चालू घडामोडी राजकारण

हात दाखवून अवलक्षण

देशातील तमाम राजकीय मंडळी ज्योतिष्यच नव्हे तर यज्ञ-हवनादी कर्मकांड तसेच अगदी तंत्र-मंत्र, जारण-मारण-उच्चाटन, वशिकरण, अघोरी कर्मकांड आदींवर प्रचंड विश्‍वास ठेवत असल्याचे अनेकदा अधोरेखित झाले आहे.

देशाच्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ज्योतिषाला दाखविलेला हात चांगलाच वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. देशातील बहुतांश जनता पावलापावलावर अंधविश्‍वासाला बळी पडत असतांना ज्यांच्याकडून पुरोगामीपणाची अपेक्षा आहे ते राजकारणीही हाच मार्ग अवलंबत असतील तर खर्‍या अर्थाने प्रगतीशील भारत घडणार कसा? हा प्रश्‍नही यातून उपस्थित झाला आहे.

इराणी यांच्या या प्रकरणातून झोपडीपासून ते महालापर्यंतचे लोकांना भविष्याबाबतचे किती कुतुहल असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. देशातील तमाम मातब्बर राजकीय मंडळी ज्योतिष्यच नव्हे तर यज्ञ-हवनादी कर्मकांड तसेच अगदी तंत्र-मंत्र, जारण-मारण-उच्चाटन, वशिकरण, अघोरी कर्मकांड आदींवर प्रचंड विश्‍वास ठेवत असल्याचे आजवर अनेकदा अधोरेखित झाले आहे. इंदिरा गांधी यांच्या कालखंडातील धिरेंद्र ब्रह्मचारी असो की, नरसिंहा राव यांच्या काळातील चंद्रास्वामी या तांत्रिकांचा एके काळी दिल्लीत बोलबाला होता. देशहिताचे महत्वाचे निर्णय असोत की अगदी कुणाच्या नियुक्त्या या दोघांचा शब्द प्रमाण मानला जात होता. विशेषत: आणीबाणीच्या कालखंडातील धिरेंद्र ब्रह्मचारी यांची भुमिका वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. चंद्रास्वामी तर कायद्याच्या कचाट्यातही सापडले होते. याचप्रमाणे दिल्लीच्या वर्तुळातील जवळपास प्रत्येक राजकारणी विविध बाबा-महाराजांच्या चरणी लीन होत असल्याचे दिसून आले आहे. याचाच कित्ता राज्य आणि अगदी गाव पातळीवरील राजकारण्यांना गिरवला आहे.

आज स्मृती इराणी यांच्यावर घणाघात करणारे आणि पुरोगामीत्वाचा आव आणणारे स्वत:देखील याचप्रमाणे बुवाबाजीच्या मागे लागतात हे विसरता कामा नये. महाराष्ट्रातील बहुतांश कथित पुरोगामी राजकारणी स्वत: किती प्रतिगामी आहेत हे विधानसभा निवडणुकीच्या काळात दिसूनच आले आहे. ‘पितृपक्षात शुभ काम करू नये’; या अंधविश्‍वासाला बळी पडत महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या बहुतांश नेत्यांनी या कालखंडात उमेदवारी अर्ज भरणे टाळले. यात शाहू-फुले-आंबेडकरांचा नेहमीच नामजप करणार्‍यांचाही समावेश होताच. यामुळे मते मागतांना पुरोगामीपणा आणि आचरणात प्रतीगामीपणा अशी त्यांची उघड दुटप्पी भुमिका असल्याचे आढळून आले. राज्यातील बहुतांश राजकारणी अनेक बाबांचे भक्त आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे सत्यसाईप्रेम उघड आहे. सत्यसाईंचा विषय निघाल्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासह बरेच आजी-माजी दिग्गज राजकारणी आणि सेलिब्रीटी शिष्यांचा उल्लेखही अपरिहार्य आहेच. महाराष्ट्राच्या राजकारणातील भैय्युजी महाराजांची ‘पॉवर’ ही कुणापासून लपून राहिलेली नाही. अनेक राजकारणी पदे मिळावीत म्हणून विविध बाबांच्या चरणी लीन झालेले असतात. यातच देश आणि राज्यात याच दैववादाला प्रोत्साहन देणारे सरकार आरूढ झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभांना बाबा मंडळींची जमलेली मांदियाळी आपण पाहिली आहेच. यामुळे स्मृती इराणी यांनी राजकीय कारकिर्दीत अजून वरच्या पायर्‍या चढण्यासाठी आपल्या हक्काच्या ज्योतिष्याला हात दाखविणे हे तसे स्वाभाविकच मानायला हवे. अर्थात संबंधीत बाबाने या प्रकरणातून मिळालेल्या प्रसिध्दीचा पुरेपुर लाभ उचलत स्मृतीबाई भारताच्या राष्ट्रपती होतील हे जाहीर भाकीत करून टाकले तेव्हा सुज्ञ जनांना कपाळाला हात लावण्यावाचून कोणताही पर्याय उरला नाही.

राजकारण्यांनी व विशेषत: उच्चपदस्थ लोकप्रतिनिधींनी केवळ देशच चालवायचा नसतो तर देशवासियांना दिशादेखील द्यावयाची असते. अर्थात ही दिशा प्रगती आणि पुरोगामीत्वाची असावी हे अपेक्षित आहे. मात्र आपले राजकारणी बर्‍याच प्रमाणात अंधविश्‍वासी आहेत ही दुर्दैवी बाब आहे. खरं तर अंधविश्‍वास हा जगातील प्रत्येक देशात कमीअधीक प्रमाणात आढळून येतोच. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अनेक किस्से याबाबत जगजाहीर आहेत. पाश्‍चात्य राष्ट्रांमध्ये तेराचा आकडा अशुभ मानला जातो. यामुळे या क्रमांकाचा मजला, हॉटेलची रूम आदींना फाटा देण्यात आलेला असतो. या दिवसाला तेथे खूप अशुभ मानतात. अनेक वलयांकीत व्यक्तीदेखील याच्या अधीन असतात. आता विश्‍वास आणि अंधविश्‍वास यांच्यातील फरक इतका सुक्ष्म आहे की यावरूनच नेहमी वाद होत असतात. ज्योतिष्य हे एक शास्त्र असल्याचा दावा करणारे खूप आहेत. यात अनेकांचे ठोकताळे हे खरे ठरतात. हा अध्ययन आणि अनुभुतीचा विषय आहे. मात्र अद्याप कुणाही ज्योतिष्याने बिनचुक भाकिताचे आव्हान स्वीकारलेले नाही. महाराष्ट्राचा विचार केला असता अंधश्रध्दा निर्मुलन समितीने विविध निवडणुकांच्या अचुक निकालाच्या भाकिताबाबत अनेकदा रोख पारितोषिकांसह आव्हान देऊनही कुणी ज्योतिष्याने याचा स्वीकार केला नसल्याचे आपण पाहिलेच आहे. मात्र असे असुनही ज्योतिष्य आणि बुवाबाजीचा धंदा फळफळत आहे.

स्मृती इराणी यांच्या दैववादी प्रवृत्तीवर तुटून पडणार्‍या विविध वाहिन्यांवर वेगवेगळ्या बाबांचे अचाट दावा करणारे कार्यक्रम आणि अंधविश्‍वाला खतपाणी घालणार्‍या कार्यक्रमांचे यथेच्छ रेलचेल असते. हीच बाब वर्तमानपत्रांचीही. दैनंदिन, साप्ताहिक आणि वार्षिक भविष्य छापणारी वर्तमानपत्रे आणि त्यांना वाचणारे आपले देशात आहेत म्हणून हा दैववादाचा खेळ आपल्या समाजजीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे आपण मान्य करायलाच हवे. या दैववादी प्रवृत्तीला दुर सारून कर्मवादी, विज्ञाननिष्ठ आणि पुरोगामी कार्यसंस्कृती विकसित झाल्याशिवाय भारत खर्‍या अर्थाने प्रगतीपथावर जाणार नाही. स्मृती इराणी यांनी ज्योतिष्याला दाखविलेला हात हा कॅमेर्‍यात कैद झाल्याने जगासमोर आला आहे. मात्र आपल्या देशात रावांपासून ते रंकांपर्यंत बहुतांश जनता याचप्रकारच्या दैववादाच्या अधीन आहे हे विसरता येणार नाही. फक्त स्मृती इराणी यांनी हात दाखवून अवलक्षण करवून घेतले इतकेच! एका व्यापक अर्थाने स्मृती इराणी पकडल्या गेल्या म्हणून दैववादी ठरल्या आहेत. प्रत्यक्षात आपल्या समाजातील मोठा वर्गच त्यांच्याप्रमाणेच या प्रकारांच्या आहारी गेलाय हे भेदक सत्य आपण पचवायलाच हवे.

Smriti_Irani

About the author

shekhar patil

2 Comments

Leave a Comment