Featured पत्रकारिता

लोक पत्रकारितेची लवलवती ज्वाला !

Written by shekhar patil

अत्याधुनिक साधनांनी पत्रकारितेतील रचनात्मकतेला चालना मिळण्याऐवजी याला श्रम वाचण्याचे साधन म्हणून वापरण्याचा प्रकार हा मीडियाला किती मारक ठरलाय हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या दोन दशकांमध्ये मुद्रीत आणि डिजीटल माध्यमातील चढउतार आणि यांचे क्रमश: होत जाणारे पतन मी स्वत: अनुभवत आहे. डिजीटल माध्यमाची गती, वैश्‍वीक परीघ आणि अर्थातच मोफत उपलब्धतेमुळेच फक्त मुद्रीत माध्यमावर आघात झाला नाही. तर, संपर्काच्या अद्ययावत टुल्सचा वापर हा पत्रकारिता सुलभ करण्यासाठी आल्याची बाब यासाठी कारणीभूत ठरली.

आयत्या प्रेसनोटस् आणि याची सहजपणे देवाण-घेवाण करणारी यंत्रणा उपलब्ध झाल्याचा मोठा फटका प्रिंट मीडियाला बसला आहे. तर, दुसरीकडे डिजीटल माध्यम हे कॉपी-पेस्ट आणि खर्‍या-खोट्याचा थांगपत्ता लागत नसल्याने जेरीस आले आहे. या माध्यमातील उचलेगिरीचे एकापेक्षा एक भन्नाट, भयंकर, विनोदी आणि काही मन सुन्न करणारे किस्से माझ्याकडे आहेत. एक दिवस नक्कीच गौप्यस्फोट करणार. मात्र आजचा विषय आहे तो, ‘खबर लहरीया’ या कम्युनिटी बेस्ड वर्तमानपत्र आणि न्यूज पोर्टलचा…! यावर आधारित ‘रायटिंग विथ फायर’ या डॉक्युमेंटरीची ऑस्करसाठी निवड झाल्यामुळे ‘खबर लहरीया’ची महत्ता पुन्हा एकदा नव्याने सांगाविशी वाटत आहे.

एका ख्यातनाम वर्तमानपत्राच्या डिजीटायझेशनशी संबंधीत काम करत असतांना मॅनेजमेंटकडून सातत्याने त्यांचे संपादक आणि पत्रकार हे नवीन माध्यमाला स्वीकारत नसल्याची ओरड होत असल्याचे मी स्वत: अनुभवले आहे. प्रिंट कडून इलेक्ट्रॉनिक अथवा व्यापक अर्थात सांगावयाचे तर डिजीटलकडे जाणारा मार्ग हा खुल्या दिलाने स्वीकारणारे खूप कमी पत्रकार असल्याचे वास्तव कुणी नाकारू शकत नाही. बहुतांश वर्तमानपत्रांच्या डिजीटल वाटचालीत हाच मोठा अडसर दिसून येतो. या पार्श्‍वभूमिवर, उत्तर भारतातील भयंकर सरंजामवादी परिसरातल्या मागास समूह घटकांमधील महिला प्रिंट आणि डिजीटल हे माध्यमांचे दोन्ही प्रकार किती लिलया हाताळतात हे पहावयाचे असेल तर आपल्याला ‘खबर लहरीया’ची वाटचाल समजून घ्यावी लागेल.

‘खबर लहरीया’ हे उत्तर भारतातील साप्ताहिक व न्यूज पोर्टल असून ते निरंतर या सामाजिक संस्थेद्वारे चालविण्यात येते. २००२ साली याची पहिली आवृत्ती निघाली तेव्हा याच्या भविष्याबाबत शंका व्यक्त करण्यात आल्या. खर तरं, याआधी देखील कम्युनिटी बेस्ड, लोकसहभागातून आणि बोलीभाषेतून अनेक वर्तमानपत्रे, साप्ताहिके वा नियतकालिके प्रकाशित झाली होती. मात्र या प्रकारचे बहुतेक प्रयोग हा अयशस्वी ठरले असतांना तब्बल दोन दशकांपर्यंत खबर लहरिया टिकलेच नाही, तर प्रचंड विस्तारले देखील… !

‘खबर लहरिया’ची काही खास वैशिष्ट्ये म्हणजे यचे कामकाज पूर्णपणे महिला आणि त्या देखील मागास समूहांमधील स्त्रीया सांभाळतात. आधी साप्ताहिकाच्या स्वरूपातील ‘खबर लहरीया’ आता पूर्णपणे डिजीटल स्वरूपात अर्थात न्यूज पोर्टलच्या माध्यमातून प्रकाशित होते. यात बुंदेली, अवधी, भोजपुरी बोलीतील कंटेंट असून यात त्यांच्या परिसरातील विविध समस्या आणि विशेष करून महिलांना भेडसावणार्‍या समस्यांच्या वृत्तांकनाला प्राधान्य देण्यात येते. महिलांवरील अत्याचार, शासकीय योजनांमधील भ्रष्टाचार, जाती व धर्मभेदातून घडणार्‍या दुर्घटना आदींना यात प्राधान्य दिले जाते.

देशभरात प्रचंड गतीने अगदी गल्लीबोळांमध्येच नव्हे तर थेट दुर्गम वाड्या-वस्त्यांमधील भोवताल जगापर्यंत पोहचवणारे अनेक पोर्टल्स, युट्युब चॅनल्स उदयास आली आहेत. यामुळे ‘खबर लहरीया’त वेगळेपण काय ? असा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. यातील एक वेगळेपण हे अर्थातच पत्रकारितेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता अतिशय निष्ठेने दोन दशकांपर्यंत एक मीडिया हाऊस चालवून दाखविण्याचे शिवधनुष्य ‘खबर लहरिया’च्या चमूने पेलून दाखविले आहे. तर यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे तंत्रज्ञानाच्या नव्या लाटेवर स्वार होत अगदी सहजपणे ‘खबर लहरीया’ हे प्रिंट कडून डिजीटलकडे शिफ्ट झाले आहे. २०१५ पासून त्यांनी आपली मुद्रीत आवृत्ती बंद करून फक्त आणि फक्त डिजीटल आवृत्तीच्या मदतीने वाटचाल सुरू केली आहे. बदलत्या काळाचा वेध घेण्यात प्रोफेशनल मीडियाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असतांना अल्प वा अर्धशिक्षीत आणि रूढ अर्थाने पत्रकारितेचे कोणतेही प्रशिक्षण न घेतलेल्या महिलांनी हा बदल जितक्या सहजपणे स्वीकारला हे मला खूपच कौतुकास्पद वाटते.

माध्यमाचे स्थित्यंतर हा माझ्या आवडीचा, अध्ययनाचा, अनुभूतीचा आणि व्यवसायाचा विषय आहे. याआधी मी याच्याशी सबंधीत विपुल प्रमाणात लिखाण केले आहे. यात न्यूयॉर्क टाईम्सने किती अवघड अशी कसरत करून डिजीटायझेशनचा मार्ग पत्करला याबाबतचे विवेचन मी आधीच एका लेखात केले असून आपण याला https://bit.ly/35DSeqU येथे क्लिक करून वाचू शकतात. मुद्रीत माध्यम हे प्रचंड शक्तीशाली असतांनाच्या कालखंडापासून वाटचाल करून ते अत्याधुनीक साधनांमुळे याच्या मर्यादा इतर मीडिया हाऊसेसला लक्षात येण्याआधीच ‘खबर लहरीया’च्या चमूने यावर शिफ्ट होण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय विस्मयकारक आणि भारतीय पत्रकारितेच्या माध्यमातून मापदंड म्हणून प्रस्थापित होणारा असल्याचे माझे मत आहे.

‘खबर लहरीया’ हे मुद्रीत माध्यमात असतांना याचा खप मर्यादीत होता. आणि डिजीटलमध्ये आल्यानंतर वाचक वाढले असले तरी यामुळे डिजीटल माध्यमातून फार काही जास्त उत्पन्न मिळत असेल अशी स्थिती देखील नाही. मात्र ज्या निष्ठेने आणि तडफेने या महिला बातम्या लिहत होत्या, कॅमेर्‍यातून टिपत होत्या, त्याच निष्ठेने त्या आपल्या स्मार्टफोनमधून भोवताल चित्रीत करताय, ठिकठिकाणच्या समस्यांना थेट लाईव्हच्या माध्मयातून जगासमोर मांडताय, दिन-दुबळ्यांना, शोषीतांना न्याय मिळवून देताय. . . ! या महिलांकडे आधीही भांडवलाची आणि साधनांची कमतरता होती. आणि आता देखील यात फारसा बदल झालेला नाही. त्यांच्याकडे डिजीटल मीडियाला आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर, गॅजेटस् आदींची वानवा आहे. मात्र सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची जिद्द ही तसूभरही कमी झालेली नाही. नेमका हाच स्पार्क ‘रायटिंग विथ फायर’ या डॉक्युमेंटरीमध्ये विलक्षण प्रत्ययकारी पध्दतीत रेखाटण्यात आलेला आहे. अद्याप हा माहितीपट कोणत्याही ओटीटी मंचावर प्रदर्शीत झालेला नसल्याने याची समीक्षा वा रसग्रहण करता येणार नाही. मात्र खबर लहरीयाची विलक्षण पॅशन ही एखाद्या माहितीपटाचा विषय बनते, आणि हीच डॉक्युमेंटरी थेट ऑस्करच्या शर्यतीत जाते ही बाब विलक्षण अशीच आहे.

‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाला ऑस्कर मिळणार की नाही ? हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र ऑस्कर हे काही गुणवत्तेचे मापदंड नाही. यामुळे हा पुरस्कार मिळो वा नको, भारताच्या ग्रामीण भागातील, आणि त्या देखील युपीसारख्या भयंकर सरंजमशाही राज्यातील मागास समूहातल्या महिलांनी पत्रकारितेतील एक देदीप्यमान अध्यायाची निर्मिती केलीय हे नाकारता येणार नाही. पत्रकारितेचे रूढ अर्थाने प्रशिक्षण न घेता आणि अत्यंत मर्यादीत रिसोर्सेसमध्ये या महिला आपल्या भोवतालच्या समस्या ज्या विलक्षण प्रखरपणे जगासमोर मांडताय, सिस्टीमशी टक्कर घेताय, गोरगरिबांना न्याय मिळवून देताय, ते पाहून लोकपत्रकारितेची आणि अर्थातच डिजीटल माध्यमाची ताकद पुन्हा एकदा विलक्षण परिणामकारक पध्दतीत जगासमोर आलीय हे कुणालाही अमान्य करता येणार नाही.

(खाली बघा रायटिंग विथ फायरचा ट्रेलर)

आपण ‘खबर लहरीया’चे डिजीटल रिपोर्टींग पाहिले तर त्यात आपल्याला सुपर फिनीश्ड ग्राफीक्स, नाट्यमयता, संगीताचा गोंगाट वा आक्रस्तळेपणा दिसणार नाही. याऊलट यात आपल्याला थेट मातीचा सुगंध जाणवतो. आपल्या बोलीभाषेत दैनंदिन जीवनातील समस्यांवर जेव्हा या पत्रकार भगिनी स्वत: बोलतात, अन् आपल्या सभोवतालच्यांना बोलते करतात, तेव्हा एखाद्या न्यूज चॅनेलच्या न्यूजरूमप्रमाणेच ही पत्रकारिता सरस वाटते. यातील अकृत्रीमता, कार्याप्रतीची निष्ठा आणि सामाजिक बांधीलकी ही आपल्याला मेनस्ट्रीम मीडियात देखील अतिशय दुर्लभ प्रमाणात दिसते ही बाब देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे.

डिजीटल पत्रकारितेला नाके मुरडणारे हे या प्रकारातील पत्रकारिता वैध की अवैध, त्यांना शासकीय मान्यता आहे की नाही ? याबाबतचा काथ्याकुट करतांना दिसतात. त्यांनी खबर लहरीयाने मिळवलेले यश, त्यातही यशस्वीपणे प्रिंटकडून डिजीटवर केलेले शिफ्टींग या सर्व बाबी अभ्यासून पाहण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाने पत्रकार आणि अ-पत्रकार यांच्यातील भेद मिटवून टाकलाय. आता कुणीही पत्रकार बनू शकतो, ते देखील प्रोफेशनल पत्रकारांप्रमाणेच किंबहुना त्यांच्यापेक्षा सरस ! हे खबर लहरियाने दाखवून दिले आहे. पत्रकारितेतील ही लहर नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि ‘रायटिंग विथ फायर’चा संदर्भ घेत आपण ही लोकपत्रकारितेची ‘लवलवती ज्वाला’ अतिशय आश्‍वासक असल्याचेही नक्कीच म्हणू शकतो.

About the author

shekhar patil

Leave a Comment