Featured slider चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

फेकचा बाप डीपफेक. . .निवडणूक प्रचारात नंबर एक !

Written by shekhar patil

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातही तंत्रज्ञानाच्या विश्‍वात काय घडतेय यावर माझी नजर असतेच. यातून लिहणे नाही झाले तरी बदलणार्‍या ट्रेंडसची नक्कीच नोंद घेतली जाते. मात्र काही विषय हे इतके इंटरेस्टींग असतात की, त्यावर भाष्य करावेच लागते. असाच एक प्रकार टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला असून तो ‘डीपफेक’ या प्रणालीशी संबंधीत आहे. या तंत्रज्ञानाबद्दल माझे अध्ययन सुरू असून याबाबत मी लवकरच सविस्तर लिहणारच आहे. संपूर्ण जग आधीच ‘फेक कंटेंट’ने हैराण झाले असतांना याच्या किती तरी पुढची टेक्नॉलॉजी असणारे डीपफेक हे नक्कीच धोक्याचा सिग्नल आहेच. खरं तर, ते दुधारी शस्त्रासारखे असून याचे अनेक भयंकर अँगल्स आहेत. मात्र आजचा विषय हा संबंधीत तंत्रज्ञान हे किती मनोवेधक पध्दतीत वापरता येते याची ग्वाही देणारे ठरले आहे.

दक्षीण कोरियात सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून यासाठी ९ मार्च रोजी मतदान होणार आहे. साधारणपणे जगभरातील राजकीय प्रचारतंत्राच्या बदलेल्या कलानुसार तेथे देखील सोशल मीडियाचा प्रचंड प्रमाणात वापर करण्यात येत आहे. आता आपण म्हणाल की, यात काय नवीन ? तर यातील नवीन आणि जगाच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय बाब तेथे तुफान लोकप्रिय ठरली आहे. ती म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या यून सुक येऊल या उमेदवाराने निवडणुकीच्या प्रचारासाठी चक्क आपलाच एक ‘डिजीटल अवतार’ तयार केला आहे. ‘एआय यून’ नावाचा हा अवतार येथील निवडणुकीत धुमाकूळ घालत आहे.

दक्षीण कोरियातील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. यंदा येथे बहुरंगी लढत असून यात कोण बाजी मारणार हे लवकरच समजणार आहे. दक्षीण कोरिया हा तंत्रज्ञानाच्या वापरात जगातील अग्रगण्य देशांपैकी एक असल्याने साहजीकच याचे प्रतिबिंब हे या निवडणुकीत उमटले असून यात सोशल मीडियाचा अतिशय विपुल प्रमाणात वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यात लक्ष वेधून घेतलेय ते जनसत्ता पक्षाचे (पीपल्स पॉवर पार्टी ) यून सूक येऊल यांनी !

यंदाच्या या निवडणुकीत डेमोक्रेटीक पक्षाचे ली जेई युंग हे पहिल्यांदा हॉट फेव्हरीट मानले जात होते. त्यांनी महापौर पदापासून ते गव्हर्नर पदेही भूषविली असल्याने त्यांचा विजय आधीपासून सुकर मानला जात होता. मात्र माजी पब्लीक प्रॉसीक्युटर असणारे यून सूक येऊल यांना जनसत्ता पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर काही दिवसांमध्येच हा कल बदलला. यासाठी कारणीभूत ठरला सोशल मीडिया.. . ! येऊल यांनी समाजमाध्यमातून जोरदार प्रचार यंत्रणा राबवत तरूणाईला साद घातली. यातच त्यांनी १ जानेवारी रोजी एक अशी काही बाब लॉंच केली की, जी त्यांच्या प्रचारयंत्रणेतच नव्हे तर जगभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली.

यून सूक येऊल यांच्या सोशल मीडिया कँपेन टिमने ‘एआय यून’ या नावाने त्यांचा एक ‘डिजीटल अवतार’ लॉंच केला. यासाठी ‘स्वतंत्र विकी वेब पेज’ तयार करण्यात आले आहे. अर्थात, कुणीही त्या पेजवर गेल्यानंतर डिजीटल स्वरूपातील यून सूक येऊल यांच्याशी वार्तालाप करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून ही आयडिया अक्षरश: सुपरहिट ठरली आहे. काही दिवसांमध्येच या डिजीटल अवतारशी सात दशलक्षांपेक्षा जास्त नागरिकांनी संपर्क साधल्याने खरी धमाल उडाली.

असा आहे ‘डिजीटल अवतार’ !

‘एआय यून’ यातील एआय हा शब्द ‘आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स’ अर्थात कृत्रीम बुध्दीमत्ता याच्याशी संबंधीत आहे. तर यून हे अर्थातच त्या उमेदवाराचे नाव होय. म्हणजेच ही कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी यून सूक येऊल यांची डिजीटल आवृत्ती आहे. थेट राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराने प्रचारासाठी आपलीच डिजीटल आवृत्ती उतारण्याचा अफलातून फंडा यातून राबविण्यात आलेला आहे. हा डिजीटल अवतार बनविण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया चमूने सुमारे २० तासांचे व्हिडीओ रेकॉर्डींग केले. यात यून सूक येऊल हे त्यांना विचारण्यात येणार्‍या विविध प्रश्‍नांना उत्तर देत असल्याच्या स्वरूपातील शुटींग करण्यात आले. हे चित्रीकरण विविध अँगल्समधून आणि विविधांगी मूड दर्शविणार्‍या पध्दतीत चित्रीत करण्यात आले. आणि हा सर्व डेटाबेस ‘एआय’ म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेच्या प्रोग्रॅमने प्रोसेस करण्यात आला. यामुळे संबंधीत पेजवर जाऊन कुणीही एआय यून यांच्याशी संपर्क साधला असता ते अगदी खर्‍याखुर्‍या व्यक्तीप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधतात. यामुळे आपल्याशी अगदी खरेखुरे यून सूक येऊल बोलत असल्याची नागरिकांना अनुभूती येते. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे निवडणुकीच्या प्रचारात बोलू न शकणार्‍या नर्मविनोदी शैलीत यूक यांची डिजीटल आवृत्ती ही लोकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत असल्यामुळे हा सर्व प्रकार नागरिकांच्या खूप पसंतीस उतरल्याचे दिसून आले आहे. यावरून सोशल मीडियात अनेक विनोदी किस्से, प्रँक व्हिडीओज, मीम्स तयार करण्यात आले असून ते प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

जगातील प्रथम डीपफेक उमेदवार

एआय यून हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला जगातील पहिला डीपफेक उमेदवार असल्याचा प्रचार यून यांच्या चमूने केला असून याला जगभरात व्यापक प्रसिध्दी लाभली आहे. स्वत: यून सूक येऊल हे देशभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत असतांना एआय यून हा एका वेब पेजच्या माध्यमातून त्यांच्या डिजीटल प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार हे एकाच वेळी फिजीकल आणि डिजीटल या दोन्ही प्रकारांमध्ये प्रचार करत आहेत. यामुळे आगामी काळात हाच फंडा जगभरातील निवडणुकांमध्ये वापरण्यात येणार असल्याची बाब निश्‍चीत झाली आहे.

समजून घ्या डीपफेक म्हणजे काय ?

आधी नमूद केल्यानुसार, मी डीपफेक तंत्रज्ञानाबद्दल लवकरच अतिशय विस्तृत असे लिखाण करणारच आहे. यात या तंत्रज्ञानाच्या अगदी बेसिक माहितीपासून ते यातील वेगवेगळे कंगोरे आपल्याला उलगडून दाखविणार आहे. यामुळे याबाबत मी सध्या फार डिटेल देत नाही. तथापि, साध्या शब्दांमध्ये सांगावयाचे तर, कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून अगदी हुबेहूब पध्दतीत तयार करण्यात आलेले बनावट व्हिडीओज म्हणजे डीपफेक होय. यात एखाद्या व्यक्तीच्या तोंडात त्याने न बोललेले शब्द देखील सहजपणे आणि अगदी कुणालाही फरक समजणार नाही अशा पध्दतीत टाकता येतात. म्हणजे मी कॅमेर्‍यासमोर बोलतांना टेक्नॉलॉजीबद्दल बोलत असेल तर माझ्याच आवाजात मी राजकारणावर बोलत असल्याचे शब्द टाकणे देखील आता डीपफेक तंत्रज्ञानामुळे सहजशक्य झाले आहे. यातील माझ्या आवाजातील राजकारणावरचे शब्द आणि त्यांना अगदी हुबेहूब माझ्या तोंडाच्या हालचालींशी मॅच करण्याचा प्रकार हा अर्थातच आर्टीफिशियल इंटीलेजीयन्सच्या मदतीने पार पाडला जातो. ‘फेक कंटेंट’मध्ये शब्द, प्रतिमा आणि व्हिडीओ हे मॅन्युअल पध्दतीत ‘मॉर्फ’ केले जातात. तर डीपफेकमध्ये हेच काम ‘एआय प्रोग्रॅम’च्या मदतीने होते हा यातील प्रमुख फरक होय.

निवडणुकीच्या प्रचारतंत्रात नवीन आयाम

कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारे ‘चॅटबॉट’ मी स्वत: सहा-सात वर्षांपासून वापरत आहे. अलीकडच्या काळात हेच ‘चॅटबॉट’ आता विविध खासगी कंपन्यांसह महापालिकांमध्येही वापरले जात आहेत. यात प्राथमिक स्वरूपातील एआयचा वापर करण्यात येतो. तर कृत्रीम बुध्दीमत्तेच्या उच्च स्वरूपातील वापरातून डीपफेक तंत्रज्ञानाचा उदय झाला असून यातून अनेक गैरप्रकार होतांना दिसून येत आहे. आधीच फेक कंटेंटला आळा घालण्यात दाणादाण उडत असतांनाच अगदी प्रथमदर्शनी बेमालूमपणे ‘खोट्याचे खरे आणि खर्‍याचे खोटे’ करण्याची क्षमता असणार्‍या डीपफेक तंत्रज्ञानाला आवर घालणे किती कठीण ठरेल याची कल्पना देखील करवणारी नाही. मात्र डीपफेक टेक्नॉलॉजी ही सकारात्मक स्वरूपातही वापरता येणार असून याचाच एक आयाम हा दक्षीण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. आता या प्रचाराचे फलीत म्हणून यून सूक येऊल हे दक्षीण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार का ? याचे उत्तर काही दिवसांमध्येच मिळणार आहे. तथापि, डीपफेक टेक्नॉलॉजी ही लवकरच आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.

फाईव्ह-जी, ब्लॉकचेन, एआय, डीपफेक, रोबोटिक्स, व्हर्च्युअल व ऑग्युमेंटेड रिऍलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मेटाव्हर्स, एनएफटी, व्हॉईस असिस्टंट आदींसारख्या अनेकविध क्षेत्रांमध्ये बरेच काही घडत आहे. याबाबत वेळ मिळेल तसा नक्कीच लिहण्याचा प्रयत्न करतो. तूर्तास डीपफेक लवकरच आपल्या वापरात येणार असून याचा बरा-वाईट वापर आणि यातून निर्माण होणार्‍या समस्या वा गोंधळ या बाबी नित्यनेमाने घडणार आहेत. याची चुणूक पहिल्यांदा दक्षीण कोरियात दिसली. येत्या कालखंडात आपल्याकडे दिसेल हे नक्की . . .!

About the author

shekhar patil

Leave a Comment