चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

सोडवा ‘कोड’चं कोडं !

Written by shekhar patil

‘‘नवीन व्हिडीओ गेम फक्त विकत घेऊ नका-स्वत: तयार करा; लेटेस्ट अॅप्स फक्त डाऊनलोड करू नका-ते डिझाईन करा आणि स्मार्टफोनसोबत फक्त खेळू नका…स्वत: प्रोग्रॅम करा’’ अशा शब्दांत बराक ओबामा यांनी नव्या युगाची भाषा कोड असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले आहे.

‘‘नवीन व्हिडीओ गेम फक्त विकत घेऊ नका-स्वत: तयार करा; लेटेस्ट अॅप्स फक्त डाऊनलोड करू नका-ते डिझाईन करा आणि स्मार्टफोनसोबत फक्त खेळू नका…स्वत: प्रोग्रॅम करा’’ अशा शब्दांत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकन विद्यार्थ्यांना साद घालून नव्या युगाची नवीन भाषा हा संगणकाचा कोड असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. ओबामा तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी स्वत: एक संगणकाचा लहानसा प्रोग्रॅम लिहून ‘अवर ऑफ कोड’ या उपक्रमात भागदेखील घेतला. याच अनोख्या उपक्रमाबाबत हा लिखाण प्रपंच.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा प्रमुख अर्थात नरेंद्र मोदी हे हातात झाडू घेऊन देश स्वच्छ करण्याची मोहिम सुरू करत असतांना अमेरिकेसारख्या दुसर्‍या बलाढ्य लोकशाहीचा अध्यक्ष हा आपल्या भावी पिढीला संगणकाची भाषा शिकवण्याचे आवाहन करतोय या बाबींमधील फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. यातील ओबामा यांचा पवित्रा हा वास्तववादावर आधारित आहे. जगभरात शिक्षणपध्दतीवर मंथन होत आहे. प्राथमिक शाळेपासूनच मुलांना त्यांना भविष्यात उपयुक्त ठरणारे शिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्नशील आहेत. विशेषत: बालवयात ग्रहणशक्ती उत्तम असल्याने शालेय जीवनातच बहुआयामी पध्दतीने शिकवण्याकडे आता कल वाढत आहे. मुलांच्या विकासासाठी भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भुगोल, समाजशास्त्रे आदी प्रमुख विषयांसह अनेक उपविषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांचा शारिरीक आणि मानसिक विकास व्हावा म्हणून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘सॉफ्ट स्किल्स’ विकसित करण्याचेही जाणीवपुर्वक प्रयत्न होत आहेत. बाल वयातच संगीत, परकीय भाषा शिकणे, वाचन आदी अभिरूची विकसित करण्याकडेही लक्ष दिले जाते. सरकार, शिक्षण खाते, शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि पालक आदी सर्व जण त्या विद्यार्थ्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील असतात. मात्र या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचा घटक अर्थात संगणकीय भाषेचा समावेश नसतो. बहुतांश अध्ययनांचा विचार करता अमेरिकेसारख्या अत्याधुनिक राष्ट्रांमध्येदेखील दहा टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रोग्रॅमिंगचे शिक्षण मिळत नाही. मग अन्य देशांची तर बातच नको. नेमकी हीच स्थिती लक्षात घेत ‘कोड’ या स्वयंसेवी संस्थेने गेल्या वर्षी एका नाविन्यपुर्ण उपक्रमाचे आयोजन केले.

(कोडविषयी काय म्हणतात ओबामा)

‘कोड’ ही संस्था गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात हादी आणि अली पारतोवी या भावंडांनी सुरू केली आहे. संगणक भाषा साक्षरतेसाठी त्यांनी अगदी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर तरूणांना उपयुक्त ठरणार्‍या मोफत अभ्यासक्रमांची निर्मिती केली. त्यांची ही धडपड पाहून मार्क झुकरबर्ग व बिल गेटस् आदींसारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना प्रोत्साहन दिले. यातून डिसेंबर महिन्यातील ८ ते १५ तारखेच्या दरम्यान ‘संगणक विज्ञान शिक्षण सप्ताह’च्या अंतर्गत ‘अवर ऑफ कोड चॅलेंज’ या अभिनव उपक्रमाची संकल्पना त्यांना सुचली. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांपासून ते कोणत्याही वयोगटातील जनतेला एक तास वेळेत ‘कोड’ अर्थात संगणकीय भाषेचा परिचय देण्यात आला. यासाठी जोरदार पुर्वतयारी करण्यात आली. ‘कोड’ संस्थेच्या या धडपडीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह विविध विख्यात कंपन्यांनीही पाठींबा दिला. परिणामी पहिल्याचा वर्षी हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला. तब्बल दोन कोटी आबालवृध्द यात सहभागी झाले. यातून ६० कोटी ओळींचे संगणकीय कोड लिहण्यात आले.

या प्रतिसादाने उत्साह दुणावलेल्या ‘कोड’ संस्थेने आपला हा उपक्रम जागतिक पातळीवर नेण्याचे ठरविले. यासाठी सुटसुटीत आणि सुलभ अभ्यासक्रम तयार करण्यात आला. याचे नावही ‘अवर ऑफ कोड’ असे ठेवण्यात आले. जगातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थाने, स्वयंसेवी संस्था आदींपासून ते सर्वसामान्य जनतेला यात प्रवेश देण्याचे ठरले. अमेरिकेतून जागतिक पातळीवर जातांना ‘कोड’ या संस्थेने आपल्या उपक्रमात अजून लवचिकता आणि वैविध्य आणले. या अनुषंगाने जगातील ३० भाषांमध्ये (यात भारतातील हिंदीचा समावेश आहे.) अभ्यासक्रम तयार करणे; जगातील १० कोटी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करणे; यासाठी दहा हजार प्राथमिक, पाचशे माध्यमिक तर दोनशे उच्च माध्यमिक शिक्षक तयार करणे आदी कामांसाठी या संस्थेला सुमारे पन्नास लक्ष डॉलर्सची (अंदाजे तीन कोटी रूपये) आवश्यकता भासली. यासाठी कोणती कंपनी वा संस्थेकडून मदत न घेता ‘कोड’ने ‘इंडिगोगो’ या क्राऊडफंडिंग जमा करणार्‍या वेबसाईटवर ८ ऑक्टोबर २०१४पासून निधी जमा करण्यासाठी मोहीम सुरू केली. यात अगदी एक डॉलर्सपासून निधी घेण्यात आला. मदत करणार्‍याने पैसे देण्यासोबत आपल्या भोवताली ‘अवर ऑफ कोड’ या उपक्रमाबाबत जनजागृती करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले. ‘इंडिगोगो’ साईटवरून पाच दशलक्ष डॉलर्स जमा करण्याच्या कल्पनेला प्रारंभी सर्वांनी वेडात काढले. मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे पन्नास लक्ष डॉलर्सपेक्षा जास्त पैसे तर जमा झालेच पण हा उपक्रमही प्रचंड यशस्वी ठरला. या मोहिमेला मार्क झुकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रेसिला चान तसेच बिल अँड मेलिंडा गेटस फाऊंडेशन आदींनी तर प्रत्येकी दहा लाख डॉलर्सची मदत केली. ‘अवर ऑफ कोड’मध्ये या वर्षी सव्वा सात कोटींपेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला आहे. जगभरातील हजारो शाळा यात सहभागी झाल्या. ‘कोड’च्या या उपक्रमात अन्य संस्थादेखील सहभागी झाल्या. यात मायक्रोसॉफ्ट, अॅपल, खान अकादमी, गुगल आदींचा समावेश आहे. या माध्यमातून एकाच वेळेस जगात संगणकीय भाषेविषयी रस निर्माण होण्यात काही प्रमाणात तर यश आले आहे. अत्यंत सुलभ मॉड्युलमुळे लोकांना हा उपक्रम खूप आवडला आहे. यात व्हिज्युअलवर जास्त भर देण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे संगणक नसणार्‍यांसाठीही कोड शिकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला मात्र संबंधीत संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र साभार-फ्लिकर)

(प्रतिकात्मक छायाचित्र साभार-फ्लिकर)

जगाचे भविष्य संगणकीय भाषेत आहे. जीवनाचे कोणतेही क्षेत्र अखेर संगणकीय भाषेवरच येते. मग ते स्मार्टफोनमधील अॅप वा गेम असो की अवकाशास्त्र! जनुकीय तंत्रज्ञान असतो की गृहोपयोगी वस्तू! प्रत्येकात ‘प्रोग्रॅम’ आहेच. आता तर प्रत्येक उपकरण ‘स्मार्ट’ होत आहे. येत्या काळात आपली सर्व उपकरणे स्मार्ट असतील. याहूनही पुढचा टप्पा ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. यातून चराचर वस्तू ‘वाय-फाय’शी जुळून एका स्मार्ट महाजालाची निर्मिती करतील. या भंपक बाता नव्हेत. हे तंत्रज्ञान दरवाजावर धडक देत आहे. या सर्वांचा आत्मा आहे अर्थातच संगणकीय भाषा. मग त्या एचटीएमएल, सी++, जावा, पीएचपी, सीएसएस वा अन्य कोणत्याही भाषा असतील. संगणकीय भाषा शिकण्याचे अवघड काम एका तासात होणे शक्य नसल्याची जाणीव ‘अवर ऑफ कोड’च्या निर्मात्यांना आहे. मात्र यातून प्रोग्रॅमची आवड विकसित होऊ शकते. विशेष बाब म्हणजे आवड निर्माण झालेल्यांना अगदी बेसिकपासून ते अत्युच्च दर्जाचे कोडींग शिकण्याची सर्व व्यवस्था या उपक्रमात करण्यात आली आहे. यामुळे अगदी हसत-खेळत संगणकीय भाषेची ओळख करून घेण्यासाठी असल्या स्वरूपाचा उपक्रम अत्यंत उपयुक्त असाच आहे. जगात संगणकाची एकच भाषा आहे. कोडींग करणारा जगातील कोणतीही भाषा बोलत असला तरी प्रोग्रॅमची भाषा युनिव्हर्सल आहे. यामुळे जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर ‘कोड’ आवश्यक आहे. यामुळे आपल्या भावी पिढीला याचे आजच बाळकडू पाजणे भाग आहे. अन् रस असेल तर आपण स्वत:च यात डुंबण्यात हरकत काय? जगात जसा ‘डीजिटल डिव्हाईड’ आहे त्याच प्रकारे तंत्रज्ञान शिक्षणातही दरी आहे. जगातील विविध धर्म, वर्ण, वंश, भाषांमधील हा भेद नाहीसा करणेही या उपक्रमाचा उद्देश आहे. गुगल, फेसबुकसारख्या कंपन्यांनी अलीकडच्या काळात आपल्या कर्मचार्‍यांच्या जाहीर केलेल्या पार्श्‍वभुमीवरून ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. यातून लिंगभेदही दिसून आल्याने गुगलने मुलींना कोड शिकण्यासाठी प्रेरित केले आहे. या वर्षाची शांततेचे नोबेल मिळवणारी मलाला युसुफजई हिनेही या उपक्रमात भाग घेतला असून जगातील मुलींनी यात सहभागी होण्याचे आवाहन या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

भारतीय शिक्षणप्रणालीत अनेक अनुपयुक्त बाबींवर अब्जावधी रूपयांचा चुराडा करण्यात आला असून आजही सुरूच आहे. यामुळे अली बंधूसारखे धडपडे अल्प पैशांत जगापर्यंत पोहचण्याचा संकल्प सिध्दीस नेत असतांना अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. शासकीय पातळीवरील लालफितशाहीमुळे कुणी अपेक्षा करणार नाही. मात्र एखादी मोठी शैक्षणिक संस्था यासाठी पुढाकार सहज घेऊ शकते. अर्थात त्यांनी पुढाकार नाही घेतला तरी ‘अवर ऑफ कोड’ने आपल्यासमोर ज्ञानसागर खुला केलाय…घोटभर प्या की…हा महासागर पचवण्याची आकांक्षा बाळगा…सगळे आपल्यासाठीच आहे!!

‘अवर ऑफ कोड’बाबत माहिती देणारा व्हिडीओ.

About the author

shekhar patil

Leave a Comment