एखाद्या विजयी विराच्या थाटात आपले उपोषण सोडणारे अण्णा हजारे वा केविलवाण्या मुद्रेने ज्युस पिणारे रामदेव बाबा यांच्यात सध्या तुलना सुरू आहे. या दोन्ही मान्यवरांपैकी नेमके कोण जिंकले यावरही चर्चा झडत आहे. या गदारोळात हरिद्वार येथील मातृसदन या आश्रमाचे संत निगमानंद यांचा उपोषणात झालेल्या मृत्यूकडे लक्ष देण्यास ना प्रसारमाध्यमांना वेळ आहे ना जनतेला! भारतीय लोकशाहीला लाजविणार्या या घटनेमुळे आपल्या समाजाची दुटप्पी भूमिकाही प्रकर्षाने समोर आली आहे.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नवी दिल्ली येथील ‘जंतरमंतर‘वर अण्णा हजारे यांच्या उपोषणाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता देशात जणू नवक्रांती अवतरणार असल्याचा बहुतांश भाबड्या जीवांचा समज झाला होता. अर्थात हा ‘मीडिया’चा अतिरेकी उन्माद होता. यामुळे उपोषणाच्या काळात अण्णा हजारे आणि कंपनीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार्या प्रसारमाध्यमांनी नंतर त्यांच्या निंदा-नालस्तीच्या मोहिमेतही याच उत्साहाने भाग घेतला. आता मीडियाला चळ लागलाय तो बाबा रामदेव यांचे आंदोलन कसे फसले याचा शोध घेण्याचा! या गोंधळात हरिद्वार येथील संत निगमानंद यांच्या मृत्यूची, खरं तर हत्त्येची दखल कुणाला घ्यावीशी वाटली नाही ही खेदजनक बाब आहे. निगमानंद यांच्याकडे रामदेव वा हजारे यांच्याप्रमाणे वलय नव्हते. मात्र त्यांनी उचललेला मुद्दा हा दुर्लक्ष करण्याजोगा नव्हता. गंगा नदीच्या पात्रात अवैधरित्या चालणारे स्टोन क्रशर्स आणि या पैशांवर गब्बर होणारे माफिया यांच्या विरोधात निगमानंद यांनी २००८ सालीच उपोषणाचे हत्यार उपसले होते. तब्बल ७३ दिवसांचे उपोषण करून त्यांनी माफियांच्या तोंडचे पाणी पळविले होते. उत्तराखंड सरकारने कारवाई करण्याचे आश्वासन देऊन निगमानंद यांचे उपोषण सोडले. मात्र यावर काहीही कार्यवाही न झाल्याने या वर्षी ते पुन्हा उपोषणाला बसले. उपोषणाच्या ६८व्या दिवशी अर्थात २७ एप्रिल २०११ रोजी त्यांना स्थानिक पोलिसांनी अटक करून बळजबरीने रूग्णालयात भरती केले. यावेळी त्यांची काया कमजोर बनली तरी ते शुध्दीवर होते. मात्र २ मे रोजी संशयास्पद पध्दतीने ते ‘कोमा’त गेले. अखेर दोन दिवसांपूर्वी त्यांची प्राणज्योत मालविली. निगमानंद यांना औषधीतून विष देण्याचा आरोप याआधीच करण्यात आला होता. आता त्यांच्या मृत्यूने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नुकत्याच आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्यांच्या शरिरात विषाचा अंश सापडला आहे.
बाबा रामदेव ज्या हिमालयन हॉस्पिटलमध्ये भरती होते त्याच्याच एका खोलीत निगमानंद यांच्यावर उपचार सुरू होते. रामदेव यांना भेटण्यासाठी देशातील तमाम संतमंडळी आणि ‘हाय प्रोफाईल’ मंडळींची वर्दळ सुरू होती. मात्र निगमानंद यांच्याकडे पाहण्याला कुणाला वेळ मिळाली नाही. रामदेव यांचा ‘इव्हेंट’ कव्हर करणार्यांनाही या गंगापुत्राची दखल घ्यावीशी वाटली नाही. आपले नायक आणि खलनायक घडविण्याची किमया मीडिया करत असतो. यामुळे प्रसारमाध्यमांच्या मर्जीनुसार आपण कुणाला डोक्यावर घेतो तर कुणाला पायदळी तुडवितो. रामदेव अथवा अण्णा हजारे यांचे आंदोलन अगदीच निरर्थक होते असा दावा कुणी करणार नाही. मात्र निगमानंद यांच्या उपोषणाचेही महत्व कमी नव्हते. देशभरातील नदी पात्रांमध्ये वाळू उपसा वा स्टोन क्रशर्सच्या माध्यमातून अंधाधुंद उत्खनन सुरू आहे. यामुळे जीवनवाहिन्या मानल्या जाणार्या नद्यांचे व पर्यायाने आपलेच अस्तित्व धोक्यात येणार आहे. खरं तर भ्रष्टाचार, लोकपाल वा काळे धन यांच्या प्रमाणेच हा मुद्दाही अत्यंत महत्वाचा आहे. मात्र अण्णा-बाबांच्या आंदोलनास अतिरेकी प्रसिध्दी तर निगमानंदाची घोर उपेक्षा हे कशाचे प्रतिक आहे?
पर्यावरणवादी आंदोलने हा काहीसा चेष्टेचा विषय बनविण्यात आला आहे. मेधा पाटकरांच्या आंदोलनांचीही अशीच उपेक्षा करण्यात येते. हे आंदोलनकर्ते विकासाचे विरोधक असून परदेशी एजंट असल्याचा प्रचारही सातत्याने करण्यात आला आहे. यामुळे बाबा-अण्णांच्या आंदोलनांना मिळणारे वलय वा प्रसिध्दी निगमानंद यांच्यासारख्यांच्या वाटेला येत नाही. बरं, रामदेव बाबांच्या आंदोलनास ‘हायजॅक’ करणार्या व स्वत:च्या नैतिकतेचा टेंभा मिरवणार्या भाजपाची सत्ता असणार्या राज्यातच एका तरूण आंदोलनकर्त्याची हत्त्या होते ही बाब संतापजनक आहे. याहूनही चिंताजनक बाब म्हणजे ना मीडिया याची दखल घेतोय ना आपण! आता त्यांच्या मृत्यूचेही भांडवल सुरू झाले आहे. देशातील तमाम भगव्या वस्त्रातील मंडळीला ‘आरएसएस’चे एजंट ठरविणार्या कॉंग्रेसला आता संत निगमानंद यांचा पुळका आलाय. म्हणे उत्तराखंड सरकारच्या उपेक्षेने त्यांचा जीव गेलाय. इकडे बाबा रामदेवांना डोक्यावर घेणारा भाजपाही कॉंग्रेसवर पलटवार करत आहे. काही दिवसांत हा मुद्दा विस्मरणात जाईल. फक्त काही जणांच्या आठवणीत राहील गंगामातेच्या हितासाठी लढणारा निगमानंद नामाचा निधड्या छातीचा योध्दा आणि त्याची करूण अखेर!