Featured slider पत्रकारिता

सत्तरी पार…क्षमता अपार !

Written by shekhar patil

नवमाध्यम हे तरूणांनाच अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येते. किंबहुना डिजीटल मीडिया म्हणजे तारूण्य व त्यातही नवतारूण्य अशी काहीशी चुकीची सांगड नेहमी घातली जाते. भलेही या माध्यमाचा वापर करणार्‍यांमध्ये तरूणाई आघाडीवर असेल; मात्र कंटेंट क्रियेशन आणि त्यातही या माध्यमाचा चपखल वापर करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. याचे दोन चमत्कार भाऊ तोरसेकर आणि अनिल थत्ते हे मराठी पत्रकारितेतील दोन दिग्गज आपल्या समोर प्रत्यक्षात साकारतांना दिसत आहेत. दोघेही सत्तरीच्या पार असून दोघांनाही पत्रकारितेचा तब्बल पाच दशकांपेक्षा जास्त अनुभव आहे. दोघांची अभिव्यक्ती भलेही परिपूर्ण संतुलीत नसेल, कुठे तरी ती झुकलेली वाटेल. मात्र, हे दोन्ही मान्यवर डिजीटल मीडियाचा करत असलेला वापर हा भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावणारा तर माझ्यासारख्या सर्व माध्यमांचा डोळसपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याला आवर्जून दखल घ्यावासा वाटणारा ठरला आहे.

डिजीटल माध्यमातून दृश्य पत्रकारितेच्या क्षेत्रात सध्या खूप घडामोडी होत आहेत. नवमाध्यमातील पहिला टप्पा टेक्स्ट आणि इमेजेसचा होता. मात्र अलीकडच्या काळात व्हिडीओजला अपार लोकप्रियता लाभली असून युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून ‘व्हिज्युअल जर्नालिझम’चा नवीन अध्याय सुरू झालेला आहे. यात अगदी गावोगावी कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या डिजीटल पत्रकारांच्या सोबत राजकीय भाष्यकारांची एक मोठी फळी आपल्याला दिसत आहे. दृश्य पत्रकारितेचा मापदंड प्रस्थापित करणार्‍या ‘मॅक्स महाराष्ट्र’ पासून ते भाऊ तोरसेकर, अनिल थत्ते, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर, हर्षदा स्वकुळ, प्रभाकर सूर्यवंशी, आबा माळकर आणि अलीकडच्या काही दिवसांमध्ये या माध्यमात सक्रीय झालेले विक्रांत जोशी आदींसह अनेक राजकीय भाष्यकार दररोज विविध राजकीय व सामाजिक मुद्यांवरून युट्युब वा फेसबुकच्या माध्यमातून जगासमोर मते मांडत आहेत.

मुद्रीत माध्यमात कधी काळी अग्रलेख आणि स्तंभलेख तुफान लोकप्रिय असत. ही त्या वर्तमानपत्राची ओळख असे. अर्थात, तेव्हा छापील माध्यमात वाचकांच्या अचूक आवडीचे मापन करण्याची कोणतीही सुविधा नसल्याने तसे मानले जात होते. मात्र डिजीटल मीडिया बाळसे धरू लागला असतांना अगदी अग्रलेखाची उपयुक्तता बरीचशी कमी झाल्याचे विविध वर्तमानपत्रांनी याबाबत केलेल्या बदलांमधून आपल्याला दिसून आले आहे. याच प्रमाणे कधी काळी इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बरेचसे ‘टॉक-शो’ प्रचंड गाजले असले तरी अलीकडच्या काळात यातील साचेबध्दपणा स्पष्टपणे अधोरेखीत झाल्याने याची लोकप्रियता देखील ओहोटीला लागली आहे. हे सुरू असतांना आता डिजीटल मीडियाच्या माध्यमातून आपापले विविध विषयांवरील विचार स्पष्टपणे पुढे मांडणारी एक फळी उदयास आली आहे. यात वर नमूद केलेल्यांपैकी बहुतांश मान्यवर हे चाळीशी वा फार तर पन्नाशीतले आहेत. मात्र सध्या ज्यांची डिजीटल माध्यमात सर्वाधीक चर्चा आहे असे भाऊ तोरसेकर आणि अनिल थत्ते हे भाष्यकार खूप अनुभवी आणि वयाने बुजुर्ग आहेत. अगदी सेवानिवृत्तीचे आयुष्य सुखा-समाधानाने जगावे अशा वयोगटातील आहेत. पत्रकारितेत मुद्रीत माध्यम सर्वशक्तीमान असल्याच्या कालखंडात आपली कारकिर्द सुरू करणार्‍या या दोन्ही मान्यवरांनी या माध्यमावरील विविध आक्रमणे आणि आज झालेली गलीतगात्र स्थिती अनुभवली आहे.

यातील भाऊ तोरसेकरांचे विशेष कौतुक याच्यासाठी की- मराठी पत्रकारितेतील बहुतांश पत्रकारांची डिजीटल माध्यमाविषयी अनास्था असतांना २०१२ च्या उत्तरार्धात भाऊ ब्लॉगच्या माध्यमातून या क्षेत्रात उतरले. त्यांचा ‘जागता पहारा’ हा ब्लॉग तुफान लोकप्रिय झाला. खरं तर, पुण्यनगरीतील ‘उलट तपासणी’ या सदराच्या माध्यमातून भाऊ तोरसेकर हे नाव खर्‍या अर्थाने महाराष्ट्रातील घराघरात पोहचले होतेच. मात्र ‘जागता पहारा’ने ही मर्यादा ओलांडून ग्लोबल पातळीवर त्यांचे लिखाण पोहचवले. साधारणपणे २०१४च्या अखेरीस मुंबईतील ख्यातनाम पत्रकार हेमंत जोशी यांच्या माध्यमातून भाऊ तोरसेकर यांच्याशी संवाद झाला तेव्हा मी त्यांना जागता पहारा हा त्यांच्या स्वत:च्या डोमेन नेमवर शिफ्ट करून युट्युबवर सक्रीय होण्याची सुचविले होते. मात्र काही कारणाने हे झाले नाही. तथापि, कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर भाऊ तोरसेकर यांनी ‘प्रतिपक्ष’ या नावाने युट्युबवर पदार्पण केले. यानंतर काय झाले तर आपल्या समोर आहेच. आज प्रतिपक्षचे २ लाख २७ हजार सबस्क्रायबर्स असून यात दिवसोगणीक वाढ होतच आहे. यावर ते राजकीय, सामाजिक तसेच चाली घडामोडींवर भाष्य करत असतात. भाऊंचे व्हिडीओ खूप लांब व पाल्हाळीक असल्याने त्यांनी व्हिडीओजची वेळ कमी करावी असा फिडबॅक त्यांना मिळाला. मात्र प्रतिपक्षचा लॉंग व्हिडीओजचा फॉर्म कायम राखत त्यांनी शॉर्ट व्हिडीओजसाठी ‘धक्के-बुक्के’ हे नवीन चॅनल सुरू केले असून त्याला देखील काही दिवसांमध्ये चांगला प्रतिसाद लाभला आहे.

तर, दुसरीकडे अनिल थत्ते हे मराठी पत्रकारितेतील ‘ग्रेट शोमॅन’ असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. कधी काळी ‘गगनभेदी’ या गाजलेल्या पाक्षिकाचे संपादक म्हणून असलेली त्यांची ओळख गेल्या काही वर्षांमध्ये एक ग्लॅमरस आणि सातत्याने प्रसिध्दीचे वलय आपल्याकडे खेचून घेण्याची कल्पकता असणार्‍या ‘मार्केटींग गुरू’च्या स्वरूपात झाली होती. दोन वर्षांपूर्वी ‘बिग बॉस’मुळे त्यांना अजून जास्त वलय मिळाले. त्यांचे दिसणे, जगावेगळी फॅशन, विलक्षण भाषा कौशल्य आणि एकंदरीतच स्वत:च्या भोवती विलक्षण ‘ऑरा’ असणारे अनिल थत्ते हे नेहमीच राजकीयच नव्हे तर विविध क्षेत्रांमध्ये लिलया मुशाफिरी करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून थत्ते हे मेनस्ट्रीम पत्रकारितेपासून दूर होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते डिजीटल विश्‍वात अवतीर्ण झाले. साप्ताहिक विवेक, महाएमटीबी, आकार डिजी-९ आदी विविध मंचांवरून परफॉर्म केल्यानंतर आता ‘गगनभेदी अनिल थत्ते’ या नावाने त्यांनी युट्युबवर आपले चॅनल सुरू केले असून यावरून ते विविध विषयांवर मते व्यक्त करत असून याला अल्प काळात चांगलीच लोकप्रियता लाभल्याचे अधोरेखीत झाले आहे.

मी आधीच म्हटल्यानुसार डिजीटल विश्‍वात कंटेंट निर्मितीसाठी वयाची कोणतीही अट नाही. भलेही पौगंडावस्थेपासून ते विशी-तिशीतील तरूणाई डिजीटल मीडियाला चांगल्या प्रकारे हाताळत असली तरी दर्जेदार कंटेंट निर्मिती ही वयावर अवलंबून नाही. भाऊ तोरसेकर आणि अनिल थत्ते यांनी अल्पावधीत हेच सिध्द केले आहे. बरं, या दोघांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे.

भाऊ तोरसेकर हे अगदी स्पष्टपणे उजव्या विचारधारेकडे झुकलेले आहेत. तर अनिल थत्ते हे आपल्या भूमिका अनेकदा बदलतांना दिसतात. भाऊंचे बोलणे हे धीर गंभीरपणे वाहणार्‍या अथांग नदीप्रमाणे तर थत्ते म्हणजे उत्साहचा धबधबा ! भाऊ अगदी खुरटी दाढी वाढलेल्या अवस्थेत कोणत्याही विषयावर बोलण्यात तयार तर थत्ते महोदय हे ‘स्टाईल आयकॉन’ ! भाऊ हे फारसे कुणाला भेटत नसतात. तर अनिल थत्ते हे ‘यत्र, तत्र, सर्वत्र’ संचार करणारे, अनेक राजकारण्यांची त्यांचा उघड स्नेह आहे. मात्र या दोन्हीमधील साम्य म्हणजे त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा पाच दशकांच्या अनुभवाचा परिपाक असल्याचे आपण अनुभवू शकतो. महाराष्ट्राची जडणघडण हे अत्यंत जवळून पाहिलेल्या, अनुभवलेल्या या दोन्ही मान्यवरांनी युट्युबच्या माध्यमातून आपल्याकडे असणारा ज्ञानाचा, माहितीचा, गौप्यस्फोटांचा आणि थत्तेंच्या बाबतीत सांगायचे तर मनोरंजनाचा खजिना हा मुक्तहस्ताने मराठी जनांसमोर उधळण्यास प्रारंभ केला आहे.

‘व्हिज्युअल जर्नालिझम’मधील भाष्यकारांचा एक मोठा अध्याय आपल्या समोर रचला जात असल्याची बाब मला येथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते. अनेक जुने संदर्भ, त्याची वर्तमान कालीन घटनांशी सांगड, वर्तमानातल्या घटनांचे विश्‍लेषण आदींच्या माध्यमातून हे दोन्ही मान्यवर विविध विषय अगदी खुलवून सांगतात तेव्हा आपल्याला ते ऐकावेसे वाटते. यातील अनिलजींची तर फॅशन, देहबोली आणि एकूणच इतर परफॉर्म हा प्रेक्षणीय सुध्दा असतो. त्यांचे गौप्यस्फोट देखील अफलातूनच ! भाऊ हे काळाचा वेध घेणारे राजकीय विचारक असून त्यांची अनेक भाकिते काळाने अक्षरश: खरी ठरविली आहेत. तर अनिल थत्ते हे अगदी सहजपणे एखाद्या विषयातील ‘करंट’ आणि ‘अंडर करंट’ ज्या विलक्षण तन्मयतेने सांगतात ते पाहणे हा अफलातून अनुभव असतो. तर हे दोन्ही मान्यवर अनेकदा एकमेकांचे खंडण-मंडण जितक्या हिरीरीने करतात, तितक्याच प्रामाणिकपणाने एकमेकांचे दिलखुलास कौतुक देखील करतात हे वैशिष्ट मला खूप भावते.

कोणत्याही न्यूज चॅनल अथवा डिजीटल मीडिया हाऊसेसकडे असणारे रिसोर्सेस, इन्फ्रास्ट्रक्चर आदींची वानवा असतांनाही राजकीय-सामाजिक भाष्यकरांची नवी व्याख्या आता भाऊ तोरसेकर आणि अनिल थत्ते आपल्या समोर साकारत आहेत. त्यांच्या व्हिडीओजचे एडिटींग हे प्राथमिक स्वरूपाचे आहे, यात उच्च दर्जाचे ग्राफीक्स, संगीत वा व्हाईस ओव्हर आदींचा अभाव आहे. मात्र असे असतांनाही लोक वेळात वेळ काढून या दोघांसह अन्य भाष्यकारांना ऐकतात तेव्हा नवमाध्यमाची ताकद आपल्याला खर्‍या अर्थाने कळते. तथापि, या दोन्ही मान्यवरांनी आपापल्या व्हिडीओजवरील कॉमेंट ‘ऑफ’ केल्याची बाब ही खटकणारी आहे. गेल्या वर्षाच्या प्रारंभी त्रयस्थ युट्युब चॅनलवरील एका आक्षेपार्ह प्रतिक्रियेमुळे भाऊ तोरसेकर यांना मनस्ताप झाला होता. यामुळेच आपण कॉमेंट सेक्शन ‘ऑफ’ केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर कोणतेही कारण न देता थत्ते यांनीही कॉमेंट ऑफ केलेल्या आहेत. डिजीटल माध्यम म्हणजे एकतर्फी संवाद नसून यात समोरच्यांची मते देखील विचारात घेणे अभिप्रेत आहे. यामुळे भाऊ आणि थत्तेजींनी मोनोलॉग नव्हे तर डायलॉगला प्राधान्य द्यावे ही अपेक्षा.

”युट्युबवरील व्हिडीओजच्या माध्यमातून भाऊ तोरसेकर व अनिल थत्ते यांना नेमकी किती कमाई होत असेल ?” असा प्रश्‍न आपल्या मनात येऊ शकतो. तर, भाऊ तोरसेकर यांच्या ‘प्रतिपक्ष’चे मॉनेटायझेशन सुरू झाले असले तरी ‘गगनभेदी थत्ते’ला मात्र अद्याप जाहिराती सुरू झालेल्या नाहीत. भाऊंना आपल्या चॅनलमधून बर्‍यापैकी उत्पन्न होत असेल असे दिसून येत आहे. तर त्यांनी आपल्या चाहत्यांकडून मदतीने अपील देखील केले असून यासाठी लिंक त्यांच्या प्रत्येक व्हिडीओच्या खाली दिसते. तर अनिल थत्ते यांनी आपल्या बेधडक लौकीकानुसार आपले चॅनल लोकप्रिय होण्यासाठी पैसा ओतल्याचेही दिसून येत आहे. बर्‍याच जणांनी या दोन्ही मान्यवरांना कुठून तरी फंडींग होत असल्याचे आरोप केले आहेत. यातील सत्यासत्यता पडताळून पाहण्याची कोणतीच सोय नसल्याने याबाबत आपण ठामपणे काहीही सांगू शकत नाही.

मात्र या सर्वात मला वाटलेली आश्‍चर्यकारक बाब म्हणजे भाऊ आणि अनिलजी यांच्यातील विलक्षण उर्जा होय. अनिल थत्ते हे दिवसातून चार-पाच व्हिडीओ टाकत असून ही संख्या २० वर नेण्याचा त्यांचा मानस आहे. तर भाऊ स्वत: ‘प्रतिपक्ष’ आणि ‘धक्के-बुक्के’ मिळून एकंदरीत पाच-सहा विषयांवर भाष्य करत आहेत. याच्या जोडीला ते अन्य युट्युब चॅनल्सवर देखील सहभागी होत आहेत. यात ते हिंदीत देखील बर्‍यापैकी लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये भाऊ हे अखील भारतीय पातळीवरील आघाडीचे भाष्यकार बनतील असे आता तरी स्पष्ट झालेले आहे.

बरेचसे तरूण पत्रकार वा कंटेंट क्रियेटर्स हे कधी तरी सटर-फटर लिहून वा एखाद-दुसरा व्हिडीओ तयार करून आपण फार ग्रेट असल्याचा आव आणतात. या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्यांनी सत्तरी पार करूनही आपल्या सृजनाला अव्याहतपणे व आत्यंतीक निष्ठेने सुरू ठेवलेल्या भाऊ आणि अनिलजींना आदर्श घ्यावा असे मला वाटते. अनेक पत्रकारांकडे जगाला सांगण्यासाठी बरेच काही आहे. मात्र नवमाध्यमाचा वापर करण्यासाठी ते अद्यापही तयार नाहीत. मला स्वत:ला अनेकांनी या माध्यमात यावे असे वाटते. याबाबत मी अनेकांना सुचविले देखील आहे. बघूया….काय होते ते !

”भाऊ तोरसेकर आणि अनिल थत्ते हे बर्‍याचदा एकांगी विचारांचा प्रसार करत असल्याने त्यांना पत्रकार म्हणावे का ?” असा प्रश्‍न बरेच जण विचारतात. याबाबत मला असे वाटते की, बहुतांश राजकीय भाष्यकारांना स्वत:ची एक भूमिका असतेच. अगदी आधीच्या पिढीतील बहुतांश संपादक हे समाजवादी विचारधारेचे होते. सध्या देखील बहुतेक पुरोगामी आहेत. यामुळे कुणी जर याच्या विरूध्दचा विचार घेऊन येत असल्यास हरकत काय ? शेवटी प्रतिपक्ष वा अन्य युट्युब चॅनल्सला पाहणारे लोक आपल्या समाजात आहेतच. बरं, मी वर उल्लेख केलेल्यांमध्ये काही अपवाद वगळता बहुतांश भाष्यकार हे उजव्या विचारांचे समर्थक असल्याची बाब लक्षणीय आहे. कारण, डिजीटल माध्यमाची ताकद ही भाजपला आधी समजली होती. याचाच विचार करून ‘ब्रँड मोदी’ साकारला आहे. यथावकाश विरोधी पक्ष देखील नवमाध्यमात सक्रीय झाले असले तरी ते यात खूप मागे पडले आहेत. याच प्रमाणे विविध भाष्यकारांच्या माध्यमातून ‘ओपिनियन मेकींग’चे काम करण्याची प्रणाली आता उजव्या विचारधारेने सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच याचा प्रतिकार करण्यासाठी पुरोगामी पक्ष आपापले भाष्यकार सायबर विश्‍वात उतरवतील. मात्र अर्थातच तोवर उजवे भाष्यकार खूप पुढे निघून गेले असतील, हे देखील तितकेच खरे !

भाऊ तोरसेकरांपासून ते अन्य भाष्यकारांना ‘काऊंटर अटॅक’ करण्यासाठी पुरोगामी पक्ष हे आता कुणाला मैदानात उतरवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ज्ञानेश महारावांपासून ते आमच्या जळगावकर विक्रांत पाटलांपर्यंतचे मातब्बर पत्रकार डिजीटल विश्‍वातील उजव्या विचारांचा यशस्वी प्रतिकार करू शकतात. आवश्यकता आहे ती त्यांना पाठबळ देण्याची. असो. प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहेच. यामुळे भाऊ तोरसेकर, अनिल थत्ते अथवा अन्य राजकीय/सामाजिक भाष्यकार हे एखाद्या विचाराने प्रेरीत होऊन अभिव्यक्त होत असतील तर त्यात गैर काय ? असे माझे स्पष्ट मत आहे.

आता थोडी भविष्याकडे नजर टाकली असता, लवकरच युट्युबवरील भाष्यकार हे अधिक ‘सुपर फिनीश्ड’ पध्दतीत आपल्या समोर येऊ शकतात. एखाद्या मुद्यावरून ‘भाऊ तोरसेकर विरूध्द निखील वागळे’ अशी जंगी वैचारिक लढाई देखील कदाचित आपल्याला लवकरच एकाच डिजीटल मंचावरून दिसू शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या कान्याकोपर्‍यातील भाष्यकार हे अधिकाधीक संख्येने युट्युब सारख्या प्रभावी माध्यमाकडे वळू शकतात. आपल्याला फक्त वाट पहायची आहे. मला व्यक्तीश: भाऊ तोरसेकर आणि अनिल थत्ते यांनी वयाची सत्तरी पार केल्या नंतरही डिजीटल मीडियाचा अतिशय समर्पक असा केलेला वापर कौतुकास्पद असाच वाटतो. आपण त्यांचे खुल्या दिलाने स्वागत करायला हवे.

खाली आपण या दोन्ही मान्यवरांचे निवडक व्हिडीओ पाहू शकतात.

About the author

shekhar patil

2 Comments

Leave a Comment