Featured slider चालू घडामोडी पत्रकारिता

कैसे-कैसे मंज़र सामने आने लगे है…पीते-पीते लोग खबरे चलाने लगे है !

Written by shekhar patil

शिक्षक, राजकारणी, पोलीस, वकील, सनदी अधिकारी आदींप्रमाणेच पत्रकारितेचा पेशा देखील नोबेल प्रोफेशन म्हणून गणला जातो. अर्थात, यामुळे यात काम करणार्‍यांनी आपल्या व्यवसायासह सार्वजीनक जीवनात वावरतांना सामाजिक निती नियमांचे पथ्ये पाळण्याची अपेक्षा केली जाते. याचे उल्लंघन केल्यास समाजात बदनामी तर होतेच, पण माध्यमातूनही याचे पडसाद उमटतात. आधी याबाबत जनतेला मते प्रदर्शीत करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हते. मात्र सोशल मीडियामुळे लोक आता संबंधीतांची चूक झाल्यास कुणालाही सोडत नाहीत. विशेष करून पत्रकारांच्या चुकांवरून तर जोरदार ट्रोलींग होते. याचमुळे दीपक चौरसिया या देशातील ख्यातनाम पत्रकाराची घोडचूक सर्व पत्रकार आणि एकंदरीतच पत्रकारितेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभी करणारी ठरली आहे. माझे आजवरचे लिखाण हे ‘प्रो-मीडिया’ या प्रकारातील आहे. कारण पत्रकार म्हणून काम करतांनाचा तणाव व अडचणी मी अनुभवल्या आहेत. मात्र चौरसिया यांच्यासारख्यांची भयंकर चूक ही समर्थन करण्याजोगी नव्हे तर, याचा जितका धिक्कार करावा तितका कमी या प्रकारातील आहे.

‘न्यूज नेशन’ या हिंदी वृत्तवाहिनीचे वरिष्ठ संपादक दीपक चौरसिया यांचा ९ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे पार्थिव दिल्ली येथे दाखल होत असतांना चौरसिया हे यावर भाष्य करतांना दिसून येत आहेत. अवघ्या सव्वा दोन मिनिटातच चौरसिया महोदय अक्षरश: दारूच्या नशेत बरळत असल्याचे पाहून चॅनलने त्यांना तातडीने ऑफ एयर केले. मात्र या दोन सव्वा दोन मिनिटांमध्ये दीपक चौरसियाने आपली वा आपल्या चॅनलचीच नव्हे तर पत्रकारितेची लक्तरे देखील वेशीवर टांगली.

( न्यूज नेशनने हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला नसला तरी ट्विटरवरून तो व्हायरल झाला आहे. खालील लिंकवर आपण हा व्हिडीओ पाहू शकतात. )

पत्रकारांच्या चुका हा समाजात हेटाळणीचा विषय आहे. सोशल मीडियात राजकारण्यांच्या खालोखाल लोक आपला संताप पत्रकारांवर काढतात. मुद्रीत माध्यम सर्वशक्तीमान असल्याच्या कालखंडात गावगप्पांशिवाय यावर चर्चा करण्याची सोय नव्हती. नाही म्हटल्यास ‘उपसंपादकांच्या डुलक्या’ सारख्या स्तंभातून यावर मल्लीनाथी केली जात होती इतकेच. मात्र सोशल मीडियाच्या आगमनानंतर सर्वसामान्य लोक पत्रकारांच्या चुकांवर तुटून पडत असल्याचे दिसून येते. विशेष करून कुणाच्या चुकीमुळे बातमीचा संदर्भ बदलला तर लागलीच ”याने गांजा ओढून बातमी लिहली का ?” अशी विचारणा होते. यानंतर थेट तो पत्रकार, त्याची संस्था एवढेच नव्हे तर त्याचे कुटुंबियांपर्यंतही लोक पोहचतात. याची अनेक उदाहरणे आपण पाहिली, अनुभवली असतील. खरं तर मीडियाकर्मी हे अत्यंत मानसिक तणावात काम करत असतात. यामुळे चुकीचे टायपिंग, उच्चार वा संदर्भ या बाबी अपरिहार्य असतात. मी देखील अशा चुका केल्या आहेत. तर, सहकार्‍यांच्या चुकांमुळे संपादक म्हणून याबाबत जाहीर दिलगिरीसुध्दा व्यक्त केली आहे. भविष्यात सुध्दा अशा चुका होतील हे मला माहित आहे. खरं तर, साधारण चुकीवरून कुणा पत्रकाराची ट्रोलींग होत असल्यास मी त्या पत्रकाराचे समर्थन देखील केले आहे. मात्र दीपक चौरसियांची चूक ही पत्रकारितेता आणि वैयक्तीक जीवनातील फरक न समजल्यास काय होऊ शकते याच्याकडे अंगुलीनिर्देश करणारी ठरली आहे.

दीपक चौरसिया हे इंदूर येथे आपल्या एका आप्ताच्या कार्यक्रमात असल्याची माहिती समोर आली आहे. ९ डिसेंबर रोजी त्यांनी आपल्या मित्रांसोबत नाचत असल्याची छायाचित्रे देखील शेअर केली होती. अर्थात, विवाह समारंभात असतांनाच त्यांनी मद्य प्राशन केले होते. आणि लागलीच रात्री साडेआठ वाजता लाईव्ह आल्यामुळे त्यांच्या लिला समोर आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. खरं तर, चौरसिया यांना अगदी बोलता देखील येत नसल्याची बाब ट्रायलमधून त्यांच्या प्रॉडक्शन टिमला समजू शकली असेल. मात्र असे असतांनाही त्यांना ‘ऑन एयर’ घेण्याचा निर्णय या चॅनलचा अंगलट आला आहे.

आता इंटरनेटच्या वाढलेल्या गतीमुळे पत्रकारितेतही ‘वर्क फ्रॉम होम’ हे अगदी सहजशक्य झाले आहे. अनेक पत्रकार, संपादक हे घरून वा अगदी आहे तिथून आपल्याच स्मार्टफोनच्या मदतीने कोणत्याही ‘लाईव्ह सेशन’ मध्ये सहभागी होत असतात. याच प्रकारे दीपक चौरसिया यांनी कोविडच्या आपत्तीच्या काळात शॉर्ट पँट घालून केलेल्या लाईव्ह सेशनचा फोटो आधी सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या पाठोपाठ आता मदिरेच्या अंमलाखाली अक्षरश: लडखळत असतांनाही लाईव्ह करण्याचा हव्यास हा सोशल मीडियात प्रचंड टिकेचा विषय बनला आहे. हा भिडू इतका ‘टल्ली’ होता की, जनरल बिपीन रावत यांना ‘जर्नालिस्ट व्ही. के. सिंग’ म्हणत होता, मधूनच डोके पकडत होता. त्यांचे एकंदरीतच हावभाव हे विचीत्र होते. अर्थात, याचमुळे आज संपूर्ण पत्रकारितेचीच छी-थू होत आहे. जी स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे माझे मत आहे. अनेक जणांनी पत्रकारांचा प्रवास हा गांजाकडून दारूकडे होत असल्याची संभावना करून त्यांच्या पितरांचा उध्दार केला आहे.

दीपक चौरसिया यांनी दारू पिणे ही त्यांची वैयक्तीक बाब आहे. यावर कुणी भाष्य करता कामा नये. तर त्यांना दारू पिऊन लाईव्ह सेशनमध्ये बोलावणे हा त्यांच्या चॅनलचा निर्णय म्हणून आपण मान्य करू शकतो. मात्र एक जबाबदार मीडिया हाऊस म्हणून आपण जगासमोर कशा पध्दतीने जावे ? याची आचारसंहिता आपण पायदळी तुडवत आहोत याचे भान चौरसिया आणि त्यांच्या ‘न्यूज नेशन’ या चॅनलच्या व्यवस्थापनाला उमगले नाही हे खरे दुदैव. खरं तर दीपक चौरसिया हा कधी काळचा भारतीय टिव्हीवरील खूप लोकप्रिय असा चेहरा होता. भारतीय न्यूज चॅनल्समध्ये दिसणे खूप महत्वाचे असतांना खुरटी दाढी वाढवलेला आणि बाह्यांगावरून थेट गावठी वाटणारा दीपक चौरसिया हा अतिशय तळमळीने विविध विषयांवर रिपोर्टींग करत असतांना खूप बरे वाटत असे. मला स्वत:ला कधी काळी तो खूप आवडत होता. त्याच्या अनेक स्टोरीज खूप गाजल्या होत्या. याचमुळे अल्प काळात रिपोर्टींगवरून तो थेट संपादक बनला तेव्हा मला मुळीच नवल वाटले नाही. मात्र यानंतर जे काही झाले ते त्याच्या आधीच्या कारकिर्दीतील वलयावर पाणी फिरवणारे ठरले.

यथावकाश पत्रकारितेत स्थिरावल्यानंतर तो प्रवाहपतीत झाला. यामुळे कधी काळी खरोखर थेट फिल्डवरून नवनवीन स्टोरीज ब्रेक करणारा दीपक चौरसिया हा स्टुडिओतूनच कल्पना विलास करू लागल्यावर केविलवाणा वाटू लागला. मध्यंतरी त्याचे कथित स्पेस सुट घालून अगदी ध्यान वाटणारा अवतार पाहून हसावे की रडावे हेच कळेनासे झाले होते. तर टिव्ही चॅनलवरील एका चर्चेत तबलिगी जमातला तालीबानी जमात असे म्हणून थेट लाईव्ह शो मध्ये आपण असे म्हटले नाही असा कांगावा करण्याची बाब देखील मध्यंतरी खूप गाजली होती.खरं तर दीपक चौरसियाला सोशल मीडियात आधी खूप लोकप्रियता होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याने ट्विटरवर एक ग्राफीक्स शेअर करून आपण देशातील सर्वाधीक जास्त लोकप्रिय पत्रकार असल्याचे मोठ्या अभिमानाने घोषीत केले होते. मात्र आता संपूर्ण सोशल मीडियाच त्याच्यावर उलटल्याचे दिसून येत आहे.

( दीपक चौरसिया यांनी तबलिगी जमातीच्या प्रवक्त्याला तालीबानचा प्रवक्ता म्हटल्याचा व्हिडीओ खाली दिलेला आहे. )

एकीकडे प्रसारमाध्यमांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मुद्रीत माध्यमासोबत इलेक्ट्रॉनिक मीडियालाही समाजमाध्यमांनी हादरा दिला आहे. आता ओबी व्हॅन्सची उपलब्धता नसतांनाही आणि कोणत्याही चॅनलचा प्रतिनिधी नसणारा अगदी एखाद्या खुर्द वा बुद्रुक गावातील व्यक्ती देखील हातातील स्मार्टफोनच्या मदतीने आपला भोवताल जगापर्यंत पोहचवत आहे. या वेगाशी जुळवून घेण्यात इलेक्ट्रॉनिक मीडियाची देखील प्रचंड दमछाक होत आहे. यामुळे न्यूज चॅनल्सला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रचंड परिश्रम करावे लागत आहेत. मात्र या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हिंदी वाहिन्या जे काही करतात ते विलक्षण संतापजनक असेच असते.

भारत-पाक; भारत-चीन आदी तर आपण समजू शकतो. मात्र त्या उत्तर कोरियाच्या हुकुमशहाच्या विक्षीप्त कथा, तंत्र-मंत्र-बुवाबाजी आदींवरील रिपोर्टींग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अगदी उघडपणे केंद्रातील सत्ताधार्‍यांच्या बाजूने केलेल्या स्टोरीज आणि ‘टॉक शो’ हे पत्रकारितेच्या पतनाचे करूण दर्शन आपल्याला घडवतांना दिसून येत आहेत. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ संकटात असतांना, आणि सोशल मीडियारूपी पाचवा स्तंभ बळकट होत असतांना पत्रकारांनी आपल्यावरील निती-नियमांची आचारसंहिता ही अजून काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता आहे. मात्र पत्रकार हेच पत्रकारितेचे शत्रू असल्याचे नेहमी समोर येणारे चित्र खूप घातक आहे.

दीपक चौरसिया यांच्या मदिरा कांड प्रकरणानंतर सोशल मीडियात खूप मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यात ट्विटरवर दुष्यंत कुमार यांच्या काव्यपंक्ती थोड्या बदलून शेअर झाल्या आहेत.

कैसे-कैसे मंज़र सामने आने लगे हैं ,
पीते – पीते लोग खबरे चलाने लगे है…

अब तो इस तालाब का पानी बदल दो,
ये पत्रकारिता के फूल कुम्हलाने लगे हैं…

या ओळी क्षणभर गंमत व्हावी अशा नाहीत, तर यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. पत्रकारितारूपी फुल कोमेजणार का ? हा प्रश्‍न आता पत्रकारांनीच एकमेकांना विचारण्याची गरज आहे. सशक्त लोकशाहीसाठी तितकीच कणखर पत्रकारिता आवश्यक आहे. मात्र आधीच सोशल मीडियाच्या आघातांनी जेरीस आलेल्या आणि राजकारण्यांच्या दबावाने भयग्रस्त झालेल्या प्रसारमाध्यमांना पत्रकारांच्या गैरवर्तनामुळे बदनामीचा डाग लागणार आहे. दीपक चौरसिया यांनी केलेले कृत्य हे प्रचंड निषेधार्ह आहे. त्यांनी स्वत: आणि त्यांच्या चॅनलने या प्रकरणी माफी मागावी हेच यथोचित ठरणार आहे. यातून धडा घेऊन दीपक चौरसियांनी आपली पत्रकारिता करावी, आणि अन्य पत्रकारांनी यापासून आवश्यक तो धडा घ्यावा हे देखील अपेक्षित आहेच.

( सोशल मीडियात तुफान लोकप्रिय असणार्‍या दीपक चौरसिया यांनी गेल्या वर्षी शेअर केलेली पोस्ट आपण खाली पाहू शकतात. )

About the author

shekhar patil

Leave a Comment