चालू घडामोडी

ही नवरी असली…!

इंदूजा पिल्लै या तरूणीने स्वत:च्या वेबसाईटवर विवाहासाठी टाकलेला ‘बायो डाटा’ हा अफलातून लोकप्रिय ठरला आहे. यातून आजची पिढी आपल्या आयुष्याकडे आणि स्वत:च्या निर्णयशक्तीकडे किती आत्मविश्‍वासाने पाहते हेदेखील अधोरेखित झाले आहे.

सोशल मीडियात ‘व्हायरल’ होणार्‍या बर्‍याच बाबींमध्ये एखादा खळबळजनक गौप्यस्फोट वा विनोदी मटेरियल अवश्य असते. मात्र समाजमनाला हादरा देणारा एखादा मुद्दादेखील लोकांना भावतो. बंगळूरू येथील इंदूजा पिल्लै या तरूणीने स्वत:च्या वेबसाईटवर विवाहासाठी टाकलेला ‘बायो डाटा’ हादेखील असाच अफलातून लोकप्रिय ठरला आहे. यातून आजची पिढी आपल्या आयुष्याकडे आणि स्वत:च्या निर्णयशक्तीकडे किती आत्मविश्‍वासाने पाहते हेदेखील अधोरेखित झाले आहे.

इंदूजा पिल्लै ही मध्यमवर्गीय तामिळ कुटुंबात जन्मलेली २४ वर्षांची तरूणी. संगणकशास्त्रात पदवीधर असणारी इंदूजा ‘भारताची सिलीकॉन व्हॅली’ म्हणून विख्यात असणार्‍या बंगळुरू शहरात एका कंपनीत नोकरीला आहे. गेल्या महिन्यात तिच्या कुटुंबियांनी एका मॅट्रीमॉनियल वेबसाईटवर तिचे प्रोफाईल अपलोड केले. अर्थात या माध्यमातून एखादा सुयोग्य वर पाहून इंदुजाचे हात पिवळे करण्याचा त्यांचा मानस हा कोणत्याही पालकांच्या जबाबदारीनुसार योग्यच होता. मात्र इंदूजाने या वेबसाईटवरील आपले प्रोफाईल पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला. कारण यात बरीचशी माहिती खोटी असल्याचे तिच्या लक्षात आले. यात ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असल्याचे लिहण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ती स्टार्टप्स अर्थात नवीन आयटी कंपन्यांसोबत काम करत आहे. याशिवाय तिच्या स्वभावाबाबत अनेक खोट्या बाबी यात नमुद करण्यात आल्या होत्या. अर्थात विवाहेच्छुकांच्या ‘बायो डाटा’मध्ये असले प्रकार सर्रास होत असतात. यात आपली मुलगी सुंदर, सुशील, सुस्वभावी, गृहकृत्यदक्ष, वडिलधार्‍यांचा आदर करणारी असल्याचे सांगण्यात आलेले असते. इकडे मुलांच्या ‘बायो डाटा’मध्ये अनेकदा त्यांच्या वेतनापासून ते गुणांपर्यंत असलेच खोटे लिहलेले असते. अनेक महाद्दर तर खोट्या कुंडल्याही टाकतात. याचा विचार करता इंदूजाच्या पालकांनी फार काही मोठी चूक केली नव्हती. मात्र हा प्रकार पाहून तिला धक्काच बसला. याबाबत तिने आपल्या पालकांना काहीही सुचना न देता आपल्या वेबसाईटवर स्वत:चा अगदी खराखुरा ‘बायो डाटा’ अपलोड केला. आता यातील प्रांजळपणाच तिला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेलाय.

indhuja

इंदूजा ‘आयटी’मध्ये पारंगत असल्याने तिने स्वत:ची ‘इंदूजा.कॉम’ ही वेबसाईट आधीपासूनच तयार केली होती. याला एक सबडोमेन जोडत तिने ‘मॅरी.इंदूजा.कॉम’ हे वेबपेज तयार करून यावर आपली खरी माहिती देत आपला जीवनसाथी कसा असावा? हेदेखील जगाला सांगितले. यात तिने आपली जन्मतारीख, उंची, वजन आदी प्राथमिक माहिती दिली आहे. आपण निरीश्‍वरवादी असून वैवाहिक स्थितीच्या रकान्यापुढे-स्वत:शी विवाह केल्याचे तर स्वत:चे लिंग-टॉमबॉय असल्याचे नमुद केले आहे. आपण बंगळुरू येथे स्टार्टप्स कॅटॅलिस्ट म्हणून काम करत असून यातून आपल्याला स्वत:पुरता खर्च करण्यासाठी रग्गड पैसा मिळतो व यातून थोडेफार पर्यटनासाठी बचत करत असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिला ब्लॉगींग आणि हौशी फोटोग्राफीत रस आहे. याचसोबत इंग्रजी चित्रपट, फिरणे आणि स्टार्टप्स कंपन्यांमध्ये काम करणे आदींचीही आपल्याला आवड असल्याचे इंदूजाने नमुद केले आहे. आपण ड्रिंक आणि स्मोक करत नाहीत, अंडी खात असलो तरी खादाड नाही असे तिचे म्हणणे आहे. मला गॉगल घालायला आवडते. अर्थात गॉगल घातल्यावर मी गबाळी दिसते. मी मैत्रीपुर्ण असले तरी मैत्रीत अजिबात रस नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण स्त्रैण स्त्री नाहीत, विवाहेच्छुक तर मुळीच नाही. मी आयुष्यात कधीही केस वाढवणार नसल्याचे सांगत स्वत:च्या जीवनावर आपली अतुट निष्ठा असल्याचे इंदूजाचे म्हणणे आहे.

आपण सध्या विवाहेच्छुक नसलो तरी तिने आपण कोणत्या जीवनसाथीचा शोध घेतोय हेदेखील सांगून टाकले आहे. यानुसार इंदूजाला शक्यतो दाढी असणारा तरूण नवरा म्हणून हवाय. त्याला जग पाहण्याची तीव्र इच्छा असावी, त्याने पोटापुरते कमवावे, तो आपल्या कुटुंबाशी जोडलेला असला तरी त्यांच्यात अडकून पडणारा नसावा, त्याला मुलाबाळांची आसक्ती नसावी. त्याचे व्यक्तीमत्व इंप्रेसिव्ह असावे, आवाज सुस्पष्ट असावा, त्याच्या कामाची त्याला घृणा नसावी आणि महत्वाचे म्हणजे संभाषण कौशल्य असावे अशी अपेक्षा इंदूजाने व्यक्त केली आहे. ‘लोकांना तग धरायचाय…मला मात्र जगायचेय’ असे तिने ठळक अक्षरात नमुद केले आहे. कुणाला जर या प्रपोजलमध्ये इंटरेस्ट असले तरी त्याने हे वेबपेज आपल्या पालकांना दाखवावे आणि एक क्षणभर माझ्यासारख्या तरूणीसोबत संसार करण्याचा विचार करावा..मगच आपल्याला संदेश पाठवावा वा मुकाट आपल्या कामास लागावे असा इशारादेखील इंदूजाने दिला आहे.

खरं तर इंदूजा ही आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. यामुळे अन्य पालकांप्रमाणे त्यांनीही आपल्या परीने तिच्या साठी वर संशोधन करणे चुकीचे नव्हते. तसा प्रयत्न त्यांनी केला. आता अरेंज्ड मॅरेजचा विचार केला असता आपल्या विवाहसंस्थेत ओळखी-परिचय, कुणा मध्यस्थाच्या माध्यमातून, वर्तमानपत्रे वा नियतकालिकातील जाहिराती, मॅरेज ब्युरो, समाज मेळावे/ विवाह सुची, मॅट्रीमॉनियल वेबसाईट आदींचे पर्याय उपलब्ध आहेत. यात प्रत्येकास वधू आणि वरास सादर करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे वर्तमानपत्रांमधील जाहिरातीत मुलगा वा मुलगी कशी असावी यात आता अमेरिकेतील ग्रीनकार्ड होल्डर आदींचाही उल्लेख होत आहे. आंतरजातीय स्थळांना प्राधान्य देणारे अमुक-तमुक जातीचा नको असेदेखील स्पष्ट सांगतात. सार एकच- आमचा मुलगा वा मुलगी सर्वगुणसंपन्न असल्याने त्यांना स्थळही तसेच हवे ही इच्छा पालकांची असते. बहुतांश मुला-मुलींना या सर्व प्रकारातून जावेच लागते. या पार्श्‍वभुमीवर इंदूजासारखी एखादी धाडसी तरूणी थेट आपल्या आई-वडिलांच्या इच्छेविरूध्द आपले स्वत:चे ठाम मत मांडते याला अनेक पदर आहेत. इंदूजाचे कृत्य अपरिपक्व व बालिश असल्याच्या प्रतिक्रियादेखील उमटल्या आहेत. ती अहंकारी स्वत:च्या कोशात मग्न असल्याचाही काहींनी आरोप केला. मात्र बहुतांश लोकांना तिचा प्रांजळपणा भलताच भावलाय. अनेक तरूण-तरूणींनी तिच्या फेसबुक पेजवर अत्यंत भावपुर्ण प्रतिक्रिया दिल्यात. तरूणाईला आता परंपरेचे बंध तोडायचे आहेत. मात्र कुणी धाडस करत नाही. यामुळे एखादी इंदूजा जेव्हा समाजासमोर आपली ठाम मते मांडते तेव्हा खळबळ उडणे स्वाभाविक आहे. इंदूजाची वेबसाईट, तिचे फेसबुक, ट्विटर, फ्लिकर आदी सोशल प्रोफाईल्स आदी तुफान लोकप्रिय झाले आहेत. अनेक वाहिन्यांवर तिच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. या सगळ्या प्रकाराने प्रारंभी तिच्या पालकांना धक्का बसला. आता मात्र त्यांना आपल्या मुलीचा अभिमान वाटत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे इंदूजाने आपला सध्या विवाहाचा विचार नसल्याचे सांगतले असले तरी तिला देश-विदेशातून खूप ऑफर्स आलेल्या आहेत. काही दिवसांतच ती भारतीय स्त्रीवादी आयकॉन बनली आहे.

indhuja_new

सध्या बीबीसीची दिल्लीतल्या निर्भया प्रकरणावरील डॉक्युमेंटरी गाजत आहे. यात बलात्कार करणारा मुकेश सिंग हा आरोपी चेहर्‍यावर कोणतेही पश्‍चातापाचे भाव न आणता एखादी सभ्य तरूणी रात्री नऊ वाजता बाहेर का फिरते? असा प्रश्‍न करत या सर्व प्रकरणासाठी ती तरूणीच कारणीभुत असल्याचे सांगते तेव्हा त्याच्या तोंडून सरंजामवादी भारतीय पुरूषच बोलत असतो. बरं हा नराधमच नव्हे तर त्याचा वकीलही महिलांविषयी अपशब्द काढतो तेव्हा संताप आल्यावाचून राहत नाही. महिला विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर झाल्या तरी त्यांनी चुल आणि मुल यांच्यापुरतेच मर्यादीत रहावे. एखादी करियरिस्ट तरूणी असली तरी तिने मुकाट आपल्या आवडी-निवडींना मारत पालक म्हणतील त्यानुसार विवाह करून संसार थाटावा असला प्रकार सध्या सुरू आहे. म्हणजे ‘असला नवरा नको ग बाई’ हे गाण्यापुरते ठिक आहे. मात्र मुलीच्या आवड-निवडीवर फारसा विचार होत नाही. बरं कुणी आपल्या आवडीनुसार प्रिती विवाहाचा मार्ग पत्करला तेथे पालकांची ‘इज्जत’ आडवी येते. यातून सर्रास प्रतिष्ठेच्या नावाखाली आपल्याच मुलींचे मुडदे पाडले जातात. अलीकडे तर सन्मानाचा प्रश्‍नच निर्माण होऊ नये म्हणून गर्भातच कळ्या खुडण्याचा क्रूरपणा वाढत आहे. म्हणजे स्त्रीला देवीसमान आदर देण्याचा आव आणत त्यांच्यावर प्रचंड निर्बंध लादणे हा भारतीयांचा दुटप्पीपणाच आहे. या दांभिकतेला इंदूजा पिल्लैसारखी एखादी तरूणी आता आव्हान देतेय याचे आपण खुल्या दिलाने स्वागत करायला हवे. इंदूजाचे हे फक्त धाडसच नव्हे तर आता सावित्रीच्या लेकी बोलायला लागल्यात, प्रश्‍न विचारायला लागल्यात आणि महत्वाचे म्हणजे आपली आवड बिनधास्त सांगायला लागल्यात याचेच द्योतक आहे. याचसोबत तिने विचारलेल्या प्रश्‍नाने कुठे तरी समाजाच्या हृदयात घर केलेय हेदेखील तितकेच खरे…

म्हणूनच तुला सलाम इंदूजा…!

About the author

shekhar patil

Leave a Comment