चालू घडामोडी राजकारण

हमने डुबते सुरज को अक्सर तनहा देखा है !

सोळाव्या लोकसभा निवडणुकीत देदीप्यमान यश संपादन करून नरेंद्र मोदी सत्तारूढ होत असतांना मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे उदास मनाने निरोप घेत आहेत. राजकारणाची हीच तर्‍हा आहे.

सोळाव्या लोकसभा निवडणुकीत देदीप्यमान यश संपादन करून नरेंद्र मोदी सत्तारूढ होत असतांना मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे उदास मनाने निरोप घेत आहेत. राजकारणाची हीच तर्‍हा आहे. पदावर असतांना भोवताली प्रचंड वलय आणि सत्ता नसतांना भयानक पोकळी! यामुळे तब्बल दहा वर्षे देशाची धुरा हाकणार्‍या डॉ. सिंग यांच्या विदाईकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही ही बाब निष्ठुर काळाची क्रुरता दर्शविणारी आहे.

खरं तर केंब्रिज व ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन डॉ. सिंग यांची कारकीर्द ही कुणालाही नजर लागावी अशीच होती. युनोसह भारतीय manmohan-singhप्रशासनातील महत्वाच्या पदांवर काम केल्यानंतर डॉ. सिंग यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (१९८२ ते ८५) म्हणून धुरा सांभाळली. यानंतर ८५ ते ८७ योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या अर्थविषयक ‘साउथ कमिशन’चे अध्यक्ष झाल्यानंतर डॉ. सिंग हे १९९० साली सेवानिवृत्त झाले होते. वरिष्ठ पदांवरील कामांचा दांडगा अनुभव आणि साहजीकच पॉलिटिकल कनेक्शन्सच्या बळावर डॉ. सिंग यांना राज्यपालपदासारख्या सोयीच्या ठिकाणी आपली वर्णी लावून घेणे सहजशक्य होते. मात्र मितभाषी सिंग यांचा असा पिंड नव्हताच. इतक्यात १९९१ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या कालखंडात राजीव गांधी यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर पंतप्रधानपदाची सुत्रे योगायोगाने तेव्हा जवळपास सेवानिवृत्त जीवन व्यतीत करणार्‍या पी.व्ही. नरसिंहराव यांच्या हातात आली. भारतीय इतिहासातील हा कालखंड मंडल-कमंडल वादाने स्फोटक तर बनलेलाच होता पण देशावर आर्थिक अरिष्टही आले होते. नुकतेच सत्तेवरून पायउतार झालेल्या चंद्रशेखर यांच्या पंतप्रधानपदाच्या कालखंडात तर देशाचा राखीव सुवर्णसाठा गहाण ठेवण्याची नामुष्की आपल्यावर ओढवली होती. देशाच्या परकीय गंगाजळीला ओहोटी लागली होती. यामुळे या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना केंद्रीय वित्तमंत्री म्हणून नियुक्त केले. नजीकच्या कालखंडात अनेक अराजकीय व्यक्तीमत्वांना केंद्रात महत्वाची पदे मिळाली आहेत. मात्र २३ वर्षांपुर्वी राव यांच्या निर्णयाने राजकीय क्षेत्राला हादरा बसला होता. राजकारणाचा रूढ अर्थाने गंध नसणार्‍या डॉ. सिंग यांच्या नियुक्तीबाबत शंकादेखील व्यक्त करण्यात आल्या. मात्र राव यांचा निर्णय डॉ. सिंग यांनी सार्थ ठरवला. या जोडगोळीने आर्थिक उदारीकरणाला चालना देतांना देशाच्या इतिहासात एका स्वर्णीम अध्यायाची नोंद केली.

डॉ. सिंग यांनी वित्तमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था लायसन्स, परमीट, कोटा आदींच्या दुष्टचक्रात अडकली होती. याचा निवडक औद्योगिक घराण्यांनाच याचा लाभ मिळत होता. डॉ. सिंग यांनी ही पध्दत मोडीत काढत स्पर्धात्मक पध्दतीला प्राधान्य देणार्‍या आर्थिक उदारीकरणाला गती दिली. यामुळे अनेक बलाढ्य उद्योगपतींचे हितसंबंध बाधीत झाल्याने त्यांच्या कार्यात अनेकदा कोलदांडा घालण्यात आला. यातून अगदी डॉ. सिंग यांनी नाराज होत राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली. मात्र राव यांनी कौशल्याने हा तणाव हाताळत त्यांना पुर्ण स्वातंत्र्य दिले. आज डॉ. सिंग यांच्यावर हीन पातळीवरून टीका करण्यात आली आहे. मात्र स्वप्नाळू समाजवादी अर्थव्यवस्थेला वास्तवावर आधारित भांडवलशाहीकडे नेणारे, ‘सेबी’ला स्वतंत्र मान्यता देणारे, ‘एनएसएसई’ची स्थापना करणारे, परकीय गुंतवणुकीतील अडसर दुर करणारे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये निर्गुंतवणुकीला प्राधान्य देणारे आणि एका वाक्यात सांगावयाचे झाल्यास भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याचा महामार्ग तयार करणारे डॉ. सिंग हेच होते हे सोयिस्करपणे विसरले जात आहे. डॉ. सिंग यांची चूक एकच की त्यांचा पिंड राजकारण्याचा नाही. यामुळे त्यांनी फक्त एकदाच म्हणजे १९९९ साली दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली मात्र यात ते चक्क पराभूत झाले.

२००४च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ‘फिल गुड फॅक्टर’चा फुगा फुटल्यानंतर सोनिया गांधी यांना अनेक लहानमोठ्या पक्षांनी पाठींबा देत त्यांना पंतप्रधानपदाचे साकडे घातले. मात्र तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या भेटीनंतर त्यांनी आश्‍चर्यकारकरित्या आपला विचार बदलून डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे देशातील सर्वोच्च पदाची धुरा सोपवली तेव्हा सोनियांना त्यागमुर्तीसह अनेक उपमा देण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र त्यांनी ही धुर्त खेळी केली होती. त्यावेळी प्रणव मुखर्जी यांना डावलून सिंग यांच्याकडे पंतप्रधानपद सोपवण्यामागे एक महत्वाचे कारण म्हणजे इंदिराजींच्या निधनानंतर मुखर्जींनी राजीवजींच्या पंतप्रधानपदाला विरोध केला होता हेच होते. अगदी याचप्रमाणे कॉंग्रेसशी कधीकाळी गद्दारी करणार्‍या शरद पवार यांना दुर सारून पी.व्ही. नरसिंहा राव यांना पंतप्रधानपद सोपविण्यात आले होते ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास गांधी घराण्याशी निष्ठा हाच एकमेव निकष अनेकदा लावण्यात आल्याचे आपणास दिसून आले आहे. (याचीच पुनरावृत्ती २००८ साली राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीत झाली हे सांगणे नकोच!) डॉ. मनमोहन सिंग हे निरूपद्रवी नेते असून त्यांच्या माध्यमातून १९८४च्या हत्याकांडामुळे कॉंग्रेसपासुन दुरावलेल्या शीख समुदायाला आपलेसे करण्याचे गणितही त्यांनी मांडले असावे. यातच तेव्हापर्यंत कॉंग्रेसला आघाडीच्या राजकारणाचा अनुभवदेखील नव्हता. या बाबींचा विचार करता डॉ. सिंग यांच्या डोक्यावर काटेरी मुकुट ठेवून सर्व सुत्रे आपल्या हाती ठेवण्याची चतुर खेळी सोनिया गांधी यांनी केली. पहिल्या पंचवार्षिकमध्ये त्यांचा हा हस्तक्षेप फारसा जाणवला नाही. किंबहुना ‘युपीए-१’ची कामगिरी चांगली राहिली. ‘मनरेगा’, शेतकर्‍यांना कर्जमाफी, माहितीचा अधिकार आदी महत्वाच्या बाबी या कालखंडात घडल्या. यामुळे ‘सिंग इज किंग’ म्हणून त्यांचा गौरव झाला. जागतिक पातळीवर त्यांच्या नेतृत्वाची वाखाणणी झाली. मात्र दुसर्‍या पंचवार्षिकमध्ये गडबड झाली अन् सोनियांनी भ्रष्ट कॉंग्रेसजनांना आवर घालण्याऐवजी डॉ. सिंग यांना हेतुपुर्वक टार्गेट केले.

संयुक्त पुरोगामी आघाडीचा दुसरा कार्यकाळ विविध घोटाळे आणि सत्ताधारी नेत्यांच्या बेताल वक्तव्यांनी गाजला. टु-जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार, कोळसा खाणवाटपातील घोळ, राष्ट्रकूल घोटाळा आदींनी डॉ. सिंग यांचे सरकार बदनाम झाले. यात ‘कोल-गेट’मध्ये त्यांच्यावर शिंतोळे उडविण्याचा प्रकार झाला तरी यातून त्यांच्यावर किटाळ आले नाही. मध्यंतरी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी संसदेतील अध्यादेश जाहीरपणे फाडण्याचा पोरकटपणा करून डॉ. सिंग यांचा अवमान केला तरी ते गप्प राहिले. मनमोहन सिंग हे रूढ अर्थाने राजकारणी नसल्याने त्यांच्याविषयी अनेकदा गैरसमज पसरवण्यात आले. ते दुर्बळ असल्यापासून त्यांचे मौन टिकेचा विषय बनले. ते सोनियांच्या हातात नियंत्रण असणारी कळसुत्री बाहुली असल्याचा सातत्याने आरोप होत राहिला. सोशल मीडियात तर त्यांना हास्यास्पद पात्र म्हणून दर्शविण्यात आले तरी त्यांनी कधी याचा प्रतिवाद केला नाही. देशाच्या राजकीय इतिहासात पंडित नेहरू यांच्यानंतर सलग दोन पंचवार्षिक पंतप्रधान राहिलेला हा माणूस वैयक्तीक जीवनात कमालीचा साधा आणि स्वच्छ प्रतिमेचा आहे. गॅस सिलींडरचे दर वाढले म्हणून चिंता व्यक्त करणार्‍या त्यांच्या सौभाग्यवती गुरूशरण कौर या देशातील तमाम मध्यमवर्गियांना आपल्या वाटल्या. डॉ. मनमोहन सिंग यांच्या तीन मुली, जावई आणि नातवंडांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा कधी गैरफायदा घेतल्याचे आपण पाहिले नाही. किंबहुना त्यांच्या मुली आणि जावयांची नावेदेखील कुणाला माहीत नाही. याचमुळे ते आपल्या २३ वर्षातील राजकीय कारकीर्द ही खुल्या पुस्तकाप्रमाणे असल्याचे ठामपणे सांगू शकले.

डॉ. मनमोहन सिंग यांचे भारताच्या इतिहासातील मुल्यांकन तर येणार्‍या काळात होणारच आहे. मात्र वित्तमंत्री म्हणून देशाला प्रगतीपथावर गतीमान करणार्‍या या माणसाने देशाचे नेतृत्वही कमालीच्या शालीनतेने केले असे आपण अगदी निर्विवादपणे म्हणू शकतो. दोष द्यावयाचाच झाला तर फक्त जी-हुजुरीला मानणार्‍या गांधी घराण्याला का नको? सिंग यांचा वारंवार अवमान करण्यात गांधी माता-पुत्राने धन्यता मानली. ‘यश मिळाले तर आमच्यामुळे तर अपयशाचे धनी मनमोहन’ असा प्रकारही अनेकदा झाला. खुद्द त्यांचे जावईबापू रॉबर्ट वधेरा यांच्या लिलांनीदेखील सरकार बदनाम झाले तरी त्यांना याचे कसलेही सोयरसुतक नव्हते. खरं तर आजवर आपल्या भोवती कायम लाचारांची फौज बाळगणार्‍या गांधी घराण्याला कधी स्वाभीमानी नेते रूचलेच नाहीत. यामुळे अनेकदा मान्यवर नेत्यांचा जाहीर पाणउतारा करण्यात आला. कॉंग्रेसचे अध्यक्षपद भुषविलेल्या सिताराम केसरी यांना त्यांनी आपल्या समर्थकांकरवी अक्षरश: हाकलून लावले. राव यांच्यासारख्या पंतप्रधानपद सांभाळलेल्या नेत्याच्या पार्थिवाला तर कॉंग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यास नकार देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यानंतर तर त्यांच्या नावाचा उल्लेखही टाळण्यात येतो. याचप्रमाणे २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाचे खापर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर फोडून त्यांना इतिहासात बदनाम करण्याचे कारस्थान यथावकाश होण्याची शक्यता आहेच. असे असले तरी डॉ. सिंग यांच्या कर्तृत्वचा ठसा पुर्णपणे पुसणे शक्य आहे का?

आदर्श राजाबाबात अगदी प्राचीन ग्रंथांपासून ते सोशल मीडियापर्यंत विवेचन करण्यात आले आहे. मात्र भर्तुहरी यांनी ‘नितीशतका’त राजा हा उपभोगशून्य स्वामी असावा ही केलेली व्याख्या सर्वोत्तम मानली जाते. डॉ. मनमोहन सिंग यांची आजवरची वाटचाल, त्यांची विद्वत्ता, सभ्य व सुसंस्कृत स्वभाव तसेच निष्कलंक चारित्र्य पाहता ते या निकषावर पुर्णपणे खरे उतरलेत याबाबत त्यांच्या विरोधकांच्या मनातही किंतु-परंतू नसावा. मात्र देशाला उदारीकरणाच्या मार्गावर नेणारा अन् देशाचे नेतृत्व सलग दहा वर्षे सांभाळणार्‍या या नेत्याची शेवटच्या कालखंडात ‘गरीब बिच्चारा’ अशी प्रतिमा झाली हेदेखील तेवढेच खरे आहे. अगदी अचूक शब्दात सांगावयाचे असल्यास ‘उपभोगशुन्य ते उपयोगशुन्य’ अशी त्यांची झालेली अवस्था कुणाही सुज्ञ भारतवासियाला खिन्न करणारी अशीच आहे. नरेंद्र मोदी हे मोठ्या अभिमानाने देशाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झालेले असतांनाच डॉ. मनमोहन सिंग यांनी खिन्न मनाने आणि विलक्षण एकाकीपणे हे पद सोडल्याचे आजचे चित्र आहे. शायर म्हणतो…

सुबह जो हसता खेलता निकले शाम को रोता देखा है
हमने डुबते सुरज को अक्सर तनहा देखा है!

याचप्रमाणे देशाला आर्थिक महासत्तेच्या दिशेने घेऊन जाणारे पण, पंतप्रधान म्हणून दुसर्‍या पंचवार्षिकमध्ये साफ अपयशी ठरलेले डॉ. मनमोहन सिंग यांच्या विदाईलादेखील अशीच स्थिती व्हावी ही बाब राजकारणातील क्षणभंगुरतेचे भेदक दर्शन घडविणारी आहे. आज मोदींच्या जयजयकाराच्या हर्षध्वनीमध्ये देशाच्या सर्वोच्च पदावर राहूनही कायम पाय जमीनीवरच राहिलेल्या या महान नेत्याला आपण कृतज्ञतापुर्वक आणि सन्मानजनक निरोप द्यायला हवा.

About the author

shekhar patil

1 Comment

  • very eyecatching heading! Manmohn is the man to whom every Indian should be Thankful. in terrific universal slowdown of 2008 he drive India skillfully on the path of Progress. UPA2 was wrost for him, corruption-scams maligned the image. he was helpless. GDP reached to 10 in era came down under 5. even though hats off to Manmohan! we are here due to him only otherwise we may have burst out in 2008! Alvida Manmohan!
    Shekharji, Congratulations for out of box thinking. when everyone is thinking for Modi, you dared to care Manmohan!

Leave a Comment