Featured अनुभव चालू घडामोडी पत्रकारिता

अलविदा लोकप्रभा

Written by shekhar patil

ज्येष्ठ पत्रकार महेशजी म्हात्रे यांनी लोकप्रभा हे साप्ताहिक बंद पडल्यानंतर विलक्षण कातर शब्दांमध्ये हुरहुर व्यक्त केली आहे. गत सुमारे अर्ध्या शतकापासून मराठी जनांशी एकरूप झालेल्या लोकप्रभेची ‘सांज’ अशा पध्दतीने यावी ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. म्हात्रे सरांनी लोकप्रभेतील दिवसांचा नॉस्टेल्जीया जागवल्यानंतर माझ्या देखील आठवणी जाग्या झाल्या. माझ्यावरील वाचनसंस्कारात लोकप्रभेचे मोलाचे स्थान असल्याचे लोकप्रभेचा अस्त होत असतांना या साप्ताहिकाबाबतची कृतज्ञता व्यक्त करणे अगत्याचे आहे.

पत्रकार म्हणून माझ्या सृजनाचा विकास हा साप्ताहिक, दैनिक ते आता चोवीस तास सुरू असणार्‍या डिजीटल मीडियापर्यंत पोहचला आहे. याच प्रमाणे वाचनाचा पॅटर्न देखील अशाच प्रकारे बदलला आहे. आधी समोर दिसेल ते वाचण्याचा सपाटा लावला असला तरी काळाच्या ओघात मोजकेच आणि उपयुक्तता असेल तितकेच वाचण्याची समज आली. मात्र इंटरनेटचे युग सुरू झाल्यानंतर यात विलक्षण बदल झाला. आज फक्त आणि फक्त सहज-सोपे सुलभ आणि कामाचे इतकेच वाचन होते. घरात उघडूनही न पाहिलेली असंख्य पुस्तके पडलेली असतांना आता आपल्याला वाचनासाठी वेळ नसल्याची जाणीव होते तेव्हा काळीज तुटते. खरं तर मित्रांसोबत शिळोप्याचा गप्पा करण्याचे दिवस जसे गेले तसे वाचन संस्कार देखील हरवलेत की काय ? अशी गत झालेली असतांनाच लोकप्रभा काळाच्या पडद्याआड जाणार असल्याची बातमी समोर आल्याने मन सुन्न झाले.

मी आणि प्रदीप धांडे हा माझा अफाट बुध्दमत्ता आणि वाचनाची विलक्षण आवड असणारा बालमित्र या दोघांचे वाचनसंस्कार ज्या विविध घटकांमुळे झाले, त्यातील एक म्हणजे लोकप्रभा होय. दिवसाला शेकड्यांनी पाने वाचण्याच्या भारावलेल्या दिवसांमध्ये प्रदीप आणि मी आलटून पालटून लोकप्रभा घेत असू. यातील विविध टॉपीक्सवर चर्चा होत असे. आज एकविसाव्या शतकात कॉंटेक्श्‍चुअल कॉंटेंट हा परवलीचा शब्द बनलाय. वर्तमानाशी सुसंगत आणि समकालीन सर्व इश्यूज कव्हर करणारे लिखाण हे वाचकांच्या/प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्यावर जगातील सर्व तज्ज्ञांचे एकमत आहे. याचा विचार करता, इंटरनेटपूर्व काळातील कॉंटेक्श्‍चुअल कॉंटेंट हे विलक्षण परिणामकारकरित्या सादर करण्याचे काम जितके लोकप्रभाने केले, तितके खचीतच दुसर्‍या साप्ताहिकाने केले असेल.

ह. मो. मराठे यांच्या संपादकपदाच्या कारकिर्दीत लोकप्रभा शिखरावर होता. मात्र अबोध वयात असतांना ते संपादक असतांनाही लोकप्रभाचे वाचन होत असले तरी त्याचे महत्व समजत नव्हते. तथापि, माधव गडकरी आणि नंतर प्रदीप वर्मा यांच्या संपादकपदाच्या कालखंडात लोकप्रभा हा आमच्या भावविश्‍वाचा अविभाज्य घटक बनला होता. खरं तर तेव्हा देखील दैनिकांच्या तुलनेत साप्ताहिकाच्या वाचकांना खिळवून ठेवणारा मजकूर देण्याचे आव्हान हे लोकप्रभासमोर होतेच. मात्र पत्रकारितेतील अनेक मातब्बरांनी लोकप्रभेला नवीन उंची दिली. यातीलच एक असणार्‍या महेश म्हात्रे सरांच्या चेकमेटचीही त्या भारावलेल्या काळात चटक लागली होतीच.

यासोबत लोकप्रभेतील अभिजीत देसाई यांच्या लिखाणाचे मी आणि प्रदीप अक्षरश: जबरी फॅन होतो. क्रिकेट, चित्रपट, गीत, संगीत आदींवर अतिशय रससशीत लिखाण करणारे अभिजीत देसाई अकाली गेले तेव्हा अनेक दिवस अस्वस्थ वाटले होते. यासोबत पराग पाटील यांच्या अनेक लेखमाला देखील खूप पसंतीस उतरल्या होत्या. लोकप्रभेची कव्हरस्टोरी ही आर्काईव्हमध्ये सुरक्षीत जतन करून ठेवण्यासारखी असे. लोकप्रभेने स्पर्श केला नाही असा गेल्या सुमारे पन्नास वर्षातील मराठी समाजातील अशी कोणतीही घटना वा विषय नसेल. लोकप्रभाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व वयोगट आणि विविध आवडी-निवडी असणार्‍या प्रत्येक वाचकाला हवेसे असणारा मजकूर यात अगदी गरगच्च भरलेला असे. यातील विषयांची निवड, याची मांडणी या बाबी पत्रकारितेच्या अभ्यासकांनी जाणीवपूर्वक अध्ययन कराव्यात अशा होत्या. यामुळे लोकप्रभाचा अंक हा कधीही शिळा वाटत नसे. माझ्या घरी आजही लोकप्रभाचे अनेक जुने अंक असून ते केव्हाही काढून वाचले तरी शिळे वाटत नाही.

वाचकांना सातत्याने ताजेतवाने, कोरे करकरीत आणि मनमोहक असे कॉंटेंट पेश करणार्‍या लोकप्रभाला घरघर लागल्याचे अलीकडे जाणवू लागले होतेच. मात्र इतक्या अनपेक्षित आणि आकस्मीक पध्दतीत लोकप्रभा निरोप घेईल हे वाटले नव्हते. मात्र काळ आणि खरं तर बदलेल्या गतीमान माध्यमांच्या आक्रमणाच्या आघाताने या साप्ताहिकाचा बळी घेतला हे सत्य देखील नाकारता येणार नाही.

लोकप्रभाचा उल्लेख आल्यानंतर चित्रलेखाचे नाव हटकून आठवणारच. खरं तर, चित्रलेखाने जी प्रखर पुरोगामी राजकीय व सामाजिक भूमिका घेतली, ती लोकप्रभाने कधी घेतली नाही. या दोन्ही साप्ताहिकांचा बाज वेगळा असला तरी या दोघा साप्ताहिकांनीच महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघणीत मोठा हातभार लावला हे विसरून चालणार नाही. आज लोकप्रभा धारातीर्थी पडला असून चित्रलेखा देखील परिस्थितीशी निकराने झुंज घेत असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रभाने नुकताच आपला ४८ वा वर्धापनदिन साजरा केला. यातील कव्हर स्टोरी ही मेटाव्हर्सच्या युगात प्रवेश करतांना. . .ही होती. आता काळाचा क्रूर महिमा असा की, खरोखर मेटाव्हर्सच्या युगात प्रवेश करतांनाच लोकप्रभाची एक्झीट झाली.

आधुनिक संपर्क यंत्रणा, अत्यंत गतीमान व मोफत असा सोशल मीडिया आणि अर्थातच यामुळे ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे मुद्रीत माध्यमातील वर्तमानपत्रे संकटात आली असतांना एखादे साप्ताहिक बलाढ्य असले तरी ते किती दिवस तग धरणार हा प्रश्‍न होताच. यामुळे लोकप्रभा आपला निरोप घेत असतांना मनात विलक्षण हुरहुर जाणवत आहे. खरं तर सकस वाचायचे असेल तर जादा रक्कम द्यावी लागली तरी चालेल हा विचार जोवर बळावत नाही, तोवर लोकप्रभाच नव्हे तर बरेच वर्तमानपत्रे आणि साप्ताहिके बंद पडतील हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही. यामुळे लोकप्रभाचा निरोप हा इतर अनेक वृत्तपत्रीय वा नियतकालीकांना देखील धोक्याचा इशारा आहे हे समजून घेण्याची गरज आहे.

चांगले आणि सकस असे लिखाण हे आपल्याला जादा पैसे देऊनच मिळेल हा विचार सुज्ञजनांनी केला तरच ही स्थिती बदलेल. आता लोकप्रभा हे डिजीटल स्वरूपात निघेल की, कायम अस्तंगत होणार याबाबत माहिती कळलेली नाही. तथापि, जर डिजीटल स्वरूपात लोकप्रभा निघालेच तर याचे सबस्क्रीप्शन भरण्यासाठी वाचनप्रेमींना पुढे सरसावले पाहिजे. मी स्वत: गेल्या अनेक वर्षांपासून विस्कळीतपणे लोकप्रभा वाचलाय. मात्र डिजीटल स्वरूपात लोकप्रभा नव्याने उभारी घेईल तर माझ्यासह अनेक जण यासाठी पैसे मोजायला तयार राहतील यात शंकाच नाही. असो, या सर्व जर-तरच्या बाबी आहेत. आता लोकप्रभा येणार नाही. विलक्षण वाचनाचे दिवस कधीच सरलेत, आता उरलाय कॉपी-पेस्ट-फॉरवर्डचा आणि उथळ विचारांचा महासागर ! यामुळे माझ्या भावविश्‍वाशी एकरूप झालेल्या आणि माझ्या जडणघडणीत महत्वाची भूमिका असणार्‍या लोकप्रभाला निरोप देतांना विलक्षण कालवा-कालव होतेय. पण इलाज नाही. . .!

About the author

shekhar patil

1 Comment

  • मुख्या.विलास पंढरीनाथ पाटील चोपडा जळगांव says:

    अलविदा लोकप्रभा… वाचून धक्का बसला…डोळ्यात पाणी तरळलं… खरंच खूप वाईट वाटलं लोकप्रभाचं बंद पडणं वाचून. लोकप्रभा संदर्भातलं आपलं वाचन अन् जोडिला स्मरण…. अभिवादन योग्य.. आमच्या तालुक्याच्या बसस्थानकावर लोकप्रभा कधीपासूनच येत नाहीये.. फक्त चित्रलेखा येतोय, व मार्मिक सोबत दर सप्ताहाचे घेतोय ( दर रविवारी १९९६पासून ).. सकस वाचनासाठी जादापैसे मोजावे लागतील…१०० % सहमत.. लोकप्रभा डिजीटल… वर्गणी भरावी लागली तरी चालेल चालू झाला पाहिजे..

Leave a Comment