Featured slider विज्ञान-तंत्रज्ञान

इमोजी : शब्दांविना संवाद ते विसंवाद

Written by shekhar patil

कधी काळी मी ‘मोर्स कोड’ शिकण्याच्या तीव्र आकांक्षेने पछाडलो होतो. एक तर यातून एक कोड लँग्वेज शिकता येणार होती. आणि दुसरे म्हणजे अमॅच्युअर रेडिओच्या ( हॅम रेडिओ ) परवान्यासाठी आवश्यक असणार्‍या एएसओसी परीक्षेसाठी (इलेक्ट्रॉनिक्सच्या अभ्यासक्रमासह) याची आवश्यकता होती. यामुळे मी याची सुरवातदेखील केली. टेलीग्राफ खात्यातील एका परिचिताच्या मदतीने ‘डॅश’ आणि ‘डॉट’मध्ये शब्द तयार करतांना थरार जाणवू लागला. हे प्रकरण पुढे जात नाही तोच आयुष्यात इंटरनेट आले. आणि एका क्षणात माझे हॅम रेडिओ, मोर्स कोड, डीएक्सइंग आदींसारखे छंद इतिहासजमा झालेत. आता हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे नुकताच जागतिक इमोजी दिन साजरा करण्यात आला. सध्या फक्त भावचिन्हांच्या माध्यमातून एक वैश्‍विक भाषा उदयास आली असून अक्षरश: अब्जावधी लोक याचा दैनंदिन संदेश वहनात वापर करत असल्याची बाब अतिशय विलक्षण अशीच आहे. मोर्स कोडने नक्कीच मानवी जीवनाला कलाटणी दिली असली तरी इमोजीने याच्या पुढील टप्पा गाठला आहे. एक तर ही दृश्य भाषा असून ती वापरण्यासाठी अतिशय सोपी आहे. यामुळे इमोजी ही जवळपास स्वतंत्र भाषा बनली असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

पृथ्वीतलावरील विविध भाषा आणि बोली विकसित होण्यासाठी हजारो वर्षांचा कालखंड लागला. माणूस पहिल्यांदा खाणा-खुणांनी संवाद साधू लागला. नंतर चित्रांच्या माध्यमातून विचारांना लिपीबध्द करण्यास शिकला. तर यानंतर विविध भाषांचा उगम झाला. आज यातील बहुतांश भाषा या विलक्षण परिणामकारक पध्दतीत उत्क्रांत झाल्या आहेत. जगभरात शाब्दीक संवाद (व्हर्बल कम्युनिकेशन) सर्वत्र प्रचलीत असतांना इमोजीसारख्या विना शब्द (नॉन व्हर्बल) या प्रकारातील संवाद वाढीस लागल्याचा विरोधाभास आज आपण पाहत असून यासाठी तंत्रज्ञान कारणीभूत ठरले आहे. सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला असून पर्यायाने इमोजींचा वापरदेखील वाढीस लागला आहे. आज फेसबुक, व्हाटसअ‍ॅप, ट्विटरसह तमाम सोशल साईट आणि मॅसेंजरवर याला विपुल प्रमाणात वापरले जात आहे.

इमोजीची जन्मकथा समजण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. टायपोग्राफी अर्थात टंकणकलेतील विविध ‘किज’च्या (Keys) सहाय्याने वेगवेगळ्या भावमुद्रा टाईप करता येत असल्याचे काहींच्या लक्षात आले. यातून १८८२ साली ‘पंक’ या तेव्हा ख्यातप्राप्त असणार्‍या नियतकालीकाने पहिल्यांदा याच प्रकारे तयार केलेल्या काही भावमुद्रा (इमोटिकॉन्स) छापल्या. यानंतर मुद्रीत माध्यमात बर्‍याचदा याचा वापर झाला. तथापि, डिजीटल स्वरूपातील इमोजीची सुरूवात जपानमधून झाली. खरं तर चीनी आणि जपानी भाषाही चित्रलिपीत लिहिल्या जातात. यामुळे त्या शिकण्यासाठी खूप कठीण असल्याचे मानले जाते. मात्र कठीण भाषा असणार्‍या जपानमधूनच अत्यंत सुलभ आणि समजण्यासाठी सोप्या इमोजीचा जन्म व्हावा हा विलक्षण योगायोग मानावा लागणार आहे. डोकोमो कंपनीतील अभियंता शिगेटाका कुरीता यांच्यामुळे १९९८ साली डिजीटल इमोजी अस्तित्वात आल्या. जपानी भाषेत ‘इ’ म्हणजे प्रतिमा तर ‘मोजी’ म्हणजे पात्र (कॅरेक्टर) होय. या दोन्हींना एकत्र करून ‘इमोजी’ हा शब्द आणि या पाठोपाठ याच्याशी संबंधीत आयकॉन्स (चिन्हे) सादर करण्यात आली. मात्र जगभरात याचे खरे प्रचलन हे युनिकोडशी संलग्न होऊन स्मार्टफोनच्या उदयानंतरच झाले. सध्या डिजीटल विश्‍वात २८२३ इमोजी असून यात प्रत्येक महिन्याला नवीन चिन्हांची भर पडत आहे.

आज जगातील अब्जावधी लोक इमोजींचा अतिशय मुक्तपणे वापर करतात. चित्र हे हजार शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक मानले जाते. यामुळे शब्दांची कंजुषी असणार्‍यांना इमोजीची वापर करणे हे केव्हाही सोयिस्कर वाटते. यामुळे एखादा चांगला मॅसेज वा लेख वाचून लांबलचक शब्दांनी युक्त असणारी कौतुकाची थाप देण्यापेक्षा अंगठा उचकावण्याची (थम्स अप!) इमोजी ही निश्‍चितच अतिशय परिणामकारक आहे. प्र. के. अत्रे यांच्या गाजलेल्या भाषणांचे वार्तांकन हे ”हशा आणि टाळ्या” आदींच्या स्वरूपात सादर केले जात असे. यामुळे रूक्ष शब्दांना जीवंतपणाचा आयाम मिळत असल्याने याला लोकप्रियता लाभली होती. सध्या टिव्हीवरील बर्‍याच मालिकांमध्ये हा फॉर्म्युला वापरण्यात येत आहे. तर डिजीटल संवादात याचीच जागा इमोजीने घेतली आहे. विविध मानवी भाव हे इमोजींच्या सहाय्याने व्यक्त करण्यातील सुलभपणा हे याचे प्रमुख कारण आहे. आजवर मानवी भावना या नवरसांच्या माध्यमातून पूर्णपणे व्यक्त होतात असे मानले जात असे. यात श्रुंगार, वीर, करूण, अद्भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत या भावरसांचा समावेश होता. आपल्या शाब्दीक संवादासाठी नऊ रस पुरेसे मानले जातात. तथापि, आपण जेव्हा भावचिन्हांच्या माध्यमातून संवाद साधतो तेव्हा अजून सुक्ष्म परिणाम गाठणे शक्य आहे. उदाहरणार्थ हसणे या एका रसाशी संबंधीत अनेक इमोजी आज उपलब्ध आहेत. यात अगदी गालातल्या गालात वा स्मित हास्यापासून ते सात मजली हास्यापर्यंतच्या इमोजी आपण वापरू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे दोन भाव हे एकाच इमोजीत (उदा. हसतांना अश्रू ढाळणे !) वापरणेदेखील आपल्याला शक्य आहे. याच्या जोडीला आपल्या भोवतालच्या सर्व बाबींशी संबंधीत भावचिन्हेही मुक्तपणे वापरू शकतो. यामुळे आज इमोजी आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटक झालेल्या आहेत. २०१५ साली ऑक्सफर्ड शब्दकोशाने ‘इमोजीला वर्ड ऑफ द इयर’चा सन्मान दिला आहे. तर पॉप कल्चरमध्ये याला तुफान लोकप्रियता लाभली आहे. फक्त इमोजींचा वापर करून ‘द इमोजी मुव्ही’ हा चित्रपटदेखील तयार करण्यात आलेला आहे. याच माध्यमातून कथा, कविता, लेख आदींसह याला नाटक, कलाकृती आदींमध्येही वापरले जात आहे. https://gimme.fun या वेबसाईटवर तर आपल्याला अख्ख्या चित्रपटाचे कथानक हे इमोजींच्या स्वरूपात पाहण्याची सुविधा दिलेली आहे. यामुळे मानवी इतिहासात प्रथमच इमोजी नावाची वैश्‍विक भाषा उदयास आल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, ‘थम्सअप’ हे चिन्ह मराठी माणूस जसे वापरतो, अगदी तसेच चीनी, जपानी, आफ्रिकन, रशियन आदींसह पृथ्वीवरील तमाम माणसेदेखील वापरतात. म्हणजेच; भाषा, धर्म, वंश, देश, वर्ण आणि वर्ग अशा कोणत्याही भेदाचा अडसर न येता जगभरात सर्वांना समजणारी एक भाषा जन्माला आल्याचे कुणीही अमान्य करणार नाही. इमोजी हे भाषेच्या वैश्‍विकीकरणासाठी आवश्यक व सुलभ साधन असल्यामुळे आपण सर्वांनी याचा अगदी मन:पूर्वक स्वीकार केला आहे. मात्र याची दुसरी बाजू आणि याचा धोकादेखील आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे.

माझ्या पत्रकारितेतील पहिल्याच नोकरीत अर्थात देशदूतमध्ये तेव्हाचे संपादक (आता दिवंगत) सुभाष सोनवणे साहेब यांनी मला घडविले. माझ्या लिखाणात समर्पक उपमांची कमतरता आढळल्यास ते समजावून सांगत असत. ते म्हणत की आपण मुळातच शब्द दरीद्री आहोत. म्हणजे कुणालाही विचारले जेवण कसे झाले ? तर तो छान, मस्त, भन्नाट, झक्कास असे उत्तर देतो. आता जेवण हे चविष्ट, रूचकर वा बेचव आदी असतांना आपण याला भलत्याच पध्दतीत व्यक्त करतो. शब्दसाठा मर्यादीत असल्याचे हे लक्षण असल्याचे सोनवणे सर म्हणत. त्यांचे हे म्हणणे इमोजींच्या वापरातही लागू पडते. पारंपरीक भाषेत आपल्याकडे शब्दांची वानवा असतांना इमोजीचा अनेकदा गैरवापरदेखील होतो. यातून संवादाचा विसंवाद होतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे इमोजीमुळे आपला शब्दसंग्रह कमी होण्याची भितीदेखील आहे. काही तज्ज्ञ व विशेष करून मानसशास्त्रज्ञांनी तर इमोजीच्या अति वापरामुळे आपण अश्मयुगीन सांकेतीक भाषेच्या युगात परतणार की काय ? अशी भिती व्यक्त केली आहे. त्यांचा हा इशारा अतिरंजीत या प्रकारातील असला तरी इमोजी ही भाषांच्या मुळावर येण्याचा धोका कायम आहे. आधीच जगातील बर्‍याचशा भाषांच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह लागले असतांना इमोजींचा वापर हा भाषांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतो. यामुळे याचा वापर थोडा हातचे राखून आणि अगदी समर्पक शब्दात सांगायचे झाल्यास विवेकाने करणे आवश्यक आहे. आपल्या भोजनात मीठ, तिखट वा मसाले यांचा वापर हा विशिष्ट प्रमाणाबाहेर गेला की सगळेच बिघडते. यामुळे ज्यांना आयुष्यात कुशल संवादक व्हायचे आहे त्याने आपल्या जीवनात माफक प्रमाणात इमोजींचा वापर केल्यास उत्तम. असे झाल्यास शब्दांना चिन्हांची जोड मिळून आपला संवाद हा खर्‍या अर्थाने रंगतदार होऊ शकतो. अन्यथा, आपण आधीच भाषेच्या वापरात कंजुषी करत असल्याने इमोजीच्या आहारी जाऊन आपले शाब्दीक कौशल्य लयास जाऊ शकते.

इमोजीला खर्‍याखुर्‍या जीवनात वापरले तर काय धमाल होईल ? हे खालील व्हिडीओत पहा.

इमोजी दिनानिमित्त तयार केलेले अँथेम खालील व्हिडीओत दिलेले आहे.

About the author

shekhar patil

Leave a Comment