आज विश्वविख्यात लेखक मारिओ पुझो यांची पुण्यतिथी. कादंबरीकार व पटकथा लेखक म्हणून पुझो यांच्याइतकी प्रसिध्दी व यश क्वचितच कुणाला मिळाले असेल. जगभरात प्रचलीत झालेले माफीया, गॉडफादर आदी शब्द ही त्यांचीच देण होय. संघटीत गुन्हेगारीबाबत विलक्षण प्रत्ययकारी पध्दतीचे रेखाटन पुझो यांच्याइतके कुणालाही शक्य झाले नाही. विशेष करून ‘द गॉडफादर’ ही कादंबरी आणि यावर आधारित याच नावाची ( द गॉडफादर) तीन भागातील चित्रपटांची मालिका त्यांना लेखन आणि पटकथा लेखनाच्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर प्रदान करणारी ठरली आहे. आपण वाचनवेडे असून द गॉडफादर वाचली नाही, अथवा चित्रपटप्रेमी असून यावरील चित्रपट पाहिले नाहीत तर आयुष्यातील एका मोठ्या आनंदाला मुकले आहात ( असे माझे तरी मत आहे. ) हे निश्चित. मी आधीच मारिओ पुझो आणि ‘द गॉडफादर’ यांच्याबाबत लिखाण केले आहे. तथापि, आज थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून याचे रसग्रहण सादर करण्याचा प्रयत्न करतोय.
द गॉडफादरमध्ये मूळच्या अमेरिकेत निर्वासीत म्हणून आलेल्या इटालीयन लोकांमधील गुन्हे प्रवृत्तीची मुख्य थीम आहे. विशेष करून, संघटीत गुन्हेगारीसोबत संघटीत धर्मातील अपप्रवृत्ती व त्यांच्यातील संबंधाला भेदकपणे दर्शविण्यात आले आहे. यात धर्माचा जीवनावरील पगडा, विविध धार्मीक अनुष्ठान, कन्फेशन, पाप-पुण्य, धर्मासत्तेची ताकद व याचा होणारा गैरवापर, गुन्हेगारी विश्वाची धर्मासोबत संलग्न होण्याची धडपड, यासाठी अवलंबण्यात येणारे गैरप्रकार हे सारे काही विस्ताराने रंगविलेले आहे. आपल्याकडेही अगदी गावगुंडापासून ते भाई मंडळीपर्यंत हे वैयक्तीक जीवनात दान-धर्म करून वा विविध देवस्थाने, सण-उत्सवांना रग्गड मदत करून पाप क्षालनाचे काम करतात. नेमक्या याच प्रकारे संघटीत गुन्हेगारी ही संघटीत धर्मसत्तेशी जवळीक साधण्यासाठी कोणत्या स्तराला जाऊ शकते याचे उदाहरण द गॉडफादरच्या तिसर्या भागात दिलेले आहे.
या कथानकामध्ये डॉन मायकेल कॉर्लिऑने हा वयाच्या साठीत आलेला आहे. इथवर तो आपल्या प्रत्येक शत्रूचा अगदी थंडपणे काटा काढून तो गुन्हेगारी विश्वातील अनभिषिक्त सम्राट म्हणून गणला जातोय. पण पापातून उभारलेल्या या साम्राज्यात आता त्याचे मन रमेनासे झालेय. विशेष करून प्रचंड असुरक्षितता, रक्तपात, दुरावलेले नातेसंबंध, मोठी झालेली मुले आणि एकंदरीतच वाढत्या वयामुळे आलेला पोक्तपणा हा त्याला गुन्हेगारीपासून लांब नेण्याच्या मार्गावर असतो. गुन्हेगारी विश्व सोडून कोणता तरी ‘व्हाईट कॉलर्ड बिझनेस’ करण्याच्या तयारीत असणार्या मायकेलला धर्मसत्ता आकर्षीत करते. यामुळे व्हॅटीकनला रग्गड देणगी देऊन तो धर्माचार्यांशी जवळीक साधतो. यातून त्याला १० करोड डॉलर्सच्या देणगीच्या बदल्यात ‘ऑर्डर ऑफ सेंट सेबेस्टीयन’ ही महत्वाची उपाधीदेखील मिळते. यासोबत तो ‘इंटरनॅशनल इंमोबिलियारे’ या कंपनीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तब्बल ६०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचेही जाहीर करतो. यातून तो व्हॅटीकनच्या ताब्यात असणार्या या बँकेतील २५ टक्के वाटा संपादन करण्याची तयारी करतो. मात्र जुगार वा नाईट क्लबसह तमाम अवैध व्यवसायातील त्याचे माफीया भागीदारही यात वाटा मागतात. अर्थात, ते देखील व्हाईट कॉलर्ड व्यवसायाकडे वळू पाहतात. यातून सुरू झालेला संघर्ष हा रक्तरंजीत होऊन अखेरीस मायकेल कॉर्लिऑनेला गलीतगात्र करून संपवून टाकतो. यातील बारकावे जाणून घेण्यासाठी आपल्याला गॉडफादरची मालिका पाहणे क्रमप्राप्त आहे. याच्या जोडीला मानवी जीवनातील विरोधाभासवर मारिओ पुझो यांनी केलेले भाष्य हे आपल्याला अक्षरश: स्तिमीत करते.
मारियो पुझो यांनी गॉडफादरच्या प्रारंभीच बाल्झाकचे ‘बिहाईंड एव्हरी ग्रेट फॉर्च्युन देअर इज क्राईम’ अर्थात जगात आज काही जे भव्य-दिव्य झालेय त्याची उभारणी पापावर आधारीत असल्याचे प्रसिध्द वचन उद्धृत केले आहे. हे वाक्य पूर्ण सत्य नसले तरी बहुतेक वैयक्तीक आणि सामूहिक जीवनातील यश हे गुन्हेगारीवर आधारित असल्याचे आपण भोवती पाहतोच. या पार्श्वभूमिवर, गॉडफादरमध्ये माफिया डॉन मंडळीने संघटीत गुन्हेगारीच्या जोरावर आपापले साम्राज्य प्रस्थापित केल्याचे दिसून येते. अर्थात, बाल्झाकनुसार पापाच्या पायावर माफियांच्या यशाची उभारणी होते. मात्र आयुष्यातील कोणत्या तरी वळणावर हे विश्व सोडून उदात्त जीवन जगण्याचे या भाई लोकांच्या मनात येते. त्यांचा सरदार असणार्या मायकेल कार्लीऑनेच्या कन्फेशनमधून हाच पश्चाताप दिसून येतो. तर दुसरीकडे अतिशय उदात्त, दैवी आणि मानवहिताच्या पायावर उभारणी झालेल्या धर्मसत्तेतील एक भाग हा पापाकडे वळण्यासाठी किती आसुसलेला असतो हेदेखील गॉडफादरमध्येच दर्शविण्यात आलेले आहे. जे आहे त्यात समाधानी नसल्याचे मानवी वैगुण्यदेखील यातून आपल्याला दिसून येते. अर्थात, जीवनातील हा विरोधाभास एकाच कथानकामध्ये गुंफण्याचे कौशल्य मारिओ पुझो यांच्या प्रतिभाशक्तीत आहे. याचमुळे गॉडफादर ही फक्त कादंबरी वा चित्रपटच नव्हे तर त्याचा एक कल्ट (संप्रदाय) तयार झालाय. ही कादंबरी कितीही वेळेस वाचली तरी मन भरत नाही. तर चित्रपटदेखील अनेकदा पहावासा वाटतो. ही कादंबरी जगातील जवळपास प्रत्येक भाषेत भाषांतरीत झालीय. तर, जगातील सर्वकालीन सर्वोत्तम चित्रपटांमध्ये गॉडफादर हा पहिल्या तीन सिनेमांमध्ये असतोच. अनेक समीक्षकांच्या मते तर हा जगातील आजवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होय. अर्थात, लोकप्रियतेसोबत समीक्षकांच्याही पसंतीस उतरण्याचे भाग्य गॉडफादरला लाभले असून याचमुळे याचे रचियता असणारे मारिओ पुझो यांना साहित्य व सिनेसृष्टीत अढळपद प्राप्त झाले आहे.