Featured slider विज्ञान-तंत्रज्ञान

नॅनो टार्गेटींग जाहिरातींच्या युगात शिरतांना…

Written by shekhar patil

इंटरनेटवर आधारित असणार्‍या विविध मंच आणि टुल्सच्या पर्यायांमुळे मेनस्ट्रीम मिडीयाला धक्का बसल्याने आता जाहिरातदारांनी नेमके करावे तरी काय ? असा प्रश्‍न अनेकदा विचारण्यात येतो. याबाबत मी आधी अनेकदा लेख आणि व्याख्यानांमधून विवेचन केले आहे. तथापि, काही दिवसांपासून एका गौप्यस्फोटावरून सायबर विश्‍वात मोठे वादंग निर्माण झाले आहे. याच्या अंतर्गत फेसबुकचा अचूक वापर केला असता, अगदी सिंगल युजरला सुध्दा टार्गेट करता येत असल्याची माहिती पुराव्यांसह समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब जाहिरदारांना वरदान ठरणारी असली तरी अनेक अर्थांनी चिंताजनक आहे. विशेष करून फेक अजेंडा वा दिशाभूल करणार्‍या कंटेंटच्या डिलीव्हरीसाठी याचा वापर होण्याचा धोका आहेच. यासोबत याचा सर्वात मोठा फटका हा डिजीटल माध्यमातून आपल्याला जाहिरातींचे रग्गड उत्पन्न मिळेल अशी आशा लाऊन बसणार्‍यांना बसणार आहे.

डिजीटल माध्यमाने वर्तमानपत्रादी माध्यमांपेक्षा प्रचंड गतीमान अशी ग्लोबल कंटेंट सप्लाय चेन ( आणि ती देखील चकटफू !) उभी केल्याचा सरळ फटका खपाला बसला. याचसोबत जाहिरातींचे उत्पन्न देखील घटले. तर, साहजीकच यामुळे जाहिरातदार हे आता डिजीटल वाटा शोधू लागले आहेत. मात्र पारंपरीक जाहिराती आणि डिजीटल माध्यमातील जाहिरातींमध्ये बराचसा फरक असून तो जाहिरातदारांनी पहिल्यांदा समजावून घेण्याची गरज आहे. पारंपरीक जाहिराती उदाहरणार्थ वर्तमानपत्र, टिव्ही, रेडिओ, होर्डींग्ज आदींसह अन्य प्रकारांमध्ये संबंधीत जाहिरात ही किती जणांनी पाहिली ? वाचक/प्रेक्षक यावर किती वेळ थांबला ? ही जाहिरात पाहून त्याने संबंधीतांना कॉल करून विचारणा केली की नाही ? आणि संबंधीत जाहिरातदाराला यातून थेट ग्राहक मिळालेत की नाही ? याची कोणतीही माहिती मिळत नाही. हा सर्व अंदाजपंचे व्यवहार असतो. किंवा ते जाहिरातदाराला ढोबळ मानाने समजावून घ्यावे लागते.

याच्या अगदी विरूध्द म्हणजे डिजीटल माध्यमातील जाहिराती या विलक्षण गतीमान, अचूक आणि पारदर्शक पध्दतीत डिलीव्हर होत असतात. यामध्ये एंगेजमेंटबाबत बर्‍यापैकी अचूक माहिती मिळते. यात संबंधीत जाहिरात किती जणांनी पाहिली यापासून ते याचा परिणाम किती झाला हे जाहिरातदाराला समजते. तर बर्‍याच जाहिरातींवर क्लिक करून वा कॉल करून ग्राहकाला थेट संपर्क साधण्याची सुविधा असल्यामुळे डिजीटल जाहिरातीच्या परिणामकारकतेचे अचूक मापन करता येते. सध्याचा कल लक्षात घेता, जागतिक पातळीवर ऑनलाईन जाहिरातींचे खूप पर्याय उपलब्ध असले तरी भारतात गुगल, फेसबुक आणि युट्युब हे तीन प्रमुख मंच आघाडीवर आहेत. यातील सर्वात सोपा इंटरफेस हा फेसबुकचा आहे. यामुळे अगदी लहान शहरे आणि गावांमधील व्यावसायिकालाही फेसबुकच्या जाहिरातींची माहिती असते. किंबहुना ते याचा वापर करत असतात. यात वयोगट, भौगोलिक ठिकाणे आदींसह अन्य मानकांच्या आधारे जाहिरातदाराला हवा तो टार्गेट ग्रुप निवडण्याची सुविधा प्रदान करण्यात आल्याने त्याला खूप सुविधा झालेली आहे. आता फेसबुकच्या याच टार्गेट जाहिरातींबाबत समोर आलेली एक बाब ही अतिशय महत्वाची असून याला सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे.

स्पेन आणि ऑस्ट्रीयामधील संगणक तज्ज्ञांनी एकत्रीतपणे फेसबुकच्या जाहिरातींबाबत “Unique on Facebook: Formulation and Evidence of (Nano) targeting Individual Users with non-PII Data” या नावाने एक रिसर्च पेपर प्रसिध्द केला आहे. आपण याला https://arxiv.org/abs/2110.06636 या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात. हा लघु प्रबंध तसा किचकट असला तरी आपण याला सोप्या भाषेत समजावून घेऊ शकतात. या संशोधनाचा सार असा आहे की- फेसबुकच्या ऍड मॅनेजरचा बिनचूक वापर केला तर अगदी एखाद्या व्यक्तीला एकट्यालाच टार्गेट करणारी जाहिरात आपण फेसबुकवर देऊ शकतो. फेसबुकवर प्रत्येक युजर्सच्या विविध आवडी-निवडींनुसार (इंटरेस्ट) त्याला जाहिराती दाखविल्या जातात. यापैकी चार दुर्मीळ आवडींची माहिती जरी एखाद्याला मिळाली तरी तो त्याच युजरला जाहिरात टार्गेट करू शकतो. याची अचूकता ही साधारणपणे ९० टक्के इतकी असते. आणि जर युजर्सच्या १८ वा त्यापेक्षा जास्त आवडींची माहिती मिळाली तर साहजीकच हे काम अगदी १०० टक्के बिनचूकपणे होऊ शकतो.

आपण हीच बाब अजून सोप्या प्रकारे समजून घेऊया. मी जळगावातील अयोध्यानगर परिसरात राहतो. माझ्या फेसबुकवरील इंटरेस्टमध्ये वाचन नमूद केलेले आहे. आता समजा अयोध्यानगरच्या परिसरातील १०० लोकांनाही वाचनाची आवड असल्याचे फेसबुकच्या डाटाबेसमध्ये नमूद केलेले आहे. मात्र माझ्या ब्राऊजींग हिस्ट्रीतून मी ओशोंची पुस्तके एक तर ऑर्डर केलेली आहेत अथवा याबाबत सर्च केले असल्याचे अंकीत झालेले आहे. यामुळे मुंबईतील एखाद्या प्रकाशनाने ओशोंचे नवे पुस्तक प्रकाशित केले आणि त्याला याची जळगावातही जाहिरात करायची आहे. तेव्हा जळगावच्या अयोध्यानगरातील फक्त आणि फक्त शेखर पाटील यालाच आपली जाहिरात दिसावी अशी तजवीज तो प्रकाशक करू शकतो. अर्थात अयोध्यानगरातील फक्त आणि फक्त माझ्याच वॉलवर ही जाहिरात मला दिसेल. यामुळे इतरांवर जाहिरातींचा खर्च न करता तो अचूकपणे संभाव्य ग्राहकाला आपल्या प्रॉडक्टची माहिती परिणामकारक पध्दतीत पोहचवू शकतो.

नॅनो टार्गेटींग हा प्रकार जाहिरातदारांना वरदान ठरणारा आहे. आपापल्या व्यवसायाशी संबंधीत इंटरेस्ट ग्रुपमधील लोकांपर्यंत कुणीही बिनचूकपणे जाहिरात दाखवू शकतो. हा प्रकार अतिशय किफायतशीर असा असून याच्या मदतीने बिनचूक ऍड कँपेन राबविता येणार आहे. मात्र याची दुसरी बाजू तपासून पाहिली असता यातील भयंकर आयाम आपल्या समोर येतो. नॅनो टार्गेटींगचा गैरवापर देखील करता येणार असल्याने याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेष करून राजकीय जाहिराती, दिशाभूल करणारे कंटेंट हे अगदी एखाद्या व्यक्तीच्या वॉलवर अचूकपणे पोहचविता येणार असल्याने हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. विशेष करून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून दिशाभूल करणारे कंटेंट, त्यांची मनोवृत्ती बाधीत होईल अशा पोस्ट अथवा विशिष्ट राजकीय आणि सामाजिक प्रणालींच्याच प्रचार करणार्‍या पोस्ट सहजपणे पोहचवता येणार आहेत. अर्थात, निवडणुकीतील प्रचारतंत्रात याचा गैरवापर सहजशक्य असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

या गौप्यस्फोटामुळे फेसबुकवर टीका होत असल्याने या कंपनीने संबंधीत रिसर्चचा दावा खोडून काढला आहे. कोणत्याही युजरने परवानगी दिली तरच त्याच्या आवडी-निवडींची माहिती आम्ही जाहिरातीच्या प्रणालीत देत असतो असे फेसबुकने जाहीर केले आहे. यामुळे आमच्या जाहिरातींच्या प्रणालीबाबतचे हे संशोधन चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता यावरून दावे-प्रतिदावे होत राहतील. मात्र फेसबुक सारख्या अतिशय लोकप्रिय डिजीटल मंचावरून अगदी एखाद्या युजरला टार्गेट करून जाहिरात देता येत असेल तर मग अन्य थर्ड पार्टी मीडियाकडे वळणार्‍या जाहिरातींचा ओघ हा आपोआप कमी होणार आहे. अलीकडच्या काळात अनेक डिजीटल मीडिया हाऊसेस हे स्थानिक अथवा थर्ड पार्टी जाहिरातींच्या आशेने या क्षेत्रात आलेले आहेत. मात्र फेसबुक इतकी अचूकता कुणाकडेच नसल्यामुळे साहजीकच त्यांना नॅनो टार्गेटींग सारख्या प्रणालींचा जबर फटका बसणार आहे.

नॅनो टार्गेट ऍडव्हर्टायजींग ही भविष्यकालीन संकल्पना नसून आजच ती सहजशक्य असल्याचे ताज्या संशोधनातून दिसून आले आहे. मात्र अगदी बिनचूक पध्दतीत कुणालाही आपल्या प्रॉडक्ट वा सेवेची जाहिरात डिलीव्हर करणे हे कुणालाही शक्य असल्याचा करण्यात आलेला गौप्यस्फोट हा व्यापक प्रमाणावर परिणाम करणारा आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून ते अपेक्षितच आहेत. मात्र हा प्रकार जाहिरात क्षेत्राला आमूलाग्र बदलणारा ठरणारा आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment