जग हे वर्तुळाकार असल्याचे मानले जाते. जीवनशैलीचा विचार केला असता चुलीवरचे जेवण, सायकलींग आदींसारख्या जुन्या जमान्यातील बाबींचा अलीकडे मोठ्या प्रमाणात स्वीकार करण्यात आला आहे. नेमक्या याच प्रकारे पत्रकारितेतही असे काही होऊ शकते का ? याबाबत आपल्या मनात विचार येण्याची शक्यता आहे. नेमक्या याच बाबीवर मी अलीकडच्या काळात थोडे मंथन केले आहे.
सध्या मी एका आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवर काम करत असून यात संबंधीतांना प्रिंट आणि डिजीटलची सांगड घालणारा ‘हायब्रीड मीडिया’ डेव्हलप करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. यामुळे आता ‘पत्रकारितेतील बदलते प्रवाह’ या विषयावर सखोल अध्ययन सुरू आहे. खरं तर मी पत्रकारितेचा ‘प’ आणि तंत्रज्ञानाचा ‘त’ सुध्दा कॉलेजात शिकलेलो नाही. मात्र, याबाबत काम करत असतांना मला याचा अभ्यास करावा लागत आहे. यात संथ पत्रकारिता अर्थात ‘स्लो जर्नालिझम’ ही एक संज्ञा अलीकडेच वाचनात आली. आता पत्रकारितेत वेग हा केंद्रस्थानी आला असतांना कुणी संथ गतीने पत्रकारिता करू शकतो का ? केल्यास याला वाचक/प्रेक्षक/युजर्स मिळतील का ? यातून उत्पन्न मिळणार तरी कसे ? आदी तमाम प्रश्न कुणासमोरही उपस्थित होऊ शकतात. हा प्रकार अद्याप बाल्यावस्थेत असला तरी खूप इंटरेस्टींग असा आहे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी उदयास आलेल्या डिजीटल मीडियाने अवघ्या एका दशकात प्रचंड गती धारण केली. साधारणपणे २०१०च्या सुमारास गती हाच आधुनिक पत्रकारितेचा महत्वाचा मानक राहणार असल्याचे स्पष्ट झाले. भलेही आपण सविस्तर बातमी नंतर वाचू वा पाहू पण आधी याला ब्रेकींगच्या स्वरूपात तरी सादर करण्याची एक जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. आज याचे बरेवाईट परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. एक तर आज कमीत कमी साधनांमध्ये उत्तमातील उत्तम न्यूज रूम तयार करणे सहजसोपे झाले आहे. यातून पत्रकारितेचे खर्या अर्थाने लोकशाहीकरण आणि सार्वत्रीकरण झालेले आहे. तथापि, यातून एक प्रकारचा न्यूरोसीसही (मनोरूग्णता) निर्माण झालेला आहे.
आज कोणतीही ब्रेकींग न्यूज ही सोशल मीडिया अथवा एखादी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून येते. अल्प काळात अन्य चॅनल्स याला हातोहात उचलतात. काही मिनिटांमध्ये आघाडीच्या वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळावर एकामागून एक या प्रकारे ही बातमी येते. यानंतर काही मिनिटे ते तासांच्या अंतराने हीच बातमी अन्य असंख्य पोर्टल्सवर थेट वा थोडी बदलून कॉपी-पेस्टच्या स्वरूपात जगासमोर येते. यामुळे ओरिजीनल आणि पायरेटेड कंटेंटचा विचार करता, आपल्या समोर येणार्या जास्तीत जास्त बातम्या ‘पायरेटेड’ असल्याची बाब ही दु:खद पण कटू सत्य आहे. विस्तृत वृत्त, यावरील बहुआयामी विश्लेषण, अग्रलेख आदींनी अद्यापही आब राखली असली तरी गतीसमोर पत्रकारितेतील हे महत्वाचे घटक देखील गलीतगात्र झाल्याचे दिसून येत आहेत. या सर्व बाबींवर ‘उतारा’ म्हणून स्लो जर्नालिझम अस्तित्वात आले. वास्तवावर विचार केला असता, हा प्रकार आजच्या प्रचंड गतीमान पत्रकारितेशी अतिशय विसंगत असून नवयुगाच्या धडाक्यासमोर टिकणारा निश्चीतच नाही. याच्या उत्पन्नाचे स्त्रोत देखील खूप मर्यादीत असल्याने संथ पत्रकारिता बाळसे धरण्याची शक्यता धुसर आहे. तथापि, या प्रकारचा विचार समोर आल्याची बाबदेखील लक्षणीय अशीच असून पत्रकारितेचे डोळसपणे निरिक्षण करणार्यांना याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
साधारणपणे २०११ च्या सुमारास ‘स्लो जर्नालिझम’ ही संज्ञा अस्तित्वात आली. ‘डिलेड ग्रॅटीफिकेशन’ (https://www.slow-journalism.com) या मुद्रीत त्रैमासिकाने याला प्रचलनात आणले. अर्थात, याआधीच ‘प्रो पब्लीका’ (https://www.propublica.org) या २००७ साली सुरू झालेल्या संकेतस्थळाने याच प्रकारची पत्रकारिता सुरू केली होती. आज जगभरात अनेक प्रकाशकांनी स्लो-जर्नालिझमचा फॉर्मेट वापरात आणला आहे. यात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. अत्याधुनीक तंत्रज्ञानामुळे जगभरात प्रसारमाध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. यामुळे जगात अक्षरश: लक्षावधी डिजीटल न्यूजरूम्स कार्यरत झाल्या आहेत. ब्रेकींग न्यूजचा अगदी वीट येईपर्यंत मारा आपल्यावर होत असतांना संथ पत्रकारिता तग धरू शकेल का ? हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. खरं तर स्लो जर्नालिझमचे अघोषीत घोषवाक्य ‘स्लो डाऊन वाईज अप’ असे आहे. ब्रिटनमध्ये ‘टॉर्टाइजमीडिया.कॉम’ ( https://www.tortoisemedia.com ) या संकेतस्थळाने तर लोकसहभागातून आपला प्रोजेक्ट उभा केला आहे. आता नावातच नमूद असल्यानुसार यावरून कुर्म गतीने कंटेंट युजर्सला मिळते. दररोज फक्त पाच महत्वाच्या बातम्या यातून देण्यात येतात. अर्थात, या बातम्या सविस्तर आणि सत्यतेवर आधारित असतात. व यासाठी युजर्सला पैसे मोजावे लागतात. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथून कार्यरत असणार्या ‘झेटलँड’ ( https://www.zetland.dk/aboutzetland ) या डिजीटल मीडिया हाऊसनेही हाच पर्याय निवडला आहे. यावरून दिवसाला फक्त दोन बातम्या दिल्या जात असून यात ऑडिओचाही समावेश असतो. याच्या उत्पन्नाचा स्त्रोतदेखील सबस्क्रीप्शन हाच आहे. याच प्रकारे जगातील विविध देशांमध्ये अल्प प्रमाणात का होईना, स्लो-जर्नालिझम कार्यरत झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आपल्याकडेही शोध पत्रकारिता, विश्लेषणात्मक लेखांना समर्पित असणारे काही डिजीटल व्हेन्चर्स अस्तित्वात आले आहेत. अर्थात, ब्रेकींग न्यूजच्या विक्षीप्त वेगाच्या हव्यासावर उतारा म्हणून हा प्रकार कार्यरत झाला असला तरी यातील काही बाबी या प्रसारमाध्यमांमधील सर्व फॉर्मेटने अनुकरण कराव्या अशा आहेत.
आपल्या भोवती अनेक घटना घडतात. यानंतर ब्रेकींगपासून ते इलेक्ट्रॉनिक मीडियातील विश्लेषण व सोशल मीडियातील चर्वणापर्यंत अनेक प्रकार घडतात. अर्थात, कितीही मोठी व महत्वाची घटना असली तरी ती काही दिवसांमध्येच विस्मरणात जाते. मात्र महत्वाच्या घडामोडींचे पुढे नेमके काय झाले ? याची माहिती कुणाला मिळत नाही. मेनस्ट्रीम मीडिया याच्या फारशा भानगडीत देखील पडत नाही. तथापि, स्लो-जर्नालिझममध्ये कोणत्याही घडामोडीचे डोळसपणे निरिक्षण करून थोड्या विलंबाने यातील न उलगडलेल्या बाबींना जगासमोर मांडण्यात येते. एका अर्थाने फेक कंटेंटला प्रतिकार करण्यासाठी पत्रकारितेचा हा प्रकार उपयुक्त ठरू शकतो असे मत अनेक माध्यम तज्ज्ञांनी मांडले आहे. मात्र, फेक न्यूज या वार्याच्या गतीने पसरत असतांना यावरील उतारा हा संथ गतीतून येत असल्याने तो फारसा परिणामकारक राहणार नसल्याचा आक्षेप घेण्यात येत असून यात तथ्यदेखील आहे. एकूणच विलक्षण वेगवान युगात संथ पत्रकारिता तग धरणार नाही हे निश्चित. तथापि, वेगाच्या हव्यासामुळे मेनस्ट्रीम मीडियात आलेल्या एक प्रकारच्या विक्षीप्ततेला स्लो-जर्नालिझम हे एक प्रकारचे उत्तर असल्याची बाब आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. विशेष करून अतिशय संवेदनशील आणि महत्वाच्या मुद्यांवरील वृत्तांकनासाठी पत्रकारितेचा हा प्रकार वापरल्यास याचा उत्तम परिणाम होऊ शकतो.
अगदी अलीकडचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास, राज्यातील राजकीय घडामोडींचा अंदाज प्रसारमाध्यमांना न आल्याने झालेली फसगत आपण सर्वांनी अनुभवली आहे. यातील सर्व तपशील तपासून अगदी विस्तृत पध्दतीतल्या रिपोर्टींगला अजूनही वाव आहे. विशेष करून देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे या दोन्हींसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजितदादा पवार यांच्या त्या कालखंडातील एकूणच हालचालींबाबतचा कोणताही अचूक वृत्तांत अद्याप प्रकाशित झालेला नाही. त्यांनी केलेले कथित बंड आणि त्यामागचा कार्यकारणभाव हा अजूनही कळते-समजते, सूत्रांची माहिती, नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती आदींच्याच माध्यमातून समोर आलेला आहे. मात्र याबाबतची अचूक आणि सुसुत्रवार माहिती अद्यापदेखील जगाला कळलेली नाही. हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद माध्यमांमध्ये नक्कीच असली तरी हा कुटाणा करणार कोण ? हा प्रश्न उपस्थित होतोच. येथेच स्लो-जर्नालिझमचा फॉर्मेट उपयोगात पडू शकतो. मात्र चुलीवरचे जेवण हे नेहमी नव्हे तर कधी तरीच मनाला मोहवते. या मुळे मेनस्ट्रीम मीडियाने सुध्दा कधी तरी बदल म्हणून का होईना, हा प्रकार वापरण्यास हरकत नाही. खरं तर सुसाट आणि संथ हे पत्रकारितेतील दोन्ही प्रकार योग्य संतुलीत पध्दतीत वापरणे परिणामकारक ठरू शकते. विशेष करून आज ‘फेक कंटेंट’ ही सर्वात मोठी समस्या बनली असतांना पत्रकारितेत दोन्ही फॉर्मेटचा मिलाफ उपयुक्त ठरू शकतो. नाही तर फक्त गोष्टीतच ससा आणि कासवाच्या शर्यतीत कासव जिंकू शकते. प्रत्यक्षात नेहमी ससाच बाजी मारत असतो. आज डिजीटल मीडियारूपी सशाचा वेग स्लो-जर्नालिझमच्या कासवाला कधीही जिंकू देणार नाही हे निश्चीत. तथापि, विलक्षण वेगाला विटलेल्यांसाठी हा पर्याय उपलब्ध असावा ही अपेक्षा गैर नाहीच !
स्लो जर्नालिझमवर ‘डिलेट ग्रॅटीफिकेशन’चे संपादक रॉब ऑर्चर्ड यांचा अतिशय माहितीपूर्ण व्हिडीओ आपण खालील लिंकवर पाहू शकतात. यात त्यांनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये ही संकल्पना समजावून सांगितली आहे.
लिंक :