स्थानिक

‘आप’ला आधार पक्षाच्या वलयाचा

जळगाव– स्थापन झाल्यापासून अवघ्या एक वर्षातaap देशव्यापी प्रसिध्दी मिळवणार्‍या आम आदमी पक्षातर्फे स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात ‘आप’च्या लोकप्रियतेच्या बळावर मातब्बर राजकारण्यांना धक्का देण्याचा दावा करण्यात आला आहे. राजकारणातील सर्व शक्यता लक्षात घेता ‘आप’ चमत्कार करणार का? भलेही विजय न मिळाल्यास किमान या पक्षाचा कुणाला फटका बसेल? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

भारताच्या राजकीय इतिहासात आम आदमी पक्षाच्या देशात एखाद्या धुमकेतूसमान झालेल्या उदयाला कुणी विसरू शकणार नाही. ढोबळ मानाने राजकारणाची बाराखडीदेखील न समजणार्‍या आणि विविध क्षेत्रातील सर्वसामान्यांना एकत्र करत भ्रष्टाचारविरोधी लढाईच्या माध्यमातून राजकारणात दमदार एंट्री करत अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सर्वांना चकीत केले आहे. खरं तर डिसेंबर २०१२ मध्ये स्थापन झालेला हा पक्ष खर्‍या अर्थाने दिल्ली विधानसभेतील अनपेक्षित यशानंतर झोतात आला. यानंतर देशभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यात प्रवेश करण्याचा सपाटा लावला. यातील पहिल्या टप्प्यात मुळचे जळगाव जिल्ह्यातील तसेच राज्यातील बहुचर्चित जलसंपदा खात्यातील घोटाळा चव्हाट्यावर आणणारे विजय पांढरे यांचाही समावेश होता. यथावकाश तालुकाच नव्हे तर अगदी गाव पातळीवरही ‘आप’बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्ष नोंदणीसही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे.

प्रारंभी विजय पांढरे यांना जळगाव जिल्ह्यातून मैदानात उतरवण्याचे संकेत होते. मात्र पांढरे यांनी नाशिकमधून राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते छगनराव भुजबळ यांच्याविरूध्द दंड थोपटले आहे. यानंतर जळगावसाठी मनपातील सत्ताधार्‍यांविरूध्द कित्येक वर्षांपासून लढाई करणारे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील यांचे नाव आले. मात्र हे नावही मागे पडले आहे. आता एरंडोल येथील डॉ. बाबा आमटे रूग्णालयाचे डॉ. संग्राम पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनीदेखील जोरात तयारी सुरू केली आहे. इकडे रावेर लोकसभा मतदारसंघासाठी प्रारंभी जळगाव येथील प्रथितयश अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप जाधव यांचे नाव समोर आले. यानंतर लोकसंघर्ष मोर्चाच्या झुंजार नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र ऐनवेळी काहीही बदल झाला नाही तर डॉ. संग्राम पाटील आणि डॉ. प्रताप जाधव हे अनुक्रमे जळगाव आणि रावेरातून ‘आप’चे उमेदवार राहू शकतात. एका अर्थाने दोन्ही मतदारसंघात कोरी पाटी व स्वच्छ प्रतिमा असणार्‍या उमेदवारांना तिकिट मिळणार आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना-भाजप महायुती व मनसेसारख्या पक्षांपेक्षा ‘आप’ची स्थिती भिन्न आहे. बहुतांश राजकीय पुर्वानुभव नसणार्‍यांचा या पक्षात समावेश आहे. सद्यस्थितीत शिवसेनेच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा जयश्री न्याती आणि भुसावळचे माजी नगराध्यक्ष गोकुळ कारडा यांचा अपवाद वगळता ‘आप’ मध्ये बहुतेक अराजकीय व विशेष सर्वसामान्य व्यक्तींचा समावेश आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीला सामोरे जातांना अनेक कसरतींना सामोरे जावे लागते. यात अगदी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणे, मतदान प्रक्रियेत सहभागी होणार्‍या ‘पोलिंग एजंट’ पासून ते विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आदींचा समावेश आहे. यामुळे दोन्ही उमेदवार हे ‘आप’ची जनकल्याणकारी विचारधारा आणि अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेच्या बळावर प्रचार करणार असले तरी स्थानिक पातळीवर लागणारे मनुष्यबळ उभे करण्याचे खरे आव्हान ‘आप’च्या उमेदवारांसमोर राहणार आहे.

या संदर्भात ‘आप’च्या एका मान्यवराने व्यक्त केलेले मत हे विचारात घेण्यासारखे आहे. ते म्हणाले की, साधारणत: २० वर्षांपुर्वी राजकारणात संक्रमणाचा एक काळ आला होता. तेव्हाची तरूणाई हिरीरीने शिवसेना-भाजपच्या प्रचारासाठी पुढे येत होती. या सर्वसामान्य जनतेच्याच जीवावर हे दोन्ही पक्ष उदयास आले. सध्या मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जनतेला कोणताही फरक दिसून येत नाही. अनेक विरोधी उमेदवार करत असलेला खर्च हा डोळे दिपवणारा असतो. यामुळे अगदी दिल्लीसह गल्लीतील सत्ताधारी आणि विरोधक हे ‘एकाच माळेचे मणी’ असल्याची भावना जनतेची झाली आहे. यामुळे आजच्या संक्रमण काळातील राजकीय पोकळी ‘आप’ भरून काढणार आहे. यासाठी आमच्याकडे आधीच उत्स्फुर्तपणे सदस्य नोंदणीसाठी झुंबड उडालेली आहे. यात तरूणांसह समाजाच्या सर्व स्तरांमधील व सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांचा समावेश आहे. यामुळे ‘पोलिंग एजंट’च नव्हे तर प्रचारासाठीही आम्हाला भाडोत्री माणसे वा पक्ष कार्यकर्त्यांवर खर्च करण्याची आवश्यकता नाही.

या मान्यवराने व्यक्त केलेले मत काही अंशी अतिआत्मविश्‍वासपुर्ण वाटू शकते. मात्र या निवडणुकीत ‘आप’च्या उमेदवारीची प्रस्थापितांना धास्ती बसू शकते. प्रारंभी हा पक्ष भाजपची मते खाणार असल्याचा अंदाज होता. मात्र दिल्लीत भाजप आणि कॉंग्रेसला समान पध्दतीने ‘आप’ने धक्का दिल्याचे दिसून आले होते. यामुळे कोण कुणाची मते खातो हे आजच सांगता येणार नाही. यामुळे ‘आप’तर्फे करण्यात आलेला विजयाचा दावा आज अवास्तव वाटत असला तरी या पक्षाचे उमेदवार दोन्ही मतदारसंघामध्ये उलटफेर करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

==============

मनसेची ‘राज की बात’!

जळगाव-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही आपली रणनिती जाहीर न करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजकीय वर्तुळात कुतुहल निर्माण केले आहे. यातच आपल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्थानिक पातळीवरही जोरदार तयारी करण्यात येत असूनही अधिकृतरित्या काहीही न दर्शविणार्‍या पदाधिकार्‍यांमुळे गुढ वाढले आहे. पक्षाच्या वर्धापनदिनी राज ठाकरे ही कोंडी फोडण्याचे संकेत असून यानंतरच स्थानिक पातळीवरील हालचाली गतीमान होण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ताधारी आघाडी तसेच त्यांना आव्हान देणारी सेना-भाजप व अन्य पक्षांच्या महायुतीच्या तुलनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तंबूत सामसुम असल्याने राजकीय निरिक्षक सध्या अक्षरश: हैराण झालेले आहेत. नजीकच्या काळात मनसे हा पक्ष आघाडी आणि युतीच्या तुलनेत तिसरी शक्ती म्हणून उदयास आला आहे. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी आपल्या स्वभावाच्या विपरीत मौन बाळगत सर्वांना गोंधळात टाकले आहे. राज्य पातळीवर हे होत असतांना जिल्हा पातळीवरही नेमकी याच्याशी सुसंगत भुमिका घेण्यात आली आहे. पक्षाचे संपर्कप्रमुख विनय भोईटे यांनी अलीकडच्या काळात शहरातच ठाण मांडले असून मोर्चेबांधणीसाठी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या बैठकांचा सपाटा चालविला आहे. मात्र याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिक पदाधिकार्‍यांची ही भुमिका आपण मनसेच्या कार्यसंस्कृतीचे अवलोकन केले असता तशी सुसंगतच वाटते.

मनसे हा पक्ष राज ठाकरे यांच्या एकखांबी नेतृत्वाच्या भोवती बहरला आहे. पक्षाचे सुपरस्टार प्रचारकही तेच आणि त्यांच्याच शब्द शेवटचा. यामुळे ठाणे जिल्ह्यातील विधानसभेचा सुलभ पर्याय असतांना त्यांनी आपले निकटवर्तीय विनय भोईटे यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी देत खुद्द त्यांना लोकसभेची तयारी करण्याचे निर्देश दिले. खरं तर नवख्या ठिकाणी येऊन लोकसभेची तयारी करणे ही बाब खूप कठीण आहे. मात्र पक्ष अध्यक्षांच्या आज्ञेचे पालन करत भोईटे यांनी जळगावात मोर्चेबांधणी सुरू केली. दरम्यानच्या काळात मनसेचे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे व त्यांच्या सहकार्‍यांना जळगाव महापालिकेत उज्वल यशही मिळाले. यामुळे उत्साह दुणावत मनसेची तयारी सुरू झाली. मनसेकडे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अनेक मातब्बरांनी आग्रह धरला. मात्र ‘पहिल्यांदा पक्षात प्रवेश मगच उमेदवारी’ या अटीमुळे त्यांची गोची झाली. पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत वारंवार बैठका झाल्या. यात नाशिक आणि पुणे येथील बैठकीत राज्यातील मोजक्या लोकसभा मतदारसंघांपैकी जळगाव आणि रावेरची जागा लढविण्याचेही निर्देश देण्यात आले. यात जळगावसाठी विनय भोईटे तर रावेरसाठी जमील देशपांडे यांच्या नावाला मंजुरीही मिळाली. मात्र खुद्द राज ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले नसल्याने स्थानिक पातळीवरही आपल्या नेत्याच्या भुमिकेविरूध्द न जाता पदाधिकार्‍यांनीही तुर्तास तरी शांत राहणेच पसंत केले आहे.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मनसेला अद्याप लक्षणीय यश मिळाले नसले तरी गत विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांनी मिळवललेली मते पाहून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर व जळगाव ग्रामीण, पाचोरा, चोपडा आदी मतदारसंघांवर पुर्ण लक्ष केंद्रीत करून अन्य ठिकाणी सक्षम पर्यायांचा शोध घेण्याचे प्रयत्न पक्षातर्फे सुरू आहे. यात अचूक व्यूहरचना जुळून आल्यास मनसे विधानसभेत खाते खोलण्याची शक्यता आहे. यामुळे मनसेचे खरे लक्ष्य हे विधानसभाच आहे. मात्र त्यापुर्वी होत असणार्‍या लोकसभेत आपली शक्ती आजमावण्याची संधी पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे सोडणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार करता जळगाव लोकसभा मतदारसंघात सुमारे एक लाख त्रेसष्ट हजार तर रावेर मतदारसंघातून ८० हजार मते मनसेच्या उमेदवारांना मिळाली आहेत. यातील कितींचे रूपांतर लोकसभेच्या मतांमध्ये होते याची चाचपणीही या निवडणुकीत होऊ शकते. तसेच यातून विधानसभेचे गणितही काही प्रमाणात नजरेस येऊ शकते. एका अर्थाने खुंटा हलवून बळकट करण्याची नामी संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मनसेला मिळाली आहे. यामुळे जय-पराजयाचा दावा न करता दोन्ही मतदारसंघ लढविणे केव्हाही सोयिस्कर ठरणार आहे.

मनसेतर्फे गेल्या काही वर्षांमध्ये जनहितार्थ करण्यात आलेली आंदोलने आणि कान्याकोपर्‍यात असलेले समर्थक हे या पक्षाचे बलस्थाने आहेत. विशेषत: पतपेढ्यांच्या विषयावर कोणत्याही राजकीय पक्षाने तोंड उघडले नसतांना जमील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या प्रदीर्घ आंदोलनामुळे शेकडो ठेविदारांना दिलासा मिळाला आहे. यातील बहुतांश ठेविदार रावेर लोकसभा मतदारसंघातील असल्याने जमील देशपांडे यांना या मतदारसंघातून तयारीस लागण्याचे सांगण्यात आले आहे. याच्या जोडीला रावेरमधील मुस्लीम मतदारसंख्येचे गणित आणि राज्य पातळीवर अल्पसंख्य पदाधिकार्‍याला दिलेल्या उमेदवारीचा सकारात्मक संदेश या बाबीही पक्षाला उपयोगी पडणार्‍या आहेत. इकडे जळगाव महापालिकेतील मनसेच्या ताकदीसह जळगाव लोकसभा मतदारसंघात शाखांचे विणलेले जाळे विनय भोईटे यांच्या उपयोगात पडणार आहे. असे असले तरी दोन्ही उमेदवारांची पुर्ण मदार ही राज ठाकरे यांच्या वलयावर अवलंबून राहणार आहे. यामुळे निवडणूक काळात शक्य झाल्यास दोन्ही वा किमान एका मतदारसंघात त्यांच्या सभेसाठी गळ टाकण्यात आली आहे. अर्थात लाखमोलाचा प्रश्‍न हाच आहे की मनसेच्या या दोन्ही उमेदवारांचा परफॉर्मन्स काय राहणार? या संदर्भात या दोन्ही मान्यवरांशी मी स्वत: चर्चा केली असता त्यांनी कोणताही अवास्तव दावा न करता राज साहेबांच्या ‘आदेशा’प्रमाणे निवडणूक लढविण्याचे ठासून सांगितले.

रविवार दिनांक ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे हे लोकसभेबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी जळगाव व रावेरचाही निर्णय होणार आहे. राज हे धक्कातंत्र देण्यासाठी विख्यात आहेत. या दिवशी ते आपले पत्ते खोलणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार ते मोजक्या ठिकाणी लढण्याची शक्यता आहे. यात जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाचा समावेश असणार की नाही? याचाही उलगडा होणार आहे. अर्थात सध्या तरी मनसेच्या शिलेदारांचे मौन हे राजकीय विरोधकांनाच नव्हे तर पक्षाच्या समर्थकांनाही कोड्यात टाकणारे ठरले आहे. हे मौन सुचक आहे की वादळापुर्वीची शांतता? मनसे उमेदवारांचा फायदा व फटका कुणाला? याची उत्तरेही लवकरच मिळणार आहेत.
===========================

‘गेम चेंजर’ शिवसेनेच्या भुमिकेकडे लक्ष

जळगाव– आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे भलेही उमेदवार नसले तरी युतीधर्म निभावतांना त्यांच्या निष्ठेची कसोटी लागणार आहे. यात ‘खान्देश विकास आघाडी’शी असणारी सलगी व भाजपशी असणारी महायुती यापैकी एकाची निवड करतांना शिवसेना नेत्यांची कसोटी लागणार आहे. यात थोडीफार खटखट झाल्यास लोकसभाच नव्हे तर त्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रदीर्घ वाटचालीत अंतर्गत कलह न टाळण्याजोगे असतात. यातुन २५ वर्षांपेक्षाही जास्त राजकीय सोबत असणार्‍या मित्र पक्षांमध्ये वाद नसल्यास नवलच. नेमकी हीच स्थिती शिवसेना आणि भाजपा या महायुतीच्या दोन प्रमुख पक्षांमधील आहे. राज्यात बर्‍याच ठिकाणी या दोन्ही पक्षांमध्ये कमी-जास्त प्रमाणात धुम्मस आहेच. जळगाव जिल्ह्यात मात्र याचे अत्यंत तीव्र प्रमाण दिसून येत आहे. आज दोन्ही बाजूंचे नेते यावर स्पष्टरित्या बोलत नसले तरी त्यांच्यातील अंतर्गत कलह कुणापासून लपून राहिलेला नाही. जिल्हा परिषदेसह अन्य काही ठिकाणी तर ‘म्हसोबाला नव्हती बायको आणि सटवाईला नव्हता नवरा’ या म्हणीतल्या अपरिहार्यतेप्रमाणे हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. आता लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू होत असतांना शिवसेनेची भुमिका नेमकी काय राहणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असूनही शिवसेनेच्या भुमिकेवर संशय व्यक्त होण्यामागे अनेक कारणे आहेत. यासाठी गेल्या पाच-सात वर्षांमधील घटनांना समजून घेणे आवश्यक आहे.

साधारणत: नव्वदच्या दशकाच्या प्रारंभीच जिल्ह्यात युतीचा बोलबाला सुरू झाला तरी १९९५ ते २००४ हा सेना-भाजपचा सुवर्णकाळ मानायला हवा. राज्य आणि केंद्रातील सत्ता उपभोगल्यानंतर दोन्ही पक्षांमधील कुरबुरीने डोके वर काढले. याचीच परिणिती म्हणून १९९९ साली जिल्ह्यात तब्बल दहा आमदार असणार्‍या युतीचे संख्याबळ २००९च्या विधानसभा निवडणुकीनंतर चार जागांवर आले आहे. या निवडणुकीतील पाडापाडीचे पडसाद पुढच्या वर्षाच्या शेवटी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उमटले. याचेचे धागेदोरे थेट पुढे ‘घरकूल’पर्यंत जुळले. खरं पाहता २००९च्या विधानसभा निवडणुकीत युतीची सत्ता येण्याचे संकेत होते. यामुळे निवडणुकीपश्‍चात आपापल्या पक्षात आपणच आघाडीवर हवे या हव्यासापोटी युतीच्या दोन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण रंगले. यातील सर्व विवरण देणे हा या विश्‍लेषणाचा हेतू नाही. मात्र यातील अंतरंग समजून घेतल्यास पुढील अनेक घटनांचे आकलन होऊ शकते.

या विधानसभा निवडणुकीत पुनर्रचनेत नव्याने समाविष्ट झालेल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांना नवख्या गुलाबराव देवकर यांनी आव्हान दिले. पाटील यांच्यासारख्या कसलेल्या खेळाडूला पराजित करण्याची किमया देवकर यांनी केली. यात या मतदारसंघातील महत्वाचे भाजप पदाधिकारी उघडपणे देवकर यांच्यासोबत फिरल्यामुळे आपला पराजय झाल्याची सल गुलाबराव पाटील यांनी अनेकदा जाहीररित्या आणि खासगीत व्यक्त केली आहे. या भाजप पदाधिकार्‍यांना एकनाथराव खडसे यांनी ‘आवरले’ नसल्याचाही त्यांनी आरोप केला. अर्थात खुद्द खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांचा विरोधी पवित्रा असल्याचा आरोप करण्यात आला. या निवडणुकीत खडसे यांनी सहज विजय मिळवला तरी गुलाबराव पाटील मात्र पराजीत झाले. येथून युतीधर्माच्या चिंधड्या उडण्यास सुरूवात झाली. एकनाथराव खडसे यांचा हिशोब चुकता करण्यासाठी शिवसेनेला नामी संधी चालून आली ती २०१०च्या शेवटी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत!

विधानपरिषदेची जागा भाजपकडे असल्याने यासाठी एकनाथराव खडसे यांचे पुत्र निखील यांना मैदानात उतरवले. त्यांच्याविरूध्द राष्ट्रवादीने अनिल चौधरी यांना उतारले. मात्र राष्ट्रवादीचे खासदार ईश्‍वरबाबूजी यांचे पुत्र मनीष जैन यांनी अचानक अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांना आ. सुरेशदादा जैन यांनी आशिर्वाद दिले. निवडक अपवाद वगळता बहुतांश शिवसेना जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांनी मनीष जैन यांना पाठबळ दिले. (याचा त्यांना घसघशीत मोबदला मिळाला ही बाब वेगळी!) परिणामी निखील खडसे हे निसटत्या मतांनी पराजित झाले. या पराजयानंतर शिवसेना नेत्यांचा आनंद कुणापासून लपून राहिला नाही. याचा परिणाम पुढील वर्षी (२०११)च्या अखेरीस झालेल्या नगरपालिका आणि त्यानंतरच्या जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत दिसून आला.

नगरपालिका निवडणुकीत धरणगाव-चोपड्याचा अपवाद वगळता शिवसेनेचे उमेदवार हे आ. सुरेशदादा जैन यांच्या ‘खान्देश विकास आघाडी’च्या तिकिटावर लढले. या आघाडीला पाचोरा येथे सत्ता मिळाली तरी भुसावळात मोठ्या मत विभाजनाने पुन्हा राष्ट्रवादी सत्तारूढ झाली. आज खान्देश विकास आघाडीचे जळगाव महापालिकेसह पाचोरा, भुसावळ, यावल येथे सदस्य आहेत. यानंतर जिल्हा परिषदेत गत निवडणुकीप्रमाणे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढून नंतर अपरिहार्यरित्या एकत्र आले. जिल्हा परिषदेत सत्ताधारी असूनही दोन्ही पक्ष एकमेकांवर सातत्याने निशाणे धरतात ही बाब कुणापासून लपून राहिलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर आता लोकसभेत शिवसेनेची भुमिका काय राहणार? हा प्रश्‍न उरतोच.

शिवसेनेच्या नेत्यांची पक्ष म्हणून आ. सुरेशदादा यांच्याशी तर; खडसे यांचा हिशोब चुकता केल्यामुळे मनीष जैन यांच्याशी सलगी आहे. या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघातून आ. सुरेशदादा व पर्यायाने खान्देश विकास आघाडी ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याची पडद्याआड तडजोड करण्यात आल्याचे स्पष्ट संकेत आहेत. गेल्या आठवड्यात या अनुषंगाने भुसावळातील बियाणी चेंबर्सवर गुप्त बैठकही पार पडली. याचप्रमाणे आता आ. सुरेशदादा यांचे नाव क्षणभर बाजूला ठेवले तरी आ. चिमणराव पाटील, गुलाबराव पाटील, कैलासबापू पाटील, किशोरआप्पा पाटील, चंद्रकांत पाटील, मनोज बियाणी आदी नेत्यांच्या भुमिका महत्वाच्या ठरणार आहे. या नेत्यांनी आपले पाठबळ पुर्णपणे भाजप उमेदवारांच्या पाठीशी उभे केल्यास त्यांची विजयाची शक्यता वाढणार आहे. मात्र त्यांनी दगा दिल्यास भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या अडचणी वाढू शकतात. अर्थात भाजपसमोर अडचणी आल्यास याचे सरळ पडसाद या वर्षाच्या शेवटी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत उमटणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.

सद्यस्थितीत ना. एकनाथराव खडसे, आ. सुरेशदादा जैन, आ. गिरीश महाजन आणि आ. चिमणराव पाटील यांची आपापल्या मतदारसंघावर पकड असल्याने मित्रपक्षांनी उघड विरोध केला तरी विधानसभेच्या परिक्षेत ते उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र अन्य ठिकाणी पुन्हा पाडापाडीचा खेळ रंगू शकतो. जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, पाचोरा-भडगावमधून किशोरआप्पा पाटील, भुसावळातून राजेश झाल्टे यांच्या मार्गात भाजपने काटे पेरल्यास याची परिणीती त्यांच्या पराभवात होण्याचा धोका आहे. याचप्रमाणे चाळीसगावातील भाजपचे संभाव्य उमेदवार उन्मेष पाटील तर अमळनेरातील अनिल भाईदास पाटील यांना शिवसेना अडचणीत आणू शकते. चोपडा मतदारसंघात भाजप तर यावल-रावेरमध्ये शिवसेनेची ताकद फारशी नसल्याने दोन्ही बाजू एकमेकांचे फारसे नुकसान करू शकणार नाहीत. मात्र लोकसभेत शिवसेनेने पडद्याआड राष्ट्रवादीला मदत केल्यास २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातून युतीच्या हातात फार काही लागणार नाही. या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची भुमिका निर्णायक राहणार आहे. मात्र ‘खान्देश विकास आघाडी’ की महायुती? या प्रश्‍नावर त्यांना सामंजस्याने व पुर्ण विचारांती निर्णय घ्यावयाचा आहे.

भुसावळ येथे काही दिवसांपुर्वी ‘संघर्षयात्री’ पुरस्कार वितरणाच्या समारंभात गुलाबराव पाटील यांनी ‘आता पुरे झाले…’ असे सुचक वक्तव्य केले असता ना. खडसे यांनीही ‘छोडो कल की बाते, कल की बात पुरानी नए दौर में लिखेंगे, मिल कर नई कहानी’ म्हणत झालं-गेलं गंगेला मिळाल्याचे जाहीररित्या सांगितले होते. अर्थात नजीकच्या काळातील जखमा विसरत मैत्रीची ‘नई कहानी’ लिहणं खरंच इतकं सोपं आहे? याचे उत्तर तर येणार्‍या काही दिवसांमध्येच मिळणार आहे.

(या लेखमालेविषयी बरेवाईट मत माझ्याशी आपण ९२२६२१७७७० या क्रमांकावर मांडू शकतात. आपण माझ्या https://shekharpatil.com या ब्लॉगलाही अवश्य भेट द्यावी.)

shivsena_leaders

(4/3/2013)
===========================

========================

जातीच्या राजकारणाला गंभीर मर्यादा

जळगाव-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जातीय समीकरणांची नव्याने चर्चा होऊ लागली आहे. मात्र जिल्ह्यातील आजवरचा राजकीय इतिहास पाहता जातीय राजकारणाला खूप मर्यादा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याचसोबत बहुतांश मातब्बर राजकारणी हे आपापल्या मतदारसंघात अल्पसंख्य समाजाचे घटक असल्याचेही निदर्शनास आले आहे.

आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी पौष्टिक चौरस आहार 4 photo आवश्यक असतो. क्वचितप्रसंगी आजारपण अथवा भोजनातील अनियमिततेमुळे डॉक्टर आपल्याला ‘टॉनिक’ची शिफारस करतात. यामुळे आपला कमकुवतपणा दुर होऊन शरीराची झिज झपाट्याने भरून निघते. आता गमतीचा भाग असा की, टॉनिक हे अत्यंत पोषक आणि चविलाही बर्‍यापैकी असले तरी ते भोजनाची जागा घेऊ शकत नाही. कुणी जेवणाऐवजी त्याचेच सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. नेमके राजकारणातही जातीचे स्थान एखाद्या टॉनिकसमानच आहे. ते ‘सपोर्टिव्ह’ असले तरी जीवनदायी नाही तसेच ‘अति झाल्यास वाईटच’ हे लक्षात घेणे गरजेचे आहे. एखाद्या राजकारण्याचे कमकुवत दुवे सांधून त्याला मजबुती प्रदान करण्याचे काम जात करते मात्र निव्वळ जातीच्या बळावर कुणी आयुष्यभर राजकारणाचा गाडा हाकू शकत नाही. किंवा एखाद्या जातीचा परिपुर्ण पाठींबा असूनही कुणी राजकारणातील सर्वोच्च शिखर गाठू शकत नाही. विश्‍वास पटत नसेल तर आपल्या आजवरच्या पंतप्रधानांच्या यादीवरून नजर फिरवा. यातील एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्व पंतप्रधान हे अल्पसंख्य जाती समुहाचे घटक आहेत. असे असूनही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारणातील यशाची प्रथम पायरी ‘जात’ असावी ही आपल्या लोकशाहीसाठी दुर्दैवी बाब आहे.

आता लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. यामुळे संपूर्ण भारताप्रमाणे आपल्या जिल्ह्यातही राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे. यात सर्वप्रथम जातीच्या गणिताचेच गुर्‍हाळ सुरू झाले आहे. बहुतांश उमेदवारांनी मतदारसंघाची जातीनिहाय आकडेवारी सज्ज ठेवली आहे. अगदी नगरपालिकेच्या एखाद्या वॉर्डाचीदेखील जातीनिहाय जनगणना करणे अशक्य असल्याने कुणी १५-१७ लाख लोकसंख्येतून जातीचे अगदी अचूक वर्गिकरण कसे करू शकतात हे न उलगडणारे कोडे आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील शेकडो जणांना मी त्यांच्याकडे कुणी जात विचारण्यासाठी आले होते का? अशी विचारणा केली असता सर्वांनी नकार दिला. यामुळे जनमत चाचण्यांप्रमाणे हादेखील फार मोठा ‘फ्रॉड’ आहे. अर्थात बहुतांश चतुर एजन्सीज या चक्क मतदारयादीतून आडनावे पाहून आकड्यांचा ‘खेळ’ करत असावेत असा अंदाज आहे. आता पाटील, चौधरी, महाजन आदींसारखी अनेक आडनावे डझनवारी जातींमध्ये आहेत तर देशपांडे, देशमुख, पटेल आदी आडनावांचे हजारो मुस्लीम मतदार जिल्ह्यात आहेत. यामुळे आडनावांवरून ‘अमक्या जातीचे इतके तर तमक्या जातीचे तितके’ हा काढलेला निष्कर्षच अशास्त्रीय आहे. यातच ‘आपण या जातीचे तर आपल्यामागे इतके तर त्याच्यामागे तितके!’ ही विचारधाराही भ्रमित करणारी आहे. आपल्या जिल्ह्यातील बहुतांश मातब्बर राजकारण्यांच्या यशाचे रहस्य जात नसून त्यांचे कार्य होते, ही बाबही आपण जाणून घेणे गरजेचे आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि पारोळा विधानसभा मतदारसंघातूनच फक्त आजवर एकाच जातीचे आमदार निवडून येत आहेत. याशिवाय अन्य तालुक्यांनी सातत्याने सर्व जातीच्या राजकारण्यांचे यश पाहिले आहे. गेल्या जमान्यातील दिग्गज राजकारणी म्हणून अजरामर झालेले कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी आणि देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावरून निवृत्त झालेल्या सौ. प्रतिभाताई पाटील या दोन्ही मान्यवरांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांच्या जातीचे मतदार हे निर्णायक अवस्थेत नव्हते. मात्र समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांचे प्रेम त्यांना लाभले. आपल्या कर्तबगारीने त्यांनी अनुक्रमे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले. आजच्या काळातील दोन प्रमुख राजकारणी अर्थात विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे व आ. सुरेशदादा जैन हे आपापल्या मतदारसंघात अल्पसंख्य समुहाचे प्रतिनिधी आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघात लेवा पाटीदार जाती समुह अल्पसंख्य असतांनाही गत २५ वर्षांपासून ना. खडसे यांनी यशस्वी राजकारण केले असून आज ते राज्यातील महत्वाच्या नेत्यांमध्ये गणले जातात. आ. सुरेशदादा जैन हे तर अत्यल्पसंख्य समुहातून आलेले असले तरी त्यांनी मंत्रीपदासह महत्वाची पदे भुषविली आहेत. याचप्रमाणे विद्यमान राज्यसभा सदस्य ईश्‍वरबाबूजी जैन हे अल्पसंख्य असूनही जामनेर तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भुमिका बजावून जिल्हा आणि केंद्रीय पातळीवर पोहचले आहेत. मनोरंजक बाब म्हणजे बाबूजींच्या जामनेर तालुक्यातील वर्चस्वाला आव्हान देणारे विद्यमान आमदार गिरीश महाजन हेदेखील आपल्या विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्य असणार्‍या जाती समुहाचे घटक आहेत. सर्वसाधारण जनतेच्या हाकेला ओ देत धावून जाणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे.

सध्या विधानसभा पुनर्रचनेत बाद झालेल्या एरंडोल-धरणगाव विधानसभा मतदारसंघाने पारूताई वाघ, महेंद्रबापू पाटील, हरीभाऊ महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या बहुसंख्य समुदायाचे नसणार्‍या आमदारांना निवडून दिले आहे. यातील गुलाबराव पाटील यांनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग व्यापक करत मुस्लीम समुदायातील आपल्या समर्थकाला (सलीम पटेल) नगराध्यक्षपदी बसविण्याचाही चमत्कार केला हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते. गुलाबराव देवकर यांनी त्यांना गत निवडणुकीत पराभूत केले असले तरी यामागे जातीसह अन्य खूप घटक कारणीभूत होते. याच प्रकारे सातत्याने कै. के.एम. बापू पाटील आणि कै. ओंकारआप्पा वाघ यांच्यात रस्सीखेच होणार्‍या पाचोरा तालुक्यात आर.ओ. तात्या पाटील यांनी बहुसंख्यांक राजकारणाला धक्का देत तब्बल दहा वर्षे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. २००९च्या निवडणुकीत त्यांना आ. दिलीप वाघ यांनी पराभवाचा धक्का दिला असला तरी या वर्षाच्या अखेरीस होणार्‍या निवडणुकीत त्यांचे राजकीय वारसदार किशोरआप्पा पाटील हे वाघ यांना आव्हान देण्याचे जवळपास निश्‍चित आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आरक्षित असतांना अल्पसंख्य समाजघटकांना संधी मिळाली आहे. २००९ साली राजीवदादा देशमुख यांनी बाजी मारली असली तरी या मतदारसंघातील जातीचा प्रभाव समजण्यासाठी अजून एक-दोन पंचवार्षिक वाट पाहणे आवश्यक आहे. इकडे चोपडा विधानसभा मतदारसंघात अरूणभाई गुजराथी यांनी अत्यल्पसंख्य समाजघटकाचे असतांनाही २० वर्षे अधिराज्य गाजविले. यावल मतदारसंघातून गत काही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये लेवा पाटीदार समुदायाच्या उमेदवारांना यश लाभत असले तरी येथून कै. रमाबाई देशपांडे यांनीही विधानसभेवर प्रतिनिधीत्व केले होते.

जातीच्या राजकारणात भुसावळचा उल्लेख विसरून चालणार नाही. या बहुरंगी मतदारसंघाने मुस्लीम आमदारही निवडून दिलेला आहे. मध्यंतरी तीस वर्षे हा मतदारसंघ लेवा पाटीदार समाजाच्या उमेदवारांकडे असला तरी संतोष चौधरी यांनी या वर्चस्वाला सुरूंग लावला. आजही चौधरी हे राजकारणातही एक महत्वाचे केंद्र आहे. त्यांच्या विरूध्द बाजूची धुरा मनोज बियाणी या अल्पसंख्य समुहातील राजकारण्याकडेच आहे. हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत संजय सावकारे यांच्या समाजापेक्षा राजेश झाल्टे यांच्या समाजाची मते जास्त असतांनाही ते पराभूत झाले होते ही बाब लक्षणीय आहे. विधानसभेप्रमाणेच नगरपालिकादी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही अल्पसंख्यांकांना योग्य सत्तेचा वाटा मिळाला आहे. वर नमूद केल्याप्रमाणे पारोळा-एरंडोल आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघात एकाच समूहाचे राजकीय प्राबल्य असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत पारोळ्यातून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र जयवीरसिंग पाटील तर अमळनेरातून सध्या तरी अपक्ष असणारे शिरीष हिरालाल चौधरी हे आव्हान देणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आता लोकसभेचा विचार करता येथेही जातीच्या राजकारणाच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जळगाव जिल्ह्याच्या आजवर जळगाव, एरंडोल, पुन्हा जळगाव, रावेर आदी लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघातही जिल्ह्यातील काही तालुके होते. जळगावातून (तेव्हाचा पुर्व खान्देश मतदारसंघ)- हरीभाऊ पाटसकर व नौशीर कुरूसेतजी भरूचा; जळगावातून- एस.एस. समदाली व के.एम. पाटील; एरंडोलमधून-सोनुसिंग धनसिंग पाटील, विजय नवल पाटील, उत्तमराव पाटील, एम.के.अण्णा पाटील, वसंतराव मोरे तर जळगावातून ए.टी.नाना पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. यात साहजिकच अल्पसंख्य समुहाच्या राजकारण्यांनाही यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

पुर्वीच्या बुलढाणा, मध्यंतरीच्या जळगाव आणि सध्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून शिवराम रंगो राणे, वाय.एस. महाजन, वाय.एम. बोरोले, गुणवंतराव सरोदे, डॉ. उल्हास पाटील, वाय.जी. महाजन आणि हरीभाऊ जावळे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. यात योगायोगाने लेवा पाटीदार जातीचे सर्व उमेदवार निवडून आले असले तरी हा समुदाय वर नमूद केलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यच होता व आहे ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. २००७ साली झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराने जातीय आकडेवारीचा आधार घेऊन एकाच समाजाला प्रतिनिधीत्व का? असा जाहीर प्रश्‍न विचारूनही त्याचा दारूण पराभव झाला होता. याचाच अर्थ की जातीय राजकारणाला मतदारांनी थारा दिलेला नाही.

या मतदारसंघातून लेवा पाटीदार समुहाचे उमेदवार विजयी होण्याचे एकच रहस्य म्हणजे बदलत्या राजकीय वातावरणात त्या-त्या राजकीय पक्षांमध्ये या समुहाचे मातब्बर उमेदवार उपलब्ध होते. यामुळे कॉंग्रेसच्या चलतीच्या काळात शिवराम रंगो राणे व वाय.एस. महाजन, १९७७च्या कॉंग्रेसविरोधी लाटेत भारतीय लोकदलाचे वाय.एम. बोरोले, पुन्हा कॉंग्रेसची लोकप्रियता वाढल्यानंतर वाय.एस. महाजन आणि १९९०नंतरच्या भाजप लाटेत डॉ. उल्हास पाटील यांना मिळालेल्या १३ महिन्यांचा अपवाद वगळता डॉ. गुणवंतराव सरोदे, वाय.जी. महाजन आणि हरीभाऊ जावळे यांना संधी मिळाली आहे. यामुळे आताही जातीच्या समीकरणाची थिअरी अगदी वरवरची आहे. याचेच द्योतक २००९च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. ‘सिंगल लार्जेस्ट’ असणार्‍या मराठा समुहातील रवींद्रभय्या पाटील हे राष्ट्रवादीच्या पारंपरिक मुस्लीम आणि दलित मतदारांची मदत होऊनही पराभूत झाले होते. यामुळे आता हरीभाऊ जावळे यांच्या विजयाची मदार ही त्यांच्या जातीपेक्षाही भाजपच्या लोकप्रियतेवर अवलंबून आहे. यावर मनीष जैन यांना मात करावयाची असल्यास त्यांना जाती-पातीच्या गणितापेक्षा विकासाचा अजेंडा, केंद्र आणि राज्य सरकारचे विविध लोकल्याणकारी निर्णय, राष्ट्रवादीची ध्येयधोरणे आणि आपल्या पक्षाचा सेक्युलर विचार मतदारांसमोर नेणे गरजेचे आहे. एका अर्थाने हरीभाऊ जावळे यांच्यासाठी जात तर मनीष जैन यांच्यासाठी त्यांची अर्थशक्ती ही ‘टॉनिक’चे काम करणार आहे. हरीभाऊ फक्त जातीवर विसंबून राहिल्यास त्यांची अवस्था २००४च्या विधानसभा निवडणुकीतील भुसावळातल्या दिलीप भोळे यांच्याप्रमाणे होण्याचा धोका आहे. भोळे हे जातीच्या पाठींब्यावर अवलंबून राहिल्याने संतोष चौधरी यांनी त्यांना अस्मान दाखविले होते. इकडे मनीषदादा जर फक्त पैशांवर अवलंबून राहिले तर १९८९च्या लोकसभा निवडणुकीतील आ. सुरेशदादा जैन यांच्याप्रमाणे त्यांची अवस्था होण्याचा धोका आहे. त्या निवडणुकीत दादांनी अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च करूनही त्यांचा दारूण पराभव झाला होता. एका व्यापक अर्थाने ही निवडणूक जातीपेक्षा संबंधित पक्षाची लोकप्रियता आणि विकासाच्या मुद्यावरच जिंकता येणार आहे.

एकंदरीतच कर्तबगार व्यक्तीला जातीच्या कुबड्या घेण्याची आवश्यकता नसते. यातच लोकसभा निवडणूक ही पक्षाची ताकद व लोकप्रियता (विशेषत: पक्षाचे कॅडर), संबधित राजकीय पक्षाचा देशाच्या विकासाबाबतचा अजेंडा, उमेदवाराची स्वत:ची प्रतिमा, त्यांचा मतदारसंघासाठीचा विकास आराखडा आदींवर अवलंबून असते. यात जातीची थोडीशी भुमिका असते. अहो, एखाद्या घरातील चार डोक्यांचेही कोणत्याही विषयावर एकमत होत नाही तर हजारो-लाखोंच्या संख्येने असणारा जातसमुह हा एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभे राहील याची कल्पना करणे कसे शक्य आहे?

(टीप-आजच्या राजकीय विश्‍लेषणात मी जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकांना मुद्दाम स्थान दिले नाही. खरं तर नजिकच्या काळात येथून निवडून आलेली शरद वाणी, डॉ. गुरूमुख जगवाणी आणि मनीष जैन ही सर्व मंडळी अल्पसंख्य जाती समुहाची घटक आहेत. मात्र ही निवडणूक थेट जनतेतून होत नसून यात अर्थकारणाचा प्रभाव उघड असल्याने याचा उल्लेख मी टाळला हे नम्रपणे नमूद करतो. याचप्रमाणे नगराध्यक्षादी निवडीतही काही प्रमाणात अर्थकारणाचा प्रभाव असल्याने तेदेखील उल्लेख टाळले.)

या लेखमालेविषयी बरेवाईट मत माझ्याशी आपण ९२२६२१७७७० या क्रमांकावर मांडू शकतात. आपण माझ्या https://shekharpatil.com या ब्लॉगलाही अवश्य भेट द्यावी.

===============================

शरद पवार यांचा ‘मास्टर स्ट्रोक’!

all photo
जळगाव– राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ना.शरदराव पवार यांनी धक्कातंत्र अवलंबत मनीषदादा जैन यांना रावेरची उमेदवारी देत त्यांना राजीनामा देण्याचेही आदेश दिले. मनीषदादांच्या माध्यमातून ‘७ शिवाजीनगर जळगाव’शी सलोखा राखत पवार यांनी जळगाव मतदारसंघातही लाभ होण्याचे गणीत तर मांडलेच, पण रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेचे असंतुष्टांना स्वप्न दाखवत लोकसभेत त्यांच्याकडून कसून मेहनत करण्याची तजवीजही त्यांनी केली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी या दोन प्रतिस्पर्धी पक्षांच्या जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीबाबत उठलेल्या वावड्या अखेर विरल्या आहेत. भाजपने विद्यमान खासदारांवर विश्‍वास व्यक्त करत त्यांना पुन्हा रणांगणात उतारले असून राष्ट्रवादीने जळगावातून डॉ. सतीश पाटील तर रावेरमधून मनीष जैन यांना उमेदवारी जाहीर केली. यात सर्वाधीक आश्‍चर्य रावेरच्या जागेबाबत व्यक्त करण्यात आले. अरूणभाई गुजराती, रवींद्रभय्या पाटील, दिलीपराव सोनवणे आदी निष्ठावंत दिग्गजांना डावलून आयात केलेल्या मनीषदादांना दिलेली उमेदवारी ही आश्‍चर्यकारक असली तरी यातून मांडलेले राजकीय गणित समजून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदराव पवार यांचे राजकीय चातुर्य लक्षात घेणे गरजेचे आहे.

सध्याची लोकसभा निवडणूक ही शरदरावांच्या पंतप्रधानपदासाठी शेवटची असल्याचे मानले जात आहे. निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाल्यास दोन आकडी खासदारांचे बळ आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील मित्रमंडळीच्या पाठींब्याने देशाचे सर्वोच्च पद काबीज करण्याची त्यांची खेळी आहे. यातून एकेक जागेसाठी ते दक्ष आहेत. प्रारंभी दिग्गज मंत्र्यांना लोकसभेत पाठविण्याची घोषणा करून त्यांनी मातब्बरांच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली. मात्र यादी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ यांचा अपवाद वगळता अन्य ज्येष्ठ मंत्र्यांना ‘दिलासा’ मिळाल्याचे दिसून आले. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी त्यांनी शेवटच्या क्षणाला सर्वांना धक्का दिला. डॉ. सतीश पाटील यांना आ. गुलाबराव देवकर यांच्याऐवजी तिकिट मिळाले हे स्पष्ट असले तरी मनीष जैन यांना तिकिट देतांना त्यांनी या एका निर्णयात अनेक हेतू साध्य केले.

गेल्या वेळी प्रचंड मतांनी पराभूत झालेल्या जळगावच्या जागेबाबत ‘खान्देश विकास आघाडी’ आणि पर्यायाने आ. सुरेशदादा जैन यांच्याशी हातमिळवणी करणे आवश्यक असल्याची जाणीव शरद पवार यांना असेलच. याचमुळे महापालिका निवडणूक राष्ट्रवादीने ‘अंगात’ आणली नाही. यानंतर ‘खाविआ’ला राष्ट्रवादीने विनाशर्त पाठींबा देऊन सुचक संकेत दिले. असे असले तरी ‘खाविआ’चा सक्रीय पाठींबा मिळवण्यासाठी आ. सुरेशदादा जैन यांच्या निकटचा एखादा मोहरा हाताशी धरण्याचे तंत्र अवलंबण्यात आले. यातूनच किशोर पाटील आणि विष्णू भंगाळे या दोन्ही माजी महापौरांनी लोकसभेत ‘इंटरेस्ट’ दाखविला. मात्र गोष्ट पुढे सरकलीच नाही. यानंतर राष्ट्रवादी श्रेष्ठींनी आ. सुरेशदादा जैन आपले राजकीय गुरू मानणार्‍या आ. मनीषदादा यांनाच थेट तिकिट देऊन ‘हुकमी एक्का’ हाती घेतला आहे.
खरं तर राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील मराठ्यांचा पक्ष ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी लेवा पाटीदार या तशा अल्पसंख्य मात्र रावेर लोकसभेत बहुसंख्य समुदायाला जवळ करावे अशी स्थानिक नेत्यांची दीर्घ काळापासूनची मागणी आहे. मात्र याऐवजी शरद पवार यांनी मनीषदादा जैन यांच्यासारख्या अत्यल्पसंख्य समुदायातील तरूणावर जबाबदारी टाकली आहे. खुद्द मनीष जैन यांनी लोकसभेची कधीपासूनच तयारी सुरू केली होती. जामनेर या त्यांच्या तालुक्यासह प्रत्येक तालुक्यात त्यांचे समर्थक आहेत वा नजीकच्या काळात तयार करण्यात आले आहेत. याला मनीषदादांची अर्थशक्ती व राष्ट्रवादीच्या ‘व्होट बँके’ची जोड मिळाल्यास भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होऊ शकतो असा होरा मांडण्यात आला आहे. यासोबत जळगाव लोकसभा मतदारसंघात डॉ. सतीश पाटील यांच्या पाठीशी ‘खान्देश विकास आघाडी’ खंबरीपणे उभे राहण्याची ‘बोली’ करण्यात आली असावी. हे सारे होत असतांना मनीषदादांच्या उमेदवारांनी रावेर मतदारसंघातील तमाम इच्छुक मातब्बर हिरमुसले असून याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यताही लक्षात घेतली असावी. यातूनच मनीषदादांना विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले असावेत. यामुळे रवींद्रभय्या, अरूणभाई, चौधरी बंधू, दिलीपतात्या सोनवणे आदी दिग्गजांना विधानपरिषदेचा शब्द देण्यात येईल. कदाचित ‘कोण आपल्या तालुक्यातून सर्वाधीक लीड देतो त्यालाच विधानपरिषद’ अशी अटही टाकण्यात येईल. परिणामी ‘साहेबांचा आदेश आणि विधानपरिषदेचे स्वप्न’ या बाबींमुळे त्यांना झटून काम करणे भाग पडेलच! यातून रावेर आणि जळगाव या दोन्ही जागांवर सरशी होण्याचा अंदाज बांधण्यात आला असावा.

एका अर्थाने शरदराव पवार यांच्या ‘मास्टर स्ट्रोक’ने अगदी स्वकीयांसकट विरोधकांनाही image descriptionगोंधळात टाकले आहे. यात ते यशस्वी झाल्यास दोन बहुमुल्य खासदारांनी राष्ट्रवादीचे बळ तर वाढलेच; पण ए.टी.नाना यांना आयात करून त्यांना खासदार करण्याच्या ना. एकनाथराव खडसे यांच्या खेळीची परतफेडही होणार आहे. अर्थात जळगाव आणि रावेरमध्ये राष्ट्रवादीच्या विजयात अत्यंत प्रबळ असणारे भाजपचे उमेदवार, मोदींची असणारी लाट, सत्ताधार्‍यांवरील नाराजी, मनसे-आप सारख्या पक्षांचे उमेदवार आणि अपक्षांसह अनेक अडथळे आहेत. यात शिवसेना, कॉंग्रेसच्या भुमिकाही महत्वाच्या राहणार आहेत. अर्थात या लोकसभा निवडणुकीत शरदराव पवार यांच्या राजकीय खेळीमुळे चांगलाच रंग भरणार आहे.

(1 march 2014)

===================

काकाने दिला धोका… पुतण्याने साधला मोका!

भुसावळ (प्रतिनिधी)-काही दिवसांपूर्वी संतोष चौधरी यांना जाहिररित्या काका-काका करतांना न थकणार्‍या उल्हास नारायण पाटील यांनी आपल्याशी दगाबाजी झाल्याचे कळताच काकांनाच इंगा दाखविल्याने शहरात आता ‘काकाने दिला धोका… पुतण्याने साधला मोका’ अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, तब्बल २० वर्षांनंतर शहरातील जुना सातारा परिसर पुन्हा राजकीय केंद्रबिंदू बनल्याचे दिसून येत आहे.

भुसावळच्या राजकीय इतिहासामध्ये जुना सातारा आणि विठ्ठल मंदिर वॉर्ड या दोन्ही परिसरांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. क्वचित प्रसंगी या दोन्ही भागातील राजकारण्यांमध्ये खुन्नस असली तरी भुसावळची सूत्रे येथूनच हालत होती. विठ्ठल मंदिर वॉर्डातील फालक तर जुना सातार्‍यातील भोळे व पाटील कुटुंब राजकीय क्षेत्रातील मातब्बर म्हणून गणले जात होते. आजही या घराण्यांमधील पुढची पिढी राजकारणात असली तरी तापीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. याला सुरवात झाली १९९१च्या निवडणुकीपासून! त्या वेळी भुसावळचे ‘किंग’ असणारे देविदासदादा भोळे यांना त्यांच्या वॉर्डातून (जुना सातारा) कै. नरेंद्र मधुकर पाटील यांनी धुळ चारली. या धक्क्यातून भोळेदादा सावरले नाहीत. यातच १९९५च्या निवडणुकीतही त्यांचा पराजय झाला. यामुळे ते बाजूला फेकले गेले. दुर्दैवाने नरेंद्र पाटील यांचा अकाली मृत्यू झाला. दरम्यान, भुसावळ नगरपालिकेवर शिवसेनेने कब्जा केला. इकडे संतोष चौधरींनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष ते नगराध्यक्ष अशी झेप घेतली व भुसावळची राजकीय सुत्रे त्यांच्या हातात आली. १९९९ला शिवसेनेने विधानसभेचे तिकिट नाकारल्यावर संतोष चौधरींनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत अपक्ष निवडणूक लढविली. यावेळी त्यांना अपयश आले मात्र नगरपालिका त्यांच्याच ताब्यात राहिली. नंतर ते पुढे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारही झाले. मध्यंतरीचा अडीच वर्षाचा कालखंड वगळता सध्या नगरपालिका संतोष चौधरींच्या ताब्यात असून आमदारही त्यांचेच समर्थक (संजय सावकारे) आहेत.

बर्‍याच वर्षांपासून भुसावळच्या राजकारणाची संपूर्ण सुत्रे ही शनि मंदिर वॉर्ड (संतोष चौधरी यांचे निवासस्थान) व बियाणी चेंबर्स (शिवसेनेचे अघोषित कार्यालय) येथून हलत होती. आता मनोज बियाणी यांनी राजकारणातून ‘व्हिआरएस’ घेतल्यावर संतोष चौधरी यांचा शहरात तसा एकछत्री अंमल आहे. मध्यंतरी माधुरी फालक यांचा नगराध्यक्ष पदाचा कालखंड वगळता फालक, भोळे आणि पाटील मंडळी काहीशी बाजूला फेकली गेली आहे. आता तीन महिन्यात नगरपालिका निवडणूक होऊ घातली आहे. सध्याच्या परिस्थितीत संतोष चौधरी यांना मात देण्यासाठी विरोधक एकवटणार की नाहीत? हे कळणे अस्पष्ट आहे. मात्र भोळे व फालक मंडळीने दंड थोपटले आहे. यातच भाजपा नगरसेवक हेमराज भोळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयात सुनावणीसाठी हजर न झाल्याने अनिल चौधरी आणि त्यांचे समर्थक सध्या कारागृहात आहेत. तर संतोष चौधरी यांना खंडणी प्रकरणी अटक झाली आहे. अनिल चौधरी यांच्या अटकेसाठी हेमराज भोळे तर संतोष चौधरींच्या अटकेसाठी उल्हास नारायण पाटील हे कारणीभूत ठरले आहेत. याचमुळे जुना सातारा भागातील हालचाली गतिमान झाल्या आहेत.

हेमराज भोळे यांच्याशी ‘कॉम्प्रमाईज’ करण्यासाठी चौधरी बंधूंनी जंगजंग पछाडले आहे. मात्र भोळे यांनी त्यांना दाद दिली नाही. आता भोळे यांच्यावरील हल्ल्याचा खटला अंतिम टप्प्यात आहे. या खटल्यातील आरोपींवर कलम ३०७ लावण्यात आले आहे. यामुळे गुन्हा सिध्द झाल्यास अनिल चौधरी आणि त्यांच्या समर्थकांना किमान साडे तीन वर्षे इतकी शिक्षा होऊ शकते. यामुळे काहीही झाले तरी नगरपालिका निवडणूक झाल्यानंतरच या खटल्याचा निकाल लागावा अशी रणनिती चौधरी बंधूंनी आखली होती. मात्र खटल्यांना वारंवार अनुपस्थित राहिल्याने अनिल चौधरींना अटक करण्यात आली आहे.

इकडे खंडणी प्रकरणातील एक फिर्यादी उल्हास नारायण पाटील यांनी तर चक्क संतोष चौधरी यांचे खंदे समर्थक मानले जात होते. त्यांनी ‘शहर विकास आघाडी’ला रामराम ठोकून संतोष चौधरी यांच्या गोटात प्रवेश केला होता. उल्हास पाटील फुटल्यानेच चौधरी बंधूंना नगरपालिकेत पुन्हा प्रवेश मिळाला हे कुणी नाकारू शकत नाही. यामुळे जुना सातारा परिसरात जनता त्यांच्यावर खूप संतापली होती. या परिसरात उल्हास पाटील यांनी संतोष चौधरी यांच्या वाढदिवसाला अक्षरश: शेकडो बॅनर्स लावले होते ही बाब भुसावळकर विसरलेले नाहीत. या फलकांवर ‘काका फक्त तुम्हीच’ असे नमूद करण्यात आले होते. संतोष चौधरींसाठी उल्हास पाटील यांनी निष्ठा बदलवली, समाजाचा रोष घेतला व शेवटी अपात्र होऊन नगरसेवक पदावर पाणी सोडले. मात्र काकाने ‘पुतण्या’लाही खंडणी मागण्यापासून सोडले नाही. पाटील यांचे मेहुणे चंद्रशेखर अत्तरदे यांना तब्बल एक कोटीची ‘डिमांड’ करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्यांना धमकावण्यातही आले. यामुळे उल्हास पाटील यांनी अखेर पोलिसांच्या मदतीने संतोष चौधरींना सापळ्यात अडकवले. इतिहासात काकाने पुतण्यावर गारदी(मारेकरी) सोडले होते. भुसावळात मात्र मानलेल्या पुतण्याने काकाचा ‘गेम’ केल्याची चर्चा रंगली आहे.
जुना सातारा भागातील भोळे आणि पाटील कुटुंबांमध्ये अंतर्गत कुरघोडी नेहमी रंगत असते. मात्र या भागाचे वर्चस्व हिसकावणार्‍या चौधरी बंधूंना पाणी पाजण्यासाठी हेमराज भोळे यांच्या पाठोपाठ उल्हास पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. याचा भुसावळच्या राजकीय समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या तरी तब्बल २० वर्षानंतर जुना सातारा परिसर भुसावळच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू पाहत आहे. अर्थात चौधरी बंधूदेखील कसलेले खेळाडू आहेत. ते बदलत्या राजकीय स्थितीचा कसा प्रतिकार करतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती?
उल्हास पाटील यांचे वडील नरेंद्र मधुकर पाटील यांनी १९९१ साली देविदासदादा भोळे यांना पराजीत करून त्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले होते. भोळेदादांनी सुमारे दीड दशक भुसावळवर राज्य केले होते. त्यांना शेवटचा धक्का देण्याचे काम नरेंद्र पाटील यांनी केले होते. आता भुसावळात सुमारे १३ वर्षांपासून एकछत्री अंमल गाजविणार्‍या संतोष चौधरी यांना नरेंद्र पाटील यांचेच पुत्र उल्हास यांनी जोरदार धक्का दिला आहे. यामुळे या प्रकरणातही इतिहासाची पुनरावृत्ती होते का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागून आहे. असे झाल्यास भुसावळच्या दोन बादशहांना धुळीस मिळविण्याचे काम करण्याचा पराक्रम जुना सातार्‍यातील पाटील कुटुंबाच्या नावावर जमा होईल.

( Jul 30, 2011 )

=====================

महिला राष्ट्रवादीत ‘ताईगिरी’!

जळगाव(खा.प्र.)– राष्ट्रवादीच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षा प्रा. अस्मिता पाटील आणि अन्य पदाधिकार्‍यांनी चक्क आपणास धमकी देण्यात येत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. यामुळे आता राजकारणातही ‘ताईगिरी’ सुरू झाली असून याला नेत्यांचे पाठबळ असल्याची चर्चा करण्यात येत आहे.
राजकारणात नेते आणि पदाधिकार्‍यांमध्ये तीव्र चुरस असते. यात आपल्या वर्चस्वासाठी साम-दाम-दंड-भेद वापरण्यात येतात. महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी याला आपल्या जिल्ह्यात तरी आजवर अपवाद होत्या. आता मात्र महिलाही यात मागे नसल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीने दाखवून दिले आहे. अपेक्षेप्रमाणे जिल्हा महिला राष्ट्रवादीत भांडणे सुरू झाली असून आता धमकावण्याचे प्रकारही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. महिला आघाडीच्या नूतन जिल्हाध्यक्षा प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह प्रदेश उपाध्यक्षा सौ. कल्पना पाटील, जिल्हा उपाध्यक्षा सौ. मनोरमा पाटील, महानगराध्यक्षा मीनल पाटील आणि कार्याध्यक्षा लता मोरे यांच्या एका निवेदनाने खळबळ उडाली आहे. त्यात महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील व णन महासंघाच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. मुंबईला नेण्यात आलेल्या शिष्टमंडळाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील या खा. ईश्‍वरबाबूजी जैन यांच्या इशार्‍यावरून राष्ट्रवादीविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. इकडे मंगला पाटील यांना पक्षाने चार वर्षे महानगर अध्यक्षपद दिले. त्या काळात पक्षवाढीसाठी काहीही प्रयत्न केले नाही. नेत्यांच्या मागेपुढे फिरण्यालाच त्या पक्षाचे काम समजत आल्या आहेत, असा आरोप करुन पत्रकात म्हटले आहे की, या महिलेचे सर्व कुटूंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. मंगला पाटील यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून पालकमंत्र्यांच्या नावाचा त्या गैरवापर करत आहेत. अमळनेरचे आमदार साहेबराव पाटील यांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली असल्याचा गौप्यस्फोटही या पत्रकात करण्यात आला आहे.
प्रा. अस्मिता पाटील यांच्या थेट ‘वरून’ झालेल्यानियुक्तीने राष्ट्रवादी महिला आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. मात्र याचे पर्यावसान जर संघर्षात होणार असेल तर ही बाब पक्षाला घातक मानावी लागेल. पदांसाठी भांडण हे निष्ठावंतांना त्यातही महिलांना शोभणारे नाही. यातच अजून एकच पत्रक निघालेय..भविष्यातील पत्रकांमध्ये एकमेकांची उणीदुणी काढतांना कोण कोणत्या पातळीला जाईल हे सांगता येणे अशक्य आहे. अर्थात यात अब्रू मात्र राष्ट्रवादीचीच जाणार आहे. खेदाची बाब म्हणजे हे समजून घेण्यासाठी कुणाला वेळ नाही. महिला कार्यकर्त्या पदांसाठी भांडताहेत…पुरूष नेते पडद्याआड त्यांचे संचालन करताहेत अन् जनता मजा लुटतेय… असे चित्र आज दिसून येत आहे.
जिल्ह्यातील राजकारणात दादागिरी, भाऊगिरी वा भाईगिरी नवीन नाही मात्र आता राष्ट्रवादी महिला आघाडीने ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत ताईगिरी सुरू केलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ना. शरदराव पवार यांच्या पुढाकाराने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू झाले आहे. यामुळे महिलांना आपोआप पदे मिळणारच आहेत. यासाठी भांडण केल्यास तोंडचा घास दुसर्‍या पक्षाची भगिनी पळवून नेणार हे नक्की. अर्थात राष्ट्रवादीतल्या सर्व ताईंनी जणू काही असेच केल्याचा चंग बांधलेला दिसतोय…दुसरे काय!

(Jul 26, 2011 )
==========================

मेहनत मनीष जैन यांची; घाम इतरांना!

आ. मनिष जैन


जळगाव (खा.प्र.)– अत्यंत चुरशीची विधानपरिषद निवडणूक जिंकल्यावर आ. मनीष जैन हे राजेशाही पध्दतीने आमदारकी उपभोगतील असा अंदाज होता. मात्र अशा सर्व भाकितांना धुडकावत या लक्ष्मीपुत्राने रस्त्यावर उतरून झंझावात सुरू केला. याचे जिल्ह्याच्या राजकारणात पडसादही उमटत आहेत. एका अर्थाने मनीष जैन हे मेहनत करत असले तरी घाम मात्र इतरांनाच फुटल्याचे मजेशीर चित्र दिसून येत आहे.

ईश्‍वरबाबूजी जैन यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यावर त्यांचे पुत्र मनीष हे विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याची वार्ता येताच जिल्ह्यात ‘हे भलतचं काय?’ अशी प्रतिक्रिया उमटली होती. याला अनेक कारणे होती. एक तर बाबूजींना खासदारकी मिळाल्यानंतर त्यांच्या मुलास तातडीने आमदारकी मिळणे जवळपास कठीण होते. याशिवाय, व्यावसायिक पातळीवर मनीष जैन यांनी ‘आरएल’चा ब्रँड देशभरात पोहचवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अविरत परिश्रम केले होते. यामुळे विस्तारणार्‍या व्यवसायाच्या गराड्यातून राजकारणाच्या खाचखळग्यात उतरणे सोपे नव्हते. एक प्रकारे अत्यंत चोख व व्यवहारी ‘माईंडसेट’ असणार्‍यांसाठी तर हा ‘तोट्याचा सौदा’ होता. याशिवाय, मनीष जैन यांचे ‘स्टेटस्’ आमदारापेक्षा कमी नव्हते. या पार्श्‍वभूमीवर ते विधानपरिषदेच्या रणांगणातून ऐनवेळी माघार घेतील असा अंदाज होता. मात्र ते अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले व निवडूनही आले. आमदारकी मिळाल्यावर ते आपल्या पदाचा वापर फक्त व्यवसायाच्या विस्तारासाठी करतील व समाजात मिरवून घेतील असेही भाकीत करण्यात आले होते. या सर्व बाबींना फोल ठरवत त्यांनी ‘मिशन खान्देश व्हिजन खान्देश’ या संकल्पनेवर आधारित विकासकामे करण्याचा निर्धार जाहीर केला. या अनुषंगाने जामनेर येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यानंतर शिरपूर तालुक्यातील जलक्रांतीचे अवलोकन करण्यासाठी शेतकर्‍यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौर्‍याला उदंड प्रतिसाद मिळाला. यानंतर शिरपूर येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातही जलसंधारणाची कामे करण्याची घोषणा आ. मनीष जैन यांनी केली होती. या अनुषंगाने जामनेर तालुक्यात या कामांना प्रारंभही करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर आता जळगावात भव्य रोजगार मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.
बाबूजींच्या घराण्याला कोणत्याही राजकीय पदाची नवलाई नाही. मात्र बाबूजी आणि मनीषदादा यांच्यात अनेक बाबी भिन्न आहेत. बाबूजींशी सर्वसामान्य व्यक्ती जाऊन भेटण्यास संकोच करू शकतो. किंबहुना बाबूजी आपल्या कारच्या काचा खालीही करत नाहीत असा आरोप विरोधक सातत्याने करत असतात. आ. मनीष जैन मात्र तळागाळातील जनतेत सहजगत्या मिसळत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय तरूणाईशी संवाद साधण्यातही त्यांना अडचण नाही कारण ते खुद्द या पिढीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. एका रितीने पैसा, पद आणि काही तरी करण्याची धमक असल्यावर काय करता येते हे आ. जैन यांनी दाखवून दिले आहे. पाय जमिनीवर ठेवून सर्वसामन्यांशी जुळत असतांना विधानपरिषदेत विविध समस्यांना वाचा फोडण्याचे कामही त्यांनी केले आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी,रोजगार, सामाजिक, युवक, महिला, सुरक्षा आदी विविध क्षेत्रातील समस्यांवर त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांनी सभागृह थक्क झाल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर ‘अपक्ष’ असल्याचा पुरेपुर लाभ उचलण्याची चतुराईदेखील त्यांच्याकडे आहे. यामुळे भाजपा वगळता ते जिल्ह्यात इतर प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावर आरामात बसतात. कृषी-जलसिंचन, रोजगार निर्मिती व शिक्षण या त्रिसुत्रीवर विकास करण्याचे स्वप्न त्यांनी वारंवार बोलून दाखविले आहे. जिल्ह्यात येत्या काळात अत्यंत महत्वाकांक्षी ‘टेक्स्टाईल पार्क’ उभारण्याचे सूतोवाचही त्यांनी केले आहे. या माध्यमातून आपला व्यावसायिक डोलारा सांभाळत जनतेसाठी वेळ काढण्याची किमया आ. मनीष जैन यांनी साधली आहे. याचा अनुकुल परिणाम होत असला तरी काही ‘साईड इफेक्ट’ही जाणवत आहेत.

आ. मनीष जैन हे जनतेतून निवडून आले नसून त्यांच्या पुढील निवडणुकीला अद्याप खूप अवकाश असूनही ते ज्या विलक्षण झपाट्याने कामाला लागलेत ते पाहून राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. आज मनीष जैन हे विधानपरिषदेत असले तरी भविष्यात त्यांनी विधानसभा वा लोकसभेसाठी दंड थोपटल्यास काय? या विचाराने अनेकांची झोप उडू शकते. याशिवाय जलसंधारणासारख्या कामांना सरकारी अभियानाचा टेकू घेण्याचे चातुर्य मनीष जैन यांच्याकडे असले तरी खुद्द सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारांना ही बाब सुचू नये याचे आश्‍चर्यही जनतेला वाटत आहे. यामुळे मनीषदादांना टक्कर द्यावयाची असल्यास स्वत:ही ‘काहीतरी’ करणे भाग असल्याची जाणीव जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींना होऊ लागली आहे. एक प्रकारे तळपत्या उन्हात या लक्ष्मीपुत्राने अविरत परिश्रम घेतले असले तरी त्यांना घाम न फुटता इतरांनाच जास्त घाम फुटल्याचे दिसून येत आहे.

(May 19, 2011)

===============================

दादा-बाबुजींची खेळी अन् मनोज चौधरींचा बळी!

जळगाव (खा.प्र.)– शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे नगरसेवक मनोज दयाराम चौधरी यांच्या अपात्रतेमागे ‘खाविआ’चे नगरसेवक सुनील महाजन यांची याचिका असल्याचे वरकरणी चित्र असले तरी खा. ईश्‍वरबाबूजी जैन आणि आ. सुरेशदादा जैन यांच्या राजकीय खेळीने या होतकरू नगरसेवकाच्या राजकीय कारकीर्दीचा बळी घेतल्याचे मानले जात आहे.

गत काही विधानसभा निवडणुकांमध्ये आ. सुरेशदादा जैन यांचा काठावर विजय झाल्याने २००९च्या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय व्हावा अशी व्यूहरचना ‘७ शिवाजीनगर’ वरून करण्यात आली. दादा शिवसेनेकडून लढणार होते आणि प्रा. चंदूअण्णा सोनवणे यांचा रस चोपडा मतदारसंघात असल्याचे तात्कालीन चित्र होते. यामुळे सुरेशदादांना जळगावात कुणीही प्रतिस्पर्धी नव्हता. यात सेना-भाजपाची सत्ता आल्यास दादांना ‘वजनदार’ खाते मिळावे म्हणून त्यांना लक्षणीय मताधिक्यही जरूरी होते. यामुळे आ. सुरेशदादांनी थेट दिल्ली दरबारी फिल्डींग लावून जळगावची जागा कॉंग्रेसला सोडली. यानंतर अँड. सलीम पटेल यांना तिकिट देण्यात आले. यावेळी कोण हे सलीम पटेल? असा प्रश्‍न जळगावकरांना पडला. (आजही हा प्रश्‍न कायम आहे!) पटेल यांना तिकिट मिळाल्याने सुरेशदादा विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याची शक्यता निर्माण झाली. यावेळी अचानक मनपातील शिवसेनेचे एकमेव (आज शिवसेनेचा एकही नगरसेवक नाही!) मनोज दयाराम चौधरी यांनी अपक्ष म्हणून सुरेशदादांसमोर दंड थोपटले. चौधरी यांची उज्ज्वल छवी मतदारांना भावली. यामुळे दादाविरोधी मतदान विभाजित झाले तरी मनोज चौधरी यांना लक्षणीय मते मिळाली. या निवडणुकीत मनोज चौधरी यांना ‘आरएल’ कडून रसद मिळाली हे उघड गुपीत होते. अर्थात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बाबूजींनी हात आखडता घेतल्याचे वृत्त होते. यामुळे मनोज चौधरी यांची अपक्ष उमेदवारी ही आ. सुरेशदादांच्या ‘सुविधे’साठी होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. निवडणुकीनंतर मनोज चौधरी यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व पत्करले.

यानंतर मनोज चौधरी यांना बाबूजींनी निष्ठेचे फळ प्रदान केले. यात त्यांना राष्ट्रवादीचे महानगराध्यक्षपद अल्पकाळ का होईना प्रदान करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरण उदयास आले. जाहीररित्या (तरी) एकमेकांच्या विरोधी भूमिका घेणार्‍या बाबूजी आणि सुरेशदादांमध्ये सलोखा निर्माण झाला. आ. सुरेशदादांनी बाबूजीपुत्र मनीष जैन यांना विधानपरिषदेत निवडून आणले. यावेळी मनोज चौधरी यांनी निष्ठेने मनीष जैन यांचे काम केले. हे सारे होत असतांना चौधरी यांच्या मताच्या जोरावर गणेश सोनवणे हे मनपातील विरोधी पक्षनेते बनले. दरम्यान, ‘खाविआ’ नगरसेवक सुनील महाजन यांनी चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली. यात त्यांना यश आल्याने मनोज चौधरी यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. या माध्यमातून एका होतकरू तरूणाची राजकीय कारकीर्द काही काळ का होईना झाकोळली जाणार आहे. अर्थात या प्रकरणातून अनेक प्रश्‍नही उपस्थित झाले आहेत.
मनोज चौधरी यांचे नगरसेवकपद गेले तरी बाबूजी त्यांना पक्षात पद देऊन त्यांचे पुर्नवसन करू शकतात. मात्र खुद्द राष्ट्रवादीत ते एकाकी पडले आहेत. यामुळे नजीकच्या काळात ही शक्यताही धुसर वाटत आहे. यामुळे मनोज चौधरी यांचा राजकीय वनवास पक्का मानला जात आहे. विधानसभेत मनोज चौधरी यांना ‘उचकवणे’ व निवडणुकीत हात आखडता घेणे या बाबी केवळ ‘योगायोग’ समजल्या तरी काही प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. मनीष जैन यांना विधानपरिषदेत ‘मदत’ करणार्‍या गटातील गणेश सोनवणे यांना मनपातील विरोधी पक्षनेतेपद मिळते तर मनोज चौधरी यांच्याविरोधातील याचिका काढून घेण्यास ‘खाविआ’ श्रेष्ठींना सांगणे बाबूजींना अशक्य नव्हते. दादा आणि त्यांच्यातील मधुर संबंध पाहता ही बाब अशक्य नव्हती. मात्र असे झाले नाही याचाच अर्थ मनोज चौधरींचा ‘गेम’ ठरवून करण्यात आला असाच होतो. चौधरी हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. यातच आता अपात्रतेच्या माध्यमातून त्यांना गलीतगात्र केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत ते दादांना आव्हान देऊ शकतीलच याची खात्री नाही. अर्थात खा. ईश्‍वरबाबूजींसारखे त्यांचे हितचिंतक जळगावातून राजकीय ‘बळी’ देण्यासाठी नवीन मनोज चौधरी शोधतील याच शंकाच नाही.

मनोज चौधरी

(Apr 28, 2011)
===========================

निरंकुश सत्ताधारी आणि बेभान विरोधक!

जळगाव महापालिकेत पाणीपट्टीवाढीवरून भाजपा समर्थीत आंदोलनाचे झुंडशाहीत झालेले रूपांतर आणि यावरून सुरू झालेला शह-काटशहांचा खेळ हा अत्यंत दुर्दैवी असाच आहे. जळगावच्या राजकीय इतिहासामध्ये या रूपाने एक लज्जास्पद अध्यायाची नोंद झाली आहे.

गत ३० वर्षांपासून दीड वर्षांचा कालखंड वगळता जळगाव नपा-मनपावर आ. सुरेशदादा जैन यांचा एकछत्री अंमल राहिला आहे. या कालखंडात वादग्रस्त घटना झाल्या नाहीत असे म्हणणे धाडसाचे ठरेल. तत्कालीन नगरपालिका आणि सध्याच्या महापालिकेत अनेकदा तणावाचे प्रसंग निर्माण झाल्याचे जळगावकरांनी पाहिले आहे. हमरीतुमरी, हाणामारी असे प्रसंगही काही वेळा घडले. मात्र या सार्‍यांहून नुकतीच झालेली घटना ही वेगळी आहे. एक तर याला अत्यंत व्यापक असा संदर्भ आहे. याशिवाय, नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रथमच बहुमताने प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा विचार करता पाणीपट्टीवरून सुरू असणारा संघर्ष हा जनहितासाठी नव्हे तर राजकीय वर्चस्वासाठीच आहे हे अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील इतर पालिकांपेक्षा जळगावला वातावरण वेगळे आहे. याला ‘सात शिवाजीनगर’ येथील मुरब्बीपणा कारणीभूत आहे. यामुळे जळगावावर राज्य करताना प्रमुख विरोधक कोण राहिल? विरोधी पक्षनेता कोण बनणार? ही सूत्रेही सत्ताधार्‍यांच्याच हाती राहिलेली आहेत. सुमारे अडीच वर्षांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेत्याचे पद मिळणे आवश्यक होते. मात्र तत्कालीन राजकीय समीकरणात राष्ट्रवादी हा पक्ष दूरचा असल्याने हे पद भाजपाच्या राजूमामा भोळे यांना ‘बहाल’ करण्यात आले. अर्थात भाजपानेही ही ‘मैत्री’ पूरेपूर निभावली. यामुळे गतवर्षी पाणीपट्टी दुप्पट करण्यात आली तेव्हा विरोधी पक्षनेत्यांसह भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मौन बाळगले होते.

दरम्यान, आ. सुरेशदादा जैन आणि ना. एकनाथराव खडसे यांच्यातील संघर्षामुळे जळगावातील राजकीय परिस्थिती बदलली. परिणामी सत्ताधारी आणि भाजपात वितुष्ट आले. याचा पहिला बळी अर्थातच विरोधी पक्षनेते ठरले. विधानपरिषद निवडणुकीत महानगर राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार मनीष जैन यांना साथ दिली. यात मनीष जैन विजयी झाल्यावर बाबूजी आणि सुरेशदादा यांच्यात सलोखा झाला. यामुळे बाबूजींचा वरचष्मा असणार्‍या महानगर राष्ट्रवादीचा कल मनपातील सत्ताधार्‍यांकडे वळणे तसे साहजिक होते. परिणामी विरोधी पक्षनेतेपदाचे ‘दान’ राष्ट्रवादीच्या झोळीत टाकण्यात आले.

आता महापालिकेतील समीकरण अत्यंत गमतीशीर आहे. प्रमुख विरोधक असणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक बहुतांश मुद्यांवर तटस्थ राहत आहेत तर भाजपा प्रखर विरोधाची भूमिका बजावत आहे. पाणीपट्टीच्या दरवाढीवरून भाजपाने पुकारलेले आंदोलन हे लोकशाही मार्गाने करण्यात आले तर जनता याला पाठिंबा निश्‍चितच देईल मात्र, एखाद्या मुद्याला केवळ आपल्या वर्चस्वासाठी वापर करणे आणि त्यासाठी कायदा हातात घेणे हे कितपत योग्य आहे? मनपातील सत्ताधार्‍यांकडे निरंकुश बळ आहे. याशिवाय, विरोधकांमध्ये सातत्याने फुट पाडण्याची चतुराईदेखील त्यांच्याकडे आहे. यामुळे भाजपाने कितीही जोर लावला तरी मनपात सत्ताधार्‍यांना कुणीही हात लावू शकत नाही. अर्थात आपणास जनहिताचा बळी देण्याचा अधिकार मिळालेला नाही याची जाणीव सत्ताधार्‍यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. ना. खडसे आणि आ. जैन यांनी आपापल्या परीने एकमेकांना नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न जरूर करावेत. या लढाईत त्यांच्या चेल्यांनीही हिरीरीने भाग घ्यावा. मात्र यासाठी मनपा सभागृह अथवा प्रशासनाला वेठीस धरू नये हीच समस्त जळगावकरांची इच्छा आहे. मनपात नुकताच झालेला राडा आणि त्यानंतरचे राजकारण हा जळगावच्या इतिहासातील अत्यंत लज्जास्पद अध्याय असून यामुळे महानगराच्या प्रतिमेला धक्का पोहचला असल्याची जाणीव निरंकुश सत्ताधारी व बेभान विरोधकांनी ठेवण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात हा संघर्ष अजून चिघळणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.
(15/2/2011)
===========================

खडसे- जैन संघर्षात जिल्ह्यात युतीची माती ?

राजकारण हे असे क्षेत्र आहे की, यात कोण कधी कोणाचा मित्र होईल, तर कोण कधी कुणाचा शत्रू होईल, हे सांगणे कठीण आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला एक इतिहास लाभला आहे. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यावर अलिकडच्या काळात भाजपा-सेना युतीने आपली पकड भक्कम केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र युतीची काहीशी पिछेहाट होत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनपेक्षीत यश मिळाले. गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील राजकारण थंड राहिले. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी आ.सुरेशदादा जैन यांच्या समर्थनाद्वारे बाजी मारली व विरोधी पक्षनेते ना.एकनाथराव खडसे यांचे सुपुत्र, जि.प.सदस्य निखील खडसे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून जिल्ह्यातील युतीमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला.

या निवडणुकीनंतरही काही दिवस राजकारण शांत राहिले मात्र ही वादळापुर्वीची शांतता होती हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. माजी मंत्री आ.सुरेशदादा जैन यांनी धरणगाव, पाचोरा येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपाचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत हल्लाबोल केला व या वादाची ठिणगी पडली. त्यानंतर ना.खडसे यांनी सुरेशदादांवर टिकास्त्र सोडले. मनपा गैरकारभाराची चौकशी सुरू होताच ते डोलायला लागल्याची टिका करून, आपण सुरेशदादांच्या कृपेने विरोधी पक्षनेते झालो नाहीत, अशी स्पष्टोक्ती केली. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतांनाच भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते गप्प कसे बसणार ? त्यांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन सुरू करून हा वाद किती पेटलाय हे जनतेला दाखवण्याचा खटाटोप केला.

ना.एकनाथराव खडसे व माजी मंत्री सुरेशदादा जैन हे दोघेही जिल्ह्यातील लोकमान्य व मातब्बर नेते आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन राजकारण केल्यास जिल्ह्याचा कायापालट होईल, अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्ते व जनतेने यापुर्वी अनेकवेळा व्यक्त केली आहे. आज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे हे दोन्ही यापुर्वी युतीच्या माध्यमातून एकत्रित आले देखील आहेत. त्यांनी एकजुटीने जिल्ह्यातील अनेक प्रश्‍नांना वाचा ङ्गोडून शासनदरबारी न्याय मिळविण्याचा कसोशीने प्रयत्न देखील केला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आज निर्माण झालेला वाद हा आजचा विषय नसून यापुर्वी देखील दोन-तीन वेळा या दोन्ही नेत्यंामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी यापूर्वीही अत्यंत टोकाची भूमिका घेतली होती. या दोन्ही नेत्यांचे आता कधीही जमणार नाही, असे यापुर्वी जनतेला वाटत होते मात्र राजकारणात सारे काही माफ असते व काल काय घडले ? हे सोयीस्करपणे विसरण्याची किमया नेत्यांना सहजपणे करता येत असते, हे जिल्ह्यातील जनतेनेच अनुभवले आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. कदाचित त्यादृष्टीने शिवसेनेने सुरेशदादांच्या माध्यमातून हे राजकीय वादळ उठविले असावे. ना.खडसे व आ.जैन यांच्यातील या कलगीतुर्‍यामुळे सत्ताधारी नेत्यांचे ङ्गावणार असून जिल्हा विकासाला निश्‍चितच खीळ बसणार आहे. जिल्ह्यात भक्कम असलेल्या युतीची माती होण्याची भीती वाटत आहे. विरोधकच जर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले तर जनतेच्या प्रश्‍नांकडे व जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या शासनकर्त्यांना धारेवर कोण धरणार ? हा खरा प्रश्‍न आहे.

( प्रसिध्दी दिनांक-१० जानेवारी २०११ )

Leave a Comment