Featured slider चित्रपट

फादर ऑफ ‘द गॉडफादर’ !

Written by shekhar patil

आज विश्‍वविख्यात लेखक मारियो पुझो यांची जन्मशताब्दी ! आजच्या बरोबर १०० वर्षांपूर्वी एका वंचित वस्तीतील भणंग कुटुंबात जन्माला आलेल्या या माणसाने जगभरातील कोट्यवधी रसिकांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. ज्याला कुणाला वाचनाची वा चित्रपट पाहण्याची आवड असेल त्यांना मारियो पुझो लिखीत ‘द गॉडफादर’ बाबत नव्याने सांगावे लागत नाही. ही आयकॉनीक कादंबरी जगात सर्वाधीक खपलेल्या पुस्तकांपैकी एक तर आहेच पण; यावर आधारित याच नावाचा चित्रपट सर्वकालीन महान सिनेमांमध्ये पहिल्या तीन मध्ये गणला जातो. खरं तर एखादी कादंबरी गाजल्यानंतर त्यावर आधारित चित्रपटालाही तुफान यश मिळाल्याची उदाहरणे दुर्मीळ मानली जातात. याचा विचार केला असता, मारियो पुझो हे याच प्रकारचा पराक्रम करणारे दुर्मिळातील दुर्मीळ लेखक होत.

अनेक समीक्षकांपासून ते सर्वसामान्य वाचकांच्या मते मारियो पुझो यांनी फक्त गॉडफादर लिहले असते तरी ते अजरामर झाले असते. मात्र याच्या जोडीला संघटीत गुन्हेगारीशी संबंधीत एकापेक्षा एक सरस कथानकांना त्यांनी जगासमोर मांडले. त्यांची पुस्तके अभिजात साहित्यात गणली गेली नसली तरी ती लोकप्रियतेच्या मानकावर तुफान यशस्वी ठरली. अर्थातच ‘द गॉडफादर’ ची सर कुणालाच आली नाही. यामुळे मारिओ पुझो म्हटले की गॉडफादर शिवाय आपल्या डोळ्यासमोर दुसरे काहीच उभे राहत नाही हे देखील तितकेच खरे !

मी मारियो पुझो यांच्या जळपास सर्व ख्यातनाम कादंबर्‍या वाचल्या आहेत. यात गॉडफादर, सिसीलियन, द फोर्थ के, ओमेर्ता आणि ‘द लास्ट डॉन’ आदींचा समावेश आहे. यातील गॉडफादरचे तर अनेकदा पारायण केले आहे. विशेष म्हणजे ही कादंबरी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधून वाचलीय. यावरील तिन्ही चित्रपट तर अनेकदा पाहिले तरी मन भरत नाही. दर वेळेस यातून आपल्याला नवीन अर्थ समजतो. याबाबत मी लिहलेदेखील आहे. यात गुन्हेगारी व धर्मसत्तेतील संबंधांबाबतचा लेख आपण https://bit.ly/3nQf17I या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात.

खरं तर पॉप कल्चरमध्ये संघटीत गुन्हेगारीबाबतचे लिखाण विपुल असून रूपेरी पडद्यावरही याच्याशी संबंधीत अनेक कथानके आलेली आहेत. हॉलिवुडचा विचार केला असता अगदी तीसच्या दशकापासूनचे अनेक गुन्हेगारीपट लोकप्रिय झाले आहेत. मात्र पुझो यांनी संघटीत गुन्हेगारीतील अनेक भयचकीत करणारे कंगोरे ज्या विलक्षण प्रत्ययकारी स्वरूपात जगासमोर मांडले ते केवळ अद्वितीय या स्वरूपातील मानावे लागणार आहेत.

आज आपल्या दैनंदिन बोलण्यात माफिया, डॉन, गॉडफादर आदी शब्द वारंवार येत असतात. यातील ‘माफिया’ हा शब्द तर जगातील प्रत्येक भाषेत रूढ झाला आहे. आपल्याकडे शब्दाचे तर इतके देशीकरण झाले आहे की, आपण वाळू माफिया, रेशन माफिया आदी स्थानिक संदर्भातील शब्दांचा विपुल वापर करत असतो. हाच ‘माफिया’ हा शब्द जगभरातील पॉप्युलर कल्चरमध्ये रूजविण्याचे काम मारियो पुझो यांनी केले. अर्थात, त्यांची महत्ता या पेक्षा किती तरी पटीने अधिक आहे.

‘युध्दस्य: कथा रम्या’ असे म्हटले जाते. आणि ते खरे देखील आहे. युध्द कथांमध्ये असणारे विलक्षण नाट्य हे कुणालाही खिळवून ठेवते. अगदी त्याच प्रकारे गुन्हेगारीशी संबंधीत कथानकांमध्येही मानवी मनाला आंदोलीत करणार्‍या अनेक घटकांचा समुच्चय असतो. तथापि, गुन्हेगारी म्हणजे निव्वळ पैशांची लालसा, वर्चस्वाची लढाई, हिंसा, बदला, दगाबाजी, लोभीपणा आदी बाबी नव्हेत. तर याच्याही पलीकडे असणारा व्यापक पट लक्षात घेतला तर आपल्याला गुन्हेगारांची मानसिकता लक्षात येते. यामुळे मारियो पुझो यांच्या लिखाणातून व्यक्त होणारा रक्तरंजीतपणा हा आपल्याला अक्षरश: गोठवून टाकतो. त्यांच्या बहुतांश कथांनकांमध्ये विलक्षण थंड प्रकारातील क्रौर्य दर्शविण्यात आल्याने याची भयावहता ही किती तरी पटीने अधिक जाणवते.

मारियो पुझो हे मूळचे इटालियन-अमेरिकन. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इटालीतून हजारोंच्या संख्येने लोक अमेरिकेत निर्वासीत म्हणून आले. पुझोंचे कुटुंब हे त्यातील एक. हे लोक आपल्यासोबत इटालीयन खाद्यसंस्कृती, कुटुंबवत्सलपणा व धर्मनिष्ठतेसोबत गुन्हेगारीची बिजे देखील घेऊन आलीत. इटालीतील संघटीत गुन्हेगारीला मोठा इतिहास आहे. यातील सिसीली बेटावरील गुन्हेगारांचे क्रौर्य तर आधीच सर्वसामन्यांच्या उत्कंठेचा विषय बनलेले होते. खरं तर इटालीयन संघटीत गुन्हेगारी ही आधी देखील अनेक कथानकांचा मुख्य गाभा बनलेली हेती. तथापि, याला एका अतिशय उत्कंठावर्धक कथानकामध्ये गुंफण्याचे काम पुझो यांनी केले. संघटीत गुन्हेगारीचे अगदी बारीक-सारीक तपशील आणि क्षणाक्षणाला उत्सुकता वाढविणारी स्टोरी लाईन यामुळे ‘द गॉडफादर’ ही कलाकृती एखादी कादंबरी वा चित्रपटाच्या पलीकडे जात एका कल्टमध्ये (संप्रदाय) परिवर्तीत झाली आहे. यातील प्रत्येक पात्र हे जणू काही अगदी खरेखुरे असल्याचे आपल्याला भासते.

मारियो पुझो यांच्या लिखाणातील भेदकता आणि अचूक संदर्भाचे मूळ हे त्यांच्या पूर्वायुष्यातील अस्थैर्यात असल्याचे आपल्याला आढळून येते. मारियो पुझो यांचा जन्म न्यूयॉर्कमधील ‘हेल्स किचन’ या कुख्यात झोपडपट्टीवजा वस्तीत झाला होता. वयाच्या पंचेचाळीशीपर्यंत सटर-फटर लिखाण करून उपजिवीका करणार्‍या मारियो पुझो यांची आर्थिक स्थितीही बेताचीच होती. १९६५ पासून त्यांनी अमेरिकेतील इटालियन निर्वासीत माफिया कुटुंबांमधील वैमनस्यावर आधारित ‘द गॉडफादर’ हे पुस्तक लिहण्यासाठी घेतले. १९६९ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने इतिहास रचला. जगभरात हे पुस्तक तुफान खपले. याच कादंबरीवर आधारित १९७२ साली ‘द गॉडफादर’ या मालिकेतील पहिल्याच चित्रपटाने तर अक्षरश: धमाल केली. मारियो पुझो यांचे लिखाण, फ्रान्सीस फोर्ड कपोला या प्रतिभावंताचे दिग्दर्शन आणि मार्लन ब्रँडो व अल पचीनो यांच्या सारख्या कसदार अभिनेत्यांच्या एकत्रीत प्रयत्नांमधून रूपेरी पडद्यावर एक अजरामर कथानक जन्माला आले.

अनेक समीक्षकांच्या मते ‘द गॉडफादर’चा पहिला भाग हे ‘एपीक’ अर्थात महाकाव्य आहे. एका विशाल पटात मानवी स्वभावातील मनोज्ञ दर्शन घडविण्यात ‘द गॉडफादर’ यशस्वी झाले असून याचे श्रेय हे अर्थातच मारियो पुझो यांच्या प्रतिभाशक्तीला जाते. या चित्रपट त्रयीतील पहिले दोन्ही भाग रसिकांच्या पसंतीस उतरले असले तरी तिसर्‍या भागाला मात्र तितके भाग्य लाभले नाही. अर्थात, आजही हे तिन्ही भाग अभिजात चित्रपट म्हणून गणले जातात. आता गमतीचा भाग असा की, मारियो पुझो हे अभिजात नव्हे तर लोकप्रिय लेखक म्हणून ओळखले जात असतांना त्यांच्या रचनेवर आधारित चित्रपटांना मात्र ‘क्लासीक’चा दर्जा मिळालेला असल्याची बाब लक्षणीय अशीच आहे.

‘द गॉडफादर’ बाबत खूप काही लिहले गेले आहे. याचे अनेक अंगांनी समीक्षण देखील झाले आहे. याच प्रकारे मारियो पुझो यांच्या अन्य कादंबर्‍या देखील वाचकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. यातील बहुतेक कादंबर्‍यांचा गाभा हा अर्थातच गुन्हेगारी हाच आहे. यातील कथानक हे विविध कालखंडात वा भिन्न भौगोलिक स्थितीत घडत असले तरी यातील काही दुवे हे समान आहेत. यात कुटुंबाला मध्यवर्ती स्थान आहे. इटालीयन माणूस हा अतिशय कुटुंबवत्सल मानला जातो. अर्थात, इटालीयन गुन्हेगारांसाठी कुटुंब हे सर्वतोपरी असते.

माफियांच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’मध्ये वर्चस्वाच्या लढाईत शक्यतो महिला आणि मुले यांना आणू नये असा अलिखीत नियम आहे. तरी काही वेळेत यामध्ये कुटुंब भरडले जाते. यातून शत्रूत्वाची नवीन श्रुंखला तयार होत असते. माफियांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते कथितरित्या धर्मपरायण असतात. गुंडांच्या टोळ्या आणि धर्मसत्तेतील साटेलोटे यावर मारियो पुझो यांनी भाष्य केलेले आहे. धार्मिक कर्मकांड निष्ठेने करणारे गुन्हेगार हे प्रत्यक्ष वागण्यात आत्यंतीक टोकाची अधार्मिक कृत्ये करत असल्याचे त्यांनी वारंवार दर्शविले आहे. माफियांचा स्वत:च्या न्याय व्यवस्थेवरच ठाम विश्‍वास असतो. यामुळे ‘खून का बदला खून’ या आदिम विचारधारेनुसार टोळीयुध्दात एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी ते जराही पुढे मागे पाहत नाहीत. किंबहुना त्यांच्यासाठी खून ही अत्यंत किरकोळ बाब असल्याचे पुझो यांनी अतिशय परिणामकारक पध्दतीत दर्शविले आहे. या विश्‍वात ईमानाला सर्वोच्च स्थान असून दगाफटका वा फितुरी करणार्‍याला मात्र यमसदनी पाठविले जाते. माफियांचे विश्‍व हे स्वत:पुरते त्यांनीच ठरविलेल्या नैतिकतेच्या नियमांना धरून वागत असते.

तर, गॉडफादर ही माफियांमधील सर्वोच्च स्थिती असते. गुन्हेगारीत शिखरावर पोहचलेला व्यक्ती हा स्वत: अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये न्यायनिवाडा करत असतो. प्रत्येक क्षेत्रात त्याचे आश्रीत असतात. तो समतोल बुध्दीने न्याय करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, खंडणीपासून ते कॅसिनोज, अंमली पदार्थ आदी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांमधून रग्गड कमाईची तजवीज त्याने केलेली असते. पैसा, सत्ता, वर्चस्व, माफियांच्या टोळ्यांमधील प्रतिष्ठा आदींसाठी ते काहीही करण्यासाठी तयार असतात. आपल्या आयुष्यात शेकडोंच्या हत्यांमध्ये हात असणारी ही डॉन मंडळी अनेकदा कनवाळू देखील वाटतात. ते रॉबीनहूड टाईप गोरगरीब आणि अडल्या-नडलेल्यांना मदत करतात. त्यांना आयुष्यात उभारी देतात. मात्र काहीही झाले तरी शेवटी ते गुन्हेगारच असतात हे मारियो पुझो यांनी आपल्या कृतींमधून मांडले आहे.

यामुळे डॉन कार्लिऑनेसह अन्य भाई मंडळीचे त्यांनी कधीही उदात्तीकरण केले नाही. परिणामी, वाचक वा चित्रपटाचा प्रेक्षक त्यांचे कथानक विलक्षण उत्कंठेने अनुभवत असतांना त्यांना ही मंडळी भली वाटत नाही. खरं तर प्राचीन ग्रंथांपासून ते आजच्या कादंबर्‍यांमध्ये बहुतांश थीम ही सत्य-असत्याच्या संघर्षाची असते. मात्र मारियो पुझो यांनी आपल्या कथानकांमधून दुष्ट विरूध्द सुष्टांमधील नव्हे तर दुष्ट व अति दुष्टांमधील लढाई दर्शविली आहे. त्यांच्या रचनांचा व्यापक पट हा गुन्हेगारी विश्‍वातील वर्चस्वाच्या लढाईचा असल्याचे आपल्याला दिसून येते.

द गॉडफादरच्या प्रारंभीच बाल्झाक यांचे Behind Every Great Fortune There Is a Crime हे उदधृत केलेले वचन या अर्थाने अतिशय चपखल असेच आहे. गुन्हेगारांच्या पापी विश्‍वाचे भेदक दर्शन मारियो पुझो यांच्या लेखणीतून स्त्रवले आहे. अर्थात, याला अतिशय थरारक अशी निवेदन शैली आणि बिनचूक तपशील यांच्यामुळे मोजक्या कादंबर्‍यांच्या माध्यमातून त्यांनी गुन्हेगारी विश्‍वाची एक अक्षरश: प्रतिसृष्टी उभी केली. क्राईम थ्रिलर या प्रकारात अनेक कादंबर्‍या व चित्रपट आले असून यात अद्यापही खंड पडलेला नाही. तथापि, ‘द गॉडफादर’ची उंची कुणालाही गाठता आली नसल्याचे रसिकांसह समीक्षकांचेही मत आहे. अर्धशतक उलटून गेल्यानंतही ‘द गॉडफादर’ आपल्याला आजही ताजीतवानी वाटते. हीच मारियो पुझो यांची महत्ता. जन्म शताब्दी निमित्त गॉडफादरच्या जनकाला मानाचा मुजरा…!

About the author

shekhar patil

Leave a Comment