Featured slider चित्रपट

रूपेरी पडद्यावरील पेंटींग

Written by shekhar patil

नुकताच ‘लव्हींग व्हिन्सेंट’ हा चित्रपट पाहिला. लॉकडाऊनमध्ये पाहिलेला हा पहिलाच सिनेमा. खरं तर टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेकांप्रमाणे मी सुध्दा भली मोठी विश लिस्ट करून ठेवली होती. यात साहजीकच पुस्तके, चित्रपट, गाणी, विपुल लिखाण आदींचा समावेश होता. तथापि, हा संकल्प सिध्दीस जाणार नसल्याचे आता स्पष्ट झाले असतांनाच व्हिन्सेंट व्हॅन गॉग या महान चित्रकाराच्या जीवनावर आधारित सिनेमा पाहिल्याने बॅक लॉग थोडासा भरून निघाल्याचे समाधान मिळाले.

शेखर पाटील

काही प्रतिभावंतांच्या आयुष्यातील दुर्दैवाचे दशावतार किती भयंकर असतात याची प्रचिती व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या जीवनाचे अवलोकन करून येते. २८ व्या वर्षी चित्रकलेस प्रारंभ करणारा हा महान कलावंत यानंतर अवघ्या आठ वर्षाच्या उर्वरित आयुष्यात अदमासे आठशे चित्र काढून परलोकी गेला. आपल्या हयातीत प्रचंड उपेक्षा, घृणा, उपासमार आदींना सामोरे गेलेला व्हिन्सेंट मेल्या नंतर दंतकथा बनला. वेडसरं, विचीत्र व माणूसघाणा म्हणून संभावना झालेल्या या कलावंताला नंतर उदंड प्रसिध्दी मिळाली असून त्याला आधुनिक कलेचा जनक मानले जाते. हे सारे काही विलक्षण आहे. अर्थात, व्हिन्सेंटच्या वैयक्तीक आयुष्यातील शोकांतिका ही अनेक कथा, कादंबर्‍या, चित्रपट वा डॉक्युमेंटरीजचा मध्यवर्ती विषय बनली आहे. त्याच्यावर विपुल लिखाण केले गेले असून यात जराही खंड पडलेला नाही. यात अर्थातच आयर्विंग स्टोन लिखीत ‘लस्ट फॉर लाईफ’ हा चरित्रग्रंथ आजही अग्रस्थानी आहे. ओशोंनी आपल्या आवडत्या ग्रंथांच्या यादीत याचा समावेश केला असून यावर अतिशय रसाळ असे भाष्य केले आहे. याचमुळे मी फार आधी ‘लस्ट फॉर लाईफ’ वाचले होते. यावर चित्रपट आला असला तरी तो फारसा प्रभावी वाटला नाही. व्हिन्सेंटच्या आयुष्यावर अनेक चित्रपट आलेत. अगदी तो व त्याचा भाऊ थिओ यांच्यातील भावबंधावरही चित्रपट येऊन गेला. यासोबत त्याच्याशी संबंधीत कथानकावर काही ऑफ बीट चित्रपट देखील आलेत. यापैकी अकिरा कुरूसावा या विश्‍वविख्यात जपानी दिग्दर्शकाने आपल्या ‘ड्रीम्स’ या सिनेमातील एक स्वप्न हे व्हिन्सेंटशी संबंधीत असल्याचे दर्शविले होते. यावर मी आधीच ‘वास्तव व आभासाच्या सीमारेषेवरील प्रतिभेचा अविष्कार’ हा लेख लिहला असून आपण याला http://bit.ly/2Kac50y या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात. यात कथेचा नायक (स्वत: अकिरा कुरूसावा) आपल्या स्वप्नामध्ये व्हिन्सेंटच्या चित्रात शिरत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. ड्रीम्समधील हा भाग कितीदा पाहून देखील मन भरत नाही. तर, लव्हींग व्हिन्सेंट चित्रपटाने याच्याही पुढचा टप्पा गाठला आहे.

व्हिन्सेंटच्या आयुष्यातील शेवटच्या कालखंडावर चित्रपट बनवत असतांना काही तरी वेगळा फॉर्मेट वापरण्याची संकल्पना डोरोथा कोबियेला व ह्युज वेल्चमन या पोलंडमधील चित्रपट दिग्दर्शकांच्या डोक्यात आली. यातील डोराथा ही स्वत: चित्रकार असल्याने आपल्या सिनेमात चित्रकलेचे सामर्थ्य परिपूर्ण पध्दतीत कसे दाखविता येईल यावर त्यांनी विचार केला. यातून त्यांना अतिशय भन्नाट कल्पना सुचली. त्यांनी हा अ‍ॅनिमेशनपट म्हणून तयार करण्याचे ठरविले. याला टेक्नॉलॉजीच्या मदतीने व्हिन्सेंटच्या कलेचा परिसस्पर्श प्रदान करण्यात आला. यासाठी त्यांनी याच्या पार्श्‍वभागाला व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या चित्रांची जोड दिली. अर्थात, व्हिन्सेंटच्या गाजलेल्या चित्रांमधील पात्रे, निसर्ग व अन्य रेखाटने पार्श्‍वभागाला ठेवून या चित्रपटाचे कथानक मांडण्यात आले. मात्र या सर्व काथ्याकुट करणे सोपे नव्हतेच ! एक तर, आजवर अशा प्रकारचा कोणताही चित्रपट आलेला नसल्याने या प्रयोगावर पैसे लावण्यासाठी कुणी फायनान्सर तयार नव्हता. यामुळे डोरोथा व ह्युज यांनी ही कलाकृती लोकसहभागातून निर्मित करण्याचे ठरविले. यासाठी किकस्टार्टर या क्राऊडफंडींग जमा करणार्‍या संकेतस्थळावर हा प्रोजेक्ट मांडण्यात आला. (लिंक : https://bit.ly/356esgX ) यातून मिळालेल्या निधीसह पोलीश फिल्म इन्स्टीट्युटच्या मदतीने ‘लव्हींग व्हिन्सेंट’ ही कलाकृती जन्मली आहे. यासाठी सात वर्षांचा दीर्घ कालावधी लागला असून २०१७ साली हा चित्रपट प्रदर्शीत करण्यात आला.

या चित्रपटासाठी व्हिन्सेंटच्या सुमारे ८०० कलाकृतींवर आधारित तैलरंगातील (ऑईलपेंट) तब्बल ६५ हजार फ्रेम्स रंगविण्यात आल्या. यासाठी जगभरातील १२५ चित्रकारांना व्हिन्सेंटच्या काळात उपलब्ध असणार्‍या सामग्रीच्या मदतीने पेंट करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याचमुळे हातांनी पेंट करण्यात आलेला हा जगातील पहिला चित्रपट ठरला आहे. यात रोटोस्कोप या तंत्रज्ञानाच्या मदतीने फ्रेमच्या पार्श्‍वभागाला व्हिन्सेंटची चित्रे असतांना यात काम करणार्‍या अभिनेत्यांचे शुटींग क्रोमा (ग्रीन स्क्रीन) वापरून चित्रीत करण्यात आले. हे चित्रीकरण व्हिन्सेंटच्या कलाकृतींच्या पार्श्‍वभागावर जोडून याला अ‍ॅनिमेशन म्हणून रूपांतरीत करण्यात आले. यातील मुख्य कथानकात रंगीत पेंटींगची पार्श्‍वभूमि असून फ्लॅशबॅक हा कृष्ण-धवल छायाचित्रांच्या मदतीने दर्शविण्यात आला आहे. त्या काळात उपलब्ध असणार्‍या छायाचित्रांच्या मदतीने हा फ्लॅश बॅक साकारण्यात आलेला असून हे मिश्रण किती अफलातून ठरले हे अनुभवण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात लव्हींग व्हिन्सेंट पहावा लागेल.

या चित्रपटाचे कथानक थ्रिलर या प्रकारातील असले तरी ते कधी गतीमान तर कधी संथ वेगात पुढे सरकते. व्हिन्सेंटच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्याची गावातील जोसेफ रोलीन या पोस्टमनशी गट्टी जमलेली असते. तो आपल्या भावासोबत विपुल प्रमाणात पत्रव्यवहार करत असून ती जोसेफच्याच माध्यमातून होत असते. नंतर व्हिन्सेंट गावातून निघून गेल्यानंतर त्याच्या आत्महत्येची बातमी येते. जवळपास एक वर्षानंतर जोसेफला आपल्याकडे व्हिन्सेंटने लिहलेले पत्र पोस्टात टाकण्याचे विस्मरण झाल्याचे आढळून येते. यामुळे तो आपला मुलगा आर्मंड याला थिओकडे हे पत्र सुपुर्द करण्यासाठी पाठवितो. यानुसार तो थिओकडे आल्यानंतर त्याला तो व्हिन्सेंटच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी वारल्याची माहिती मिळते. यानंतर आर्मंड हा ज्या गावात व्हिन्सेंटने आत्महत्या केली त्या गावात जाऊन चौकशी करतो. येथे त्याला एकामागून एक असे विविध रहस्योदघाटने होतात. यात त्याला कलावंत व माणूस म्हणून व्हिन्सेंटची महत्ता कळते. अर्थात, याच्या सोबत त्याचा संभ्रमही वाढतो. मग व्हिन्सेंटने आत्महत्या केली की त्याचा खून झाला ? तो कुणाच्या प्रेमात होता का ? त्याचे शेवटच्या दिवसांमधील निकटवर्तीय कोण होते ? तो वेडा होता की लोक तसे समजत होते ? तो नेमका कसा मरण पावला ? याबाबतची उत्तरे तो विविध लोकांच्या माध्यमातून जाणून घेतो. व्हिन्सेंटच्या विविध कलाकृतींच्या फ्रेम्समधून एकाच वेळी अनेक पातळ्यांवरून पुढे सरकणारे हे कथानक आपल्या काळजाचा ठाव घेते. कॅनव्हास, कुंचला, रंग आणि फटकार्‍यांनी अजोड कलाकृतींचे सृजन करणारा, व्यवहारी जगात मिसफिट ठरलेला, आपल्या भावाला अतिशय तन्मयपणे पत्र लिहणारा आणि अर्थात अगदी करूण व भणंग आयुष्य जगणार्‍या या महान कलावंताला आपल्या समोर साकार करते.

‘लव्हींग व्हिन्सेंट’ पाहणे म्हणजे अर्थातच रूपेरी पडद्यावर आपल्या समोर साकारणार्‍या कलाकृतीची अनुभूती घेण्यासारखे आहे. यात त्याच्या आयुष्यासह सृजनाचे अगदी बारकावे अतिशय चपखलपणे टिपण्यात आलेले आहेत. यात त्याच्या काही चित्रांमध्ये आढळून येणारे रहस्यमय कावळे आपल्याला अनेकदा भेटतात. खरं तर, व्हिन्सेंटने शेतातच आपल्यावर गोळी झाडली असल्याने ‘ठो’…आवाजानंतर एकाच वेळी असंख्य कावळ्यांचे भयभीत कावकाव करून केलेले पलायन अकिरा कुरूसावांनीही ड्रीम्समध्ये अचूकपणे टिपले होते. अन् याला या सिनेमामध्येही दर्शविण्यात आले आहे. याच्या जोडीला लांबलचक कुरणे, शेत, प्रखर सूर्यप्रकाश, नदी, गुढरम्य रात्री, फुलांचे ताटवे, रहस्यमय वास्तू, डोंगर-दर्‍या, मानवी संवेदना टिपणारी पोर्टेट, रेखाटने, पेंटींग्ज आदींच्या सोबत आपण एक कलायात्रा अनुभवतो. हीच लव्हींग व्हिन्सेंटची महत्ता. आणि यावर कळस चढविलाय चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावलीच्या सोबत दिलेल्या डॉन मॅक्लीन या गायकाच्या गाजलेल्या व्हिन्सेंट या गाण्याने !

वेड्यांच्या इस्पितळातून अनिमिष नेत्रांनी गुढ रात्रीला तल्लीनतेने न्याहाळणारा व्हिन्सेंट…आणि त्याच्या कलेस भाव विभोरपणे अभिवादन करणारा गायक आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातो. हे वेडेपणं आपलं आयुष्य अनेक आयामातून सुंदर व समृध्द करणारे आहे. फक्त यासाठी आपल्याकडे हवी संवेदनशीलता आणि खुलेपणा ! नेमका हाच संदेश लव्हींग व्हिन्सेंट आपल्याला देतो. यामुळे एक अजोड कलाकृती पाहिल्याची अनुभुती येते.

Starry, starry night
Paint your palette blue and grey
Look out on a summer’s day
With eyes that know the darkness in my soul
Shadows on the hills
Sketch the trees and the daffodils
Catch the breeze and the winter chills
In colors on the snowy linen land

Now I understand
What you tried to say to me
And how you suffered for your sanity
And how you tried to set them free
They would not listen, they did not know how
Perhaps they’ll listen now

Starry, starry night
Flaming flowers that brightly blaze
Swirling clouds in violet haze
Reflect in Vincent’s eyes of china blue
Colors changing hue
Morning fields of amber grain
Weathered faces lined in pain
Are soothed beneath the artist’s loving hand

Now I understand
What you tried to say to me
And how you suffered for your…

लव्हींग व्हिन्सेंट हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओसह युट्युबवर उपलब्ध आहे. आपण खालील लिंकवर याचा ट्रेलर पाहू शकतात.

About the author

shekhar patil

Leave a Comment