Featured slider चालू घडामोडी पत्रकारिता

डिजीटल मीडियातील ‘फ्युजन पत्रकारिता’ !

Written by shekhar patil

डिजीटल माध्यमाने पत्रकारितेची चौकट उदध्वस्त करतांना याची गृहितके, सौदर्यशास्त्र आणि एकंदरीतच मुख्य ढाचा खिळखिळा करण्यास प्रारंभ केलेला आहे. याचमुळे कधी काळी दृश्य पत्रकारितेत दिसणे ही महत्वाची अट असतांना आता तुमच्या-आमच्या सारखेच दिसणारे, सर्वसामान्यांची भाषा बोलणारे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जनहिताचे मुद्दे उपस्थित करणार्‍या पत्रकारांची एक पिढी डिजीटल मीडियात उदयास आलेली आहे. यात अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांच्या सारख्या सेलिब्रिटींची जबरदस्त धुलाई केल्यामुळे सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलेल्या मनीष कुमार कश्यप या बिहारी तरूणाच्या निमित्ताने एक नवीन अध्याय आकाराला येत आहे. मेनस्ट्रीम मीडियाने अनेक रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. नुसत्या या जागा भरून काढण्याचा प्रयत्न जरी केला तरी समाजहिताला केंद्रस्थान मानणारी नवपत्रकारिता कशी उदयास येऊ शकते याचे उदाहरण आपल्या भोवतीचे अनेक मनीष कश्यप करत आहेत. पारंपरीक आणि नवमाध्यमांचा अभ्यास करणार्‍यांनी याकडे गांभिर्याने बघण्याची आवश्यकता आहे.

प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत आपल्या कडचा डिजीटल मीडिया हा थोडा प्राथमिक अवस्थेत असला तरी अलीकडच्या काही दिवसांमध्ये यातील स्थित्यंतर हे कुणीही स्पष्टपणे अनुभवू शकतो. यात फेसबुक आणि युट्युबवरील व्हिडीओजच्या माध्यमाचा अतिशय परिणामकारक वापर होतांना आपल्याला दिसून येत आहे. ‘व्हिज्युअल जर्नालिझम’ अर्थात दृश्य पत्रकारितेतील पारंपरीक संकेतांना झुगारून लावत अगदी सटर-फटर ब्रेकींग न्यूज पासून ते अतिशय गंभीर मुद्यांवरील प्रदीर्घ चर्चा आपल्या समोर सादर करण्यात येत आहेत. यात मेनस्ट्रीम मीडियातील काही मातब्बर मंडळींपासून ते देशाच्या गल्लीबोळातील हौशा-गवशांचाही समावेश आहेच. यातील बर्‍याचशा हास्यास्पद बाबींवर सोशल मीडियातील ट्रोलर्स तुटून पडत असतात. मात्र यातील अनेक ‘स्टोरीज’ या तुफान लोकप्रिय होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये याच प्रकारात मनीष कुमार कश्यप (मूळ नाव त्रिपुरारी कुमार तिवारी ) हा बिहारी तरूण सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनला आहे. ‘सच तक न्यूज’ या डिजीटल मीडिया हाऊसचा संपादक व खरं तर सर्वेसर्वा असणारा मनीष हा गेल्या तीन वर्षांपासून नवमाध्यमात कार्यरत आहे. मात्र अलीकडच्या काही महिन्यांमध्ये त्याला तुफान लोकप्रियता लाभली आहे. गेल्या पंधरा दिवसात त्याने बॉलिवुडच्या अभिनेत्यांबाबतचे केलेले वार्तांकन सोशल मीडियातून चर्चेचा विषय बनले असून आपण देखील ते कोणत्या तरी व्हाटसऍप ग्रुपमध्ये नक्कीच पाहिले असेल.

( या व्हिडीओत बघा शाहरूखच्या मन्नत बंगल्या बाहेरील रिपोर्टींग )

सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मुलास ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतरच्या काळात मनीष कश्यप हा नेमका मुंबईत होता. याप्रसंगी त्याने थेट शाहरूखच्या मन्नत या बंगल्या समोर केलेले वार्तांकन सोशल मीडियात वणव्यासारखे व्हायरल झाले आहे. एखादा पत्रकार भावनांचा उद्रेक होऊ न देता, वार्तांकन करत असतो. हा एक पत्रकारितेचे संकेत आहे. मात्र मनीषने भावनेने ओथंबलेल्या स्वरात केलेले रिपोर्टींग हे असंख्य आबालवृध्दांना भावले आहे. अर्थात, यावर एकांगीपणाचा आरोप करून ट्रोल देखील करण्यात आले आहे. तथापि, भोजपुरी भाषा बोलणारा एक तरूण हा डिजीटल मीडियाच्या माध्यमातून एक मोठा आयकॉन बनला हे निश्‍चीत.

( या व्हिडीओत पहा अमिताभला कमला पसंद वरून केलेले रिपोर्टींग )

यासोबत मनीष कश्यप याने अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यासमोरून वार्तांकन करतांना ”ते कमला पसंद या अतिशय घातक अशा पानमसाल्याची जाहिरात करून देशातील जनतेचे आरोग्य खराब का करत आहेत ?” असा प्रश्‍न विचारला. खरं तर, अशा प्रकारचा प्रश्‍न मेनस्ट्रीम मीडिया विचारू शकत नाही. कधी काळी रूपेरी पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ची भूमिका साकारणार्‍या बॉलिवुडच्या महानायकाची ‘अँग्री यंग डिजीटल पत्रकारा’ने बिनपाण्याने केल्याने सोशल मीडियात प्रचंड खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत आले असले तरी मनीषच्या व्हिडीओने सरोगेट जाहिरातीचा मुद्दा भेदकपणे समोर आल्याने अमिताभने कमला पसंद सोबतचा आपला करार रद्द केला. त्याने याच प्रकारातील मुंबईतील काही मुद्यांवरून केलेले व्हिडीआज देखील खूप गाजले आहेत. यात त्याने एनसीबीच्या कार्यालया समोर नियमांचे उल्लंघन करून करणार्‍या वेब सेरीजचे बंद केलेल्या चित्रीकरणाचा व्हिडीओ देखील लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

( बघा : वेब सेरीजच्या चित्रीकरणाचा डाव कसा उधळून लावला ते ? )

खरं तर, डिजीटल मीडियाचा समर्पक वापर हा फक्त मनीष कश्यपच करत नाहीय. त्याच्यापेक्षा जास्त युजर्स, फॉलोअर्स असणारे अनेक जण आज विविध विषयांवरील दृश्य पत्रकारिता करत आहेत. मात्र मनीषच्या यशातून नवमाध्यमातील एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की, आता प्रमाण भाषा अथवा पत्रकारितेची पारंपरीक आचार संहिता आता उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शुध्द हिंदीत नव्हे तर थेट भोजपुरीत रिपोर्टींग करणार्‍या मनीष कश्यपला डिजीटल माध्यमाने ‘ग्लोबल आयकॉन’ बनविले आहे. हे मीडियाचे खर्‍या अर्थाने लोकशाहीकरण आहे. मीडियातील भाषीक आणि प्रांतीक भेद हे अनेकदा उघडपणे बोलले जात असले तरी याला सांधण्यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत. मात्र डिजीटल मीडियाने आता ‘लोकल इश्यू’ आणि ‘ग्लोबल रीच’ याचे अफलातून ‘फ्युजन’ सादर करण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. अर्थात, आता लोकल आणि ग्लोबल यांच्यातील भेदाची भिंत देखील उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे अधोरेखीत झालेले आहे. याच्याच मदतीने बिहारच्या ग्रामीण भागातील एक युवक मुंबई सारख्या मायानगरातील ज्वलंत मुद्यावर अगदी थेट त्याच्याच भाषेत रिपोर्टींग करतो तेव्हा आपल्या समोर नवमाध्यमाची विलक्षण ताकद अक्षरश: साकार होतांना दिसते. याच ताकदीने डिजीटल मीडियात अनेक जण आता पाय घट्ट रोवून उभे राहतांना दिसत आहेत. याबाबत मी आपल्याला नेहमी अपडेट करत राहीलच.

डिजीटल माध्यमाने वर्तमानपत्रांच्या पत्रकारितेच्या पुढील रेष आखली असतांना आता व्हिज्युअल जर्नालिझममधील पुढील पल्ला आपल्याला दिसू लागला आहे. किमान याची चुणूक तरी स्पष्ट झालेली आहे. अर्थात, दृश्य पत्रकारितेतील पुढची पिढी ही अज्ञात चेहर्‍यांमधून, गाव-खेडी, वाडी-वस्त्यांमधूनही उदयास येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मनीष कश्यप ही तर सुरूवात आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या नव्या फ्युजन पत्रकारितेचे आपण मन:पूर्वक आणि खुल्या दिलाने स्वागत करायला हवे असे मला वाटते.

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment