Featured slider विज्ञान-तंत्रज्ञान

व्हिडीओ बॉंब : सावध ऐका आजच्या हाका !

Written by shekhar patil

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत फोडलेल्या कथित व्हिडीओ बॉंबवरील विविधांगी राजकीय भाष्य आपण वाचले, ऐकले वा पाहिले असेल. या माध्यमातून फडणवीस आणि सहकार्‍यांनी आरोपांची सरबत्ती केली असली तरी हे व्हिडीओज खरे की खोटे ? ते कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकतील ? याच्यापासून ते यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आल्याचे आरोप-प्रत्यारोप देखील आपल्यासमोर आले आहेतच. मात्र माझे यावरील भाष्य हे तंत्रज्ञानाच्या आयामातून आहे. जगातील प्रत्येक माणसाने डिजीटल युगात वावरतांना घ्यावयाची काळजी ही जितकी आवश्यक आहे, तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त याची गरज ही वलयांकीत मंडळी आणि विशेष करून राजकारण्यांना आहे. फडणवीस यांनी विविध प्रकरणांशी संबंधीत पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सुमारे सव्वाशे तासांचे व्हिडीओ रेकॉर्डींग विधानसभाध्यक्षांना दिल्याची बाब ही राज्याच्या राजकीय इतिहासातील एका नव्या युगाची नांदी ठरणार असून याच्या केंद्रस्थानी अर्थातच टेक्नॉलॉजी होय. . .!

तंत्रज्ञानाने जीवनाच्या विविध क्षेत्रांवर व्यापक परिणाम केलाय. आम्हा पत्रकारांचा विचार केला असता, पत्रकारितेतील डिजीटल अध्याय हा कधीचाच सुरू झाला आहे. राजकारणाचा विचार केला असता तंत्रज्ञानाने पहिला आघात केला तो प्रचारतंत्रावर ! सोशल मीडियाच्या विविध मंचांचा वापर करून पारंपरीक प्रचारापेक्षा कितीतरी सरस आणि परिणामकारक प्रचार करता येत असल्याचे राजकीय पक्षांच्या लक्षात आले. नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आदींसारख्या नाविन्याचा स्वीकार करणार्‍या नेत्यांनी नवतंत्रज्ञानाला आत्मसात करून मिळवलेले यश हे आपल्यासमोर आहेच. तर प्रशांत किशोरसह अन्य राजकीय रणनितीकारांच्या हातातील हुकमी एक्का हा अर्थातच टेक्नॉलॉजी होय.

भाजप आणि आप सारखे राजकीय पक्ष तंत्रज्ञानाचा विपुल वापर करत असतांना देशातील अन्य पक्षांनी याकडे बर्‍यापैकी दुर्लक्ष केले आहे. ‘डिजीटल पॉलिटीकल कँपेनिंग’ म्हणजे ट्रोलर्सची फौज पदरी बाळगणे नव्हे हे बर्‍याच पक्ष आणि नेत्यांच्या लक्षात अजून देखील आले नाही. एकीकडे डिजीटल प्रचारतंत्रात मागे पडणार्‍या राजकीय पक्षांना टेक्नॉलॉजीचाच ‘राजकीय अस्त्र’ म्हणून कसा वापर करता येतो याचे सर्वात भेदक उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या पेन ड्राईव्हचा कितपत इफेक्ट होणार हे तर काळच ठरवेल. मात्र तंत्रज्ञानाबाबतचे अज्ञान, अनास्था आणि अर्थातच बेपर्वाई ही राजकारण्यांना किती घातक ठरू शकते याचा एक अतिशय सुरस असा ‘ट्रेलर’ त्यांनी दाखवून दिलाय हे कोण नाकारणार ? या व्हिडीओजची सत्यासत्यता ही फॉरेन्सीकच्या अध्ययनानंतर समोर येणारी असली तरी तंत्रज्ञानाचा समर्पक वापर राजकीय अस्त्र म्हणून वापरणे शक्य असल्याचे यातून स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभाध्यक्षांना दिलेल्या पेन ड्राईव्ह मधील निवडक व्हिडीओज प्रसारमाध्यमांना देण्यात आले आहेत. इतर व्हिडीओज समोर येतील की नाही याबाबत सांगता येणार नाही. मात्र या व्हिडीओजचे प्रथमदर्शनी अवलोकन केले असता, थेट सरकारी वकिलाच्या घरात वा कार्यालयातून हे व्हिडीओज चित्रीत करण्यात आल्याचे दिसून येत आहे. आता हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे गॅजेटस् आणि टुल्स हे प्राथमिक अवस्थेच्या खूप पुढे गेले आहेत. म्हणजे पेन वा अमुक-तमुक वस्तूमध्ये दडविलेल्या छुप्या कॅमेर्‍याच्या मदतीने स्टींग करणे कधीच मागे पडलेय. आता ‘डिजीटल सर्व्हायलन्स’ हे किती तरी पटीने सुधारित आणि अर्थातच सहजसोपे झाले आहे. फडणवीस यांनी सादर केलेले कथित पुरावे हे कधी-कसे-कुठून जमा करण्यात आलेत हे तेच सांगू जाणोत. किंबहुना ते न्यायालयीन तपासाच्या समोरून येईलच. मात्र कोणत्याही व्यक्तीची गोपनीय माहिती ही किती विविधांगी पध्दतीत चोरता येते याची प्राथमिक माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे.

आपले स्मार्टफोनवरील संभाषण सुरक्षीत नाहीय. ते कंपन्यांच्या सर्व्हरवर आणि तपास यंत्रणांनी ठरविले तर त्यांच्या सर्व्हायलन्स सिस्टीममधून टॅप होऊ शकते. यात एखाद्या व्यक्तीने दुसरा स्मार्टफोन वापरला तरी त्या ठिकाणचे अक्षांश-रेखांश आणि नजीकच्या मोबाईल टॉवर सोबत जोडल्या गेलेल्या संपर्कातून तो दुसरा क्रमांक देखील सहजपणे टॅप होतो. अनेक जणांना व्हाटसऍप, फेसटाईम, स्काईप वा फेसबुक मॅसेंजर आदींवरून केलेले कॉल सुरक्षित असतील तो देखील गैरसमज आहे. पेगॅसस आणि तत्सम सॉफ्टवेअर्सच्या मदतीने व्हाटसऍपसह अन्य टुल्सवरून केलेले कॉल देखील संबंधीत युजरला थांगपत्ता लागू न देता त्रयस्थ व्यक्ती रेकॉर्ड करू शकतात. आपण इंटरनेटचा विपुल वापर करत असलो तरी आपले ब्राऊजर्स आणि स्मार्टफोन ऍप्स हे युजर्सची इत्यंभूत माहिती जमा करून याचा व्यावसायिक उपयोग करतात. याचा हेरगिरीसाठी वापर होत नसेल, याची खात्री कुणीही देऊ शकत नाही.

आपण वापरत असलेले सर्व गॅजेटस् हे युजर्सच्या भोवतालच्या माहितीवर नजर ठेवत असतात. आपल्या स्मार्टफोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन हे भोवतालच्या ध्वनीसह अन्य माहिती जमा करत असतात. अगदी गुगल असिस्टंट, अलेक्झा हे व्हॉईस असिस्टंटही युजर्सची माहिती जमा करतात. फेसबुक-व्हाटसऍपचा मालक मार्क झुकरबर्ग हा एका सार्वजनीक कार्यक्रमात असतांना त्याने आपल्या लॅपटॉपच्या वेबकॅमवर सेलो टेप लाऊन आल्याचे सर्वांनी पाहिले होते. अर्थात, वेबकॅम सुरक्षित नसल्याची कबुली त्याने जाहीरपणे दिली. जसे वेबकॅम असुरक्षित आहेत, अगदी तसेच सीसीटिव्ही कॅमेरेही हॅक करता येतात. होय, इंटरनेटशी कनेक्ट असणार्‍या सीसीटिव्हीमध्ये हॅकर्स प्रवेश करून याचा ऍक्सेस मिळवू शकत असल्याचे आधीच सिध्द झालेले आहे. ‘पीकाबो फ्लॉ’च्या माध्यमातून हा सर्व गैरप्रकार होत असल्याचे दिसून आले आहे. इंटरनेटशी कनेक्ट असणारे प्रत्येक गॅजेट हॅक करता येत असल्याचे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

येणार्‍या कालखंडात इंटरकनेक्ट असणार्‍या गॅजेटची संख्या वाढणार आहे. ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञान आल्यानंतर याला वेग येईल. यामुळे माझ्या घरातील फ्रिज हे स्मार्टफोनला कनेक्ट असल्याने कुणीही त्रयस्थ व्यक्ती माझ्या स्मार्टफोनमधून जाऊन फ्रिजवर नियंत्रण मिळवू शकेल. या आणि अशा अन्य अनेक प्रकारांनी आपण बर्‍याचशा डिजीटल दुर्घटनांना आमंत्रण देणार आहोत. आजच्या डिजीटल विश्‍वात हेरगिरी करणे अतिशय सोपे झालेय. याला पर्सनल, प्रोफेशनल, सोशल आणि अर्थातच ‘पॉलिटीकल वेपन’ म्हणून वापरणे देखील याचमुळे सहजशक्य झालेय.

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे हे नेमके कसे जमा करण्यात आलेत ? वा विरोधक म्हणतात त्याप्रमाणे ते मॉर्फ केले आहेत का ? याचे उत्तर न्यायालय देणार आहे. मात्र, आता राजकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने डिजीटल सर्व्हालयन्सपासून वाचण्यासाठी दक्ष रहावे लागेल. अर्थात, कोणतेही गॅजेट वापरून केलेला संपर्क हा कुणीतरी त्रयस्थ व्यक्ती डोकावून पाहू वा ऐकू शकतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकारण्यांनी डिजीटल सर्व्हालयन्सपासून कमीत कमी डॅमेज व्हावे यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची देखील गरज आहेच.

माझ्या मनात एक गमतीशीर विचार आलाय. काळाच्या ओघात अनेक जुन्या बाबी परतल्या आहेत. म्हणजे कधीकाळी भाकरी, चुलीवरचे जेवण, सायकल चालविणे या बाबी कष्टकर्‍यांशी संबंधीत मानल्या जात होत्या. आज आपल्या सर्वांना या बाबी आवडू लागल्या आहेत. कारण आधुनिक जीवनशैलीचे ‘साईड इफेक्ट’ हे बर्‍यापैकी आपल्या लक्षात आले आहेत. याच प्रमाणे राजकारणी सुध्दा संपर्काची आधुनीक माध्यमे सोडून पुन्हा एकदा जुन्या जमान्याप्रमाणे भेटी-गाठीतच महत्वाचे निर्णय घेतील काय ? बघूया काय होते ते ! मात्र देवेंद्र फडणवीस यांचा पेन ड्राईव्ह आणि यातील कथित व्हिडीओ बॉंब या बाबींमधून महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या युगाचा प्रारंभ झालाय हे नक्की. . .! टेक्नॉलॉजीबाबत ‘सावध ऐका पुढल्या हाका’ ही उक्ती देखील आता बदलवावी लागणार आहे. ‘सावध ऐका आजच्या हाका’ हे राजकारण्यांनी समजून घ्यावे हीच अपेक्षा.

About the author

shekhar patil

Leave a Comment