Featured slider चालू घडामोडी पत्रकारिता

उडीमार पत्रकार : काय करणार रवीश कुमार ?

Written by shekhar patil

सोशल मीडियाने जशी मेनस्ट्रीम मिडीयातील पत्रकारांची एकाधिकारशाही संपविली, तशीच त्यांच्या मर्यादांवर यथेच्छ टिंगल उडवण्याची हक्काची जागादेखील उपलब्ध करून दिली आहे. खरं तर यातील बहुतांश चिखलफेक ही तत्कालीन ट्रोलींगच्या पलीकडे विचार करण्यासारखी नसते. मात्र देशातील दिग्गज पत्रकारांपैकी एक म्हणून ख्यात असणार्‍या रविश कुमार यांनी रिपब्लीक भारत या वृत्तवाहिनीच्या पत्रकार शाजीया निसार व मृदूल शर्मा यांचा एक व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर करून आजच्या पत्रकारितेवर भाष्य केले, ते पाहून आपोआपच अंतर्मुख झालो. रवीश यांचे भाष्य हे चिंतनीय नक्कीच असले तरी याची दुसरी बाजू तपासून पाहिली असता आपल्याला अजून एक भीषण वास्तव दिसून येईल.

शेखर पाटील

रिपब्लीक भारतच्या पत्रकारांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून या संदर्भात रवीश कुमार यांची मूळ पोस्ट आपण https://bit.ly/3rFR46u या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात. त्यांनी या विषयाशी संबंधीत भाष्य करत पत्रकारितेच्या दिशेबाबत अतिशय उपहासात्मक टीका केली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दासारख्या गंभीर विषयाबाबत रिपोर्टींग करत असतांना रिपब्लीक भारतच्या पत्रकार अक्षरश: अंगात आल्यागत घुमत वा गरबा-दांडीया खेळण्यागत जो काही प्रकार करताय त्यावरून सोशल मीडियात प्रचंड ट्रोलींग होतेय. यावरून धम्माल मीम्स देखील व्हायरल झाले असून उथळ पत्रकारितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, याच प्रकारावर रविश कुमार यांनी टिका करत ही भारतातील ‘कूदंत पत्रकारिता’ असल्याची केलेली मल्लीनाथी देखील योग्यच आहे. मात्र या सर्व प्रकाराला वर्तमानातील इतर घटनांची जोड दिली असता, आधुनिक युगातील दिखावूपणा, उत्सवप्रियता आणि एकंदरीतच हाय एनर्जी दाखविण्याचा ऍटीट्युड याच्या मुळाशी असल्याचे दिसून येतो. यासोबत आपण इतरांपेक्षा वेगळे काही करण्याची व तशी दाखवण्याची उर्मी देखील याला कारणीभूत असल्याचे आपल्याला स्पष्ट दिसून येते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे लोकांची बदललेली आवड याचे देखील हा प्रकार प्रतिक असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

( खाली पहा रिपब्लीक भारत वाहिनीच्या पत्रकारांचा व्हायरल झालेला व्हिडीओ )

सोशल मीडियामुळे आपली अभिव्यक्ती ही असण्यापेक्षा दिसण्यावर व दाखविण्यावर शिफ्ट होतांना दिसून येत आहे. सगळीकडे ‘परफॉर्मींग आर्ट’ सुरू असल्याचे दिसते. विविध सोशल मीडिया मंचावरील व्हिडीओजच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ ही या दृष्टीने अभ्यासनीय अशीच आहे. यामुळे दृश्य पत्रकारितेची मानके देखील बदलू लागली आहेत. अगदी पार दूरदर्शनादी प्रारंभीचा कालखंड सोडून दिला तरी तरी खासगी वृत्तवाहिन्या सुरू झाल्यानंतरची काही वर्षे अनेक मातब्बर पत्रकारांनी व्हीज्युअल माध्यमाचा विलक्षण समर्पक वापर करून पत्रकारितेचा नवीन मापदंड प्रस्थापित केला. मात्र नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियात प्रत्यक्ष कॉंटेंटपेक्षा दिखावूपणा आणि काहीही करून सनसनाटी निर्माण करण्याचा हेकेखोरपणा वाढला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टिआरपीची गळेकापू स्पर्धा सुरू झाल्याने काहीही करून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अक्षरश: आचरट चाळे सुरू झाले. आज इलेक्ट्रॉनिक पेक्षाही विलक्षण गतीमान आणि सहजसुलभ असे डिजीटल माध्यम ऐन भरात येत असतांना याच दोन्ही माध्यमांमध्ये आचरटपणाचा अक्षरश: कळस झाल्याचे दिसून येत आहे. रिपब्लीक भारतच्या पत्रकारांची नाचून बातमी पेश करण्याचा प्रकार हा यातीलच मानावा लागेल.

रवीश कुमार यांनी म्हटल्यानुसार युध्दासारख्या संवेदनशील मुद्यावरील पत्रकारिता इतक्या उथळ पातळीवर नक्कीच असता कामा नये. मात्र यातील दुसरी बाजू देखील आपण तपासून बघावी. ज्या दोन पत्रकार जबरदस्त पध्दतीत ठेका धरून रिपोर्टींग करताय, त्यांचीच रिपब्लीक भारत ही वाहिनी टिआरपीमध्ये थेट दुसर्‍या क्रमांकावर विराजमान झालीय हे विसरून चालणार नाही. खरं तर, वर्तमानपत्राच्या खपांचे आकडे हे बहुतांश करून बनावट ( मॅन्युपिलेटेड ) असले तरी सर्वमान्य मानले जातात. त्याच प्रमाणे टिआरपीतील घोळ मान्य केला तरीही रिपब्लीक भारतने चक्क आजतक, एबीपी न्यूज, झी न्यूज, इंडिया टिव्ही आदींसारख्या दिग्गज वृत्त वाहिन्यांना मागे सारून दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतलीय. आता त्यांच्या पुढे फक्त टिव्ही नाईन-भारतवर्ष हे चॅनलच असून इतरांना अर्णब गोस्वामीने मात दिल्याचे वास्तव देखील आपल्याला समजून घ्यावे लागेल. विलक्षण संवेदनशील, सामाजिक मुद्यांना समर्पित असणारी पत्रकारिता करणार्‍या रवीश कुमार यांची एनडीटिव्ही ही वाहिनी पहिल्या दहामध्ये सुध्दा नाहीय हे देखील तितकेच वास्तव !

लोकप्रियता हा गुणवत्तेचा मापदंड असू शकत नाही, असताही कामा नये. शरीराला खूप हानीकारक असूनही कोणत्याही गावातील फास्टफूडच्या स्टॉलवरील गर्दी आणि त्याच गावातील पौष्टीक भाजी-पोळी वा अन्य पदार्थ विकणार्‍यांच्या ठिकाणच्या वर्दळीपेक्षा किती तरी पटीने अधिक असते. लोकांना जसे चटपणीत खाणे-पिणे आवडते, अगदी त्याच प्रकारात उथळ ज्ञान, अर्धवट माहिती आणि दर्जाहीन मनोरंजनही हवे असते. सोशल मीडियात व्हायरल होणारे बहुतांश कंटेंट हे याच प्रकारातील असल्याची बाब याची ग्वाही देणारी ठरली आहे. यामुळे युध्दाचे रिपोर्टींग कुणी अतिशय गांभीर्याने करत असेल तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे. याला वाचक/प्रेक्षक वर्गदेखील मिळतोच. मात्र, नाचून वा आक्रस्तळेपणाने केलेली पत्रकारितेला यापेक्षा जास्त लोकांना भावते हे देखील समजून घेतले पाहिजे. पहाणारे तयार असल्याने असला थिल्लरपणा बळावत चाललाय.

असे म्हणतात की, लोकांची लायकी असेल तसे राज्यकर्ते त्यांना मिळत असतात. याचनुसार जनतेलाच सवंगपणा हवा असेल तर नाचणारे, उड्या मारणारे वा आरडा-ओरडा करणारे पत्रकार त्यांना नक्कीच मिळतील आणि आवडतील. आणि रिपब्लीक भारतच्या यशातून आक्रस्तळेपणायुक्त पत्रकारितेला लोकाश्रय मिळत असल्याची बाब स्पष्टपणे अधोरेखीत झालीय. या वाहिनीवर ग्राफीक्सचा भरगच्च वापर, आरडा-ओरड करून सादर केलेले कार्यक्रम यांची यथेच्छ रेलचेल असून याला लोकांची पसंती मिळत असल्याच्या बाबीकडे दुर्लक्ष करता येणार नाहीच.

आज इलेक्ट्रॉनिक माध्यमात दिखावूपणाला मोठे महत्व आले आहे. लोकांना आपल्यातील वेगळेपण दाखविण्याची, त्यांना उल्लू बनवण्याची आणि काहीही करून खिळवून ठेवण्याची कला ही गुणवत्तेपेक्षा जास्त आवश्यक बनलीय. वृत्तवाहिन्यांमध्ये अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसू शकतात. दृश्य पत्रकारितेत परफॉर्मींग आर्ट हा यशाचा पासवर्ड झालाय, ही दुर्दैवी असली तरी ही बाब खरी आहे. रवीश कुमार यांच्यासह इतर अनेक मान्यवर पत्रकारांनी रिपब्लीक भारतच्या या उडीमार पत्रकारितेवर टीका केली असली तरी हा सर्व छपरी प्रकार समाजातील एका मोठ्या वर्गाला भावणारा आहे हे सत्य नाकारता येणार नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील हा आततायीपणा आज ट्रोलींगचा विषय बनला आहे. तथापि, एक पत्रकार आणि यापेक्षाही पत्रकारितेतील बदलांचा अभ्यासक म्हणून मला हा सर्व प्रकार अटळ आणि अपरिहार्य वाटतोय. अशा स्वरूपाचे प्रकार हे लोकांची आवड-निवड बदलत चाललीय याचे देखील प्रतीक होय. यामुळे रिपब्लीक भारतने टिआरपीत पहिल्या क्रमांक मिळविला तरी नवल वाटता कामा नये !

About the author

shekhar patil

Leave a Comment