Featured slider साहित्य

कोसलाकारांचे आद्य काव्य प्रेम

Written by shekhar patil

खान्देशचे थोर सुपुत्र डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा आज जन्म दिन ! वयाच्या पंचाऐशीव्या वर्षात पदार्पण करणार्‍या या दादा माणसाचा प्रत्येक वाढदिवस हा विविधांगी स्वरूपातून अनुभवण्याचा असतो. मी १०० टक्के ‘नेमाडपंथी’ ( आजच्या भाषेत अंधभक्त !) नाहीय, त्यांच्या देशीवादाच्या सिध्दांतील काही गृहितके तसेच विविध विषयांवरील मते ही पटणारी नसली तरी साहित्यमूल्याच्या पातळीवर मात्र ते उत्तुंग व्यक्तीमत्व होय यात शंकाच नाही.

खरं तर, मराठीतली तमाम साहित्य रसिक मंडळी ही हिंदू चतुष्टातील दुसर्‍या ग्रंथाची वाट पाहत असतांना मध्यंतरी याआधीच त्यांचा काव्यसंग्रह येणार असल्याची माहिती समोर आल्याची बाब ही मला थोडी विलक्षण वाटली. हिंदू चतुष्टातील दुसर्‍या कादंबरीची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली असून अनेकदा याबाबत विरोधी कंपू खवचट प्रतिक्रिया देखील देत असल्याचे आपल्याला दिसून येते. याबाबत कधीही घोषणा होईल अशी स्थिती असतांना याच्या आधीच कदाचित भालचंद्र नेमाडे यांचा कविता संग्रह येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी आपल्या कादंबर्‍यांमधून वेगळा फॉर्म आणला. याला मान्यता देखील मिळाली. नेमाडेंच्या कादंबर्‍या या जीवनातील निरर्थकतेसोबत जातीयतेसह विविध सामाजिक विषयांवर प्रखर भाष्य करणार्‍या आहेत. समीक्षा करतांना ते अनेकदा विलक्षण कठोर झाल्याचे दिसून येते. त्यांच्या शैलीत तिरकसपणा ( अनेकदांच्या मते तुच्छतावाद !) देखील जाणवतो. मात्र कवि भालचंद्र नेमाडे हे यापेक्षा खूप वेगळे आहेत.

भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या पंचविशीत पदार्पण करतांना लिहलेल्या ‘कोसला’ने मराठी साहित्यात खळबळ उडवून दिली. मराठी कादंबरीचे तेव्हापर्यंतचे सर्व मापदंड आणि रूपके उद्ध्वस्त करणारी ‘कोसला’ ही याचमुळे मैलाचा दगड म्हणून गणली गेली. मात्र कोसलाच्या फार आधीपासूनच भालचंद्र वनाजी नेमाडे हा सांगवीकर मुलगा काव्याच्या प्रेमात पडला होता. आपण वयाच्या पंधराव्या वर्षापासून कविता करत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत नमूद केले आहे. तथापि, कोसलानंतरचे ‘चांगदेव चतुष्ट्य’ आणि अलीकडे हिंदू मालिकेवर लक्ष केंद्रीत करतांना त्यांनी मोजक्याच पण अतिशय सकस अशा कवितांचे सृजन केले. तसाही भाराभर लिखाण करणे त्यांनी सातत्याने टाळले आहे. जे काही जगासमोर मांडायचे ते परिपूर्ण पध्दतीतच असा त्यांचा कायम दंडक असल्याचेही सर्वांनी अनुभवले असतांना त्यांना दैनंदिन कामातून मोठा विराम मिळाला तो कोरोनाच्या काळात ! याचाच सृजनासाठी वापर करून त्यांनी वर्षभर फक्त कविताच लिहल्या. याच कवितांचा संग्रह लवकरच प्रकाशित होणार असल्याने याबाबत साहजीकच उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे.

डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या कविता विलक्षण सारगर्भ आहेत. खरं तर, त्यांना संपूर्ण सजीव सृष्टीविषयची कणव ही कादंबर्‍यांमधूनही आलेली असली तरी याची काव्यातील गुंफण ही काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. असेही त्यांचे लिखाण हे प्राचीन संतपरंपरेशी नाते सांगणारे असल्याने त्यांच्या भाषेत एक सहज प्रवाहीपणा आहेच. याच प्रवाहाला कवितेत धीरगंभीरपणा आणि अथांगतेचा आयाम मिळाल्याचे आपण अनुभवू शकतो. नेमाडेंच्या लिखाणात महिलांविषयी आत्यंतीक कारूण्य ओसंडत असते. यातूनच ”अशा कशा रांगोळ्या काढतात तुम्ही घरंदाज व्यथांनो ?” हा प्रश्‍न साध्या काव्यपंक्तींना अंतर्मुख करणार्‍या उंचीवर घेऊन जातो. नेमाडेंचा कट्टर फेमिनिझम हा त्यांच्या आगामी काव्यसंग्रहातही असेल असे त्यांनीच सांगितले आहे. साधनाच्या अंकात नम्रता फलके यांनी आकाशवाणीसाठी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तर भाष्य केले आहे. यातील एका कवितेत तर आपल्या आजीपासून ते नातीपर्यंतच्या प्रवासातील मैत्रीणी, प्रेयसी, पत्नी, मुली, सहकारी या सर्व महिलांना त्यांनी सामावून घेतल्याची माहिती दिली आहे. तर, येथेच त्यांनी आपली पत्नी सौ. प्रतिभा यांच्यावरील एका कवितेतील काव्यपंक्ती देखील दिल्या आहेत. यामुळे हा काव्यसंग्रह मातृशक्तीचे सृजनस्तोत्र असेल का ? ही उत्सुकता देखील लागली आहे.

भालचंद्र नेमाडे यांची साहित्याबाबतची मते सडेतोड आणि पारंपरीक विचारांना हादरा देणारी आहेत. कथा हा साहित्य प्रकारच नसल्याची ठाम भूमिका मांडणार्‍या नेमाडेंना आवडते ती कविताच ! आयुष्याच्या उत्तरार्धात हा साहित्यमहर्षी पुन्हा नव्याने काव्यसृजनात जीवनाचा अर्थ शोधत असल्याची बाब देखील आपण लक्षात घेण्याची गरज आहे. यात कोरोना काळातील काळोखमय कालखंडाचे संदर्भ देखील येतील का ? अत्याधुनिक संपर्क यंत्रणांनी खर्‍याखुर्‍या संवादापासून तुटलेपणाची व्यथा यातून अभिव्यक्त होणार का ? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या भोवती भेदाच्या भिंती प्रचंड गतीने उभ्या राहत असतांना भालचंद्र नेमाडे यावर प्रखर भाष्य करणार का ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला मेलडी आणि देखणी नंतरच्या त्यांच्या आगामी काव्यसंग्रहातूनच मिळणार आहेत.

‘नोटस ऑफ मॅडमॅन’ ही ओशो रजनीश यांच्या संवादावर आधारित लहानशी पुस्तीका आहे. जीवनातील समस्त सौंदर्यबोधांवर त्यांनी अतिशय भावपूर्ण विवेचन केलेय. यात आयुष्यभरात विपुल ( साडेसहाशे ग्रंथांच्या आसपास साहित्य निर्माण होईल इतके !) बोलल्यानंतर ओशोंनी आपल्याला जगाने तत्वचिंतक, प्रेषीत वा कुणी धर्मपुरूष म्हणून नव्हे तर कवि म्हणून ओळखले जावे अशी इच्छा व्यक्त केली होती. भालचंद्र वनाजी नेमाडे या महान माणसालाही आपण कादंबरीकार, समीक्षक, विचारवंत वा प्रखर भाष्यकार म्हणून नव्हे तर कवि म्हणून ओळखले जावे असे तर वाटत नसेल ना ? मला तरी तसेच वाटते. कविता हे आपले पहिले प्रेम सांगणार्‍या नेमाडेदादांच्या काव्यसंग्रहाची उत्सुकता याचमुळे किती तरी पटीने वाढलेली आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment