Featured slider पत्रकारिता

डिजीटल मीडियातला वन मॅन ‘सुपर हिट’ शो !

Written by shekhar patil

डिजीटल माध्यमांनी पत्रकारांचे ‘स्पेशल स्टेटस’ संपुष्टात आणले आहे. आज कुणीही सहजपणे अभिव्यक्त होऊ शकतो. खरं तर, आधी देखील लिहणार्‍यांपेक्षा वाचणारे हुशार असले तरी पत्रकारांच्या चुका ‘झाकली मूठ’ या प्रकारात सुरक्षित राहून जगासमोर येत नव्हत्या. आज मात्र अगदी मोठ्यातल्या मोठ्या संपादकांनी दडपून देण्याचा प्रयत्न केला तरी एका क्षणात याचा बोभाटा होतो.

ज्या प्रकारे नवमाध्यमाने लिहणार्‍या पत्रकारांना हादरा दिला, अगदी त्याच प्रमाणे व्हिज्युअल जर्नालिस्टलाही याचा फटका बसला आहे. दृश्य पत्रकारितेतील नवीन पिढी ही फक्त सॅटेलाईट वाहिन्यांच्या कार्यालयातील वा फिल्डवरील प्रोफेशनल दृष्टीने पारंगत पत्रकारांपुरतीच मर्यादीत राहिलेली नाही. तर, यत्र-तत्र-सर्वत्र असणार्‍या इंटरनेटच्या लहरींवर स्वार होऊन अगदी खुर्द वा बुद्रुक गावांमधील अथवा वाडी-वस्त्यांवरील अनेक जण आपापल्या परीने दृश्य पत्रकारिता करत आहेत. यातील ९९ टक्के ‘काँटेंट’ हे बाळबोध स्वरूपाचे असले तरी मोजके जण हे अतिशय निष्णातपणे काम करत अचूक आगेकूच करत आहेत. याच प्रकारात डिजीटल मीडिया काय चमत्कार करू शकतो याचे एक मोठे उदाहरण जळगावातील मुफ्ती हारून नदवी यांच्या माध्यमातून समोर आले आहे.

आपल्याला नावातून समजले असेल की, हारून नदवी हे मुफ्ती अर्थात धर्मगुरू आहेत. आता, एखादा धर्मगुरू हा डिजीटल मीडियाचा विलक्षण परिणामकारक वापर, आणि तो देखील स्वत: करत असेल यावर कुणी विश्‍वास ठेवणार नाही. मात्र हा सर्व चमत्कार घडला असून मी याचा डोळस साक्षीदार आहे.

साधारणपणे जानेवारी २०१७ मध्ये मी वर्तमानपत्राचा संपादक असतांना मुफ्ती हारून नदवी हे माझ्याकडे आले. अगदी नमस्कार-चमत्कार होत नाही तोच बोलले, ”शेखरभाऊ अपने को पेपर शुरू करनेका है…आप मुझे सलाह दो..!” मी डोक्याला हात मारला. म्हणालो, ”अहो मुफ्तीसाहेब, सगळे जग डिजीटल मीडियाकडे धाव घेत असतांना तुम्हाला मुद्रीत माध्यमात जाण्याची इच्छा का सुचली ? यापेक्षा तुम्ही पूर्णपणे डिजीटल मीडियात काम करा.” त्यांनी त्याच क्षणाला माझा ५० टक्के सल्ला मानला. अर्थात, त्यांनी डिजीटल मीडियात सक्रीय होतांनाच ‘नदवी टाईम्स’ या नावाने साप्ताहिक देखील सुरू केले. तर आधीपासूनच सुरू असलेल्या व अगदी निष्क्रीय असणार्‍या युट्युब चॅनलच्या कामाला गती दिली.

यानंतर, मुफ्ती हारून नदवी यांनी अतिशय जोरदार गतीने काम सुरू केले. आधी घरून काम करणार्‍या मुफ्तींनी ऑफिस थाटले. हळूहळू कर्मचारी वाढविले. आज आपल्याला आश्‍चर्य वाटेल, मुफ्ती हारून नदवी यांच्या व्हायरल न्यूज लाईव्ह या युट्युबवरील चॅनलला ११ लाख ३० हजार सबस्क्रायबर्स आहेत. अनेकदा एखादा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे तात्काळ सबस्क्रायबर मिळाले तरी पुढे ते त्या चॅनलवरील व्हिडीओ पाहत नाहीत असे बर्‍याचदा दिसून येते. मात्र ‘व्हायरल न्यूज लाईव्ह’ वरील प्रत्येक व्हिडीओ हा सरासरी साडे तीन लाख लोक पाहतात. ते दिवसाला चार व्हिडीओज टाकतात. याचा विचार करता, दररोज १२ लाख लोक त्यांचे वृत्त पाहतात. त्यांच्या व्हिडीओजवर लाईक, कमेंट शेअर्स या प्रकारची एंगेजमेंट ही फार मोठ्या प्रमाणात आढळून येते. अर्थात, मुफ्तींचा प्रत्येक व्हिडीओ प्रेक्षकाला खिळवून ठेवतो.

एखादा धर्मगुरू हा आपल्या पारंपरीक वेषभूषेतच आणि अगदी कोणताही कृत्रीमपणा न बाळगता एखाद्या विषयाची कोणत्याही चॅनलच्या संपादकासारखी चिरफाड करू शकतो. ते देखील अगदी आपल्या लहानशा कार्यालयात बसून ! ही जादू डिजीटल मीडियाचीच आहे. आपल्याला अजून आश्‍चर्य वाटेल की, मुफ्ती हे कधीही रिटेक घेत नाहीत. ते अनेकदा कार्यक्रमांचे लाईव्ह प्रक्षेपण करतात. ते साधारणपणे सकाळी नऊ ते दुपारी एक या चार तासांच्या कालावधीत ते चार कार्यक्रम तयार करतात. हेच चार कार्यक्रम टप्प्याटप्प्याने त्यांच्या चॅनलवरून प्रसिध्द होतात. यात अगदी जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांपासून ते आंतराष्ट्रीय इश्यूजच्या बातम्या आणि त्यावरील भाष्यांचा समावेश असतो. आधी ते स्वत:च व्हिडीओ एडिटींग करत होते. अलीकडे मात्र त्यांनी कर्मचारी लावले आहेत. प्रवासात असतांना देखील व्हिडीओ तयार करून ते पाठवून देण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. यामुळे ‘व्हायरल न्यूज लाईव्ह’च्या अनेक व्हिडीओजमध्ये कार वा ट्रेनमध्ये बसून मुफ्ती हारून नदवी हे एखाद्या विषयावर मत मांडतांना दिसतात. आता त्यांचे सहकारी देखील वार्तापत्र सादर करू लागले आहेत.

डिजीटल मीडियासाठी आवश्यक असणारे तंत्रकौशल्य, विलक्षण उर्जा, नव्याचा स्वीकार करण्याची वृत्ती, सकारात्मकता, सातत्य आणि कर्मठपणा आदी गुण त्यांना वाटचालीसाठी लाभदायक ठरले आहेत. अलीकडेच त्यांच्या १९ वर्षाच्या मुलाचे आजाराने निधन झाले. हा भयंकर असा आघात ताजा असतांनाच तीन दिवसांचा शोक आटोपताच ते चौथ्या दिवशी कॅमेर्‍यासमोर बसले. आपल्या कामावर नितांत प्रेमाचे यापेक्षा दुसरे कोणते उदाहरण राहू शकत नाही ! सर्वात महत्वाचे म्हणजे व्हिज्युअल मीडियात आवश्यक असणारे प्रेझेंटेशनचे कौशल्य आणि अमोघ वक्तृत्व याची देणगी त्यांना लाभली आहे. यामुळे नवीन माध्यमाचा अतिशय समर्पक वापर ते करत आहेत.

आज ‘व्हायरल न्यूज लाईव्ह’चे सबस्क्रायबर्स हे बारा लाखांच्या उंबरठ्यावर आहेत. युट्युबवरील जाहिरातींच्या माध्यमातून आता आता ते त्यांच्या स्वत:सह सहा-सात कर्मचार्‍यांचा खर्च सहजपणे भागवू शकत आहेत. स्थानिक जाहिरातींवर एक पैशांइतकेही अवलंबून न राहता गल्लीपासून ते जगभरातील महत्वाच्या मुद्यांवर मुफ्तींचे भाष्य हे ऐकण्यासारखे असते. साहजीकच त्यांची विचारधारा ही ‘प्रो-इस्लामी’ असली तरी समकालीन विषयांवरील त्यांचे भाष्य हे चोखंदळ प्रेक्षकांनाही अनेकदा चकीत करण्याइतके चांगले असते. यामुळे मुफ्ती हारून नदवी हे डिजीटल माध्यमातील एक चालता-बोलता आणि माझ्यासमोर साकार झालेला चमत्कार आहे. याहून मोठा चमत्कार हा मुफ्तींची नम्रता व कृतज्ञता आहे. अनेक जाहीर कार्यक्रमांमधून त्यांनी शेखर पाटील या पत्रकार मित्राच्या सल्ल्यामुळे आपण डिजीटल माध्यमात यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या यशात इतरांचा वाटा असल्याची कबुली देणे हे धाडस मोजक्या लोकांमध्ये असते. यात मुफ्ती हारून नदवी यांचा समावेश होतो. असो…

एक मात्र नक्की, डिजीटल मीडिया लोक समजतात तितका सोपा नाही. कुणालाही लिहण्यासाठी वा दाखवण्यासाठीचे माध्यम मोफत असले तरी त्यात काय लिहणार वा दाखवणार यावर बरेच काही अवलंबून आहे. अगदी हौशे-गवशे व नवश्यांपासून ते मुद्रीत वा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील नोकरी गेली म्हणून डिजीटलकडे वळणार्‍यांपेक्षा किती तरी पटीने मुफ्ती हारून नदवी यांच्यासारखे लोक अतिशय सरस पत्रकारिता करतात ते त्यांच्याकडे असणार्‍या कौशल्यामुळेच !

‘काँटेंट इज किंग’ म्हटले जाते. मुफ्ती हे रूढ अर्थाने पत्रकार नसले तरी त्यांच्याकडे सादरीकरणाची विलक्षण प्रतिभाशक्ती आहे. अशा प्रकारचे कौशल्य नसणारे कॉपी-पेस्टवर अवलंबून राहत आपण पत्रकार असल्याचा दाखविण्याचा आटापीटा करतात. एखाद्या ठिकाणी आलेली बातमी जशीच्या तशी वा क्वचीत प्रसंगी थोडी बदल करून फटाफट शेअर करण्याच्या पलीकडे त्यांच्यात कुवत नसते. बरं, आपण बातमी चोरली नसल्याचा बनाव ते जगासमोर करू शकत असले तरी गुगल मात्र त्यांची चोरी पटकन पकडतो. यामुळे कॉपी-पेस्ट पत्रकारांना डिजीटल माध्यमातून उत्पन्नाला भयंकर मर्यादा असल्याचे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

मेनस्ट्रीम मीडियाने वार्तांकन करतांना अनेक रिकाम्या जागा सोडल्या आहेत. त्यांना त्या सोडाव्या लागतात. या त्यांच्या मर्यादा आहेत. नुसत्या त्या जागा भरून काढल्या तरी सुध्दा डिजीटल मीडियात कुणीही यशस्वी होऊ शकतो. आणि थेट मेनस्ट्रीम मीडियाला हेवा वाटावा इतक्या सुपर फिनीश्ड पध्दतीत कुणी काम करत असेल तर काय जादू होऊ शकते हे मुफ्ती हारून नदवी यांच्या सारखे मोजके लोक दाखवून देत आहेत. नवमाध्यमांचा हा चमत्कार आहे.

अजून आपल्याकडे डिजीटल मीडिया बाल्यावस्थेत आहे. हे माध्यम पूर्णपणे विकसित झाल्यानंतर आणि इंटरनेटचा वेग वाढल्यानंतर ठिकठिकाणी मुफ्ती हारून नदवी यांच्यासारखे ‘परफॉर्मर’ उदयास येतील. अर्थात, यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागेल इतकेच ! मुफ्ती हारून नदवी यांना डिजीटल मीडियात विकसीत होण्यासाठी खूप वाव आहे. एक तर हा मंच क्रॉस प्लॅटफॉर्म या प्रकारात विकसीत करण्याचे मी सुचविले आहे. यावरील कंटेंट हे वैविध्यपूर्ण असावे याकडे आता त्यांचे लक्ष आहे. विलक्षण झपाट्याने ते सर्व बदल स्वीकारत आहेत. यामुळे ‘व्हायरल न्यूज लाईव्ह’ हे खरोखरच सोशल मीडियात व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्‍वास आहे.

नुकतीच स्मृती शताब्दी साजरी करण्यात आलेले शायर अकबर इलाहाबादी यांचा-

खीचो न कमान को…ना तलवार निकालो ॥
जब तोप मुकाबील है…तो अखबार निकालो ॥

हा शेर खूप प्रसिध्द आहे. प्रत्येक पत्रकार अभिमानाने याला कधी तरी उदधृत करत असतो. मात्र याच अकबर इलाहाबादी यांनी वर्तमानपत्रांमधील दिशाभूल करणार्‍या वार्तांकनाची खिल्ली उडवितांना-

मियां को मरे हुए हफ्ते गुजर गए…
कहते है अख़बार मगर, अब हाले मरीज अच्छा है ॥

असे म्हटल्याचे सर्व जण सोयिस्करपणे विसरतात. मुद्रीत माध्यम सर्वशक्तीमान असल्याच्या कालावधीत वर्तमानपत्र काढणे आणि ते चालवणे हे मोठ्या अभिमानाने मिरवले जात असे यात शंकाच नाही. मात्र आज मुद्रीत माध्यम आक्रसत असतांना त्यांचा दुसरा शेर हा अधिक महत्वाचा झाला आहे. आधी फेक न्यूज वा प्रोपगंडा हा थोड्या विलंबाने येत असे. डिजीटल मीडियात प्रत्येक क्षणाला याचा धोका असतो. यामुळे खर्‍या-खोट्याची शहानिशा करत डिजीटल मीडियात काम करणे हे अतिशय अवघड आहे. ही कसरत ज्याला जमेल तो, खरा डिजीटल पत्रकार, नाही तर…’कॉपी-पेस्ट-फॉरवर्ड’ करणारे महाठग आपल्या भोवती हजारोंनी दिसत आहेत. या बाबींचा विचार करता अक्षरश: वन मॅन ‘सुपर हिट’ शो प्रकारात एक दशलक्षांपेक्षा जास्त युजर्सला खिळवून धरणारे मुफ्ती हारून नदवी हे रूढ अर्थाने पत्रकार नसतांनाही खरे पत्रकार असल्याचे माझे मत आहे.

व्हायरल न्यूज लाईव्हची लिंक : https://bit.ly/3duvcEV
मुफ्ती हारून नदवी यांच्याशी आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.

9923223361
9637541786

About the author

shekhar patil

Leave a Comment