Featured slider क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञान

फाईव्ह-जी नेटवर्क : सृष्टी व प्रतिसृष्टीतील सीमारेषा होणार धुसर !

Written by shekhar patil

अलीकडच्या काळातील सर्वात उत्कंठावर्धक संज्ञा म्हणजे फाईव्ह-जी होय. देशातील टेलकॉम कंपन्या स्पेक्ट्रमच्या लिलावाची वाट पहात आहेत. विविध कंपन्यांनी या नेटवर्कसाठी आधीच जय्यत तयारी केली असून या माध्यमातून आपले जीवन पुन्हा एकदा बदलणार असल्याची बाब आपण लक्षात घेण्याजोगी आहे. हे सारे किती रोमहर्षक असेल याची चुणूक एयरटेल कंपनीने अलीकडेच एका प्रयोगाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. तर आज जाणून घेऊया हा प्रकार नेमका आहे तरी काय ?

मी आधीच्या अनेक लेखांमधून ‘इमर्सिव्ह जर्नालिझम’बाबत ओझरते उल्लेख केले आहेत. याबाबत अजून विस्तृत विवेचनाचा योग आला नसतांनाच एयरटेल कंपनीच्या एका इव्हेंटमुळे कुतुहल चाळविले गेले आहे. लक्षणीय बाब म्हणजे याचा विविध क्षेत्रांप्रमाणेच पत्रकारितेवरही परिणाम होणार असल्यामुळे याची माहिती आपण जाणून घेणे अगत्याचे ठरणारे आहे. आपण सध्या वापरत असलेले मोबाईल नेटवर्क हे चौथ्या पिढीतले अर्थात ४-जी ( फोर्थ जनरेशन ) या प्रकारातील होय. टु-जी ते फोर-जी पर्यंतचा प्रवास आपण सर्वांनी मोबाईल नेटवर्कच्या स्पीडच्या माध्यमातून अनुभवला आहेच. अर्थात, मोबाईल नेटवर्कच्या अपडेशन सोबत याच्या माध्यमातून होणार्‍या माहितीच्या आदान-प्रदानाचा वेग देखील वाढलेला आहे.

कंपन्यांनी काहीही दावा केला असला तरी फोर-जी नेटवर्कच्या माध्यमातून जास्तीत जास्त ५० मेगा बाईट प्रति सेकंद इतक्या गतीने डेटा डाऊनलोड करता येतो. तर अपलोडींगसाठी कमाल १५ ते २० मेगाबाईट प्रति सेकंद इतका वेग मिळतो. नेटवर्क वीक असेल तर यात मोठ्या प्रमाणात घट होते. खरं तर ‘थ्री-जी’ नेटवर्कच्या तुलनेत हा वेग खूपच चांगला असल्याने गेल्या काही वर्षात सोशल मीडियात टेक्स्टपेक्षा व्हिडीओजचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र यासोबत विकसित होत असलेल्या विविध तंत्रज्ञानांसाठी हा वेगदेखील अपुरा पडत असल्याचे लक्षात घेऊन जगभरातील कंपन्यांनी फिप्थ जनरेशन अर्थात पाचव्या पिढीतील (फाईव्ह-जी ) नेटवर्कची तयारी केल्याचे दिसून येत आहे.

भारताचा विचार केला असता रिलायन्स जिओ, भारती एयरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या आघाडीच्या कंपन्यांनी फाईव्ह-जी नेटवर्कची जय्यत तयारी केली आहे. जिओने याबाबत सर्वात पहिल्यांदा घोषणा करून आघाडी घेतली असून या पाठोपाठ एयरटेल आणि व्हीआयनेही आपण यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे. आधी जिओने फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचा मर्यादीत प्रमाणातील डेमो देखील दाखविला आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच एयरटेल कंपनीने गुरूग्राम येथील आपल्या कंपनीच्या ‘नेटवर्क एक्सपेरियन्स सेंटर’मध्ये सादर केलेला एक डेमो हा तंत्रज्ञानाच्या चित्तथरारक वापराची चुणूक दर्शविणारा ठरला. अर्थात, यासाठी निवडलेली थीम ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एका सोनेरी अध्यायाची असल्याने या प्रयोगाची रंगत अजूनच वाढली.

आपण क्रिकेट रसिक असाल तर १९८३ सालच्या विश्‍वचषकातील कर्णधार कपिल देवची झिंबॉब्वेच्या विरूध्दची नाबाद १७५ धावांची खेळी आपल्याला आठवत असेलच. खरं तर भारतीयच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील एक अविस्मरणीय खेळी म्हणून याची नोंद करण्यात आलेली आहे. नंतर वन डे क्रिकेटमध्ये अनेकांनी कपिलचा विक्रम मोडला. अगदी द्विशतके देखील झळकावण्यात आली. मात्र ज्या अत्यंत विपरीत स्थितीत आणि गोलंदाजांना अनुकुल असणार्‍या खेळपट्टीवर कपिलने ही खेळी साकारली ती पाहता अनेकांच्या मते ही वनडेतील सर्वोत्तम इनिंगपैकी एक होय. अतिशय दुर्दैवाची बाब अशी की, टर्नब्रिज वेल्स मैदानावर पार पडलेल्या या सामन्याच्या दिवशी ( १८ जून १९८३) ब्रिटनमधील टेलीव्हीजन कर्मचार्‍यांचा संप होता. यामुळे या अविस्मरणीय खेळीचे चित्रीकरण करता आले नाही. अनेकदा याबाबत खंत व्यक्त करण्यात येत असली तरी जे घडले त्याला काहीही इलाज नव्हता. याच अजरामर इनिंगला एयरटेलने फाईव्ह-जी तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवंत केले.

खालील व्हिडीओत पहा १७५ री प्लेड डेमोची झलक

एयरटेल कंपनीने फाईव्ह-जी नेटवर्कच्या गतीचा वापर करून कपिल देव यांच्या याच नाबाद १७५ धावांच्या खेळीला पुनर्जिवीत केले. यासाठी कृत्रीम बुध्दीमत्ता अर्थात ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. कपिल देव यांच्या आजच्या आणि तत्कालीन छायाचित्रांना एआय प्रोसेसरच्या मदतीने ३६० अंशात स्कॅन करून त्यांचा १९८३ सालातील हुबेहूब अवतार तयार करण्यात आला. यासोबत तेव्हाच्या भारतीय व झिंबॉब्वे संघातील खेळाडू, अंपायर, स्कोअरबोर्ड, स्टेडियम यांना देखील एआयच्या मदतीने जिवंत करण्यात आले. यानंतर ‘१७५ री-प्लेड’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिलदेवची हीच खेळी एयरटेलच्या ऑडिटोरियममध्ये निवडक मान्यवरांना दाखविण्यात आली. याची चुणूक आपण सोबतच्या व्हिडीओजमध्ये पाहू शकतात. लक्षणीय बाब म्हणजे याप्रसंगी कपिल देव यांनी उपस्थितांशी ‘होलोग्राफीक अवतार’च्या माध्यमातून संवाद देखील साधला. म्हणजेच दुसर्‍या ठिकाणावरून त्यांनी लोकांशी वार्तालाप केला. नंतर, या ऑडिटोरियमध्ये येऊन त्यांनी वार्तालाप केला.

तंत्रज्ञानाच्या मदतीने आधी कोणत्याही स्वरूपात रेकॉर्ड न करण्यात आलेला क्रिकेटचा सामना हा कधी पाहता येईल याची आपण कल्पना देखील केली नव्हती असे कपिल देव यांनी म्हटले. त्यांच्याच शब्दात सांगावयाचे झाले तर, ”कोई क्रिकेट को इस तरह से भी देख पायेगा सोचा नही था !” अर्थात ही सर्व किमया आहे ती फाईव्ह-जी तंत्रज्ञानाची ! विशेष बाब म्हणजे कपिल देवची ही खेळी ‘फोर-के’ रिझोल्युशनमध्ये सादर करण्यात आली. तर पाहणार्‍यांना चारपैकी एक कॅमेर्‍याचा अँगल निवडण्याची सुविधाही देण्यात आली होती. आगामी काळात क्रिकेट वा कोणत्याही अन्य खेळांचे सामने पाहतांना युजर आपल्याला हव्या त्या कॅमेर्‍यातून सामना पाहू शकणार असून याची चुणूक ‘१७५ री-प्लेड’ या डेमोमधून दिसून आलेली आहे.

भारतात अद्यापही फाईव्ह-जी नेटवर्कच्या वहनासाठी आवश्यक असणार्‍या स्पेक्ट्रमचा लिलाव झालेला नाही. दूरसंचार खात्याने प्रायोगीक तत्वावर उपलब्ध करून दिलेल्या स्पेक्ट्रमच्या मदतीने एयरटेल कंपनीने हा प्रयोग यशस्वीपणे पार पाडला. ही तर ‘फाईव्ह-जी’च्या वापराची फक्त नांदी आहे. फेसबुकने आधीच मेटाव्हर्सवर काम सुरू केले आहे. यात खर्‍या आणि आभासी ( रिअल आणि व्हर्च्युअल ) विश्‍वातील भेद मिटणार असून टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण हव्या त्या वेळेस या दोन्ही मुशाफिरी करू शकणार आहोत. यासाठी आवश्यक असणारा प्रचंड गतीचा डेटा आपल्याला फाईव्ह-जी नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार आहे. या नेटवर्कवरून युजरला साधारणपणे एक गेगाबाईट प्रति सेकंद इतक्या गतीने स्थीर स्पीड मिळणार असल्याचा विविध कंपन्यांचा दावा आहे. प्रत्यक्षात यापेक्षा कमी म्हणजे, दोनशे वा तीनशे मेगाबाईट प्रति सेकंद इतका वेग देखील मिळाला तर तो आपल्या जीवनाला अक्षरश: बदलून टाकणार आहे. यामुळे एयरटेलचा ‘डेमो’ हा फक्त ट्रेलर मानला तर याचा पिक्चर किती भारी असेल याची आपण आज कल्पना देखील करू शकत नाही.

खालील व्हिडीओत पहा याच कार्यक्रमाचा एक प्रोमो

भारती एयरटेल कंपनीच्या ‘१७५ री-प्लेड’ या डेमोचा विचार केला असता प्रचंड गतीमान असणार्‍या नेटवर्कच्या मदतीने केवळ माहितीचे आदान-प्रदानच गतीमान होणार नाहीय, तर विविध क्षेत्रांमध्ये याचे परिणाम होणार आहे. याबाबत एका लेखात भाष्य देखील करता येणार नाही. फक्त एयरटेलच्याच प्रयोगाचा वापर केला असता, याचा रेकॉर्ड करण्यात न आलेल्या घटनांना अगदी खर्‍या-खुर्‍या प्रकारात पुन्हा जीवंत करण्यासाठी उपयोग होईल. इतिहासातील अनेक अध्याय यातून जीवंत करता येतील. एयरटेलच्या प्रयोगात होलोग्राफीचाही वापर करण्यात आलेला आहे. यातून एखाद्या ठिकाणी उपस्थित न राहतांनाही तेथे असल्याचा आभास निर्माण करता येईल. याचा निवडणुकीचा प्रचार, रॅलीज आदींपासून ते लाईव्ह शोज, कार्पोरेट मिटींग्जपर्यंत सगळे काही बदलून जाणार आहे.

पत्रकारितेत या माध्यमातून स्टोरी टेलींग या प्रकाराला नवीन आयाम मिळणार आहे. अर्थात आजच्या डिजीटल मीडियातील पत्रकारिता देखील पुढे आमूलाग्र बदलून जाणार आहे. आज एचडीमधील लाईव्ह स्ट्रीमिंगलाही अडचणी येत असतांना थेट फोर-के क्षमतेतील क्रिस्टल क्लिअर लाईव्ह करणे शक्य होईल. ज्यांना टेक्नॉलॉजी समजेल ते एआयच्या मदतीने आपल्या पत्रकारितेला नवीन उंचीवर नेतील. तर इतरांच्या कंटेंटची उचलेगिरी करणार्‍यांना पुढे देखील चोरीचे नवीन मार्ग शोधावे लागतील. आजच तंत्रज्ञानातील बदलांचा स्वीकार करणे अगदी मोठ्या मीडिया हाऊसेसलाही जमत नाहीय. फाईव्ह-जी नेटवर्कच्या आगमनानंतर तंत्रज्ञानातील बदलांची गती अजून मोठ्या प्रमाणात वाढल्याने अडचणी निर्माण होतील हे देखील तितकेच खरे. . .! मात्र हातात स्मार्टफोन घेऊन पत्रकारीता करणार्‍यांची संख्या देखील विलक्षण प्रकारात वाढेल यात शंकाच नाही.

पुराणात विश्‍वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केल्याचे उल्लेख आहेत. आज टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपल्या भोवती एक आभासी ( व्हर्च्युअल ) जग उभे राहिले आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून यात विहार करू शकतो. अर्थात आज देखील रिअल आणि व्हर्च्युअल विश्‍वात अंतर आहेच. तथापि, फाईव्ह-जी नेटवर्कचा वापर करून खर्‍या आणि आभासी जगातील अंतर मिटणार आहे. यातून अनेक चित्तथरारक आणि मनोरंजक अशा बाबी समोर येतील. आपल्याला फक्त हे तंत्रज्ञान केव्हा येणार याचीच वाट पहायची आहे. ते आल्यानंतर सृष्टी आणि प्रतिसृष्टीतील सीमारेषा अजून धुसर होईल. याचे बरे-वाईट परिणाम देखील भोगण्यासाठी आपण तयार रहावे हेच उत्तम !

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment