Featured slider साहित्य

अजीब दास्ता है ये…

Written by shekhar patil

अलीकडेच बंगाली पत्रकार तथा लेखक रबीशंकर बल यांचे (मूळ बंगालीतून हिंदीत अनुवादीत ) ‘दोजखनामा’ हे पुस्तक वाचले. आता दोजख म्हणजे नरक असल्याने या पुस्तकात असणार तरी काय असा प्रश्‍न सर्वांना पडू शकतो. याचे उत्तर देण्याआधीच आपल्याला सांगतो की, आज महाकवि मिर्झा गालीब यांची जयंती आहे. आज या माणसाला परलोकी जाऊन दीड शतक उलटले तरीही याची महत्ता तसूभरही कमी झालेली नाही. भारतीय उपखंडातील जनतेच्या दैनंदिन जीवनातील वार्तालापात गालीबचे अनेक शेर अगदी बेमालूमपणे मिसळून गेलेले आहेत. मात्र, आजही अभिजनांपासून ते सर्वसामान्यांना आपलासे वाटणारे गालीब हे अक्षरश: शापीत जीवन जगले. तसे ते प्रेमकवी होते…चिंतक/तत्वज्ञ होते…जीवनातील व्यर्थतेची भेदक जाणीवही त्यांना होती. मात्र गालीब म्हणजे वेदनेचा स्वरही होय. अर्थात, दु:ख फक्त त्यांच्या काव्यातच नव्हे तर त्यांच्या जीवनातही होते.

ना गुल-ए-नगमा हू ना पर्दा-ए-साज
मै हू अपनी शिकस्त की आवाज ॥

आपल्याला स्वत:च्या पराजयाचा ध्वनी म्हणणारा गालीब विलक्षण दुर्दैवी आयुष्य जगला. सृजनाचा विचार करता त्यांची बरोबरी कुणी करणार नाही. या अर्थाने त्यांच्याकडे कुबेराचे भंडार होते. मात्र त्यांना आयुष्यात अनेक दुर्दैवी घटनांना सामोरे जावे लागले. नेमक्या याच प्रकारे गालीब यांच्यानंतर जवळपास अर्ध शतकानंतर जन्माला आलेल्या सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यालाही याच प्रकारच्या शापाने ग्रासले. मानवी जीवनातील क्रौर्य विलक्षण परिणामकारक पध्दतीत मांडणार्‍या मंटो यांचे वैयक्तीक आयुष्यदेखील खूप दु:खद होते. ठंडा गोश्त, खोल दो, टोबा टेक सिंग सारख्या अनेक अजरामर कथांना लिहणारा मंटो यांच्या अल्पायुष्यातील बहुतांश काळ आर्थिक ओढाताण, दारूचे व्यसन आणि यामुळे होणारा त्रास, बदनामी, खटले यांच्यामुळे वाया गेला. याचमुळे गालीब यांच्याप्रमाणे बदनामीचा डाग घेऊन मंटो परलोकी गेले. अर्थात, गालीब यांच्या प्रमाणेत मंटो यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी त्यांची महत्ता जगाला कळाली हे सांगणे नकोच !

गालीब आणि मंटो हे अनुक्रमे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील उत्तुंग व्यक्तीमत्व असल्यामुळे साहजीकच त्यांच्यावर त्यांच्याबाबत खूप काही लिहले गेले असून यात अद्यापही भर पडत आहे. यात त्यांच्या बायोग्राफीज अर्थात चरित्रांचाही समावेश आहे. तथापि, रबीशंकर बल यांनी दोजखनामा या कादंबरीत एका अतिशय अफलातून अशा कथानकातून या दोन्ही महान व्यक्तीमत्वांचे जीवन चरित्र अतिशय सुरेखपणे गुंफले आहे. खरं तर, गालीब व मंटो हे रूढ अर्थाने धर्मपरायण नव्हते. गालीब यांनी तर आपल्या काव्यातून अनेकदा कट्टरपंथीयांची खिल्ली उडविली आहे. अगदी स्वर्गाबाबतही त्यांचे मत खालील काव्यपंक्तींमध्ये स्पष्ट दिसून येते.

हमको मालूम है
जन्नत की हकीकत लेकीन,
दिल के खुश रखने को
गालीब ये खयाल अच्छा है ॥

या बाबींचा विचार करता, गालीब व मंटो यांच्यासारख्यांना स्वर्ग म्हणजेच जन्नत नव्हे तर नर्क म्हणजे दोजखमध्ये जागा मिळाली असेल अशी कल्पना करून रबीशंकर यांनी दोजखनामा ही कादंबरी लिहली आहे. मंटो यांच्या मृत्यूनंतर त्यांचे एक अप्रकाशीत हस्तलिखीत लेखक रबीशंकर बल यांच्या हातात पडते. यातून ही भन्नाट कादंबरी सुरू होते. यात गालीब आणि मंटो हे एकमेकांच्या शेजारी कबरीमध्ये निवांतपणे बसून एकमेकांशी गप्पा करतात. ते एकमेकांना आपापली कथा सांगतात. कधी ते एकमेकांच्या आयुष्याबाबतही भाष्य करतात. एकमेकांना डिवचतात, खिल्लीदेखील उडवतात तर कधी करूणाही व्यक्त करतात. एकाच वेळी अनेक पातळ्यांवरून फिरणारे कथानक हे भूत-वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांमध्ये फिरते. दोन्ही मान्यवरांच्या वैयक्तीक आयुष्यातील शोकांतिकेला बाहेरच्या जगातील कोलाहलाची जोड यात देण्यात आलेली आहे. १८५७ चे स्वातंत्र्यसमर आणि १९४७ सालच्या फाळणीची किनार साहजीकच याला लाभली आहे. याच्या जोडीला दोन शतकांमधील सामाजिक, साहित्यीक, सांस्कृतीक, सामरीक आणि धार्मिक अशा विविध वर्तुळांना सामावणारा अतिशय व्यापक असा पट दोजखनामात विलक्षण प्रत्ययकारी आणि प्रवाही स्वरूपात अभिव्यक्त करण्यात आला आहे. याला हिंदी, उर्दू, फारसी, बंगाली आदी संस्कृतींची जोड आणि अर्थातच दिल्ली, आग्रा, लखनऊ ते लाहोर पर्यंतचा भौगोलिक आयामदेखील लाभला आहे. उर्दूच्या विलक्षण नजाकतीने याला अजून चार चांद लावले आहेत.

सआदत हसन मंटो हा जगातील आघाडीच्या कथाकारांमध्ये मानला जातो तर गालीब यांना वैयक्तीक आयुष्यात ‘दास्तान’ अर्थात कथा ऐकण्याचे वेड होते. यामुळे दोन गोष्टीवेल्हाळांनी मस्त निवांतपणे शिळोप्याच्या गप्पा केल्यागत रसाळ कथानक दोजखमानात आहे. आपण याला मुळापासून वाचले तर उत्तम. यात गालीबसह अन्य शायरांचे कलाम आणि अन्य उपकथानकांनी अजून रंगतदार केले आहे. लेखक एका ठिकाणी म्हणतात की ”कुणीही इतिहास लिहू शकतो…मात्र कथा लिहायची असल्यास तुम्हाला स्वप्न पाहता आले पहिजे.” नेमक्या याच प्रकारचा ‘मॅजिकल रिअ‍ॅलिझम’ या कादंबरीत विलक्षण रसाळ पध्दतीत आपल्याला अनुभवता येतो. मार्क ट्वेन यांनी ”आपल्याला चांगले वातावरण हवे असेल तर स्वर्गात जा…अन् चांगली संगत हवी असल्यास नरकात !” असे खोचकपणे म्हटले आहे. यामुळे गालीब आणि मंटो यांच्यासारखे (लौकीकदृष्टया) छंदीफंदी व भणंग लोक कुठे मिळतील हे सांगणे नकोच. मात्र नरकालाही आपल्या सृजनाने स्वर्गात बदलण्याची किमया हे प्रतिभावंत करत असतात. गालीब आणि मंटो हे भलेही शापीत आयुष्य जगले तरी नरकासमान जगाला स्वर्गाची अनुभूती देऊन गेले. याचमुळे रबीशंकर बल यांचा ‘दोजखनामा’ हा खर्‍या अर्थाने ‘जन्नतनामा’ बनतो. हीच या दोन्ही दिग्गजांची व अर्थातच लेखकाच्या सृजनाची महत्ता !

आपण रबीशंकर बल यांचे दोजखनामा हे पुस्तक खालील लिंकवरून मिळवू शकतात.

https://www.amazon.in/Dozakhnama-Rabishankar-Bal/dp/9351772381

About the author

shekhar patil

Leave a Comment