्यकाळ!’ याचा विचार करता गुरूच्या पुर्वायुष्यातदेखील असलेच षड्रिपुंचे थैमान असू शकते तर शिक्षा भोगून आलेला नंतर खरा साधकही बनू शकतो असा संदेशही कदाचित दिग्दर्शकाला द्यावयाचा असू शकतो. असो. उत्तम नेत्रसुखद अनुभव, बौध्द मतानुसार जीवनाचे तत्वज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाचे थक्क करणारे रंग पहाण्यासाठी ‘स्प्रिंग, समर, फॉल, विंटर…अँड स्प्रिंग’ अवश्य पहाच!
पहा संपुर्ण चित्रपट!