Featured slider अनुभव आध्यात्म

ओशो डायनॅमिक मेडिटेशन : गती व विरामाचे संतुलन

Written by shekhar patil

आज ओशो रजनीश यांचा तिसावा महानिर्वाण दिन. कधी काळी रजनीश शब्द हा घृणेचा निदर्शक होता. तर आज आम्ही ओशोंना वाचतो/मानतो असे म्हणण्याची फॅशन आलीय. गेल्या महिन्यात मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या नावाने ‘इंटरनॅशनल फेस्टीव्हल’ आयोजित करून आपल्या भूमिच्या या थोर सुपुत्राला ते गेल्यानंतर तीन दशकांनी का होईना सन्मान दिला. आज ओशोंना पृथ्वीतलावरील असंख्य लोक फॉलो करत आहेत. यात विश्‍वविख्यात सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंतचा समावेश आहे. तथापि, जगात आज सर्वाधीक वाचल्या व ऐकल्या जाणार्‍या या माणसाला समजून घेणे फार कठीण आहे. त्यांनी आयुष्यभरात दिलेल्या प्रवचनांच्या माध्यमातून तब्बल साडे सहाशेच्या जवळपास ग्रंथ निर्मित झाले आहेत. यात परस्पर विरोधाभास खूप आहे. त्यांच्या तत्वज्ञानात प्रचंड वैचारिक तफावत आढळते. यामुळे कधी भक्ती तर कधी ध्यान; कधी योग तर कधी ज्ञान आदींना महत्ता देणार्‍या ओशोंना नेमके म्हणायचे तरी काय ? हा प्रश्‍न बहुतेकांना पडतो. यात तथ्यदेखील आहे. कारण बुध्दीच्या मर्यादेची जाणीव आपण ठेवत नाही. खरं तर, पोहण्याचे पुस्तक वाचून कुणी पोहणे शिकू शकत नाही. यामुळे ओशोंचे विचार वाचून वा ऐकून आनंद मिळत असला तरी हा खूप वरवरचा प्रकार आहे. त्यांना खरे समजून घ्यायचे तर ध्यानात शिरायला हवे. आज ओशोंच्या महानिर्वाण दिनानिमित्त मला या बद्दलच दोन शब्द सांगावेसे वाटतात. खरं तर आजवर मी बौध्दीक आणि भावनिक पातळीवर विपुल लिखाण केलेय. यापुढे याला आत्मीक अनुभूतीपर लिखाणाची जोड मिळणार असल्याचेही मी नम्रतापूर्वक नमूद करत आहे.

जीवन हे द्वंदावर आधारित आहे. याची प्रचिती मलादेखील आलेली आहे. माझ्यापुरते बोलायचे तर मला इतक्या परस्परविरोधी बाबींमध्ये रस आहे की अनेक जण चकीत होतात. यातील अजून एक आयाम हा माझ्या निकटवर्तीयांशिवाय कुणालाही माहित नाही. तो म्हणजे माझ्या आयुष्यात आध्यात्मीकतेचा खूप मोलाचा वाटा आहे. मी माझ्या कुमारवस्थेत जितके वाचन केले असेल, जितका क्रिकेट, फुटबॉलादी खेळ खेळलो असेल वा अन्य तारूण्यसुलभ आकर्षणांच्या मागे धावलो असेल त्याच्या पेक्षा जास्त मला रस हा आध्यात्मीक साहित्यासह साधू, संत, फकीर आदी मंडळींमध्ये होता. मी अनेक वर्षे यासाठी विलक्षण झपाटलो होतो. मी झपाटून वाचन केले. तसेच या क्षेत्रातील अनेकांना भेटलो. अगदी बाळबोध विचारधारांपासून ते अत्युच्च तत्वज्ञानाचे कल्ट; सात्वीक विचारांपासून ते तंत्र-मंत्रापर्यंतचे विविध पंथ-उपपंथ आदींची किमान प्राथमिक माहिती तरी मिळवली. अनेक पंथांची उपासनाही केली. या मार्गावर अनेक चित्तथरारक घटना घडल्या. माझ्या अंतर्यात्रेत भेटलेले बहुतांश लोक हे तद्दन भंपक व भोंदू होते. थोडी मंडळी ही वर्तनाने भली आणि वागण्यात सज्जन असली तरी मात्र पारलौकीकतेची कोणतीही अनुभूती नसणारे होते. तर शंभरातील फक्त एकच जण खरोखर आध्यात्मीक होता. अशा एक टक्क्यावाल्यांच्या शोधात अनेक वर्षे व्यतीत केल्यानंतर एका घटनेमुळे माझे जीवन बदलून गेले. येथेच माझा शोध देखील थांबला.

माझा कॉलनीमधील ( विद्यानगर, भुसावळ ) मित्र संतोष पुरूषोत्तम चौधरी याने ओशो रजनीश यांचे ध्यानयोगाचे पुस्तक प्रेझेंट केल्यानंतर मला प्रचंड सुखद धक्का बसला. मी याला वाचून झपाटलो गेलो. सुदैवाने माझ्या दुसर्‍या मित्राचे (डॉ. अमित) आजोबा गोपाळ नारायण फेगडे हे भुसावळच्या ध्यान केंद्राचे संचालक होते. त्यांच्या इमारतीतच हे केंद्र होते. त्यांच्याकडे ओशोंची जवळपास ९५ टक्के ग्रंथसंपदा होती. मी याचा जवळपास तीन वेळा फडशा पाडला. मात्र समाधान होत नव्हते. मनातील संभ्रम वाढत होता. अशाच अवस्थेत मी पहिल्यांदा ओशोंनीच विकसित केलेले डायनॅमिक मेडिटेशन ( सक्रीय ध्यान ) केले अन् माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मी अजूनही वर्षातून अनेक दिवस हे ध्यान नियमितपणे करतो. यात मला आलेली अनुभूती ही सांगता येणार नाही. मात्र एकूणच आयुष्यात सकारात्मकता व संतुलन येण्यामागे हेच ध्यान असल्याचे मी अगदी नि:संदिग्धपणे सांगू शकतो.

ओशोंनी स्वत: १०० पेक्षा जास्त ध्यान विधी विकसित केल्या असल्या तरी माझ्या मते याचे सर्वोच्च शिखर म्हणजेच ‘डायनॅमिक मेडिटेशन’ होय. त्यांनी आयुष्यात एक शब्दही बोलला नसता तरी हे एक ध्यान त्यांना मानव जातीच्या इतिहासात मानाचे स्थान निर्माण करणारे ठरू शकले असते इतके ते विलक्षण परिणामकारक आहे. खरं तर ध्यान म्हटले की, आपल्यासमोर अगदी निवांतपणे पद्मासनात बसलेला व्यक्ती डोळ्यासमोर येतो. कारण ध्यान हे याच पध्दतीत केले जाते असा समज रूढ झालेला आहे. यासोबत ध्यान म्हणजे एकाग्रता असाही समज रूढ झालेला आहे. मेडिटेशनमध्ये कुणावर तर लक्ष केंद्रीत करावे लागते अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. अर्थात, ध्यान म्हणजे ‘आत्यंतीक शिथीलतायुक्त विराम’ असे आपण सर्व जण समजतो. ओशोंच्या डायनॅमिक मेडिटेशनमध्ये मात्र याच्या अगदी विरूध्द स्टेप्स आहेत. यात विराम असला तरी तो आत्यंतीक सक्रीयतेतून आलेला असतो. तीव्र गतीनंतरची शिथीलता यात कुणीही अनुभवू शकतो. तसेच याला उत्सवाची जोडदेखील देण्यात आलेली आहे. याचमुळे हे ध्यान पारंपरीक पध्दतीचे नसून यात गती आणि शिथीलतेचा अफलातून मिलाफ आहे. यात पाच स्टेप्स असून प्रत्येक भाग हा आधीच्या, नंतरच्या आणि एकूणच ध्यानाच्या संपूर्ण प्रक्रियेशी सुसंबध्द असाच आहे. प्राचीन भारतीय ध्यान परंपरा आणि आधुनीक मनोचिकीत्सा याचा संगम यात करण्यात आलेला आहे. म्हणजेच यात धर्म आणि विज्ञानाचा मिलाफ आहे.

डायनॅमिक मेडिटेशन करण्याआधी आपण काही बाबी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

१) सक्रीय ध्यानात प्रचंड शारीरीक हालचाली होत असल्याने आपण हे करतांना निरोगी असणे गरजेचे आहे. विशेष करून हृदयविकार, फुफ्फुसांशी संबंधीत विकार वा अन्य विकार असणार्‍यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे ध्यान करावे हे अपेक्षित आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिले काही दिवस हे ध्यान तज्ज्ञ वा अनुभवी साधकाच्या मार्गदर्शनाखालीच करावे.

२) हे ध्यान शक्यतो पहाटे लवकर करावे. हे करतांना आपले पोट रिकामे असावे. तर अंगावर सैलसर कपडे असल्यास उत्तम. ध्यानात साधकाने आपले डोळे पूर्णपणे बंद केलेले असावेत. यातील पहिल्या तीन स्टेप्स या प्रत्येकी दहा तर नंतरच्या दोन प्रत्येकी १५ मिनिटांच्या आहेत.

३) सक्रीय ध्यानासाठी स्वतंत्र एक तासाचे संगीत तयार करण्यात आले असून यात विविध स्टेप्सचे बदल सहजपणे लक्षात येतात. यामुळे ध्यान करतांना संगीत आवश्यक आहे.

४) सक्रीय ध्यान हे एकट्याने देखील करता येते. तथापि, याचा चांगला इफेक्ट हा सामूहिक ध्यानात मिळत असल्याचा अनेक साधकांचा अनुभव आहे. यामुळे प्रारंभी तरी काही जणांसोबत हे ध्यान केल्यास चांगला परिणाम मिळू शकतो.

५) हे ध्यान खर्‍या अर्थाने निधर्मी असून यात कोणत्याही प्रकारचा पूजा-पाठ वा उपासनेचा समावेश नाही. हे ध्यान केल्याने आपल्या आयुष्यात कोणतीही भौतिक सुख-समृध्दी येईल वा चमत्कार होईल अशी अपेक्षा चुकूनही करू नये. कारण हे ध्यान आत्मोन्नतीसाठी असून याच्यामुळे आपल्याला आयुष्यात सच्चीदानंदाची अनुभूती घेता येईल.

पाच वेगवेगळ्या स्टेप्स

वर नमूद केल्यानुसार सक्रीय ध्यानाच्या पाच वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. संगीतात बदल झाल्यानंतर यात बदल करायचा असतो.

१) अराजक श्‍वास : ध्यानाच्या पहिल्या १० मिनिटांमध्ये साधकाने अराजकपणे श्‍वास घ्यावयाचा असतो. श्‍वास हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. आपल्या वेगवेगळ्या मनोदशा या श्‍वासाच्या बदलांशी संबंधीत असतात. प्रत्येकाचा श्‍वास घेण्याचा एक स्वतंत्र पॅटर्न असतो. हा पॅटर्न तोडण्याचे काम पहिल्या स्टेपमध्ये करण्यात येते. यात साधकाने प्रचंड गतीने श्‍वास घ्यायचा असतो. हे सहजसोपे नसल्याने साधकाने प्रचंड गतीने श्‍वास सोडण्याकडे लक्ष द्यावे. कारण शरीर श्‍वास बरोबर घेते. परिणामी, पहिल्या टप्प्यात योगामध्ये भस्त्रीका करतो त्या पध्दतीत विलक्षण गतीने श्‍वास सोडावा.

लाभ : सुमारे दहा मिनिटे तीव्र गतीने श्‍वास सोडल्यानंतर तितक्याच गतीने श्‍वास घेतला जातो. यामुळे ऑक्सीडेशन होते. अर्थात, शरीरशुध्दी होऊन फ्रेश वाटते. या स्टेपमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.

२) रेचन : दहा मिनिटांचे अराजक श्‍वासचक्र संपल्यानंतर पुढील दहा मिनिटांमध्ये रेचन करायचे असते. खरं तर रेचन (कॅथार्सिस) हा आधुनीक मनोचिकित्सेतील महत्वाचा घटक होय. आपण दैनंदिन जीवनात अनेक विचार व भावना दाबत असतो. कधी आपल्याला जोराने हसावेसे वाटते, कधी रडावेसे वाटते, कधी कुणावर रागवावेसे वाटते. मात्र सामाजिक शिष्टाचारामुळे आपण असे करू शकत नाही. हा सर्व दडपून टाकलेला भाग दुसर्‍या स्टेपमध्ये अगदी मुक्तपणे अभिव्यक्त करायचा असतो. यामुळे कुणाला रडू येते तर कुणाला हसू…कुणी गाणे म्हणते तर कुणी शिव्यांचा वर्षाव करत असल्याचे प्रकार घडतात. पहिल्यांदा हे सगळे विचीत्र वाटते. आतून काही बाहेर येत नाही. तथापि, काही दिवसांमध्येच साधकाच्या मनाच्या कान्याकोपर्‍यातील विकार बाहेर पडतात.

लाभ : सक्रीय ध्यानातील या दुसर्‍या स्टेपमुळे मनशुध्दी होते. जाणीवपूर्वक मनोविकारांचे रेचन केल्यामुळे साहजीकच तणावाचेही निराकरण होते.

३) हू-हू आघात : दुसरी स्टेप संपल्यानंतर लागलीच साधकाने दोन्ही हात वर करून उड्या मारत हू-हू-हू असे बोलायचे आहे. यातील ‘हू’ हा उच्चार गळ्यापासून नव्हे तर पोटातून निघेल अशा पध्दतीत करायचा आहे. ‘हू’ हा उच्चार सरळ मूलाधार चक्रावर आघात करून उर्जेचे उत्थान करतो.

लाभ : वर नमूद केल्यानुसार हू या मंत्राच्या आघातामुळे उर्जेचे उत्थान होते. भारतीय परंपरेनुसार याला कुंडली उर्जेचे उर्ध्वगमन असे म्हणता येईल. पहिल्या टप्प्यात शरीर शुध्दी, दुसर्‍यात मनशुध्दी झाल्यानंतर या तिसर्‍या स्टेपमध्ये विपुल प्रमाणात उर्जा निर्मितीच्या माध्यमातून आत्मीक उन्नती होते.

४ साक्षी भाव : आत्यंतीक गतीने ‘हू-हू’ सुरू असतांना संगीत अचानक थांबते आणि सक्रीय ध्यानाचा चौथा टप्पा सुरू होतो. खरं तर, शारिरीक हालचाली शिखरावर पोहचल्या असतांना अचानक थांबणे हा साधकाला एक धक्का असतो. यानंतर त्याला पुढील पंधरा मिनिटे हा आहे त्या स्थितीत स्तब्ध उभे रहावे लागते. या कालावधीत साधकाने आपल्या मनात आलेल्या विचारांकडे तटस्थपणे पहायचे असते. डायनॅमिक मेडिटेशनच्या पहिल्या तीन स्टेप्स या पूर्व तयारी असून चौथ्या टप्प्यात खर्‍या अर्थाने ध्यान साधले जात असल्याची बाब आपण लक्षात घेण्याची गरज आहे. या कालवधीत संगीत पूर्णपणे थांबलेले असते.

लाभ : विचारांकडे तटस्थपणे पाहणे अर्थात ‘साक्षीभाव’ हा आत्मोन्नतीमधील सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. विपस्सनेत श्‍वासाबाबतचा साक्षीभाव असतो. तर या ध्यानात आपण अगदी तटस्थपणे विचारांचे अवलोकन करायचे असते. यातून निर्विचारतेची झलक आपल्याला मिळते. पहिल्यांदा या प्रकारची अगदी लहान-लहान क्षणांची अनुभूती मिळते. जी नंतर प्रगाढ होत जात साधकाची अंतर्यात्रा गतीमान होते.

५) उत्सव : पंधरा मिनिटांचा साक्षीभाव संपल्यानंतर अतिशय मोहक असे संगीत सुरू होते. यावर साधकाने अगदी हलक्या स्वरूपाचे नृत्य करून आपल्याला मिळालेला आनंद अभिव्यक्त करायचा असतो.

लाभ : पहिल्या तीन टप्प्यांमध्ये उर्जेची निर्मिती व उत्थान; चौथ्या टप्प्यात अक्रियता तर पाचव्या भागात या सर्व अनुभूतींचे सेलिब्रेशन केले जाते. आपल्याला मिळालेला आनंद हा नृत्याच्या माध्यमातून अस्तित्वासोबत वाटला जातो.

सक्रीय ध्यान हे अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. एक तर हे शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर हिलींग करणारे आहे. यामुळे साधकाला शारिरीकदृष्टया तंदुरूस्तीचा अनुभव येतो, मूड फ्रेश राहतो आणि आत्मीक पातळीवरही विकास होतो. साधारणपणे कुणीही समग्रतेने हे ध्यान तीन महिने केल्यास पुढे याला करण्याची गरज राहत नाही. तथापि, याला पूर्णतेने करणे फारसे सोपे नाही. यामुळे सातत्य टिकले नाही तरी हे ध्यान प्रदीर्घ काळापर्यंत करता येते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे खरे ध्यान हे परम अक्रियतेमध्ये असल्याने सक्रीय ध्यान ही याची पहिली पायरी असल्याचे ओशोंचे मत आहे. यामुळे डायनॅमिक मेडिटेशन ही अंतर्यात्रेतील पहिली पायरी असल्याची बाब लक्षात घेण्याची गरज आहे.

ओशोंनी आपल्या तत्वज्ञानात हास्य-विनोदाला महत्वाचे स्थान दिले आहे. याच प्रकारे त्यांचा ‘हसीबा खेलीबा…धरीबा ध्यानम’ म्हणजेच हसत-खेळत ध्यान हा संदेशही होता. डायनॅमिक मेडिटेशन म्हणजेच सक्रीय ध्यान हे देखील याच प्रकारातील असून याला केल्याने आपल्या आयुष्यात खरे हास्य व आनंद अवतरू शकतो. याची प्रचिती मला आलीय हे मी ठामपणे सांगू शकतो.

खालील व्हिडीओत सक्रीय ध्यानाच्या पाचही स्टेप्स क्रमानुसार दिलेल्या आहेत.

सक्रीय ध्यानाचे संपूर्ण संगीत खाली दिलेले आहे.

ओशो सक्रीय ध्यानावर विपुल बोलले असून यातील एक प्रवचन खालील व्हिडीओत दिलेले आहे.

डायनॅमिक मेडिटेशनबाबत अधिक माहिती ही खालील लिंक्सवर उपलब्ध आहे.

https://www.oshodynamic.com

http://oshomeditationstudio.com/portfolio/dynamic-meditation

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment