Featured slider क्रीडा

‘बेस्ट’ इंडिज : एक दिवसीय क्रिकेटचे सुवर्णयुग

Written by shekhar patil

आजपासून क्रिकेटचा विश्‍वचषक सुरू होतोय. मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. कधी काळी ‘इट क्रिकेट-स्लीप क्रिकेट’चे भारावलेले आयुष्य जगलो. यात खेळासोबत वाचन, पाहणे, बोलणे सारेच काही आले. क्रिकेटबाबत चिक्कार वाचले. यातून या नितांतसुंदर खेळाचे विविध पैलू जाणून घेतले. इंटरनेटच्या आगमनानंतर डॉक्युमेंटरीज, व्हिडीओज आदींमधून याला नवीन आयाम लाभला. खरं तर, मी खेळणे सोडल्यापासून जाणीवपूर्वक क्रिकेट सामने पाहणेदेखील कमी केले. यात वेळेच्या अपव्ययाचा मुद्दा तर होताच. पण, मॅच फिक्सींगच्या प्रकरणामुळे क्रिकेट हे माझ्या यादीतून जवळपास बाद झाले. मात्र विश्‍वचषकाचा ज्वर आता मुलाच्या डोक्यात भिनल्याचे पाहून पुन्हा एकदा हे प्रेम प्रकरण आठवले. मुलास क्रिकेट विश्‍वचषकाविषयी माहिती देतांना आपसूकच या स्पर्धेच्या इतिहासातील एक तेजस्वी प्रकरण आठवले. वेस्ट इंडिज हा ‘बेस्ट’ इंडिज संघ असल्याचे हे युग आपल्याला गतवैभवाचे विहंगम दर्शन घडविते.

वास्तविक पाहता क्रिकेटच्या विश्‍वचषकात अनेक महान खेळाडूंनी आपल्या प्रतिभाशक्तीचे दर्शन घडविले आहे. तर मातब्बर संघांनी विजेतेपदाचा मुकुट मोठ्या अभिमानाने मिरवला आहे. बर्‍याच समीक्षकांनी आपापली ड्रीम टिमदेखील निवडलेली आहे. मात्र या सर्व काथ्याकुटात न पडता या स्पर्धेतील सर्वात शक्तीशाली संघ म्हणून गणल्या जाणार्‍या क्लाईव्ह लॉईडच्या टिमची बाब काही औरच. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सुवर्ण युगातील दोन टप्पे अनुक्रमे एक दिवसीय आणि कसोटी सामन्यांशी संबंधीत आहे. लॉइडच्याच संघाने ७५ आणि ७९ साली लागोपाठ दोन विश्‍वचषक जिंकण्याचा भीम पराक्रम केलाय. (याची बरोबरी नंतर फक्त रिकी पाँटींगच्या चमूने २००३ आणि २००७ साली केली.) लॉईडची विजेतेपदाची हॅटट्रीक भारताने १९८३ साली थोपवली. यानंतर लॉईडने निवृत्ती पत्करल्यावरही सुमारे दशकभरापर्यंत विंडीजने कसोटीत दबदबा कायम ठेवला. १९८० ते १९९५ अशा तब्बल दीड दशकापर्यंत हा संघ एकही कसोटी मालिका हरला नाही. अर्थात, या संघाच्या यशाची मालिका सुरू झाली ती क्लाईव्ह लॉईडच्याच नेतृत्वात.

सत्तरच्या दशकाच्या मध्यात कॅरेबियन देशांमधील वातावरण हे धुमसते होते. यात जगभरातील वर्णभेदी लढ्याची तीव्रता वाढली असतांना क्रिकेटच्या मैदानावरील लढाईतला विजयातून या देशांमधील जनतेला अस्मितेचे एक नवीन प्रतिक मिळाले. या कालखंडातील सर्व खेळाडूंनी एकमुखाने याला मान्यदेखील केले आहे. विशेष करून विंडीजच्या अश्‍वेत खेळाडूंना तुच्छ लेखणार्‍या इंग्लंड व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना थेट मैदानावर जोरदार प्रत्युत्तर देऊन चीत करण्याचे काम क्लाईव्ह लॉइड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले. त्यांच्या या देदीप्यमान कामगिरीत अत्यंत आक्रमक अशा फलंदाजांसोबत तुफानी चौकडीचा मोलाचा वाटा होता.

वास्तविक पाहता विंडीजच्या संघात जलद गोलंदाजांची वानवा नव्हतीच. साठच्या दशकापासून हा संघ यासाठी प्रसिध्द होता. वेस हॉल आणि त्यांच्या जोडीला चार्ली ग्रिफीथ यांनी एक काळ गाजविला. गॅरी सोबर्स हे जलद आणि फिरकी या दोन्ही प्रकारांमध्ये पारंगत होते. साधारणपणे सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी कॅरेबियन क्रिकेटमध्ये नवयुगाचा प्रारंभ झाला. क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली याच संघाने कसोटी आणि एक दिवसीय या तेव्हा उपलब्ध असणार्‍या दोन्ही प्रकारांमध्ये आपल्या वर्चस्वाची द्वाही फिरवली. १९७४ साली गॅरी सोबर्स व रोहन कन्हाय या दोन महान खेळाडूंनी सेवानिवृत्ती पत्करली. यानंतर विंडीजच्या संघाची सूत्रे क्लाईव्ह लॉईडकडे आली. त्यांनी एक जबरदस्त संघाची उभारणी केली. जो आजदेखील क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात बलाढ्य चमूंपैकी एक मानला जातो. याची खासियत म्हणजे त्यांनी एकाच वेळी चार जलदगती गोलंदाज खेळविण्याची रणनिती यशस्वीपणे अंमलात आणली. याची अगदी आजवर बहुतांश संघाने कॉपी केल्याचे दिसून येते. मात्र विंडीजच्या तुफानी चौकडीची बात काही औरच.

सत्तरच्या दशकाच्या मध्यावर अँडी रॉबर्टस् यांच्या रूपाने विंडीज संघातील गोलंदाजीचे नवीन पर्व सुरू झाले. लवकरच कॉलीन क्राफ्ट, मायकेल होल्डींग आणि जोएल गॉर्नर यांच्या रूपाने ही चौकडी पूर्णत्वास आली. यातील कॉलीन क्राफ्ट यांची कारकिर्द ही तुलनेत अल्पजीवी ठरली. मात्र ही भर माल्कम मार्शलच्या रूपाने भरून निघाली. या चौकडीतील प्रत्येकाची शैली आणि बलस्थाने वेगवेगळी होती. मात्र त्यांच्या नुसत्या नावानेच फलंदाजांचा थरकाप उडायचा. यातील अँडी रॉबटर्स हा तुफानी चौकडीचा अग्रदूत मानला गेला. अतिशय चतुराईने गोलंदाजी करणार्‍या अँडीच्या भात्यात अनेक अस्त्रे होती. त्याचे कटर हे भल्याभल्या फलंदाजांना चकवण्यास सक्षम होते. मायकेल होल्डींग हा अतिशय लयबध्द रनअपसह गोलंदाजी करायचा. गतीला अचूक दिशा आणि टप्पा देत फलंदाजांचा अचूक वेध घेण्यासाठी तो ख्यात झाला. तब्बल ७ फुट ८ इंच उंची असणार्‍या जोएल गॉर्नरचा अवतारच फलंदाजांना गर्भगळीत करत असे. डेडली यॉर्कर व बाऊन्सर ही त्याची खास अस्त्रे. ताडमाडासारखी उंची लाभल्यामुळे त्याच्या चेंडूची दिशा ओळखण्यात फलंदाजांची हमखास गफलत होत असे. तर माल्कम मार्शल या चौकडीत सर्वांत उशीरा समाविष्ट होऊनही अग्रस्थानी विराजमान झाला. खरं तर आपल्या अन्य सहकार्‍यांच्या तुलनेत कमी उंची ( ५ फुट ११ इंच) लाभलेला मार्शल हा फार थोडा रनअप घेऊन अतिशय जलद गतीने गोलंदाजी करत असे. त्याचे बाऊन्सर्स हे फलंदाजांना अक्षरश: गर्भगळीत करत असत. या तुफानी चौकडीच्या आधी, त्यांच्या कारकिर्दीत आणि उत्तरार्धात विंडीज संघात काही जलदगती गोलंदाज आले. मात्र त्यांना यांची उंची गाठता आली नाही. यानंतर फक्त अँब्रोज आणि वॉल्श यांचा अपवाद वगळता कुणी इतके यशस्वी व लोकप्रियदेखील ठरले नाही.

लाईडच्या संघातील फलंदाजांचे फळीदेखील अतिशय मजबूत होती. गॉर्डन ग्रिनीज आणि डेसमंड हेन्स ही सलामीची जोडी विरूध्द संघाच्या गोलंदाजावर जोरदार हल्ला करण्यासाठी ख्यात होती. यातील ग्रिनीजने तर भल्याभल्यांना जेरीस आणले होते. डेनीस लिली, इम्रान खान व बॉब विलीससारख्या तुफान गतीने गोलंदाजी करणार्‍यांना अगदी सहजगत्या स्वीप मारण्याचे धाडस तोच करू जाणे. जोडीला असणारा हेन्सही तितकाच प्रतिभावंत होता. ग्रिनीज व हेन्सची जोडी फोडण्यात विरोधी गोलंदाज जेरीस येत असत. ही जोडी फुटल्यानंतरही विरोधकांना उसंत मिळत नसे. बादशहा विवियन रिचर्डस् मस्त पैकी च्युईंग गम चघळत धुलाई करत असे. अनेक समीक्षक आणि क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, रिचर्डस् हा सर्वकालीन महानतम फलंदाजांपैकी एक होय. अगदी सहजपणे कोणत्याही गोलंदाजांची गलीतगात्र अवस्था करण्यात त्याचा हातखंडा होता. नैसर्गिक शैलीत निर्धास्तपणे खेळणारा रिचर्डस् या संघाची जान होता. यानंतर मैदानावर जाडसर भिंगाचा चष्मा घातलेल्या क्लाईव्ह लॉइड दाखल व्हायचा. इतर वेळेस अगदी जंटलमन वाटणारा लॉइड हा आपली वजनदार बॅट एखाद्या दांडपट्टयासारखी फिरवायचा तेव्हा अक्षरश: कसाई भासत असे. अर्थात या संघाची जशी गोलंदाजांची तुफान चौकडी होती. अगदी त्याचप्रमाणे हे चारही फलंदाज विरोधी संघावर जोरदार हल्लाबोल करण्यात माहीर होते. यात आक्रमकतेमुळे काही दगाफटका होऊन ही फळी तंबूत परतल्यास टिच्चून फलंदाजी करणार्‍यांची एक फळी अजून होती. यात लॅरी गोम्स, गस लोगी व यष्टीरक्षक जेफ दुजॉ यांचा समावेश होता. यातील गोम्स हा कामचलावू गोलंदाज होता तर लोगी हा सर्वकालीन महान क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून गणला गेला. जेफ दुजा हा अतिशय जिगरबाज खेळाडू म्हणून ख्यात होता. अर्थात सातव्या क्रमांकापर्यंत विंडीजची फलंदाजी होती. तर वर नमूद केल्यानुसार तुफानी चौकडी गोलंदाजीचा भार वाहण्यासाठी समर्थ होती. तर जवळपास प्रत्येक खेळाडूची शरीरयष्टी ही एखाद्या अ‍ॅथलिटप्रमाणे असून सर्वजण चपळ होते. यामुळे त्यांचे क्षेत्ररक्षणदेखील अतिशय उत्कृष्ट दर्जाचे होते.

बादशहा विवियन रिचडर्स

क्लाईव्ह लॉइडच्या संघाने १९७५ साली आपल्या कट्टर विरोधी कांगारू संघाला नमवून विजेतेपद पटकावले. १९७९ साली इंग्लंडला त्यांच्याच मायभूमित व क्रिकेटच्या पंढरीवर (लॉडर्स मैदान) लोळवून विश्‍वविजेतेपद कायम राखले. १९८३ साली मात्र कपिलदेवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कमी जोखण्याची जबर किंमत त्यांना विजेतेपद गमावून चुकवावी लागली. लाईडचा १९८३ चा संघ हा अतिशय संतुलीत आणि परिपूर्ण असूनही भारताने केलेला पराजय त्यांच्या खूप जिव्हारी लागला. या विश्‍वचषकानंतर लागलीच भारतीय दौर्‍यावर आलेल्या विंडीजने याची खुन्नस मैदानात काढली. सहा कसोटी सामन्यांची मालिका ३-० ने तर एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकून लॉइडच्या सहकार्‍यांनी नुकतेच विश्‍वविजेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाला लागलीच अक्षरश: जमीनीवर आणले. यानंतर वर नमूद केल्यानुसार १९९५ पर्यंत विंडीजने कोणतीही कसोटी मालिका गमावली नाही. मात्र एक दिवसीय सामन्यांमधील या संघाचा दरारा हळूहळू कमी होत गेला. १९८३ नंतर कधीही हा संघ विश्‍वचषकाच्या अंतीम फेरीत गेला नाही. मध्यंतरी अतिशय खराब स्थितीत असणारा हा चमू आता नव्याने उभारी घेण्यासाठी सज्ज झालेला आहे. मात्र गत इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता फारशी दिसून येत नाही.

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात विंडीज क्रिकेटला उतरती कळा लागली. लारा सारखा महान फलंदाज तसेच अन्य गुणवान खेळाडूंचा भरणा असूनही हा संघ गतवैभव प्राप्त करू शकला नाही. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचा लहरी कारभार यासाठी बर्‍याच प्रमाणात कारणीभूत ठरला. खेळाडूंना अपेक्षेनुसार मानधन न देण्याचा बोर्डाचा निर्णय अनेकदा वादग्रस्त ठरला. यातच क्रिकेटमधील काही नियम, विशेष करून बाऊन्सर्सवर घालण्यात आलेल्या निर्बंधाचाही या संघाला फटका बसला. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी क्रिकेट हा खेळ फलंदाजकेंद्रीत बनला. मृत (पाटा) खेळपट्टयांवर विंडीजच्या जलदगती गोलंदाजांना कोणतीही चमक दाखविण्याची संधी उरली नाही. याचा फटकाही या संघाला बसला. तर दुसरीकडे कॅरेबियन बेटांमध्ये बास्केटबॉल, फुटबॉल आदींची लोकप्रियता वाढीस लागली. टी-२० च्या २०१२ आणि २०१६ सालचे विश्‍वविजेतेपद मिळवल्याने विंडीजचे सुवर्णयुग परतल्याची चर्चा सुरू झाली. मात्र तसे अद्याप तरी झाले नाही. अर्थात, आजही कॅरेबियन बेटांवर क्लाईव्ह लॉइडच्या महापराक्रमी चमूची लोकप्रियता अबाधित आहे. याचमुळे, जागतिक क्रिकेटमधील हा एक सोनेरी अध्याय आहे हे सांगणे नकोच.

तुफानी चौकडी : रॉबटर्स, होल्डींग, क्रॉफ्ट आणि गॉर्नर

About the author

shekhar patil

Leave a Comment