Featured slider साहित्य

जादू का फसाना !

Written by shekhar patil

आज ख्यातनाम शायर, गीतकार, पटकथा लेखक व सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत. गुलजार यांच्या नंतर इतक्या वैविध्यपूर्ण प्रकारांमध्ये चित्रपटसृष्टीत आपल्या गुणवत्तेची अमीट मोहर उमटवणारे म्हणून त्यांचेच नाव समोर येते.

जावेदजींचे घरगुती नाव हे जादू आहे. त्यांचे वडील विख्यात शायर जाँनीसार अख्तर यांच्या ‘लम्हा-लम्मा किसी जादू का फसाना होगा’ या गजलमध्ये याचे मूळ आहे. जनाब जाँनीसार यांना जादू शब्दाची भुरळ पडल्याने त्यांनी आपल्या मुलाचे नाव याच्याशी साधर्म्य साधत जावेद ठेवले. तर घरात त्यांना जादू या नावानेच पुकारले जात असे. जानिसार अख्तर यांचा द्रष्टेपणा त्यांच्या चिरंजीवांनी अगदी शब्दश: खरा ठरविला. शब्द सौंदर्याची जादू काय असते ते जावेद साहेबांनी दाखवून दिले आहे. यात पटकथा लेखनाचा विचार करता, सलीम-जावेद या जोडीचे घटक म्हणून त्यांनी अजरामर झालेल्या चित्रपटांचे खटकेबाज संवाद लिहले. ‘कितने आदमी थे’ /’जो डर गया वो मर गया’ पासून ते ‘मोगँबो खुश हुवा’ पर्यंतचे भारतातील बहुतांश भाषांमध्ये प्रचलीत झालेले आयकॉनीक डायलॉग्ज तर त्यांनी लिहलेच पण; पडद्यावर अमिताभ बच्चन सारख्या महानायकाची ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा साकारण्याची कामगिरीदेखील त्यांनी केली. सत्तरच्या दशकातील संतप्त तरूणाईपासून ते एकविसाव्या शतकात ग्लोबल संधी शोधणार्‍या भारतीय तरूणाईच्या किमान तीन पिढ्या जावेद अख्तर या सहा अक्षरी नावाच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे आपण सर्वांनी अनुभवल्या आहेत. अगदी सोशल मीडियातही त्यांचे वलय अनेकदा आपल्याला दिसून येते.

खरं तर जावेदजींच्या कुटुंबात काव्याचा वारसा असल्याने त्यांचे शायर बनणे हे फारसे आश्‍चर्यकारक नव्हतेच. त्यांचे वडील जाँनिसार अख्तर हे दिग्गज शायर आणि गीतकार होते. आई साफिया यादेखील शायर होत्या. त्यांचे मामा मजाज लखनवी हे उत्तुंग प्रतिभेचे लेणं लाभलेले कवि होते. मुज्तर खैराबादी हे त्यांचे आजोबा (वडिलांचे वडील); मुज्तर यांचे वडील सैयद अहमद हुसेन आणि आई हिरमा हेदेखील कवी होते. तर कैफी आजमी आणि शौकत आजमी या शायर दाम्पत्याची कन्या शबाना आझमी ही त्यांची (दुसरी) अर्धांगिनी बनली. यामुळे जन्मजात गुण, भोवतालचे वातावरण आणि आयुष्याच्या उमेदीच्या कालखंडातील संघर्षाने त्यांच्या भाषेला धार चढली. त्यांच्यात दोन व्यक्तीमत्वे असल्याचे सातत्याने जाणवते. एक तर चित्रपटाची पटकथा साकारतांना त्यांच्यातील डावा विचार हा प्रकर्षाने डोकावतो. प्रस्थापितांविरूध्दचा आक्रोश आणि शोषितांविषयीची कणव यातून दिसून येते. मात्र गद्यातून अक्षरश: शब्दांच्या ठिणग्या उडवणारा हा माणूस पद्य लिहतांना अतिशय हळूवार होत असल्याचे आपल्याला दिसून येते.

‘फुल भी हो दरमिया तो फासले हुवे’ अशी मधुर कैफियत मांडणारा हा शायर ‘इक लडकी को देखा तो…’ अशी अवस्था झाल्यानंतर एक से बढकर एक अशा डझनवारी उपमांची उधळण करतो. ‘जिंदगी धुप तुम घना साया’ व ‘इतने हुवे करीब की दूर हो गये’…असे प्रेमाचे विलोभनीय रंग उलगडून दाखवतो. यात ‘पहले प्यार का पहला गम’, ‘ख्वाब शीशे के दुनीया पत्थर की’…’अपनी तो हार है यार मेरे’ असा दर्ददेखील असतो. ‘संदेसे आते है’…मधून विरहाच्या व्याकुळतेची उत्कटता व्यक्त करतांनाच ‘ओ पालनहारे’ असे आर्जवदेखील करतो. ‘नीला आसमान सो गया’ पासून ते ‘सो गया है जहाँ’ सारखी निरवताही त्यांच्याच सृजनाची देणं आहे. खरं तर तेजाबच्या ‘इक…दो…तीन’ पासून ते गलीबॉयच्या रॅप साँगपर्यंतच्या ठेक्यावर झुलवण्याची किमयादेखील ते करू शकतात. मात्र जावेद अख्तर यांचे नाव आल्यानंतर आठवते ती भावविभोरताच !

जावेद अख्तर यांचे विस्तृत आत्मचरित्र अद्याप आले नसले तरी ‘तरकश’ या काव्य संग्रहात त्यांनी आपल्या आयुष्यावर संक्षिप्त पण आत्यंतीक सारगर्भ स्वरूपात जे लिहलेय त्याला तोड नाही. हे वाचून कुणीही अक्षरश: हेलावून जातो. लखनऊ, अलीगड, भोपाळ आणि मुंबई या आयुष्यातील प्रवासातले महत्वाचे टप्पे त्यांनी इतक्या विलक्षण तरलपणे मांडलेत की बस्स ! बालपणीच मातृछत्र हरपणे, आजोळी असतांना अनाथपणाची झालेली भेदक जाणीव, बापाशी असणारा अबोला, महाविद्यालयातील फक्कड दिवस, वडिलांशी संबंध तोडणे, चित्रपटसृष्टीतील भयंकर संघर्ष, यशाचे शिखर आणि वैयक्तीक जीवनातील चढ-उतार आदींबाबत त्यांनी अलवारपणे रेखाटन केले आहे. एक माणूस म्हणून जावेद अख्तर हे आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिले आहेत. ते आणि त्यांची अर्धांगिनी शबाना आझमी यांनी वेळोवेळी आपापल्या भूमिका या स्पष्टपणे मांडल्या आहेत. मनोरंजन क्षेत्रातील मंडळी बर्‍याचदा गुळमुळीत भूमिका घेत असतांना या दाम्पत्याचा स्पष्टवक्तेपणा निश्‍चितच उठून दिसतो. जानिसार अख्तर यांचा जादू हा पुढे जाऊन कोट्यवधींच्या जीवनात ‘फसाना’ बनला. याच जादूने तुम्हा-आम्हा सार्‍यांच्या जीवनात अत्यानंदाचे असंख्य क्षण उधळलेत !

जावेद अख्तर यांचे नाव येताच डोळ्यासमोर अनेक गाणी येतात. खरं तर आवडणारी गाणी खूप आहेत. मात्र आज तुलनेत थोडे कमी लोकप्रिय असणार्‍या एका गाण्याबाबत मला सांगावेसे वाटते. १९९७ साली आलेल्या ‘तुम याद आये’ या अल्बममधील ‘सारे सपने कही खो गये’ हे गाणे मला खूप आवडते. गाणे सुरू होण्याआधी जावेदजींच्या गंभीर आवाजातील काव्य आपल्याला दुसर्‍या दुनीयेत घेऊन जाते….

मोहब्बत पलको पे कितने
हसीन ख्वाब सजाती है
फुलो से महकते ख्वाब
सितारो से जगमगाते ख्वाब
शबनम से बरसते ख्वाब
फिर कभी यू भी होता है
की पलको की डालियो से
ख्वाबो के सारे परींदे
उड जाते है
और आंखे…हैरान सी रह जाती है ॥

यानंतर जावेदजींचे शब्द, सिंफनीचे मनमोहक संगीत आणि अर्थातच अलका याज्ञीक यांचा मधुर सुर आपल्याला अक्षरश: स्वर्गीय अनूभुती प्रदान करतात. आयुष्यातील विरलेली स्वप्ने, याचा आठव आणि गतकालाचा गहिवर इतक्या अजोड प्रकारे कधी कोणत्या गाण्यातून अभिव्यक्त झालाय असे मला तरी वाटत नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे अल्बममधील गाणे असून याला व्हिडीओ नाही. म्हणजेच, चित्रीकरणाविना आपल्या काळजाचा ठाव घेण्याची क्षमता या गाण्यात आहे.

तुमने हम से कही थीं जो बातें,
उनको दोहराती हैं गम की रातें |
तुम ना आये मगर जो गए
हाय हम क्या से क्या हो गए ||

ओह…किती विलक्षण नजाकत आणि मोहकता. हीच जावेदजींच्या सृजनाची किमया ! आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीदेखील समाजात अतिशय स्वाभीमानीपणे तर साहित्य व चित्रपटसृष्टीत आत्यंतीक संवेदनशीलपणे वागणार्‍या या महान शायराला मानाचा मुजरा. आपण याच प्रकारे उत्तर आयुष्यातही आमच्या आयुष्यात विलोभनीय रंग भरावेत हीच अपेक्षा.

खाली पहा : सारे सपने कही खो गये हे गाणे.

About the author

shekhar patil

Leave a Comment