चालू घडामोडी पत्रकारिता

ही वेळ कुबेरांची खिल्ली उडविण्याची नाही !

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मागे घेतलेल्या ‘असंतांचे संत’ या अग्रलेखावरून गदारोळ उडाला आहे. मराठीच नव्हे तर कदाचित भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात ही एक अभुतपुर्व घटना मानली जात आहे. यावरून ‘लोकसत्ता’सह कुबेर यांच्यावर होणारी चौफेर टीका स्वाभाविक आहे. मात्र या प्रकरणाच्या अनेक पैलूंचे अध्ययन केल्यानंतर हा केवळ काही काळापुरता टिका-टिपण्णी अथवा खिल्ली उडविण्यापुरता मुद्दा नसल्याचे कुणालाही स्पष्टपणे दिसून येऊ शकते.

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मागे घेतलेल्या ‘असंतांचे संत’ या अग्रलेखावरून गदारोळ उडाला आहे. मराठीच नव्हे तर कदाचित भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात ही एक अभुतपुर्व घटना मानली जात आहे. यावरून ‘लोकसत्ता’सह कुबेर यांच्यावर होणारी चौफेर टीका स्वाभाविक आहे. मात्र या प्रकरणाच्या अनेक पैलूंचे अध्ययन केल्यानंतर हा केवळ काही काळापुरता टिका-टिपण्णी अथवा खिल्ली उडविण्यापुरता मुद्दा नसल्याचे कुणालाही स्पष्टपणे दिसून येऊ शकते.

कुणाला कितीही मिरच्या झोंबू देत…गिरीश कुबेर हे सद्यस्थितीत मराठी वर्तमानपत्रसृष्टीचे ‘आयकॉन’ आहेत. प्रत्येक वर्तमानपत्र आणि संपादकाला स्वत:ची एक भुमिका असते. याचा विचार केला असता कुबेर यांच्याइतका प्रत्येक विषयावर ठाम भुमिका (अनेकदा ती ‘पॉप्युलर’ विचारसरणीच्या विरूध्द असली तरी!) घेणारा संपादक सांप्रतकाळी कुणी दिसून येत नाही. कुबेरांचा हाच ‘युएसपी’ अनेकांच्या असुयेचे कारण बनणे स्वाभाविक आहे. यात साहजीकच त्यांचेच समव्यावसायिक अर्थात आम्हा पत्रकारांचा समावेश असला तरी या माणसाचा मी निस्सीम चाहता आहे. असे असूनही त्यांचा प्रत्येक विचार मला भावेलच अशी अपेक्षा मी कधी करत नाही. मध्यंतरी त्यांच्या वादग्रस्त ठरलेल्या ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अनेक जणांच्या रोषाला कारणीभूत ठरलेल्या अग्रलेखावरून मी ‘कुबेर महोदयांचा उलटा चष्मा’ हा लेख लिहून प्रतिवादही केला आहे. असे असूनही माझ्या मनात त्यांच्या विषयीचा आदर कायम आहे. कुबेरांचे काही लेख तुम्हाला एखाद्या विषयावर नवीन दृष्टी देतात तर काही प्रचंड खुपतात. अर्थात आपल्या विचारांशी प्रामाणिक असणारे ते मौलिक प्रज्ञावंत आहेत. आजवर त्यांच्या अनेक लेखांनी वाद निर्माण झालेत. अनेकांवरून जोरदार चर्चा झडली. तरी कुबेर कधी डगमगले नाहीत. अगदी त्यांनी आपल्या विचारांचा प्रतिवाद करणारे लेखही ठळकपणे ‘लोकसत्ता’तून छापलेत. यावरील साधक-बाधक चर्चेलादेखील त्यांनी व्यासपीठ दिले. याचमुळे ‘असंतांचे संत’ या अग्रलेखावरून त्यांनी केलेले घुमजाव एखाद्या आक्रितासमान मानले गेले. यातून काहींना आयता मुद्दा मिळाला. अनेक जण त्यांना झोडपू लागले आहेत. या सर्वांनी त्यांच्यासह ‘लोकसत्ता’च्या व्यवस्थापनाच्या भुमिकेबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले आहे. मात्र हा केवळ विरोधापुरता विषय आहे का हो ? कुबेरांनी राजीनामा देऊन स्वाभीमानी बाणा दाखविण्याचा सल्लाही अनेकांनी दिला असला तरी तो व्यवहार्य आहे का? याचा विचार करण्याचीही गरज आहे.

girish_kuber

गेल्या वर्षाच्या प्रारंभी तामिळ लेखक पेरूमल मुरूगन यांनी कट्टर विचारसरणीच्या विरोधाला कंटाळून लिखाण बंद करण्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. त्यांनी उद्वेगाने आपल्यातील लेखकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले होते. एका लेखकाचा हा मृत्यू देशभरात प्रचंड गाजला होता. यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा झडली होती. यावर स्वत: गिरीशजी कुबेर यांनी १७ जानेवारी २०१५ रोजी ‘झुंडसंहिता जिंदाबाद !’ या मथळ्याखालील अग्रलेखातून जोरदार भाष्य केले होते. यात ते म्हणतात-

‘‘लेखक पेरुमल मुरुगन मेले ते बरे झाले! त्यांनी आत्महत्या केली. तेही बरेच झाले. त्यांनी फारच जगण्याचा हट्ट धरला असता, तर कोणाला तरी त्यांचा वध करावा लागला असता. ते टळले. तसे त्यांच्या जगण्याचेही प्रयोजन राहिलेले नव्हतेच. मुळातच एकेकट्या माणसाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार आपण ठेवलेलाच नाही. तो केव्हाच रद्दबातल केला आहे. अद्याप तसा कायदा झालेला नाही. वटहुकूमही निघालेला नाही. पण समूहाचा कायदा राज्यघटना आणि दंडसंहिता वगैरेंहून अधिक महत्त्वाचा ठरतो. त्या भारतीय झुंडसंहिते (भाझुंसं)नुसार एकेकट्या व्यक्तीचा असण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. त्यातही ती व्यक्ती विचारवंत, कलावंत, साहित्यिक अशा दर्जाची असेल तर त्यांना तातडीने आपला मेंदूमृत्यू घोषित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुळात कोणत्याही व्यक्तीकडे एकाहून अधिक मेंदू असणे हा भाझुंसंनुसार गुन्हा आहे. लहान मेंदूने काम भागत असताना मोठ्या मेंदूची चैन करण्याचे कोणालाही कारण नाही. पेरुमल मुरुगन यांना त्याचीच शिक्षा मिळाली. त्यांनी देहान्त प्रायश्चित्त घेतले.’’

काळाचा महिमा म्हणा की दुसरे काही…! हे शब्द लिहल्यानंतर बरोबर १४ महिन्यांनी याच ‘भारतीय झुंडसंहिते (भाझुंसं)’नुसार त्याच संपादकाच्या मृत्यूची घोषणादेखील झाली. फरक एवढाच की पेरूमल मुरूगन यांनी स्वत: याची घोषणा केली तर कुबेर यांच्या संस्थेने ही कामगिरी चोखपणे बजावली. या प्रकरणाचा सर्वात भयावह पैलू हाच आहे. भारतात आणीबाणी लादल्यानंतर ज्या एक्सप्रेस समुहाने कणखर पत्रकारितेचे दर्शन घडविले त्याच समुहातील ‘लोकसत्ता’ने हे काम केले. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या अंकात कधी काळी आणिबाणीच्या निषेधार्थ अग्रलेखाची जागा कोरी सोडली होती. याचप्रमाणे ‘असंतांचे संत’ बाबत भलेही माफीनामा मागत याच पॅटर्ननुसार अग्रलेखाची जागा कोरी सोडून निषेध व्यक्त करणे अशक्य नव्हते. अन्यथा आणीबाणीत ज्या पध्दतीने याच समुहाच्या ‘फिनान्शियल एक्सप्रेस’ने पहिल्या पानावर ठळक अक्षरांमध्ये रविंद्रनाथ टागोरांची ‘व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर’ (चित्त जेथ भयशुन्यो!) ही कविता छापली होती; त्या बाण्याला अनुसरून भलेही माफीनामा छापत, होईल त्या परिणामाला सामोरे जाणेही शक्य होते. मात्र असे न करता अग्रलेख ‘मागे’ घेण्याचा प्रकार अनेक प्रश्‍नांना जन्म देणारा आहे. याचसोबत झुंडसंहितेच्या (ही देशी की विदेशी? याबाबत संशयकल्लोळ आहेच!) एका नवीन भयंकर पैलूची जाणीव करून देणारीदेखील आहे.

जगातील प्रत्येक धर्मात ‘संघटीत’ गैरप्रकार आहेत हे कुणी नाकारू शकत नाही. प्रत्येक धर्मात अवैज्ञानिक, खुळचट, कालबाह्य विचारांना अद्यापही कवटाळण्यात येत असल्याचेही स्पष्ट आहे. कुबेर यांनी आपल्या अग्रलेखातून यालाच हात घातला होता. सेवेच्या बुरख्याआड चालणार्‍या धर्मांतरणाच्या कृत्यांवरची त्यांची मल्लीनाथी गैर कशी असू शकेल? मुळातच हिंदू, मुस्लीम, ज्यू आदींसह जगातील असतील तितके धर्म आणि संप्रदायांप्रमाणेच ख्रिस्ती धर्मातही अनेक गैरप्रकार आहेच. हे विषय अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. खुद्द मदर तेरेसा यांच्या कथित ‘उदात्त’ कामगिरीची चिरफाडही अनेकदा करण्यात आली आहे. अरूप चॅटर्जी यांनी ‘मदर तेेरेसा; द फायनर व्हर्डीक्ट’ हे पुस्तक आणि यावर आधारित ‘हेल्स अँजल्स’ या डॉक्युेंटरीतून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पत्रकार क्रिस्तोफर हिचेन्स यांनीही ‘मिशनरी पोझिशन: मदर तेरेसा इन थिअरी अँड प्रॅक्टीस’ या पुस्तीकेतून त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. एवढेच नव्हे तर ख्रिस्ती धर्मावरही अक्षरश: हजारो पुस्तकांच्या माध्यमातून आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. यावर अनेक चित्रपट व माहितीपटही आले आहेत. या तुलनेत गिरीश कुबेर यांचा संक्षिप्त अग्रलेख इतका झोंबला हे नक्कीच आश्‍चर्यजनक आहे. यातून प्रसारमाध्यमांचा एकांगीपणाही स्पष्टपणे उघड झाला आहे. सातत्याने हिंदू (थोड्या प्रमाणात मुस्लीम) धर्मातील कट्टरपणावर तुटून पडणार्‍या माध्यमांचे डोळे खाडकन उघडवणारा हा प्रकार आहे.

प्रत्येक धर्माची वैज्ञानिक कसोटीवर घासून तसेच मानवतेच्या दृष्टीकोनावर आधारित चिकीत्सा व्हावी यात गैर काहीही नाही. मीडियाचीही याच प्रकारची भुमिका असावी हे अपेक्षित आहे. याचा विचार करता भारतीय प्रसारमाध्यमांनी आजवर बर्‍यापैकी तटस्थपणे ही भुमिका पार पाडली असे आपण म्हणू शकतो. आजच्या सहिष्णूता-असहिष्णूतेच्या कोलाहलात तर मीडियाची जबाबदारी अजूनच वाढली आहे. मात्र असे असतांना ‘लोकसत्ता’ने घेतलेली भूमिका व्यावसायशरण या प्रकारातीलच असल्याची शक्यता आहे. यात संस्थात्मक पातळीवरील तडजोडची अपरिहार्यता ठळकपणे अधोरेखित झाली आहे. ‘कार्पोरेट मीडिया’चा हा दुटप्पीपणा आपण मुळातून समजून घेतला पाहिजे. वर्तमानपत्र हे सेवेचे व्रत, एखादी चळवळ वा समाज सुधारणेचे माध्यम नसून तो एक ‘बिझनेस’ आहे. प्रत्येक व्यवसायाप्रमाणे यात नफा आणि हितसंबंध हे सर्वतोपरी असल्याची भेदक जाणीवदेखील यातून झाली आहे. यामुळे माझ्या मते तरी आता गिरीशजींप्रमाणे धारदार लिखाण करणार्‍यांना परिपुर्ण स्वातंत्र्य प्रदान करणार्‍या सोशल मीडियाचा एकमात्र पर्याय उरला आहे. आपल्याकडे अद्याप ‘पेड डिजीटल कंटेंट’ ही संकल्पना रूजली नसली तरी कुबेर यांच्यासारख्या लिखाण करणार्‍याला याची अडचण येणार नसल्याने त्यांनी हा प्रयोग करून पाहण्यास हरकत नसावी. असे न झाल्यास वर्तमानपत्रात कार्यरत राहून ते सोशल मीडियातदेखील स्वतंत्र भुमिका मांडू शकतात.

गिरीश कुबेर यांनी अग्रलेख मागे घेतल्याने काहींना फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या आश्‍चर्यकारक नव्हेत तर उद्वेगजनक आहेत. आज ‘कार्पोरेट मीडिया’ हा आपल्या प्रतिमेला जपणार्‍या एखाद्या ब्रँडप्रमाणे सजग असतो. कोणत्याही जाहिरातीतून शक्यतो अगदी लहानातला लहान समुदायदेखील दुखावला जाणार नाही याची काळजी घेतली जाते. याचप्रमाणे आजची मीडिया संस्थाने बहुतांश प्रसंगी सावध आणि लवचिक भुमिका घेत आहेत. यातून संपादकांनीही एक तर बाजारशरण पध्दतीच्या गुळमुळीत भुमिका घ्याव्यात अथवा एखाद्या वेळेस धाडस केलेच तर सपशेल माघार घ्यावी असा ट्रेंड आता रूजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका अर्थाने आज गिरीश कुबेर हे जात्यात असले तर त्यांची खिल्ली उडविणारे सुपात आहेत. त्यांच्यावरही या प्रकारचा बाका प्रसंग ओढवू शकतो. याचमुळे आजची वेळ ही गिरीशजींची खिल्ली उडविण्याची नसून पत्रकारितेतील बदलावर गांभिर्याने चिंतन करण्याची आहे. आपल्या भोवतीचे धार्मिक, जातीय, राजकीय, वांशिक, भाषिक वा प्रादेशिक अस्मितांचे हिंस्त्र हाकारे तीव्र होत असतांना गिरीश कुबेर यांच्यासारख्या प्रज्ञावंताची झालेली ही अवस्था आगामी भयसूचक कालखंडाची झलक दर्शविणारी आहे. हा धोका त्यांना झोडपून काढणार्‍यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

पेरूमल मुरूगन यांच्यावरील अग्रलेखाचा शेवट करतांना गिरीशजी म्हणाले होते की-

‘‘…आविष्काराचे स्वातंत्र्य तर आपल्यालाही मान्य आहे. फक्त तो आविष्कार आपला देव, समाज आणि धर्म याविरोधात असता कामा नये. हा एक फार महत्त्वाचा संदेश यातून गेला. लेखक, कलावंत हे समाजसंस्कृतीचे निर्माते. पण संस्कृती टिकविण्यासाठी आपण त्यांचीही गय करणार नाही, हे आपण दाखवून दिले. ते बरेच झाले.’’

यात आता लेखक आणि कलावंतांसोबत पत्रकार हा पेशादेखील जोडावा लागणार आहे इतकचं ! गिरीश कुबेर यांना झोडपून काढण्यात मग्न असणार्‍या त्यांच्या समव्यावसायिकांनी याचाच विचार करावा हेच उत्तम.

About the author

shekhar patil

7 Comments

  • ही वेळ पत्रकारांनी संघटित होण्याची असून मध्यमावरील(कुबेर यांच्या वरील) दबाव मोठे संकटाची चाहूल देत आहे.

  • शेखरजी , अप्रतिम विश्लेशण, सुरवातीला मलाही प्रचंड राग आला, नंतर हा बाजारशरणाचा प्रकार असेल हे मलाही जाणवले , पन प्रकार एका मोठ्या संकटाची नांदी असल्याचे प्रकशॉने वाटते , हालेख इतरत्र पोस्ट करउ शकतो का?

  • निर्भिङ लेखनी पञकारांचा श्वास असुन तो दबला जाणे म्हणजे स्वतंञ लोकशाहिचा खुन करण्या सारखे आहे
    येणा-या काळात पञकारांची अखंङ समुह शक्ती अत्यंत गरजेची आहे
    जगाव तर अस की ईतिहासानही एक पान आपल्या करिता राखाव

Leave a Comment