Featured slider चित्रपट

मेरे सपने हो जहाँ…ढुंढू मै एैसी नजर !

Written by shekhar patil

उमलत्या वयातील भावविश्‍वाशी एकरूप झालेले घटक हे मर्मबंधातील ठेवीसमान असतात. हृदयाच्या पार तळाशी कुलूपबंद कराव्यात अशा…कधी तरी कातर प्रसंगात आठवणी उफाळून येतात आणि सुरू होतो ‘यादो का सिलसिला’…याच प्रकारे नव्वदच्या दशकात वयात आलेल्यांना जीवनभराची भावशिदोरी देण्याचे काम हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रतिभावंतांनी केले. यातील एक मोठे नाव असणार्‍या नदीम-श्रवण या लिजंडरी जोडीतील श्रवणकुमार राठोड यांच्या निधनाची बातमी सकाळी समजली आणि एकामागोमाग एक अशा सुरील्या आठवणी ताज्या झाल्या.

हिंदी चित्रपटांमधील गाण्यांचा विचार केला असता पन्नास आणि साठचे दशक सुवर्ण युग होते. नंतर थोडी चमक फिकी पडली. तरी सत्तरच्या दशकात मेलोडी टिकून होती. ऐंशीच्या दशकात मात्र निवडक अपवाद वगळता धांगडधिंगा आला. याच दशकाच्या शेवटी आलेल्या कयामत से कयामत तक व मैने प्यार किया आदींच्या रूपाने ही स्थिती बदलण्यास सुरूवात झाली. याच काळात तंत्रज्ञानातील बदल हे एका नव्या क्रांतीला जन्म देणारे ठरले. व्हिसीआरच्या माध्यमातून मनोरंजनाचे लोकलायझेशन होत असतांनाच गुलशन कुमार या हिकमती माणसाने ऑडिओ कॅसेटच्या माध्यमातून संगीताचे खर्‍या अर्थाने लोकशाहीकरण केले. यातून उभ्या राहिलेल्या भल्या मोठ्या साम्राज्यातील एक मोठा अध्याय हा नदीम-श्रवण अर्थात नदीम सैफी आणि श्रवण कुमार राठोड या संगीतकार जोडगोळीच्या माध्यमातून समोर आला.

भारतातील म्युझिक इंडस्ट्रीत गुलशन कुमार यांच्या ‘टि सेरीज’ने ऐंशीच्या दशकाच्या मध्यापासूनच पाय रोवायला सुरूवात केली असली तरी त्यांना पहिले जबरदस्त यश लाभले ते आशिकीच्या स्वरूपात ! खरं तर आधी सटर-फटर प्रॉडक्शन केल्यानंतर कयामत से कयामत तक, त्रिदेव आदींसारख्या चित्रपटांच्या ऑडिओ कॅसेटमुळे ‘टि सेरीज’चा वारू आधीच उधळला होता. मात्र अत्यंत महत्वाकांक्षी असणार्‍या गुलशन कुमार यांनी स्वत: चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. आशिकी या चित्रपटाचे कथानक फारसे दमदार नसतांनाही यातील गाण्यांनी इतिहास घडविला. याच्या तब्बल दोन कोटी कॅसेटस् विकल्या गेल्या. आजही हा विक्रम अबाधित आहे. राहूल रॉय आणि अनु अगरवाल यांच्या सारख्या अनाम व ठोकळ्यासमान असणार्‍या चेहर्‍यांना यामुळे अलोट लोकप्रियता लाभली. तर यातून नदीम व श्रवण या जोडीचा खर्‍या अर्थाने भाग्योदय झाला.

जवळपास दीड दशकांपासून उमेदवारी करणार्‍या या दोघांना यातून खर्‍या अर्थाने ब्रेक मिळाला आणि याच जोडीने नव्वदच्या दशकातील हिंदी चित्रपट संगीतावर हुकुमत गाजविली. गुलशन कुमार यांच्या चमूमध्ये नदीम-श्रवण जोडीचा प्रवेश झाला. सोबत गीतकार समीर, गायक कुमार सानू व उदीत नारायण तर गायिका अनुराधा पौडवाल व अलका याज्ञिक अशी जबरदस्त टीम तयार झाली. यातून रूपेरी पडद्यावर अनेक अजरामर संगीतकृती साकार झाल्या. यथावकाश ही टिम फुटली. तरी नदीम-श्रवण आणि गुलशन कुमार मात्र यशाच्या पायर्‍या झपाट्याने चढले.

नदीम-श्रवण यांच्याकडे त्यांच्या उदयानंतर काही वर्षांनी तळपू लागणार्‍या ए. आर. रहेमानसारखे जादूई प्रतिभाशक्ती नाही. त्यांनी भारतीय वा पाश्‍चात्य शास्त्रीय संगीताचाही फार वापर केला नाही. तर त्यांच्यात प्रयोगशीलता नसली तरी सहजपणे ओठांवर रूळणारी गाणी त्यांनी रचली. नव्वदच्या दशकातील आर्थिक उदारीकरणात नवतारूण्यात आलेल्यांना या जोडगोळीने भारून टाकले. त्यांच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द-सुरांचा साजही त्यांनीच दिला.

अतिशय अलवार भावनांच्या अभिव्यक्तीपासून ते उडत्या चालीच्या गाण्यांना त्यांनी समर्थपणे न्याय दिला. मात्र हे होत असतांना संगीतातील मेलोडी हरवणार नाही याची मात्र त्यांनी काळजी घेतली. यामुळे किमात आठ-नऊ वर्षापर्यंत या जोडीने बॉलिवुडच्या संगीतविश्‍वावर साम्राज्य गाजविले. गुलशन कुमार यांच्या हत्येमध्ये नदीम सैफी यांचे नाव आल्यानंतर कारकिर्दीच्या ऐन शिखरावर असतांना या जोडीवर आघात झाला. नदीम पळून जाऊन लंडनमध्ये स्थायीक झाला. हा अध्याय घडला नसता तर कदाचित अजून अनेक वर्षे त्यांनी हुकुमत गाजविली असती. मात्र यानंतर सहा-सात वर्षात ही जोडी अधिकृतपणे फुटली.

आज श्रवणकुमार राठोड यांच्या निधनाने नदीम-श्रवण जोडीचे ते भारावलेले युग पुन्हा एकदा रसिकांसमोर साकार झाले आहे. एकामागून एक अनेक सुपरहिट चित्रपटांना गाणी देणार्‍या या जोडीच्या संगीतात असे नेमके काय होते जे त्यांना यशोशिखरापर्यंत घेऊन गेले ? याचे उत्तर एका वाक्यात देता येणार नाही. मात्र त्यांनी कधीही क्लिष्ट शब्दरचना व संगीताचा वापर केला नाही. सहजसोपे गीत आणि तितकेच सुलभ संगीत ही त्यांची खासियत होती. सतार, बासरी, संतुर, शेहनाई आदींसारख्या भारतीय वाद्यांचा विपुल वापर त्यांनी केला. या वाद्यांचा पाश्‍चात्य संगीतासोबत मिलाफ त्यांनी केला. मात्र यासोबत त्यांनी गिटारचाही अतिशय समर्पक असा वापर केला. दंतकथा बनलेल्या आशिकीच्या जवळपास प्रत्येक गाण्याला गिटारच्या संगीताचा टच आहे. परदेस चित्रपटातील ‘दो दिल मिल रहे है…’ या गाण्यात देखील त्यांना असाच वापर केला आहे. तर ‘तुमसे अच्छा कौन है’ मधील ‘आंख है भरी भरी और तुम मुस्कुराने की बात करते हो’…यातील गिटार तर अप्रतिम…! तर मोजक्या पण अतिशय दर्जेदार अशा दुल्हे का सेहरा सुहाना लगता है/हो गया है तुमसे प्यार कव्वाल्या देखील त्यांनी अजरामर केल्या आहेत. आणि एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी आलेल्या राज चित्रपटातील विविध गाण्यांमध्ये झिंग आणणारा पाश्‍चात्य ठेका देखील त्यांनी तितक्याच कौशल्याने वापरला.

नदीम-श्रवण ही जोडी प्रेमगितांसाठी ख्यात आहे. प्रेम आणि ते देखील अतिशय आसुसलेले, विरहाग्नीत जाळणारे, आयुष्य उदध्वस्त करणारे आणि जीवनाला उभारी देखील देणारे…कधी मुग्ध तर कधी दग्ध, कधी सिडक्टीव्ह तर कधी प्लॅटोनिक, कधी मोटिव्हेशनल तर कधी उदास करणारे….प्रेमाची ही सगळी विलक्षण रूपे आपल्याला नदीम-श्रवण यांच्या गाण्यांमध्ये आढळून येतात. प्रेमातील भग्नता ही त्यांच्या काही गाण्यांची मुख्य थीम देखील आशिकांच्या व्यथांना शब्द देणारी ठरली.

मला स्वत:ला या जोडीची अनेक गाणी आवडतात. आशिकीतील तर सर्व गाणी अविट गोडीची आहेत. सडक, साजन, राजा हिंदूस्थानी, परदेस, धडकन आदींमधील गाणी तर भावविश्‍वाशी समरस झालेली आहेतच. पण अन्य तुलनेत लोकप्रिय नसणार्‍या चित्रपटांमधील गाणी देखील तितकीच आवडतात. मात्र नंबर वन गाणे हे आशिकीतील ‘सांसो की जरूरत है जैसे जिंदगी के लिये’… यापेक्षा दुसरे कोणतेही असूच शकत नाही !

वक्त के हाथो मे सबकी तकदिरे है
आईना झुठा है सच्ची तस्वीरे है ॥

प्रेम हे आयुष्यातील कधीही न फिक्या पडणार्‍या प्रतिमेसमान असते. वास्तवचे दर्शन घडविणारा आरसा हा खोटा ठरविण्याची किमया ही फक्त आणि फक्त प्रेमातच असते. याचमुळे खरे प्रेम हे कधीही म्लान होत नाही. ते सदैव ताजे टवटवीत असते.

मिलेगी कहीं कोई रहगुजर
तन्हा कटेगा कैसे ये सफ़र
मेरे सपने हो जहाँ
ढूंढू मै ऐसी नज़र….

आपले स्वप्न असणारी नजर शोधण्याची पॅशन असणाराच खरा प्रेमी असतो. आणि प्रेमाचे हेच रसरसलेपण, विलक्षण आसुसलेपण आपल्याला आशिकितले हे गाणे जगून अनुभवता येते. प्रेम नसेल तर जीवन जगण्यात काय अर्थ ? आणि ज्याच्या आयुष्यात हे क्षण येतात त्या इष्काच्या सोबतीला संगीतमय आशिकी येते तेव्हा नेमके काय होते ? हे कुणाला सांगून समजणार नाही. यासाठी तुम्हाला ठार वेडे प्रेमी व्हावे लागते. थँक गॉड…माझ्या आयुष्यात हे विलक्षण झपाटलेपण आले….मी ते जगलो. आणि हो, नदीम-श्रवण यांच्या संगीतात याचा कैफ देखील अनुभवला. आज श्रवण कुमार राठोड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दिवसभर त्यांचीच गाणी पुन्हा एकदा जगली. श्रवणजी आपल्या जाण्याने मर्मबंधातील ठेव असणारी कुपी अलगद उघडली. आपल्या सृजनात चिंब भिजलो…..जिथे असाल तिथे मस्त मैफील जमवा हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !

About the author

shekhar patil

Leave a Comment