Featured राजकारण

होऊ द्या (फक्त) चर्चा मराठी पंतप्रधानांची!

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच मराठी व्यक्ती पंतप्रधानपदावर का विराजमान होत नाही हा प्रश्‍न हटकून विचारण्यात येतो. आतादेखील हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. खरं तर मराठी माणूस अनेक न्यूनगंडांचे ओझे घेऊन जगतो. यातील सर्वात ठसठसणारी वेदना ही पंतप्रधानपदाचीच आहे. गेल्या आठवड्यात प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी याच मुद्याला हात घातला आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच मराठी व्यक्ती पंतप्रधानपदावर का विराजमान होत नाही हा प्रश्‍न हटकून विचारण्यात येतो. आतादेखील हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. खरं तर मराठी माणूस अनेक न्यूनगंडांचे ओझे घेऊन जगतो. यातील सर्वात ठसठसणारी वेदना ही पंतप्रधानपदाचीच आहे. गेल्या आठवड्यात प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी याच मुद्याला हात घातला आहे.

आपले मराठीपण अगदी अभिमानाने मिरवणारा नाना पाटेकर हा मनस्वी कलावंत आहे. मराठी जनांच्या हिताची त्याची कळकळ जगापासून लपून राहिलेली नाही. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ या गावात गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘‘स्वातंत्र्याला साठ वर्षे उलटली. मराठी माणूस कुठं कमी नाही, मग देशाच्या पंतप्रधानपदी एकदाही मराठी माणसाला संधी का मिळाली नाही?’’ अशी खंत नानाने व्यक्त केली. आपण अति शालीन स्वभावाचे आहोत. मोक्याच्या क्षणी आपण दुसर्‍यांना पुढे करतो. आता आपल्याला ही शालीनता सोडून, पंतप्रधानपद मिळवण्यासाठी जोर लावला पाहिजे असे परखड मतही त्याने व्यक्त केले. यानंतर दोनच दिवसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनीही याच विषयाला वाचा फोडली.pawar_saheb

पुणे येथे दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री ना. शरदराव पवार यांनी एक गौप्यस्फोट केला. लालबहादूर शास्त्री यांच्या अकस्मात निधनानंतर यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधानपदाची संधी होती. यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन स्वत: इंदिरा गांधी यांना याबाबत विचारणा करण्याचे शरद पवार यांनी सुचविले होते. मात्र आपणास नेहरूंनी केंद्रात आणले असून त्यांच्या मदतीनेच महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. यामुळे त्यांच्या कन्येला आपण देशाच्या सर्वोच्च पदाबाबत कशी विचारणा करू? असे यशवंतराव म्हणाले. यानंतर इंदिरा गांधी यांनी धुर्तपणे यशवंतराव चव्हाण यांच्या पाठींब्याने पंतप्रधानपद कसे मिळवले हा किस्सा शरद पवार यांनी या कार्यक्रमात खुलवून सांगितला. वास्तविक पाहता योग्य वेळ साधून गौप्यस्फोट करण्यात शरदराव माहीर आहेत. यामुळे २००४ व २००९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी त्यांनी चतुरपणे मराठी पंतप्रधानपदाचा मुद्दा चर्चेत आणला होता. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच त्यांनी पध्दतशीरपणे या मुद्याला हवा मिळेल याची तजवीज केली आहे. यातून शरद पवार यांचा राजकीय हेतू स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र एका क्षणाला राजकारण दुर ठेवले तरी एखादा मराठी भूमीपुत्र पंतप्रधानपदावर का विराजमान होऊ शकत नाही? हा प्रश्‍न आपण तमाम मराठी जनांना अस्वस्थ करणारा आहेच.

नाना पाटेकर यांच्याप्रमाणेच शरद पवार यांनीही सुसंस्कृतपणामुळे मराठी राजकारणी सर्वोच्च स्थानावर आरूढ होण्यासाठी वंचित राहतात असे वक्तव्य केले आहे. राजकारणात कोणतेही उच्च स्थान पटकावण्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागतात असेही त्यांचे म्हणणे आहे. पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांमध्ये सत्यांश आहेच. मात्र भलेही यशवंतराव चव्हाण यांना भिडस्त स्वभावामुळे पंतप्रधानपदावर पाणी सोडावे लागले असेल तरी खुद्द शरद पवार यांनी प्रयत्नांची शर्थ करूनही त्यांना हे पद का मिळाले नाही? हा प्रश्‍न उरतोच. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये अनेक मराठी जनांनी केंद्रीय पातळीवरील राजकारण गाजविले आहे. अनेकांनी संसदेत आपल्या अभ्यासपुर्ण कामाची छाप टाकली आहे. कर्तृत्वात आपण कुठेही कमी नसतांना मात्र एकाही मराठी मान्यवराला पंतप्रधानपद पटकावता आले नाही ही दुर्दैवी बाब आहे. यामुळे ‘मराठी माणूस युध्द जिंकतो मात्र तहात पराभूत होतो’ या उक्तीची हटकून आठवण होते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सर्वाधीक काळ सत्तेवर असणार्‍या कॉंग्रेसने प्रत्येक राज्यातील प्रमुख नेत्यांची आपसात भांडणाची सोय लावून ठेवण्याचे धोरण अंगिकारले आहे. केंद्रीय सत्तेत मात्र फक्त निष्ठावंतांनाच स्थान देण्यात आल्याचे आजवर दिसून येत आहे. या पार्श्‍वभुमीवर यशवंतराव चव्हाण आणि खुद्द शरद पवार यांना पंतप्रधानपदाने कशी हुलकावणी दिली हे पाहिले असता अनेक बाबींचे आकलन होते.

१९६२ साली आपण चीनकडून युध्दात सपाटून मार खाल्ल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांना हटवून पंडित नेहरू यांनी यशवंतरावांना त्यांच्या जागी पाचारण केले. यावेळी अवघ्या महाराष्ट्राने ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ म्हणून कौतुक केले होते. यानंतर आपण पाकिस्तानसोबतच्या युध्दात विजय मिळाल्याने संरक्षणमंत्री चव्हाण लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाले. लालबहादूर शास्त्री यांच्या अकस्मात निधनानंतर खरं तर तामिळ नेते कामराज यांच्यासह ते स्वत: पंतप्रधानपदाचे दावेदार होते. मात्र कामराज यांनी ‘किंगमेकर’ची भुमिका बजावली तर वर शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानुसार इंदिरा गांधी यांनी हे पद आपल्याकडे खेचून घेतले. यानंतर कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत कलहात कामराज आणि मोरारजी देसाई यांच्यासारख्या मातब्बर मंडळींनी स्वतंत्र चुल मांडली तरी यशवंतराव हे कॉंग्रेससोबतच होते. याचे फळ म्हणून त्यांना संरक्षण मंत्रालयानंतर गृह, परराष्ट्र आणि वित्त आदींसारखी महत्वाची खाती मिळाली. आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे पानीपत झाले. यात खुद्द इंदिराजींचा पराभव झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळाले. यानंतर कॉंग्रेसमधील पुन्हा उफाळून आलेल्या अंतर्गत कलहाने पक्षात उभी फुट पडल्यानंतर यशवंतराव हे आपल्या समर्थकांसह कॉंग्रेस (अर्स) गटात सहभागी झाले. यानंतर या गटाचे संस्थापक देवराज अर्स हे खुद्द जनता पक्षात गेल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी वेगळी चुल मांडत आपल्या गटाचे नाव समाजवादी कॉंग्रेस ठेवले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्रातून शरद पवार गेले. यानंतर चरणसिंह यांच्या मंत्रीमंडळात यशवंतराव चव्हाण यांना गृहमंत्रीपदासह उपपंतप्रधानपदही मिळाले. मात्र हे पद औटघटकेचे ठरले. १९८० साली इंदिरा कॉंग्रेसच्या वावटळीत समाजवादी कॉंग्रेसचे पानीपत झाले. राज्यातून फक्त या पक्षाचे खुद्द यशवंतराव हेच निवडून आले. पुढच्याच वर्षी ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले. अर्थात तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एका अर्थाने चव्हाण यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर ठाम भुमिका घेतली असता त्यांना पंतप्रधानपद मिळाले असते. याचसोबत इंदिराजींची सोबत योग्य वेळी सोडली असती तरीही त्यांना पंतप्रधानपद मिळण्याची शक्यता होती. मात्र असे झाले नाही. १९८४ वाली यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे शिष्य शरदराव पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर खरी पकड निर्माण झाली. पुढे ते समाजवादी कॉंग्रेसमधून पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेले. यानंतर कधी केंद्रात तर कधी राज्यात त्यांनी पदे उपभोगली आहेत.

१९८७ साली कॉंग्रेसमध्ये परतल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वात १९९१च्या निवडणुकीत कॉंग्रेसने राज्यात घवघवीत यश मिळविल्यानंतर त्यांचे नाव पहिल्यांदा पंतप्रधानपदासाठी घेण्यात आले. मात्र यात पी.व्ही. नरसिंहराव यांनी बाजी मारून नंतर पवार हे डोईजड होतील हे हेरून त्यांना चतुराईने महाराष्ट्रात परत पाठविले. १९९६ साली शरद पवार यांच्या महत्वाकांक्षेने उचल खाल्ली व त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविली. मात्र त्यांना सिताराम केसरी यांनी पराभूत केले. याच कालखंडात सोनिया गांधी राजकारणात सक्रीय झाल्या. यानंतर इंदिराजी यांच्या कालखंडातील यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणेच आपल्याला भलेही केंद्रात मोठी पदे मिळतील मात्र सर्वोच्च स्थान मिळणार नसल्याचे त्यांनी दुरदृष्टीने हेरले. यातून सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा मांडत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नावाने आपला सवतासुभा उभा केला. मात्र तेव्हापासून सत्तेची गणिते लक्षात घेत स्वतंत्र अस्तित्व राखत त्यांनी कॉंग्रेसची सोबत केली आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणेच शरद पवार यांनी कॉंग्रेसपासून विलग होण्याचा निर्णय घेतला खरा मात्र चव्हाण यांच्यापेक्षा पवार यांना याचा लाभ चांगल्या प्रमाणात झाला. याची त्यांना किंमतीही चुकवावी लागली. एके काळी सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाला विरोध करणार्‍या पवार यांना २००४ साली युपीएला मिळालेल्या विजयानंतर त्यांनी पंतप्रधानपद स्विकारावे अशी विनंती करावी लागली. खरं तर शरद पवार यांनी पंतप्रधानपदासाठी कधीपासूनच व्युहरचना सुरू केली आहे. अल्पमतातही सरकार चालवणारे चरणसिंग, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल आणि एच.डी. देवेगौडा यांच्याप्रमाणे देशाच्या सर्वोच्च पदावर आरूढ होण्याची त्यांची आकांक्षा आहे. अर्थात लालूप्रसाद आणि मुलायम यांच्याप्रमाणे ते ही इच्छा बोलून दाखवत नाहीत. मात्र आज खरंच निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती आली तरी दोन आकडी संख्याबळावर ते पंतप्रधानपद पटकावू शकतील, ही बाब आज तरी अशक्य वाटते.

आजवर करण्यात आलेल्या सर्व जनमत चाचण्यांनुसार देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्वाधीक जागा मिळू शकतात. हा आकडा दोनशे ते सव्वादोनशेच्या आसपास असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. यामुळे एखाद-दुसर्‍या पक्षाची सोबत घेऊन ही आघाडी सत्तारूढ होऊ शकते. मात्र ‘रालोआ’विरूध्द सेक्युलर विचारधारेच्या पक्षांची मोट आवळून त्यांना कॉंग्रेस बाहेरून पाठींबा देऊन भाजपला सत्तेपासून रोखू शकते. यावेळी राष्ट्रवादीकडे दहा-पंधरा खासदार असले तरी त्यांच्यापेक्षा प्रबळ असणारे मुलायम, जयललिता, ममता, मायावती, नितीशकुमार आदी मंडळीचाही पंतप्रधानपदावर दावा राहणार आहे. भलेही पवार यांनी या सर्वांना पाठींबा देण्यास भाग पाडले तरी त्यावेळी बाहेरून पाठींबा देणार्‍या कॉंग्रेसची भुमिका निर्णायक राहू शकते. गत १५ वर्षांपासून केंद्र आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दबावतंत्र सहन करणारा कॉंग्रेस पक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठींबा देण्याची शक्यता धुसर आहे. एका अर्थाने पंतप्रधानपदासाठी सर्वार्थाने योग्य असून तसेच नेटाने पुढे जाण्याची जिद्द असतांनाही खुद्द शरद पवार यांनाच हे पद मिळण्याची शक्यता अशक्य कोटीतील आहे.

दिल्लीच्या राजकीय वर्तुळात एके काळी पंतप्रधानपदासाठी प्रमोद महाजन यांचे नावही घेतले जात होते. दुर्दैवाने त्यांच्या अकाली मृत्यूने ही शक्यताही मावळली. कॉंग्रेसच्या निष्ठावंतांच्या यादीतील आघाडीवरचे नाव असणारे सुशीलकुमार शिंदे यांनाही भविष्यात हे पद मिळण्याची अधून-मधून चर्चा होत असते. मात्र राहूल गांधींच्या राजकारणातील केंद्रस्थानामुळे ही बाबही शक्य होईल असे वाटत नाही. या विषयावर व्यापक विचार केला असता या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतरही दिल्लीच्या तख्तावर मराठी पंतप्रधान नसणार हे जवळपास निश्‍चित आहे. एका राज्याचे मुख्यमंत्री असणार्‍या नरेंद्र मोदी यांना भाजपसारखा प्रमुख राजकीय पक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवतो. याचप्रमाणे नितीशकुमार, ममता बॅनर्जी, मायावती व एवढेच नव्हे तर कोणतीही राजकीय पार्श्‍वभुमी नसणारे अरविंद केजरीवाल यांना ज्या पध्दतीने पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जाते, त्याप्रमाणे कुणा मराठी नेत्याची या पदासाठी देशात चर्चादेखील होऊ नये ही बाब आपल्यासाठी मन विषण्ण करणारी अशीच आहे. यामुळे या लोकसभा निवडणुकीतही आपण फक्त मराठी पंतप्रधान कधी होणार? ही वांझोटी चर्चाच करू शकतो.

तशा आजवर अनेक चर्चा होतात. यात पार अगदी मराठीला नोबेल-ऑस्कर कधी मिळेल या पासून ते उद्योग-व्यापार, प्रशासकीय सेवा आदींमधील मराठी टक्का कधी वाढणार यावर नेहमी चर्चा झडत असतात. या प्रश्‍नांची उत्तरे कुणीही देऊ शकत नाही. याचप्रमाणे दिल्लीच्या तख्तावर मायमराठीचा एखादा सुपुत्र केव्हा विराजमान होणार? याचे उत्तरही आपल्याकडे नाहीच !!

About the author

shekhar patil

Leave a Comment