Featured slider अनुभव आध्यात्म

ओशो : वादळ आणि मौनाचा मिलाफ

Written by shekhar patil

आज ओशो रजनीश यांचा जन्म दिन. ओशो आणि जे. कृष्णमूर्ती ही गेल्या शताब्दीमधील मानवी चेतनेची दोन सर्वोच्च शिखरे आपल्याच देशात जन्माला यावीत हा विलक्षण योगायोग. दोन्ही तत्वचिंतक महापुरूष काळाच्या फार पुढे होती. मला दोन्ही आवडतात. माझ्या आयुष्यावर या दोघांचा प्रभाव आहे. मात्र दोघांपैकी निवडायचे कुणाला ? असा प्रश्‍न येतो तेव्हा बुध्दीचा कल जे. कृष्णमूर्तीकडे असला तरी हृदयाची साद ही ओशोंच्या दिशेने जाते.

कृष्णमूर्तींची अभिव्यक्ती ही अधिक स्पष्ट असली तरी वळणवाटांवरून जाणारे ओशो रसाळ आहेत. कृष्णमूर्ती अकॅडमीक वाटतात, तर ओशो हे काव्यमय आणि महत्वाचे म्हणजे जीवनाच्या अधिक निकट वाटतात. कृष्णमूर्ती सत्याच्या जवळ नेणारे बोलतात. तर ओशो आपल्याला थेट बोट धरून तेथे घेऊन जातात. कृष्णमूर्तींनी मानवी जीवनातील अंतीम सत्य सांगितले तरी मार्ग दिला नाही. ओशोंनी सत्यही सांगितले आणि अनेक मार्गदेखील दिलेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कृष्णमूर्तींनही परंपरा नाकारली असली तरी ओशो परम विद्रोही आहेत. बंडखोर, कुणालाही अंगावर घेणारे, बुरसटलेल्या विचारांची अक्षरश: चिरफाड करणारे, आणि परिणामांची तमा न बाळगता सत्याच्या बाजूने उभे राहणारे…!

मी त्यांचा भक्त नव्हे तर डोळस अनुयायी आहे. मी ओशोंना कोळून प्यायलो, नव्हे त्यांना जगलो. त्यांचे समग्र साहित्य मी किमान तीनदा वाचले, हजारो प्रवचने ऐकलीत, आज देखील त्यांच्या ध्यान विधी नियमीतपणे करतो. मात्र त्यांच्या विरोधातील जे काही आहे ते वाचणे, ऐकणे आणि पाहणे हे देखील मस्तपैकी एन्जॉय करतो. जीवनातील संतुलन आणि क्रेझीनेस तितक्याच सहजपणे अनुभवणे हेच खरे जगणे. हीच तर शिकवण ओशोंनी दिलीय.

मी ओशो आणि त्यांच्याशी संबंधीत माझ्या आठवणींबाबत अनेकदा विस्तृत विवेचन केले आहे. आपण ते माझ्या ब्लॉगवर बघू शकतात. या लेखाच्या खाली मी स्वतंत्र लिंकदेखील देत आहे. मला अनेक जण विचारतात की, ओशो हे प्रचंड ‘कॉंट्रॅडिक्टरी’ म्हणजे विरोधाभासी व्यक्तीमत्व आहे. ते कधी एखादा महापुरूष, धर्मग्रंथ वा एखाद्या विचारावर बोलतात तेव्हा त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. आणि विरोध करतात तेव्हा त्याची अक्षरश: लक्तरे वेशीवर टांगतात. यामुळे त्यांची नेमकी शिकवण काय ? हा प्रश्‍न अनेकांना पडतो. ओशो म्हणजे प्रचंड वैचारिक कन्फ्युजन असेही अनेकांना वाटते. ते स्वाभाविक देखील आहे. यामुळे मला ओशोंच्या शिकवणीत काय भावले ? असे देखील अनेकांनी विचारले आहे. याबाबत आज थोडे विवेचन करतो.

* सर्वात महत्वाची बाब म्हणजे ओशोंनी ध्यान आणि उत्सवाचा मिलाफ केला. आपल्या आयुष्यात बुध्दाचे मौन आणि मिरेचे नृत्य असावे. धर्म वा आध्यात्मीकतेशी जुडलेली बरीचशी मंडळी ही रूक्ष वाटते. तर दुसरीकडे आयुष्य हे उत्सवाप्रमाणे जगणार्‍या बहुतांश जणांना मौनाची साधी झलक देखील मिळत नाही. याला पूर्णपणे नाकारत ओशोंनी नवमानव हा ‘झोरबा द बुध्दा’ या प्रकारातील असेल असे सांगितले. यातील झोरबा हा पार्थिव जगातील उत्सवाचे प्रतीक असून बुध्द म्हणजे अर्थातच ध्यान होय. जीवनातील आनंद, उत्सव आणि उत्स्फुर्ततेला अध्यात्मीकतेशी जोडण्याचे महत्वाचे काम ओशोंनी केले. माझ्या मते हाच त्यांच्या शिकवणीचा सार आहे. पौर्वात्य आध्यात्मिकतेला पाश्‍चात्य विज्ञानाला जोडण्यात सेतू बनण्याचे काम त्यांनी केले.

Email : shekhar@shekharpatil.com

* ओशोंनी ध्यानाला खूप महत्व दिले. खरं तर, भारतीय दर्शनशाास्त्रानुसार ज्ञान, भक्ती आणि कर्म हे तीन प्रमुख मार्ग मानले जातात. त्यांनी या तिघांवर विस्तृत विवेचन देखील केले आहे. मात्र यात त्यांनी ध्यानाला प्राधान्य दिले आहे. आजच्या विलक्षण गुंतागुंतीच्या जगात मानवाला खरी शांती आणि यातूनच त्याच्या आत्मोन्नतीचा मार्ग हा ध्यानातूनच जातो हे ओशोंनी सांगितले. अर्थात, त्यांनी फक्त ध्यानाची महत्ताच वर्णन केली नसून त्यांनी यासाठीच्या विधी देखील विकसित केल्या. त्यांनी स्वत: १०० पेक्षा जास्त ध्यानविधी विकसित केल्या असून यातील ‘सक्रीय ध्यान’ (डायनॅमिक मेडिटेशन) हे तर विलक्षण परिणामकारक असेच आहे. मानसिक तणावातून मुक्ततेपासून ते अंतर्यात्रेसाठी हे ध्यान अत्यंत उपयुक्त असल्याचे सिध्द झाले आहे. जगभरात ध्यानयोगाच्या प्रचार-प्रसारात ओशो यांचा मोलाचा वाटा आहे.

* ओशोंनी आधुनिक मनोचिकित्सेला प्राचीन विधींची जोड दिली. विसाव्या शतकात मानवी मनावर गहन संशोधन झाले. यातून आधुनिक मनोचिकित्सेची एक मोठी शाखा खुली झाली. सिग्मंड फ्राईड, युंग, एडलर आदींसारख्या मनोचिकित्सकांनी समाजमन ढवळून काढणारे विविध संशोधन जाहीर केले. यातून विविध थेरपीज प्रचलीत झाल्या. मात्र मानवी मन हे अथांग असून पाश्‍चात्य मनोचिकित्सेतील मर्यादा देखील ओशोंना ज्ञात होत्या. विशेष करून सर्वसामान्यांची मनोदशा आणि जागृत ध्यानी व्यक्तीच्या मनोदशेतील फरकाची फ्राईडसह इतरांना जराही माहिती नव्हती. याचमुळे ओशोंनी पाश्‍चात्य सायकॉलॉजीतील जे-जे चांगले ते टिपून घेत पतंजली, बुध्द आदींनी हजारो वर्षांपूर्वी दिलेल्या विधींचा मिलाफ केला. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे सक्रीय ध्यान होय. यात सायकॉलॉजीतील ‘कॅथार्सिस’ अर्थात रेचनासह जॉर्ज गुर्जिएफच्या ‘स्टॉप’ पध्दतीचाही समावेश करण्यात आलेला असल्याचे आपल्याला दिसून येते. आध्यात्म आणि मनोचिकित्सेचा मिलाफ हा ओशोंच्या शिकवणीचा एक मोठा आयाम मानावा लागणार आहे.

* ओशोंनी वर्तमानाला महत्व दिले. आताच क्षण हाच खरा…! जीवनाचा खरा आनंद हा ‘नाऊ अँड हिअर’ याच स्थितीत घेता येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ध्यानी व्यक्ती हा अखंड जागृत अवस्थेत असतो. किंबहुना जागरूकता हेच ध्यानाचे खरे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कुणी म्हणतो की पुराणकाळ स्वर्णीम होता, कुणी म्हणतो की भविष्य चांगले असेल. मात्र वर्तमान हाच एकमेव खरा काळ असल्याचे त्यांनी वारंवार नमूद केले आहे.

* ओशोंनी सृजनाला सन्मान दिला. साहित्य, काव्य, गीत-संगीत, चित्रकलादी विविध कला आदींचा त्यांनी गौरव केला. कोणतेही सृजन हे एक प्रकारचे ध्यानच असल्याचे त्यांनी सांगितले. ओशोंनी आयुष्यातील आपल्या विपुल प्रवचनांमध्ये विविध कलावंत, त्यांची कला आणि आयुष्यातील विविध प्रसंग आदींवर भाष्य केले आहे. त्यांनी साहित्यीक आणि कलावंतांचा खर्‍या अर्थाने गौरव केला. अर्थात, याचमुळे जगभरातील सृजनशील रचनात्मकता असणार्‍या प्रतिभावंत हे ओशोंच्या भोवती जमा झाले. आजही जगातील बहुतांश कलावंतांना ओशो आपले वाटतात हे त्याचमुळे !

* ओशो हे अत्युच्च अभिरूची असणारे ग्रंथप्रेमी होते. त्यांच्या पुस्तकालयात एक लाखांपेक्षा जास्त ग्रंथ असून याचे संदर्भ त्यांच्या प्रवचनांमधून येतात. त्यांना आवडलेल्या पुस्तकांवर त्यांनी ‘बुक्स आय हॅव लव्हड’ या मालिकेत भाष्य केले आहे. तर ‘नोटस ऑफ मॅडमॅन’ या पुस्तकात त्यांनी काव्यावर भाष्य केले आहे. त्यांच्या प्रवचनांमध्ये हिंदी कविता आणि शायरीचेही खूप उल्लेख आढळतात. यातील अनेक कृतींवर त्यांनी मार्मीक भाष्य केले आहे. तर हायकू या तीन ओळींच्या जपानी कवितांवरील त्यांचे ‘सिग्नेचर ऑन वॉटर’ या मालिकेतील भाष्य तर अफलातून असेच आहे.

* ओशोंनी जगभरातील धर्मांचे संस्थापक, प्रेषीत, धर्मग्रंथ, विचारधारा, संप्रदाय आदींवर भाष्य केले आहे. यात अगदी ताओ तेह किंग सारख्या प्राचीन ग्रंथापासून ते गीता, धम्मपदे आदींसह थेट आधुनिक युगातील विचारवंतांचा समावेश आहे. वेद, उपनिषदांपासून ते आधुनिक युगातील संत-महत्म्यांच्या शिकवणीला त्यांनी त्यांच्या दृष्टीतून सादर केले. त्यांच्या शिकवणीवर भाष्य केले. यातील चुकीच्या बाबींवर कडाडून टीका करत चांगल्या बाबींचे त्यांनी मुक्त कंठाने कौतुक केले.

* आधुनिक युगातील भांडवलशाही, गांधीवाद, मार्क्सवाद, नाझिवाद, फॅसीझम, नेहरूवाद आदी विचारधारांपासून ते राजकारण, गरिबी, लोकसंख्यावाढ, पर्यावरण, सामाजिक विषमता, अर्थशास्त्र, तंत्रज्ञानाचे विविध पैलू आदींवरही ओशोंनी भाष्य केले आहे. संपूर्ण मानवी जातीच्या प्रमाणात इतक्या व्यापक प्रमाणात एकाच व्यक्तीने कधीच भाष्य केले नव्हते ही बाब ओशोंना इतरांपासून वेगळी ओळख प्रदान करणारी ठरली आहे.

* ओशोंनी संपूर्ण मानवतेला एक प्रमाण मानून उपदेश दिला. राष्ट्रे, धर्म, जाती, भाषा, वर्ण, पंथ, लिंग आदींच्या पलीकडे जात एक समग्र मानव हाच पृथ्वीला वाचवू शकतो असे त्यांचे मत होते. ‘वसुधैव कुटुंबकम’ या उक्तीनुसार त्यांची शिकवण होती. यामुळे अमुक धर्म वा विचारधारा श्रेष्ठ व तमुक कनिष्ठ असा भेद त्यांनी कधी केला नाही. जे-जे चांगले ते स्वीकारून वाईट व विशेष करून विषमतेला पूरक असणार्‍या विचारांना त्यांनी त्याज्य मानले. त्यांनी महिलांना देखील मोठा सन्मान दिला.

* ओशोंनी प्रत्येक साधकाने निर्भय असावे असे शिकवले. अर्थात, त्यांचे स्वत:चे जीवनच अशा अनेक धाडसी प्रसंगांनी भरलेले आहे. विशेष करून अमेरिकेच्याच भूमिवरून अमेरिकन भांडवलशाहीतील कुरूपता आणि ख्रिश्‍चॅनिटीतील गैरप्रकारांना आव्हान देण्याचे साहस संपूर्ण इतिहासात त्यांनी दाखविले. याची त्यांना जबर किंमत मोजावी लागली. मात्र ते डगमगले नाहीत. त्यांच्या शेवटच्या प्रवचनमाला तर ज्वालाग्राही विचारांनी भरलेल्या होत्या. बुरसटलेल्या विचारांवर आघात करतांना त्यांनी कधीही मागे पुढे पाहिले नाही. आणि जीवनात निर्भयता खूप महत्वाचे असल्याचेही त्यांनी अनेकदा सांगितले आहे. याचमुळे ओशोंनी स्वत: आयुष्यात अनेकदा वाद-विवाद आणि टिकेला सहजपणे तोंड दिले.

* आत्मोन्नतीच्या अंतर्यात्रेसाठी संसाराचा त्याग करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचे ओशोंनी सांगितले आहे. घर-दार सोडून कुठे तरी हिमालयात जाऊन मिळालेल्या शांतीपेक्षा संसारातील कटकटीतून कुणीही संतुलीत राहू शकत असेल तर तेच खरे ध्यान असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात ‘मेडिटेशन इन मार्केटप्लेस’ ही त्यांची शिकवण आजच्या युगातील तणावावर रामबाण ठरणारी आहे.

* जीवनातील हास्य व अश्रूंना ओशोंनी फार महत्व दिले. त्यांच्या प्रवचनांमधून त्यांनी हजारो विनोदी किस्से अगदी रंगवून सांगितले आहेत. यातील काही विनोद तर अक्षरश: पोट धरून हसायला भाग पाडतात. हास्य-विनोद हा खर्‍या धार्मिक जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तर रूदन हे केवळ दु:खातच नव्हे तर भावावेगातही होत असल्याने ओशोंनी त्याचाही स्वीकार करण्याचे सांगितले. त्यांच्या ध्यान पध्दती या सहजसुलभ आहेत. जीवनातील खेळकरपणातूनच ध्यान साध्य करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

* ओशोंनी श्रीमंती त्याज्य मानली नाही. एखादा समाज समृध्द बनतो, जेव्हा त्याच्या भौतिक गरजा पूर्ण होतात तेव्हा तो खर्‍या अर्थाने आध्यात्माकडे वळतो असे त्यांचे मत होते. कुणीही अंतर्बाह्य समृध्दीने जगावे असे त्यांना अपेक्षित होते. याच प्रमाणे काम उर्जा जाणीवपूर्वक ध्यानाकडे वळविणे शक्य असल्याचेही त्यांचे मत होते.

* ओशोंनी आपल्या शिकवणीतून जगाला तर हादरे दिलेच. पण, अनेकदा आपल्या शिष्यांनाही बुचकळ्यात टाकले. यात त्यांनी पहिल्यांदा आचार्य रजनीश, नंतर भगवान रजनीश आदी नावे धारण केली. तर शेवटी ओशो हे नाव धारण केले. त्यांच्या नवसंन्यास चळवळीत आधी मरून अंगरख्यासह गळ्यात माळा अनिवार्य होती. तर शेवटी त्यांनी त्याचाही त्याग करण्यास सांगितला. कधी त्यांनी आपल्या ‘एनलायटंड’ शिष्यांची यादी जाहीर केली. तर काही दिवसात आपण ही मस्करी केल्याचे सांगून यावर पडदा टाकला. गुरू-शिष्यावर अनेकदा विवेचन केल्यानंतर त्यांनी शेवटच्या काळात आपण कुणाचे गुरू नसून एखाद्या मित्रासमान असल्याचे सांगून टाकले. यामुळे ओशो हे अनेकदा हाती दंडुका घेऊन आपल्या शिष्यांना झोडपणारे झेन गुरू देखील वाटतात. अर्थात, त्यांचा अदृश्य दंडुका हा धक्कातंत्राच्या माध्यमातील होता हे सांगणे नकोच.

* स्वर्ग-नरक; परमेश्‍वर-सैतान; सुख-दु:ख या बाबी बाह्य नसून आपल्यातच असल्याची महत्वाची शिकवण ओशोंनी दिलेली आहे. ‘नरामध्ये नारायण होण्याची संभावना’ असून यासाठीच अंतर्यात्रा आवश्यक असते. संत तुकाराम यांनी म्हटल्यानुसार ”तुझे आहे तुजपाशी” वा कबिरांच्या ”मै कहता आंखन देखी” या उक्तींशी सुसंगत अशी ओशोंची प्रमुख शिकवण आहे. कुणालाही (अगदी त्यांना सुध्दा) अंधपणे फॉलो करू नका. आपल्याला जिथे चांगली अनुभूती येईल तोच आध्यात्म मार्ग निवडा असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

* ओशोंनी आपल्या अनुयायांना ध्यानमार्गावरून चालण्याचे आवाहन करतांना आपली सुध्दा आसक्ती न धरण्याचे ठासून सांगितले आहे. यात त्यांनी आपल्या प्रवचातून ”मैने चांद की तरफ इशारा किया है….तुम उंगली को ही चांद मत समझ लेना ॥” असा सूचक इशारा दिला आहे. अर्थात, आपण आयुष्यात ध्यान करून जे काही मिळविले, ते कुणीही मिळवू शकतो. मी आपल्याला फक्त सत्य दूरून दाखविले, तुम्ही मलाच सत्य समजू नका असे ओशोंनी कळकळीने सांगितले आहे.

आज जगभरात ओशोंना मोठी मान्यता मिळाली आहे. वैश्‍वीक पातळीवर सर्वाधीक वाचल्या जाणार्‍या लेखकांमध्ये त्यांचा समावेश आहे. सोशल मीडियात तर त्यांना अलोट लोकप्रियता आहे. त्यांच्याबाबत अनेकदा दावे-प्रतिदावे करण्यात येतात. मात्र हे सर्व आरोप-प्रत्यारोप त्यांनी आपल्या आयुष्यातच पचवून टाकले होते. ते थोडे काळाच्या आधी जन्माला आले होते. आता जगभरात त्यांच्या शिकवणीवर गहन विचार, संशोधन होतेय. कधी काळी त्याज्य आणि हेटाळणीचा विषय असणारा हा माणूस आता कुतुहलाचा विषय बनलाय हे निश्‍चीत. आजचाच नव्हे तर येणारा काळही या माणसाची महत्ता अधोरेखीत करणार आहे. मानवी चेतनेच्या इतिहासात ‘प्री-ओशो’ आणि ‘पोस्ट-ओशो’ अशी स्पष्ट विभाजनरेषा पडणार असल्याचे माझे मत आहे. असो, ओशोंनी माझ्या आयुष्यात रूपांतरण घडवून आणले. याबद्दल त्यांना वंदन नक्कीच करावे लागेल.

About the author

shekhar patil

Leave a Comment