Featured slider पत्रकारिता

दास्तान-ए-देशदूत

Written by shekhar patil

दैनिक देशदूतच्या जळगाव आवृत्तीने काल रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. तत्कालीन संपादक सुभाष सोनवणे यांच्या शब्दांमध्ये सांगायचे तर खान्देशी जिभाऊ आणि बायजाच्या आशा-आकांक्षांना, व्यथा-वेदनांना प्रमाण मानून पत्रकारिता करण्याचे काम देशदूतने अव्याहतपणे केले आहे. गोदातीरावरून येऊन तापी, गिरणा, पांझरेच्या खोर्‍यात स्थिरावलेल्या देशदूतची येथील मातीशी, माणसांशी, व्यवस्थेशी आणि समाजांशी जुडलेली नाळ ही आज देखील कायम आहे. देशदूतच्या आजवरच्या २४ वर्षांपैकी साडे सात वर्षे हे वर्तमानपत्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक होते. येथील माझ्या कारकिर्दीबाबत मी आधीच सविस्तर लिहले आहे. याची पुनरावृत्ती टाळत आज नव्याने दोन शब्द सांगावेसे वाटतात. तर आधी केलेल्या लिखाणाच्या लिंक्स मी याच लेखात देत आहे.

मनाशी दृढ निश्‍चय करून मी दैनिक देशदूतच्या गेटमधून प्रशिक्षणार्थी उपसंपादक म्हणून गेलो होतो. तर दुसर्‍या गेटने बाहेर पडतांना तीच पॅशन, तोच संकल्प आणि तीच स्वप्ने अधिक परिष्कृत झालेली होती. साडे सात वर्षाच्या कालखंडाने मला आमूलाग्र बदलून टाकले होते. प्रचंड मेहनत, चिंतन, मनन आणि सृजन यांनी परिपूर्ण असणारी उज्ज्वल कारकिर्द एका क्षणात सोडून पुढे जाणे खूप कठीण असते. पण जीवन थांबत नसते; नवनवीन शिखरे, स्वप्ने आपल्याला खुणावत असतात. यानुसार जड अंत:करणाने देशदूतचा निरोप घेतला. सुभाष सोनवणे सरांचा आशीर्वाद घेऊन जातांना माझ्या आणि त्यांच्याही तोंडून फारसे शब्द फुटले नाहीत. जवळपास इतर सर्व सहकार्‍यांनी हृदयापासून शुभेच्छा दिल्या. शिपाई लालाजी जैसवाल आणि गेटकिपर दराडे बाबांसमोर झुकलो तेव्हा तर ते ओक्साबोक्शी रडले. ”साहेब तुम्हाला कधी विसरणार नाही हो आम्ही…!” असे म्हणत त्यांनी दिलेला ‘सेंड ऑफ’ आजही मर्मबंधातल्या ठेवीसमान जोपासून ठेवला आहे.

मी रूजू झालो तेव्हा दैनिक देशदूत आपल्या वाटचालीच्या शिखराकडे झेपावण्यासाठी सज्ज झाला होता. स्थानिक पत्रकारितेत मातब्बर मानल्या जाणार्‍या धों. ज. गुरव साहेब आणि नाशिकच्या पत्रकारितेतील नाणावलेल्या दिवंगत शशिकांत टेंबे सरांनी केलेल्या पायाभरणीला सुभाष सोनवणे साहेबांच्या ड्रीम टिमने नव्या उंचीवर नेले. यातील माझ्यासोबतच्या अनेक जणांनी पुढील काळात पत्रकारितेतील अनेक शिखरांना सर केले. आजही बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. माझ्यासाठी दैनिक देशदूत हे पत्रकारितेतील मोठे विद्यापीठ होते. सोबतच सुभाष सोनवणे सरांच्या नेतृत्वाचा अपूर्व योग देखील जमून आला. कोणत्याही संस्थेचे यश हे तिच्या कार्य संस्कृतीवर (वर्क कल्चर) अवलंबून असते. याचा विचार करता देशदूतने एक अतिशय व्हायब्रंट आणि मानवी संवेदनांना प्रमाण मानणारी, त्याचा सन्मान करणारी ‘इको-सिस्टीम’ विकसित केली असल्याची अनुभूती मला येथे काम करतांना आली. कदाचित इतरांना हे जाणवलेही नसेल. तथापि, मी काम करत असतांना तरी मला याची अनुभूती आली अन् मी यालाच फॉलो केले.

हे देखील वाचा : पत्रकारितेतील पहिले पाऊल

खरं तर, प्रत्येक संस्थेत असतात तशी अर्क मंडळी देशदूतमध्ये देखील होती. कामचुकारपणा, सुस्तपणा, द्वेष, जळाऊवृत्ती आदी येथे देखील काही प्रमाणात होत्या. मात्र यापेक्षा येथील सकारात्मकता मला जास्त भावली, जी मी माझ्या अंगी भिनवली. यासाठी संपादक सुभाष सोनवणे यांच्या जोडीला व्यवस्थापक एस. के. ठाकूर आणि नंतरचे व्यवस्थापक सुभाष गोळेसर यांचे प्रयत्न विशेष करून कारणीभूत ठरले. संपादक आणि व्यवस्थापक ही कोणत्याही वर्तमानपत्राची दोन चाके असतात. यांच्यात सुसंवाद असल्यास ते वर्तमानपत्र यशस्वीपणे आगेकूच करते. देशदूतच्या यशस्वी वाटचालीत वर नमूद केलेल्या दोन्ही व्यवस्थापकांचाही तितकाच मोलाचा वाटा होता हे नाकारता येणार नाही. खरं तर दोन्ही व्यवस्थापकांचा पिंड व स्वभाव वैशिष्ट वेगळे. ठाकूर साहेब हे पाहताच आदर वाटावा असे व्यक्तीमत्व. कोणताही निर्णय शांतपणे, सर्व बाजूंनी विचार करून घेणारे. तर गोळेसर हे आक्रमक आणि आपल्या सहकार्‍यांसाठी लढणारे असे होते. मात्र दोघांनी देशदूतला व्यवस्थापकीय पातळीवर ‘लीड’ करण्याचे काम अतिशय कुशलतेने केले. देशदूतमधील सर्व विभागप्रमुख आणि सहकार्‍यांना मी आधीच्या लेखांमध्ये मेन्शन केलेले असल्यामुळे येथे विस्तारभयास्तव मी पुन्हा उल्लेख टाळतो.

हे देखील वाचा : देशदूतचे दे धमाल दिवस

अपवाद वगळता, कोणत्याही वर्तमानपत्रांमधील संपादक आणि त्यांचे सहकारी यांच्यातील संबंध हे तसे सासू-सुनेप्रमाणे मानले जातात. किंबहुना आधी तरी तसेच होते. काळाच्या ओघात ( रिश्ता वोही सोच नई यानुसार !) संपादकांचा खाष्टपणा आणि तोरा बर्‍याच प्रमाणात कमी झाला आहे. खरं तर, आपले सहकारी तसेच प्रतिनिधी आणि वार्ताहरांचा छळ करणार्‍या त्यांचा पदोपदी पाणउतारा करणार्‍या संपादकांच्या अनेक सुरस कथा मीडियात आज देखील चघळल्या जातात. अनेकदा तर एखादा सहकारी हा संपादकापेक्षा चांगला लिहत असेल, त्याच्यात स्पार्क असेल वा एखाद्या रिपोर्टरचे मातब्बर मंत्री वा राजकारण्यांसोबत संबंध दृढ झाल्यास संपादक अस्वस्थ होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे बरेचसे संपादक हे आपल्या सहकार्‍यांना जाणीवपूर्वक दबावात ठेवत असतात. त्यांना पदोपदी आपणच ‘बॉस’ असल्याचे दाखवून देतात. अशी ‘बॉसगिरी’ सहन केलेल्या अनेक पत्रकारमित्रांनी याबाबत बरेच काही सांगितले आहे, अजूनही सांगत असतात.

हे देखील वाचा : सृजनशील साडेसाती

माझा एका वरिष्ठ पत्रकार मित्र म्हणतो की पुराण कथांमध्ये एखादा ऋषी तपश्‍चर्या करायला बसला की इंद्राचे सिंहासन डोलत असल्याचे अनेक संदर्भ आहेत. अगदी तसेच आपलाच एखादा सहकारी हा आपल्या पुढे तर निघून जाणार नाही ना ? ही चिंता बहुतांश संपादकांना सतावत असते. मात्र थँक गॉड…सुभाष सोनवणे साहेब हे याच्या अगदी विरूध्द होते. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना प्रचंड मोठी स्पेस दिली, त्यांना प्रोत्साहीत केले. याचा अनेक सहकार्‍यांनी आपल्या कौशल्याचा विकास करण्यासाठी चांगला लाभ करून घेतला. मात्र माझ्यासाठी तर ही सुवर्णसंधीच ठरली. दैनिक देशदूतच्या इतिहासातील सर्वाधीक लिहणार्‍यांपैकी एक असा लौकीक मी संपादन केला तो सरांनी दिलेल्या संधीमुळेच ! मी विविधांगी विषयांवर विपुल लिखाण केले.

एकीकडे प्रादेशिक विभागाचा प्रमुख म्हणून जिल्हाभरातील प्रतिनिधींच्या बातम्यांना यथायोग्य न्याय देण्याचा, त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचे काम करतांना दुसरीकडे विविध विषयांवरील सृजनाला अव्याहतपणे सुरू ठेवण्याची कसरत मी यशस्वीपणे पार पाडली. परिणामी पत्रकारितेतील कौशल्याचा विकास करतांनाच देशदूतच्या नेटवर्कशी संबंध जोपासण्याची संधी मला मिळाली. आज देखील देशदूत परिवारातील अनेक सदस्य माझ्या कायम संपर्कात असतात. माझे लिखाण वाचून मला आवर्जून कॉल करतात. तर काही जण माझ्या सोबत काम देखील करत आहेत.

हे देखील वाचा : शिल्पकाराच्या सावलीत

दैनिक देशदूतने मला घडविले, मजबूत केले, सृजनाला नवी दिशा दिली, आयुष्याला अर्थ दिला, स्वत्वाची ओळख दिली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानवी मूल्यांना समजण्याची एक नवीन दृष्टी दिली. अनेक संपादकांचा दुष्टपणा, खाष्टपणा, कपटीपणाचे बरेचसे किस्से चर्चेचा विषय बनत असतांना स्व. सुभाष सोनवणे सरांनी एक निकोप आणि स्पर्धात्मक अशी ‘कार्यसंस्कृती’ तयार केली. देशदूतमध्ये आज हाच वारसा विद्यमान संपादक हेमंतनाना अलोणे हे समर्थपणे चालवत आहेत. देशदूतच्या नंतर मी देखील दोन वर्तमानपत्रांमध्ये संपादक आणि आता स्वत:च्या व्यवसायात कार्यरत असतांना हीच कार्यसंस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. माझे सहकारी हे माझ्यापेक्षा कनिष्ठ नसून ते माझ्या बरोबरीचे असल्याची मला सोनवणे सरांकडून मिळालेली वागणूक मी नेटाने पुढे नेली आहे. यामुळे सरांना जशा अडचणी आल्या तशा मलादेखील आल्या. काही जणांचे तर खूप वाईट अनुभव आले. मात्र त्यापेक्षा जास्त अनुभव हे चांगले आले. सर्वात महत्वाचे म्हणजे यातून आत्मीक समाधान देखील मिळाले. यामुळे हीच रेषा प्रमाण मानून माझी वाटचाल सुरू आहे. सोनवणे सरांच्या शिकवणीनुसार फार मोठ्या ज्येष्ठ पत्रकारांसोबत काम करतांना मला न्यूनगंड जाणवला नाही, तर एखाद्या काल-परवा लागलेल्या ज्युनियरसमोर मी कधी अहंगंड देखील मिरवला नाही.

मी आयुष्यात कधीही कुणाचे अनुकरण केले नाही. मात्र मी दैनिक देशदूतच्या कार्यसंस्कृतीची तसेच संपादक सुभाष सोनवणे यांच्या सहकार्‍यांसोबतच्या वागणुकीची तंतोतंत कॉपी केलीय, आणि हे सांगतांना मला खूप अभिमान वाटत आहे. दैनिक देशदूत आणि अर्थातच सुभाष सोनवणे सर हे माझ्या हृदयात असले तरी देशदूतची ‘कार्य संस्कृती’ ही माझ्या डीएनएमध्ये भिनलेली असल्याचे आज मी कृतज्ञतेने नमूद करत आहे. आणि या ‘इको-सिस्टीम’मध्ये माझ्या सोबत काम करणार्‍या सर्व सहकार्‍यांचे यात नक्कीच योगदान आहे. या सर्व प्रणालीला अगदी ओथंबलेल्या हृदयाने दंडवत…!

खरं तर, पंचविशी ही अपार उर्जेची मानली जाते. याच अपूर्व ताकदीने व दमाने देशदूत पुढे जावा ही मनोकामना. आता देशदूत पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत असतांना अनेक आव्हाने आ वासून आहेत. मुद्रीत माध्यमांसमोर असणार्‍या सर्व आव्हानांना पुरून उरत देशदूतने तगावे, जगावे, बहरावे आणि विस्तारावे यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

About the author

shekhar patil

Leave a Comment