Featured क्रीडा चालू घडामोडी

फुटबॉलची किक, समाजहिताचा गोल !

Written by shekhar patil

ज्याने जीवनात फुटबॉलला एकदाही किक मारली नाही, तो आयुष्यातील खूप मोठ्या आनंदाला मुकल्याचे माझे मत आहे. हा खेळ नाही तर एक जीवनशैली आहे, झपाटून टाकणारी, जीवनाला चैतन्यदायी व रसरशीत अशी नवीन आयाम देणारी. फुटबॉल हा फक्त मैदानात खेळला जात नाही. तो खेळणार्‍याच्या नसानसांमध्ये भिनतो. फुटबॉल खेळणारा चालत नाही, तर नाचतो. तो एका र्‍हिदममध्ये लयबध्द जीवन जगतो. . . रस्त्यात दिसेल त्याला पायाने टोलवण्याचा, अन्यथा किमान स्पर्श तरी करण्याचा प्रयत्न करतो. थँक गॉड, माझ्या आयुष्यात फुटबॉल आला तो मैदानावरील खेळातून आणि याच्यावरील निस्सीम प्रेमातूनही. ज्या उमलत्या वयात फुटबॉलची किक माझ्या डोक्यात भिनली, त्याच उमलत्या वयातील माझा मुलगा जेव्हा या खेळाच्या प्रेमात पडला तेव्हा मला झालेला आनंद कुणालाही सांगता येणारा नाही. सारे काही विसरून झपाटल्यागत फुटबॉल खेळण्याची धुंदी ही कुणाला सांगून समजणारी नाही. याला अनुभवावे लागते. हा खेळ तन-मनाची अक्षरश: परीक्षा घेतो, प्रचंड दमवून टाकतो. फुटबॉल खेळून गलीतगात्र झाल्यावर पाणी पिण्याची आणि भोजनाची अविट गोडी ही कशातही अनुभवता येत नाही. तारूण्याच्या धुंदीतील सर्वोच्च किक ही फुटबॉलचीच. . . .बाकी सारे व्यर्थ !

यंदा म्हणजे अगदी येत्या काही महिन्यात फिफा वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे या वर्षी फुटबॉल नव्याने जगता येणार आहे. त्या कालखंडात फुटबॉलशी संबंधीत बरेच काही लिहता-बोलता येईल. यासाठी थोडा अवकाश असला तरी लवकरच याच नितांत सुंदर खेळावर आधारित नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट येतोय. याचे कथानक फुटबॉल आणि या खेळाचे समाजावरील व्यापक परिणामाचे दर्शन घडविणारे ठरण्याची शक्यता आहे.

ब्युटिफुल गेम म्हणून वाखाणण्यात आलेला फुटबॉल हा नि:संशयपणे पृथ्वीतलावरील सर्वाधीक लोकप्रिय खेळ होय. आपल्याकडे क्रिकेटचे स्तोम जास्त असले तरी वैश्‍वीक पातळीवर विचार करता, फुटबॉलच्या लोकप्रियतेची सर क्रिकेटच काय, पण कोणत्याही खेळाला येणार नाही. या खेळाचे अनेक आयाम आहेत. याचे मोठे अर्थकारण असून यातून अब्जावधी डॉलर्सची एक इंडस्ट्री उदयास आलेली आहे. फुटबॉल खेळण्यासाठी साधनांची आवश्यकता ही तुलनेत जास्त लागते. म्हणून काय यापासून वंचित असणारे फुटबॉल खेळणे सोडतात का हो ? नक्कीच नाही. जगभरातील झोपडपट्टया, वंचीत, मागास समूह घटकांमधील मुले वा तरूण देखील आपापल्या परीने याचा आनंद घेतात. मग कधी कुणी चिंध्यांचा फुटबॉल वापरतो, तर कुणासाठी वीटा वा दगडांचे गोल पोस्ट होतात. बरेच जण तर बुटांविनाच फुटबॉल खेळतात. फुटबॉलसाठी लागणारे भले मोठे मैदान नसले म्हणून काय झाले ? अनेकदा रस्ते, माळरान, अरूंद बोळ वा लहानशा मैदानांवरही फुटबॉलचे सामने रंगतात. एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे पेले, मॅराडोना, रोनाल्डो (सिनियर) आदींसारखे लीजंडरी खेळाडू हे दक्षिण अमेरिकन देशांमधील झोपडपट्टयांमधून पुढे आले आहेत. आज आजही सातत्याने याच वंचित वस्त्यांमधील लक्षावधी डोळ्यांमध्ये हेच स्वप्न फुलवत गल्लीबोळांमधून घाम गाळत असतात.

दुर्दैवाने भारतासारख्या देशात हा खेळ पुरेसा बहरलाच नाही. अगदी महाराष्ट्रापेक्षा लहान असणारे काही देश देखील जागतिक पातळीवर फुटबॉलचे सामने गाजवत असतांना आपल्याला आजवर यात फार काही करता आले नसल्याची बाब माझ्यासारख्या सच्च्या रसिकाला अनेकदा टोचत असते. अर्थात, आपला देश या खेळात कुठेही दिसत नसला म्हणून काय झाले ? भारतातल्या अभिजात समुदायापासून ते वंचीत, शोषीतांच्या वस्त्यांपर्यंत या खेळामुळे मंत्रमुग्ध होणार्‍यांची संख्या कमी नाही. फुटबॉल हा तसा धुसमुसळा आणि अनेकदा भांडणांना आमंत्रण देणारा खेळ समजला जातो. याचे खेळाडूच नव्हे तर रसिक देखील अनेकदा हातघाईवर उतरतात. मात्र फुटबॉल हा समाजाला जोडण्याचे काम देखील करतो. इतिहासात याचे अनेक दाखले आहेत. फुटबॉलचा समाजाच्या सर्व स्तरांवर अतिशय व्यापक प्रभाव पडला आहे. याला खेळासोबत सलोख्यासाठी देखील वापरले जाते. आणि हो, हाच फुटबॉल खेळाच्या माध्यमातून समाजसुधारणेचे काम हे किती विलक्षण परिणामकारकरित्या करतो हे अनुभवण्यासाठी नागराज मंजुळे यांनी झुंड या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

नागपुरच्या हिस्लॉप कॉलेजातील क्रीडा शिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. अर्थात, हे बारसे यांचे बायोपीक आहे. खरं तर, ते स्वत: फुटबॉलचे खूप मोठे खेळाडू वा स्टार नसतांनाही नागराज सारख्या प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाला त्यांच्या जीवनावर चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा कशी मिळाली ? आणि अमिताभसारख्या दिग्गज अभिनेत्याने ही भूमिका का स्वीकारली ? या प्रश्‍नांची उत्तरे खुद्द विजय बारसे यांच्या कार्यात दडलेली आहेत. २००१ सालच्या जुलै महिन्यात कॉलेजमधून घरी येत असतांना अचानक पावसाची सर आल्याने ते एका झाडाखाली उभे राहिले. इतक्यात त्यांना भर पावसात प्लास्टीकच्या बादलीचा फुटबॉल करून याला तल्लीनपणे खेळणार्‍या गोरगरीब मुलांची टोळी दिसली. अगदी भान हरपून फुटबॉल खेळणार्‍या या मुलांना पाहून विजय बारसे यांचे जीवन बदलून गेले.

खरं तर परिसरातील झोपडपट्टयांमध्ये राहणारी ही मुले सटर-फटर चोर्‍या आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये कायम मग्न असत, गरीबी, गुन्हेगारी आणि व्यसनाधिनतेने करपलेल्या त्यांच्या बालपणात त्यांना खिळवून ठेवणारी एकच बाब म्हटजे फुटबॉल असल्याचे विजयजींच्या लक्षात आले. आणि त्यांनी तात्काळ या मुलांना खेळण्यासाठी फुटबॉल तर दिलाच पण दररोज पाच रूपये देण्याचे आमीषही दाखविले. यातून सुरू झालेला सिलसिला हा स्लम फुटबॉल या विश्‍वव्यापी चळवळीत परिवर्तीत झालाय. चोरीमारी, हाणामारी करणारे, व्यसनांच्या धुंदीत आयुष्य उध्वस्त करणारी लक्षावधी मुले यातूनच फुटबॉलच्या मैदानावर दिसून लागली आहेत. आज दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये झोपडपट्टी फुटबॉलचा विस्तार झालाय. जगभरात आता झोपडपट्टी फुटबॉलचे दरवर्षी शेकडो सामने होतात. याला रसिकांचा उदंड आश्रय देखील मिळालाय. आणि याचे सर्व श्रेय आहे ते प्राध्यापक विजय बारसे यांचेच !

एका साध्या क्रीडा शिक्षकाला सुचलेली कल्पना ही झोपडपट्टयांमधील हजारो बालकांच्या आयुष्याला नवीन वळण देणारी ठरली. फुटबॉलच्या माध्यमातून त्यांना जीवनातील एक मोठा आनंद तर मिळालाच पण गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळणारी त्यांची पाऊले ही फुटबॉलच्या कौशल्यात पारंगत झाली आणि यातून एक मोठी समाजसुधारणेची चळवळ उभी राहिली. हा प्रवास नेमका पुढे कसा गेला ? हे आपल्याला नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटातून जाणून घेता येईल. मात्र या सिनेमाच्या निमित्ताने फुटबॉलची महत्ता आणि समाजातील उपेक्षित घटकाची नागराज मंजुळेंनी घेतलेली दखल या बाबींचे नक्कीच कौतुक केले पाहिजे.

आज आपण कितीही सामाजिक न्यायाची भाषा केली तरी कला, साहित्य, चित्रपट आदींमधील उच्चवर्णीय आणि उच्चवर्गियांचे वर्चस्व कुणापासून लपून राहिलेले नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काला, असुरन, जय भीम आदींसारखे शोषीत समुदायाला केंद्रस्थानी ठेवणारे चित्रपट बनत असतांना बॉलीवुड यापासून कोसो दूर आहे. अपवाद वगळता वास्तविक जीवनाचा काहीही संबंध नसणार्‍या आणि गल्लाभरू कथानकांना प्राधान्य देणार्‍या हिंदी चित्रपटसृष्टीत आपला मराठमोळा नागराज मंजुळे एंट्री करतांना विजय बारसे यांच्या सारख्या वाल्मीकी समाजातील नायकाची खरीखुरी कथा जेव्हा रूपेरी पडद्यावर साकारण्याचा संकल्प करतो, तेव्हा त्याचे मन:पूर्वक कौतुक करावेसे वाटते. एक दिग्दर्शक म्हणून नागराज परिपक्व बनण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल ठरू शकते. कारण फँड्री आणि सैराट हे आपल्या भोवतालचे उघड वास्तव फिक्शनच्या स्वरूपात मांडतांनाचे त्याचे कौशल्य आपण सर्वांनी वाखाणले आहेच. पण प्रत्यक्षातील फुटबॉलच्या एका बहुजन नायकाच्या कथानकात त्याने सृजनाचे रंग कसे भरले असतील ? हे पाहण्याची देखील उत्सुकता आहेच.

भारतात फुटबॉल अन्य देशांच्या तुलनेत तितकासा रूजलेला नसेल. मात्र कधी तरी, यातही रेनेसॉं होईल. या उष:कालात भारतीय संघ हा जागतिक पातळीवर जाईल ही अपेक्षा करूया. फुटबॉलवर अनेक चित्रपट बनले आहेत. याच्या तुलनेत झुंड कुठे असेल ? हे तर याला पाहिल्यानंतरच समजू शकते. मात्र ज्यांनी फुटबॉलवर प्रेम केलेय, ज्यांना गोल, पेनल्टी, किक, हेडर, ड्रिबलींग यांच्यातील सौंदर्य कळते; ज्यांना विलक्षण उर्जावान आणि गतीमान असा हा खेळ प्राणप्रिय वाटतो, त्यांच्यासाठी नागराज मंजुळे यांचा झुंड ही पर्वणी ठरणार आहे. आणि हो, यासोबत समाजातील उपेक्षित घटकांमधील नायकाचा गौरव करण्याचा त्याचा हा प्रयत्न रूपेरी पडद्यावरील सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले एक सशक्त पाऊल देखील ठरावे अशी अपेक्षा करणार्‍यांनीही झुंड आवर्जून पहायलाच हवा.

एक योगायोग : महानायक अमिताभ बच्चन यांच्या बहुतांश गाजलेल्या भूमिका विजय नावाच्या आहेत. अर्थातच, ही सर्व काल्पनिक पात्रे होती. मात्र प्रत्यक्षातील एका नायकाची भूमिका जेव्हा स्वीकारण्याची वेळ आली तेव्हा त्यांचे नाव देखील विजयच असावे हा देखील योगायोग. फरक इतकाच, बच्चनजींेचे आधीचे नायक खन्ना, कपूर, कुमार आदींसारख्या आडनावांचे असले तरी झुंडमध्ये ते बारसे नावाच्या नायकाची भूमिका साकारताय. . .या मातीतल्या तसेच उपेक्षीत समुदाय घटकातील नायकाची भूमिका अमितजींना साकारावी लागली, हाच खरा रूपेरी पडद्यावरील सामाजिक न्यायाचा ‘विजय’ नव्हे काय ?

About the author

shekhar patil

Leave a Comment