Featured slider आध्यात्म

स्वीकार व नकाराच्या पलीकडचा बुध्द !

Written by shekhar patil

मला स्वत:ला गौतम बुध्दाबाबत शालेय जीवनातच विलक्षण आकर्षण वाटत होते. यात त्यांच्याशी संबंधीत अलौकीक कथांचे गारूड हे प्रमुख कारण होते. तर, कॉलेज जीवनातील आध्यात्मीक शोधात याला गती आली. या संदर्भातील वाचन आणि काही ध्यान पध्दती केल्यानंतर बुध्द कधी हृदयात विराजमान झाला हे कळलेच नाही. आज बुध्द पौर्णिमा. एखाद्या व्यक्तीचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महानिर्वाण हे एकाच दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेला व्हावे यात काही योगायोग असो वा नसो, यातील काव्य मात्र मनाला मोहवणारे आहे. आज तब्बल अदमासे पंचवीस शतकांनंतरही बुध्द महिमा नाहीशी झालेली नाही. किंबहुना आज हा महामानव खर्‍या अर्थाने ग्लोबल झालेला आहे. आता बुध्द हे जागतिक अहिंसा व शांततेचे अघोषीत ब्रँड अँबेसेडर असले तरी त्यांच्या शिकवणीचा मूळ गाभा शोधण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. आज यावरच दोन शब्द सांगावेसे वाटतात.

या संदर्भात पहिल्यांदा एक कथा- गौतम बुध्द यांना ज्ञानप्राप्ती (एनलाईटमेंट) झाल्या नंतर त्यांनी विपुल प्रमाणात प्रवचन दिले. यातील एक घटना अतिशय मार्मीक अशीच आहे. बुध्द नेहमीच आपल्या प्रवचनाच्या शेवटी आता ”जा…आणि आपापले काम करा !” असे म्हणत असत. शिष्यांना या बद्दल नेहमी आश्‍चर्य वाटत असे. शेवटी त्यांचा पट्टशिष्य तथा चुलत भाऊ आनंद यांनी याबाबत विचारणा केली. यावर बुध्द म्हणाले की, ”माझ्या प्रवचनात भिक्षूंसोबत इतरही लोक असतात. त्यांच्यासाठी मी हे वाक्य म्हणतो.” मात्र आनंदला हे स्पष्टीकरण पटले नाही. यावर बुध्द हसून म्हणाले की, ”अरे बाबा माझ्या आज रात्रीच्या प्रवचनात तुम्हा भिक्षूंसह काही संसारी लोकांसह एक वेश्या व एक चोर देखील आलेले होते. माझ्या शिकवणीतून त्यांनी काय घेतले हे उद्या सकाळी जाऊन चौकशी करून जाणून घे !”

आनंद यांनी लागलीच सकाळी या तिन्ही जणांच्या घरी धाव घेतली. यात एका भिक्षुकडे गेल्यावर आनंद यांनी तुम्ही बुध्दांच्या संदेशातून काय घेतले व रात्री नेमके काय केले ? अशी विचारणा केली. यावर भिक्षु म्हणाले की, ”बुध्दांच्या शिकवणीनुसार मी रात्री ध्यान केले नंतर अल्प आहार घेऊन विश्रांती केली. कारण हेच बुध्दांनी सांगितले आहे.” आनंद यांना हे उत्तर तसे अपेक्षितच होते. ते चोराच्या घरी गेले असता तो झोपलेला होता. घरच्या मंडळीने त्याला उठविल्यानंतर थेट बुध्दांचा शिष्य आपल्याला भेटायला आल्याने तो भारावला. आनंद यांनी आधीचाच प्रश्‍न चोराला विचारला. यावर तो चोर म्हणाला की, ”काल रात्री बुध्दांनी सर्वांना आपापले काम करण्याचे सांगितल्यानंतर मला खूप आनंद झाला. ते खरोखरच अंतर्यामी असल्याचे मला जाणवले. यामुळे प्रवचनानंतर मी सरळ चोरी करण्यासाठी गेलो. आज रात्री तगडा माल हाती लागल्याने बर्‍याच दिवसांची काळजी मिटली आहे” अशी माहिती त्या चोराने दिली. या माहितीमुळे थक्क झालेला आनंद वेश्येच्या घरी गेल्यावर त्यांचे चांगले स्वागत करण्यात आले. आनंद यांनी वेश्येलाही हाच प्रश्‍न विचारला. यावर वेश्या म्हणाली की, ”अहो बुध्दांनी माझ्या मनातील बाब जाणून घेत…जा आता आपापल्या कामाला लागा असे सांगितले. याचे मी तंतोतंत पालन करून रात्रीच मैफिल सजवली. अनेक राजे-महाराजे यात आले व त्यांनी मला रग्गड पैसा दिला.” ही सर्व बुध्दांचीच कृपा असल्याचे देखील ती म्हणाली.

आनंद यांनी या तिघांची माहिती बुध्दांना दिली. यावर ते हसून म्हणाले, ”आनंद जग हे असेच आहे… प्रत्येकाचा विचार व दृष्टीकोन वेगवेगळा असतो. यामुळे प्रवचनानंतर भिक्षूने ध्यान केले, चोराने चोरी तर वेश्यने शेज सजवली. म्हणजे सांगणार्‍याचे सगळेच काही समोरच्यांना समजेल असे नव्हे !” म्हणजेच आपण कितीही ज्ञान दिले तरी घेणारा त्याला हवे तेच घेणार अथवा तशी समजूत करून घेणार याची जाणीव बुध्दांना होती. यामुळे त्यांनी आपल्या शिकवणीमध्ये खूप स्पष्टपणा ठेवला. तरीही अतिशय दुर्देवाची बाब म्हणजे गौतम बुध्द यांच्या विचारांच्या बाबतही असेच काहीसे झाले. सुदूर पुर्वेपासून ते मध्य आशियापर्यंत बौध्द धर्म पसरला. तथापि काळाच्या ओघात धम्माचा विस्तार कमी झाला. यात प्रामुख्याने बुध्द विचारांमध्ये घुसडण्यात आलेले विचार कारणीभूत ठरले. यासोबत भारतातून बौध्द धर्मियांच्या केलेल्या उच्चाटनाचाही यात मोठा वाटा आहे. तर अलीकडच्या शतकात चीनमधील बुध्दीझमला कम्युनिस्टांनी चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. भारत व चीनसारख्या विशालकाय देशांमध्ये बौध्द विचारांचा संकोच झाल्याचा धम्माच्या प्रचार-प्रसारात अडचणी आल्या. तथापि, भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून याचे पुनरूज्जीवन झाले. तर आता चीनमध्येही काही प्रमाणात का होईना बुध्दीझमचे पुनर्जागरण सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आता वैश्‍विक पातळीवर बुध्द विचारांचा प्रचंड गतीने होणारा प्रसार आपल्याला दिसून येत आहे.

बुध्द आपल्याला अनेक रूपात भेटतो. मानवी इतिहासात जशी ख्रिस्तपूर्व व ख्रिस्तपश्‍चात विभाजन रेषा आहे. अगदी त्याच प्रकारे मानवी चेतनेच्या इतिहासात ‘बुध्दपुर्व’ व ‘बुध्द पश्‍चात’ असे विभाजन मानले जाते ही बुध्दांच्या विचारांची महत्ता आहे. गत २५ शतकांमध्ये धम्मावर विलक्षण अध्ययन झाले आहे. यात अनेक मते-मतांतरे; संप्रदाय, विचारधारा आदींनी धम्म हा जसा एकीकडे समृध्द झाला; तसाच दुसर्‍या बाजूने कमकुवतही ! या लेखात वर सांगितलेली कथा ही प्रत्यक्षात बुध्दांच्या विचारांबाबतही खरी ठरली. याचमुळे मूर्तीपुजेला प्रखर विरोध करणार्‍या बुध्दांच्या इतक्या मूर्त्या बनल्या की, अरबी भाषेतील मूर्तीसाठी वापरला जाणारा ‘बूत’ हा शब्द बुध्दाचाच अपभ्रंश आहे. मानवी इतिहासात सर्वाधीक शिल्पे ही बुध्दांचीच बनल्याचे कुणी अमान्य करणार नाही. यासोबत ज्या बुध्दांनी कर्मकांडांना विरोध केला त्यांच्याच अनुयायांनी बर्‍याच प्रमाणात आपापले स्वत:चे कर्मकांड सुरू केलेत. तथापि, आज एकविसाव्या शतकात बुध्दाला नव्याने शोधले जात असल्याची बाब विलक्षण आणि बुध्दाची महत्ता दर्शविणारी आहे.

आज भौतिक सुख-सुविधा हात जोडून उभ्या असल्या तरी मानवाच्या अंतर्यामीचे रितेपण मात्र वाढीस लागले आहे. इतिहासात प्रथमच मानव इतक्या मानसिक गुंत्यामध्ये जीवन जगतोय. या ताणतणावर उत्तर शोधून आदर्श जीवन कसे जगायचे याचे उत्तर हे बुध्दाकडे असल्याचे बहुतेकांच्या लक्षात आले आहे. यामुळे इतिहासात पहिल्यांदाच बुध्दाच्या स्वीकार्यतेसाठी खूप अनुकुल स्थिती आहे. आज अनेक खंडांमध्ये विभाजीत असणारा बुध्दीझम हा परिष्कृत पध्दतीत सादर करण्यासाठी यावर मंथन होणे आवश्यक आहे. खरं तर बुध्दीस्ट विश्‍वासाठी एका ‘रेनेसॉ’ची आवश्यकता आहे. असे झाल्यास आजवर ‘लाईट ऑफ एशिया’ म्हणून गौरविण्यात आलेले बुध्द हे मानव जातीचे खर्‍या अर्थाने पथ प्रदर्शक बनतील.

खरं तर, बुध्दाने नेहमीच त्या-त्या काळातील सर्वसामान्यांपासून ते प्रतिभावंताना आकर्षीत केले आहे. आत्मा-परमात्मा व स्वर्ग-नरकाच्या भितीला साफ नाकारणारा बुध्द हा टोकाच्या नास्तिकांना व परम आस्तिकांनाही आपला वाटतोय. ईश्‍वर व अवतारांना साफ नाकारणार्‍या बुध्दाला ईश्‍वराचे स्वरूप देणारेही आहेत. तर मानवी चेतनेचा सर्वोच्च अविष्कार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या अनेक शतकांपासून जगभरातील लक्षावधी कलावंताचे प्रेरणास्थानही बुध्दच आहे. विहार, मठ व लेण्यांमधील कलाकृतींपासून ते आजच्या डिजीटल आर्टमध्येही बुध्दाकृती ही अविभाज्य घटक असल्या सारखी आपल्याला दिसून येते. कुणासाठी बुध्द विपश्यनेच्या माध्यमातून आत्मोन्नतीची अनुभूती प्रदान करणारा आहे…कुणासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा…कुणासाठी करूणामय तर कुणासाठी प्रज्ञावान ! कुणाला सनातन्यांविरूध्द विद्रोह करणारा बुध्द भावतो तर कुणाला अर्धोन्मीलीत अवस्थेत अंतरीचा शोध घेणारा….कुणाला बुध्दाचे कारूण्य भावते तर कुणाला त्यांचे नितीनियम…कुणाला त्यांची विरक्ती आपलीशी वाटते तर कुणाला त्यांचे तत्वज्ञान…! एकाच महापुरूषाची ही असंख्ये रूपे कुणालाही मोहित करून टाकण्यास समर्थ आहे. यामुळे दुर्गम गिरीकंदरांमधल्या मॉनेस्ट्रीज (मठ) मधील ध्यानसाधना करणार्‍या साधकांपासून ते हॉलीवुड वा सिलीकॉन व्हॅलीतील वलयांकीत मंडळी बुध्दाच्या प्रेमात आहे. नव्हे ते धम्म जगत आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे बुध्द हा कुणालाही हवा तितका घेता येतो…अर्थात नाकारताही येतो. खरं तर गौतम बुध्द हे स्वीकारण्या व नाकारण्याच्या पलीकडचे असून हीच त्यांची महत्ता आहे.

मला स्वत:ला बुध्दांचा ‘मध्यम मार्ग’ हा अधिक उपयुक्त व विज्ञाननिष्ठ वाटतो. मानवाने संसार आणि विरक्ती ही दोन टोके टाळून मध्यम मार्गाचा अवलंब करण्याची त्यांची शिकवण ही आजही तितकीच उपयुक्त आहे.’ना भोगो, ना त्यागो…वरना जागो’ ही शिकवण जागृत जीवनासाठी अत्यावश्यक आहे. आयुष्यात कोणत्याही प्रकारचा अतिवादाला टाळण्याचा हा मूलमंत्र कुणालाही आयुष्यात खूप कामास येऊ शकतो. तर अंतर्यात्रेसाठी बुध्दांच्या विपश्यनेसह अन्य ध्यान पध्दती या समस्त मानव जातीला अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत. बाकी; प्रज्ञा, शील व समाधी हे त्रिरत्न; मानवी दु:खाची व्याख्या आणि त्यापासून मुक्तता शक्य असणारी दर्शविणारे चार आर्यसत्य आणि आदर्श जीवन जगण्यासाठी बुध्दांनी दिलेला आर्य अष्टांग मार्ग यांची महत्ता आणि नैतिक व आदर्श जीवन पध्दती साठी बुध्द, धम्म आणि संघ यांची अनिवार्यता यांच्याबाबत नव्याने सांगण्याची काहीही आवश्यकता नाही. अर्थात, वर सांगितलेल्या कथेनुसार गौतम बुध्दांची मूळ व शुध्द स्वरूपातील शिकवण अंगिकारणे वाटते तितके सोपे नाही. यासाठी बुध्दांचाच ‘अत्त दीप भव:’ हा मूलमंत्र आपल्या उपयोगात पडू शकतो.

सर्वात शेवटी ओशोंचे उध्दरण- ”गौतम बुद्ध ऐसे हैं जैसे हिमाच्छादित हिमालय। पर्वत तो और भी हैं। हिमाच्छादित पर्वत और भी हैं, पर हिमालय अतुलनीय है। उसकी कोई उपमा नहीं है। हिमालय बस हिमालय जैसा है। गौतम बुद्ध बस गौतम बुद्ध जैसे हैं। पूरी मनुष्य जाति के इतिहास में वैसा महिमापूर्ण नाम दूसरा नहीं। गौतम बुद्ध ने जितने हृदयों की वीणा को बजाया है उतना किसी और ने नहीं। गौतम बुद्ध के माध्यम से जितने लोग जागे और जितने लोग परम भगवत्ता को उपलब्ध हुए उतने किसी और के माध्यम से नहीं। गौतम बुद्ध की वाणी अनूठी है और विशेषकर उन्हें, जो सोच-विचार, चिंतन-मनन, विमर्श के आदि हैं। हृदय से भरे हुए लोग सुगमता से परमात्मा की तरफ चले जाते हैं, लेकिन हृदय से भरे हुए लोग कहां हैं? और हृदय से भरने का कोई उपाय भी तो नहीं है। हो तो हो न हो तो न हो। ऐसे आकस्मिक नैसर्गिक बात पर निर्भर नहीं रहा जा सकता।”

अर्थात, विवेकशील आणि खुल्या हृदयानेच आपल्याला बुध्द गवसू शकतो. मग आपण सर्वसामान्य असो की अभिजन ! हाच बुध्द आपल्या आयुष्यात यावा यापेक्षा महत्वाचा संकल्प असू शकतो का ?

About the author

shekhar patil

Leave a Comment