Featured slider चालू घडामोडी

भीमराज का बेटा !

Written by shekhar patil

महाकवि वामनदादा कर्डक यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे भीमशाहीर प्रतापसिंह बोदडे नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. संपूर्ण देशातील ( खरं तर जगातील !) आंबेडकरी जनतेच्या हृदयात अढळपद मिळविलेल्या ‘भीमराज की बेटी मै तो, जयभीम वाली हू !’ या आयकॉनीक गाण्यासाठी प्रतापदादा ख्यात असले तरी याच्यापेक्षा किती तरी सरस, जाज्वल्य, चैतन्यदायी व रसरशीत अशा काव्याचे सृजन त्यांनी केलेय. यामुळे त्यांच्या रूपाने आंबेडकरी कला क्षेत्रातील एक मोठा अध्याय आता आठवणीत उरला आहे.

आदीशक्ती मुक्ताईच्या भूमीला थोर परंपरा आहे. हटयोगी चांगदेवाचा गर्वहरण करणार्‍या संत मुक्ताबाईच्या या भूमितून प्रतिभाताई पाटील, सहकार महर्षी स्व. प्रल्हादराव पाटील, एकनाथराव खडसे ते आजच्या चंद्रकांत पाटलांपर्यंतचे राजकीय नेतृत्व बहरले आहे. याच आधीच्या एदलाबाद आणि आताच्या मुक्ताईनगरातून प्रतापसिंह बोदडे यांच्या सारखा मोठा माणूस आपल्या कर्तृत्वाची अमीट छाप उमटवून गेला. मुक्ताईची भूमि ही भक्तीची आणि शक्तीची तशीच समतेची सुध्दा आहे. या शहरातील प्रमुख चौकाचे नावच प्रवर्तन चौक असून परिसरातील सर्व घडामोडींचे ते केंद्रस्थान आहे. प्रतापदादांना आपल्या मायभूमीचे खूप कौतुक आणि अभिमान होता. आपल्या गावावर, परिसरावर आणि येथील चराचरावर निस्सीम प्रेम करणारा हा महान कलावंत याच भूमित सामावला.

मला प्रत्यक्षात त्यांना तीनदा भेटण्याचा योग आला. यातील दोनदा पीटर अंकल यांच्यासोबत अतिशय मनमोकळ्या गप्पा झाल्या. तर शेवटच्या धावत्या भेटीत निवांतपणे बोलूया असे ठरले होते.. . .दुर्दैवाने तो दिवस उजाडलाच नाही. असो. माणूस गेल्यानंतर जे राहिले त्याची टोचणी लागते. प्रतापदादा गेल्यानंतर ही खंत आयुष्यात कायम राहणारी आहे.

प्रतापदादांचा जन्म यावल तालुक्यातील बामणोद या आजोळच्या गावी झाला. वडील तमासगीर असल्याने गीत-संगीताचे संस्कार सोबतच आले. मात्र अतिशय खडतर बालपण गेलेल्या प्रतापदादांना शिक्षणाची गोडी असल्याने त्यांनी नेटाने पदव्युत्तर शिक्षण घेऊन रेल्वेत नोकरी पत्करली. दरम्यानच्या काळात वामनदादा कर्डक यांच्याशी संपर्क येऊन त्यांच्यातील भीम गीतकाराला खर्‍या अर्थाने आकार आला. वामनदादा हे आंबेडकरी जलशांचे सुपरस्टार होते. शोषीत, वंचित समुदायाच्या व्यथा-वेदना व्यक्त करणारी आणि त्यांच्यात आंबेडकरी विचारांचा जाज्वल आशावाद जागवणारी वामनदादांची प्रतिभा ही तारूण्यातील प्रतापदादांची प्रेरणा बनली. वामनदादांच्या सोबतीने ते लिहते झाले, अन् खर्‍या अर्थाने त्यांचे वैचारीक वारसदार देखील बनले.

आंबेडकरी समाजातील गीत-संगीत हा दूरवरून समजण्याचा नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने हजारो वर्षांचे ओझे झुगारून देत समाजाला प्रगतीचा मार्ग दिला. यातून शिक्षणाचा आणि प्रगतीचा ध्यास घेणार्‍या पिढ्या उभ्या राहिल्या. याच पिढ्यांच्या संघर्षाला, त्यांच्या स्वप्नांना, आशा-नैराश्याला आणि एकूणच आयुष्यातील संघर्षाला आवाज देण्याचे काम प्रतापदादांच्या लेखणीने केले. खरं तर गीतकार आणि संगीतकार या दोन्ही भूमिकांमधील डावी-उजवी बाजू ठरविता येत नाही. गायकीचा विचार केला असता, प्रतापदादांचा आवाज हा धारदार, अगदी काळजाचा ठाव घेणारा होता. याचमुळे ते पहाडी आवाजांचे प्रतापदादा म्हणून ख्यात झाले. मात्र आपल्या गायनाविषयी अभिव्यक्त होतांना ते हळूवार झाल्याचे दिसून येते.

माझ्या कंठात गंधार स्वर. . .आहे भीमराव आंबेडकर !

अशा ओथंबलेल्या शब्दांमध्ये ते आपल्या सृजनाची एकमेव प्रेरणा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्याची कृतज्ञता व्यक्त करतात. हाच गंधार स्वर कोट्यवधी आंबेडकरी जनतेचे जीवन सुगंधीत करणारा ठरला. प्रतापदादांच्या लिखाणातून विलक्षण आशावाद जाणवतो.

भीम नावाने जेव्हा मी सूर लावतो |
तेव्हा थुई-थुई मनाचा मोर नाचतो ॥

अशा प्रकारे त्यांनी सृजनातील मनोदशा व्यक्त केली आहे. प्रतापदादांचे पूर्वायुष्य हे खूप खडतर गेले. त्यांना जीवनाचे दाहक चटके बसले. आपल्या समाजाच्या वाटेला आलेली उपेक्षा आणि संघर्ष हा देखील त्यांनी प्रत्यक्षात भोगला. हीच वेदना त्यांच्या अनेक गाण्यांमधून जगासमोर आली. त्यांच्या पाणी वाढ व मायं या गाण्याने हजारोंना रडविले. बोदवड येथील एका कार्यक्रमात हे गाणे त्यांनी आपल्या आई-वडिलांसमोर म्हटले तेव्हा सर्वांनाच हुंदके आवरेनासे झाले. जे आपण भोगले, तेच लेकरू सांगत असल्याचे पाहून ही माऊली इतकी भावविवश झाली की, तिने पुन्हा कधी हे गाणे आपल्या समोर म्हणू नको अशी शपथच आपल्या मुलाला टाकली. खुद्द प्रतापदादांनीच ही आठवण सांगितली आहे.

प्रतापदादांनी आपली स्वत:ची बहुतांश गाणी म्हटली. तर त्यांची गाणी ही अनेक आंबेडकरी कलावंतांनी म्हटली. आजही अक्षरश: शेकडो कलावंत बोदडे यांची गाणी म्हणतांना आपण पाहू शकतो. रात्रभर चालणारे आंबेडकरी जलसे, भीमगितांचे मुकाबले पाहिलेल्यांपासून ते थेट टिकटॉक, इन्टाग्रामच्या इन्स्टंट युगापर्यंतच्या पिढ्यांच्या हृदयाला स्पर्श करण्याचे, त्यांना आयुष्यात नवीन उमेद देण्याचे काम दादांच्या गितांनी केले आहे. एका अर्थाने ते जुन्या व नव्या पिढीतील सेतू होते.

प्रतापदादा बोदडे यांनी गाण्यांचे विविध प्रकार हाताळले. मात्र कव्वाली या प्रकारातील गाण्यांवर त्यांचे विशेष प्रेम असल्याचे दिसून आले. एखादी कव्वाली ही जशी कलाकलाने फुलत शिखरावर जाते, अगदी त्याच प्रमाणे त्यांनी अनेक गाणी ही याच फॉर्ममधील असल्याचे आपण अनुभवू शकतो. त्यांचे मराठीसह हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी हिंदी-उर्दूत विपुल गाणी लिहली…गायली ! आंबेडकरी विचारांना देशभरात नेण्याचे काम त्यांनी या माध्यमातून केले. त्यांच्या सर्व गितांना अमाप लोकप्रियता लाभली. त्यांच्या समग्र गीतांचे एकाच ठिकाणी संकलन व्हावे हीच आता अपेक्षा.

प्रतापदादांचे सर्वाधीक गाजलेले आणि अगदी आयकॉनीक गणलेले गेलेले गाणे म्हणजे अर्थातच भीमराज की बेटी हे होय. त्यांची स्वत:ची कन्या रागिणी हिच्या बालपणी तिच्यासोबत खेळतांना दादांना हे गाणे सुचले. शकुंतला चव्हाण यांनी म्हटलेले हे गाणे अगदी मेगा हिट ठरले. या गाण्याचे आजवर अक्षरश: शेकडो व्हर्जन्स आले असून याला अमाप लोकप्रियता लाभली. यातील ‘भीमराज की बेटी’ ही प्रतिमा आणि उपमा एकविसाव्या शतकातील ‘आंबेडकरी फेमीनिझम’चे तेजस्वी प्रतिक बनली. युपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना देखील याच उपाधीने सन्मानीत करण्यात आले. दादांनी आयुष्यभर पुरोगामी विचार प्रखरतेने मांडला. शिव छत्रपतींपासून ते शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार त्यांनी समाजात पेरले. ‘दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर… एक त्या रायगडावर दुसरा चवदार तळ्यावर’ अशा शब्दांमध्ये शिवराय आणि भीमरायांच्या कार्याला जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या अनेक गीतांमध्ये हाच विचार आढळतो.

आंबेडकरी समूहातील नवी पिढी कर्तबगार आहे. स्पर्धात्मक युगाला तोंड देऊन आपला मार्ग स्वत: शोधणारी आहे. आधीच्या संघर्षाची धार कमी झाली असली तरी हा लढा अद्याप संपलेला नसल्याची जाणीव प्रतापसिंह बोदडे यांनी आपल्या गाण्यांमधून अनेकदा करून दिलेली आहे. आंबेडकरी विचार हा अविरत संघर्षाचा आणि प्रगतीचा दीपस्तंभ असल्याचे त्यांनी शेवटपर्यंत सांगितले.

सागराच्या तळाला भीमाने फाडले
तळातून दलितांचे विश्‍व काढले ॥

अशा शब्दांमध्ये आपल्या बापाचे ऋण व्यक्त करणारे प्रतापदादा अनेकदा आजच्या बदलत्या स्थितीवर प्रखर भाष्य देखील करतात.

तुझ्या पाऊलखुणा भीमराया
तुझी पोरं पुसू लागली रे |
तुझ्या वैर्‍यांच्या दारात जाऊन,
पंगतीला बसू लागली रे ॥

अशा शब्दांमध्ये त्यांचा आक्रोश अभिव्यक्त होतो. मात्र एकंदरीत पाहता प्रतापसिंह बोदडे यांची गाणी ही विलक्षण सकारात्मकतेचा आणि आहे त्या परिस्थितीशी दोन हात करण्याचा संदेश देणारी आणि यासाठी प्रेरीत करणारी आहेत. कोट्यवधी आबालवृध्दांचे मुक्तीदाते असणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत सर्व रूपके त्यांच्या काव्यातून येतात. बाबसाहेबांनी लिहलेल्या भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला हक्क हा खूप अनमोल असून शिक्षणाच्या माध्यमातून आपण आयुष्यातील सर्व अडथळे पार करू शकतो असे त्यांनी ठासून सांगितले आहे. अशा या महान कलावंताने आपला शेवट कसा असावा हे देखील विलक्षण भावपूर्ण काव्यपंक्तीत सांगितले होते.

माझ्या अस्थी वरी
फुलत्या फुलांची बाग रहावी
त्याच बागेची फुले
सकाळी भीमाला वहावी ॥

अशा भावपूर्ण शब्दांमध्ये त्यांनी अंतीम इच्छा व्यक्त केली होती. खरं तर प्रतापसिंह दादा बोदडे यांनी हयात असतांनाच आंबेडकरी गीत-संगीतरूपी असंख्य फुलांची बहरलेली बाग भीमरायाच्या चरणी आधीच अर्पण केली आहे. आंबेडकरी चळवळ आणि याला स्फुर्ती देणारे, क्रांतीचा जयघोष करणारे आणि महामानवाच्या विचारांना प्रमाण मानून जीवनात प्रगतीचा मूलमंत्र देणार्‍या गीतांचे सृजन करणारा हा खूप खूप मोठा असा माणूस आपल्यातून निघून गेला. एवढा मोठा कलावंत असणार्‍या प्रतापसिंह बोदडे यांची शासन दरबारी कधी दखल घेण्यात आली नसल्याची खंत नक्कीच वाटते. अर्थात, याच्यापेक्षा किती तरी पटीने श्रेष्ठ असणार्‍या कोट्यवधी जनतेचे प्रेम त्यांना मिळाले. त्यांच्याच काव्यपंक्तीचा वापर करायचा म्हटल्यास प्रतापसिंह दादा बोदडे म्हणजेच भीमराज का बेटा होय. भिमाच्या या थोर सुपुत्राला मानाचा मुजरा. मुलगा कुणाल आणि मुलगी रागिणी हे प्रतापदादांचा थोर वारसा पुढे चालवत आहेत. त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

About the author

shekhar patil

Leave a Comment