Featured अनुभव पत्रकारिता

सृजनशील ‘साडेसाती’

Written by shekhar patil

काळ-काम-वेग याचे गणित जुळले तरच आपण पत्रकारितेत तग धरू ही खूणगाठ मी देशदूतला लागण्याच्या पहिल्याच दिवशी मनाशी बांधली होती. या दृष्टीने स्वत:च्या जीवनशैलीत बरेचसे बदल करणे आवश्यक होते. याचीच प्रथम अंमलबजावणी केली. एक तर मी कायम मित्रांच्या गराड्यात राहत होतो. अनेक दिवसांमध्ये तर अगदी चौदा-सोळा तास मित्रांसोबत राहत असू. एम.आर. असतांना कामाच्या वेळेचे बंधन नसल्याने मैत्री तशीच कायम होती. आता पत्रकारितेच डेस्कवर काम करणे. यातही जळगावला अप-डाऊन करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आलाच. सकाळी आठ ते रात्री आठ हा वेळ कामातच जात असे. यामुळे पत्रकारितेत आल्यापासून बाहेरचे संबंध अगदी कमी करून टाकले. विचार केली की, पत्रकारितेत स्थिरावल्यानंतर नाते वा मैत्री संबंधाचे पाहू. यानुसार फक्त ‘काम एके काम’ सुरू केले.

पहिल्या भागात नमूद केल्याप्रमाणे रविवारच्या शब्दगंध पुरवणीत ‘सायबरविश्‍वात सेलिब्रिटी’ ही मालिका सुरू झाली. ही पहिली मालिकाच तब्बल तीस भाग चालली. याचाच अर्थ सुरूवात दणक्यात झाली. दरम्यान यासोबत दैनंदिन कामात पारंगत झालो. सर्व तालुका प्रतिनिधींपासून ते अगदी खेडोपाड्यातील वार्ताहर/एजंट आदींची तोंडओळख झाली. सुभाष सोनवणे साहेबांनी सुचित केल्याप्रमाणे मी विज्ञान-तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत केले. यावर लेख प्रसिध्द झाले. हळूहळू आपण इतर विषयावरही लिहू शकतो असा आत्मविश्‍वास आला. आजवर मी कोणत्याही एका विषयाचे सखोल अध्ययन न केल्यामुळे माझी स्थिती ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी झाली होती. अकरावी-बारावीला विज्ञानात ‘पीसीएम’ सोबत इलेक्ट्रॉनिक हा विषय असल्याने यातील प्राथमिक ज्ञान मिळाले. याशिवाय, रसायनशास्त्रात पदवी करतांना या विषयासह भौतिकशास्त्राचीही प्राथमिक माहिती मिळाली. स्पर्धा परिक्षांच्या तयारीत भुगोल आणि राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास झाला. एम.आर. म्हणून लागल्यानंतर फार्माकोलॉजीसह ऍनोटॉमी व फिजिओलॉजीचे प्राथमिक ज्ञान मिळाले. माहिती तंत्रज्ञानाची स्वत:ला आवड होती. याच्या जोडीला साहित्य, आध्यात्म, राजकारण, इतिहास, कला-संस्कृती आदी जवळपास सर्व विषयांवर वाचन केलेले होते. अर्थात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्या तरी विषयात पारंगत असणे आवश्यक असते. मला मात्र हक्काचा असा कोणताही विषय नव्हता. यामुळे कोणत्याही एका विषयात ‘स्पेशलायझेशन’ नसल्याची खंत मला कायम वाटत असे. मात्र माझ्यातील हा अवगुण पत्रकारितेत सर्वात मोठा गुण ठरला. आपण कोणत्याही विषयावर किमान दोन शब्द लिहू शकतो. त्यावर आपले मत मांडू शकतो हे लक्षात आल्यानंतर मी लिखाणाचा ट्रॅक बदलून अन्य विषयांवरही लिहण्याचे ठरविले.

जुन २००४च्या प्रारंभी अकाल तख्ताने क्रुरकर्मा दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याला शहीद म्हणून घोषित केल्याचे वृत्त आले. मी भीतभीत सोनवणे साहेबांना ‘‘या विषयावर लिहू का?’’ अशी विचारणा केली. साहेबांनी एक क्षण माझ्याकडे पाहत म्हटले, ‘‘अरे बाबा या विषयावर आधीच नाशिकहून आलेला अग्रलेख आपण प्रसिध्द केलाय. तू यात काय नवीन लिहणार?’’ मी त्यांना अग्रलेखातील मुद्दे आणि माझ्या मनातील दृष्टीकोन सांगितला. यानंतर काही वेळ शांत राहिल्यानंतर त्यांनी मला यावर लिहण्यास होकार दिला. मी मोठ्या मेहनतीने लेख तयार केला. साहेबांनी पहिल्याच फटक्यात लेख ‘ओके’ केल्यावर थक्क होण्याची पाळी माझी होती. ‘इतिहासातील छळणारी भुते’ या शीर्षकाच्या त्या लेखाने माझ्या विचारांची दिशाच बदलली. ‘शिवानी समाचार’प्रमाणे मला लिखाणासाठी आकाश मोकळे झाले. यानंतर मला विषयाचे कोणतेही बंधन राहिले नाही. साधारणत: शुक्रवारी रात्री शब्दगंध पुरवणीचे पेजीनेशन होऊन शनिवारी दुपारी सोनवणे साहेब यावरून नजर फिरवत असत. शनिवारी सायंकाळी पुरवणी छपाईसाठी जात असे. यामुळे रविवारच्या पुरवणीत लेख देण्यासाठी मंगळवार-बुधवारपासूनच तयारी करावी लागत असे. मी स्वत: विषय शोधायचो. अनेकदा सोनवणे साहेब विषय देत. आश्‍चर्याची बाब म्हणजे अनेकदा संपादकीय तसेच अन्य विभागातील सहकार्‍यांशी झालेल्या चर्चेतून विषय ठरत असे. हे सारे होत असतांना मी दैनंदिन काम काय करत होतो हे सांगणे क्रमप्राप्त आहे.

देशदूतच्या दिवसपाळीत तापी, बोरी आणि गिरणा ही तीन ग्रामीण भागातील पाने लागत. याशिवाय, जळगाव, धुळे व नंदुरबार आवृत्तीसाठी कॉमन असणारे पान क्रमांक तीन लागत असे. मला आळीपाळीने सर्व पाने लावण्याची संधी मिळाली. पान तीन वर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच विज्ञान-तंत्रज्ञान व मनोरंजनाशी संबंधीत बातम्या लावणे अपेक्षित होते. मी हे पान चांगल्या प्रतीचे बनवू लागलो. रामसिंग परदेशी अगदी मन लावून या पानाची डिझाईन करत असे. हे पान करत असतांना दोन अनपेक्षित कामे माझ्याकडे आली. मी भाषांतर उत्तम प्रकारे करू शकतो हे लक्षात आल्यानंतर

व्यवस्थापक एस.के. ठाकूर यांनी जाहिरातीच्या भाषांतरासाठी मी तोवर भाषांतर करणारे विवेक खडसे यांना मदत करावी असे सांगितले. यामुळे रेल्वेसह सर्व जाहिरातीचे भाषांतरही मी करू लागलो. यातील निविदेतील पारिभाषिक शब्द कायम लक्षात राहिले. यासोबत सोनवणे साहेबांनी मला टेलिप्रिंटरवरून येणार्‍या पीटीआयच्या बातम्यांचे वर्गिकरण आणि शक्य असल्यास भाषांतर करण्यास सांगितले. याचा एकच लाभ झाला की वर्तमानपत्रात ग्रामीण भागातील बातम्या संपादित करतांना मी जगातील घडामोडींविषयीदेखील सजग राहिलो. लोकल आणि ग्लोबल या दोन्ही पातळ्यांवरील भान मला लेखांचा विषय निवडण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. अनेकदा डीएव्हीपीसह अन्य जाहिरातीही भाषांतरीत कराव्या लागत. २००६ साली विवेक खडसे यांना नंदुरबारला सरकारी नोकरी लागल्यानंतर भाषांतराची जबाबदारी माझ्या एकट्यावर आली. पुढे विकास पाटील आल्यानंतर थोडी उसंत मिळाली. मात्र अनुवादाच्या ताणामुळे अनेकदा चिडल्यासारखे होत असे. सकाळी माझ्यासमोर दोन-तीन पुर्ण पाने जरी भाषांतरासाठी आणली तरी हरकत नव्हती. मात्र सायंकाळी घरी जातांना येणार्‍या जाहिराती डोके फिरवायच्या. अनेकदा याबाबत जाहिरात विभागातील सहकार्‍याशी चकमक व्हायची. मात्र ठाकूर साहेबांनी शांतपणे समजावून सांगितल्यानंतर काम केल्याशिवाय गत्यंतर नसेच! बर्‍याचदा रात्री जाहिराती आल्यास माझ्या घरी शिपाई जाहिरात देण्यासाठी आणि भाषांतर घेण्यासाठी येत असे. इंग्रजीच्या बर्‍यापैकी ज्ञानामुळे मी भाषांतराचा उपयोग करून जाहिरातींसह पान क्रमांक तीन उत्तम प्रकारे लावू लागलो. मात्र ग्रामीण पान लावतांना मला माझ्यात थोडा बदल करावा लागला. याचा मला झालेला लाभ मी आपणास शब्दात सांगू शकत नाही.

साधारणत: पत्रकारितेत थेट बातमी पाठविणारा एखाद्या गावातील वार्ताहर, तालुका प्रतिनिधी वा अन्य बातमीदार यांचे डेस्कवरील माणसाशी कधी बनत नाही. कारण संपादनाची कात्री घेतलेल्याला आपल्या अधिकारात बातमीचे संपादन करावयाचे असते तर बातमी पाठविणारा याबाबत संपादनात नेहमी पक्षपात होण्याची तक्रार करतो. याचसोबत त्यांच्यासोबतच्या वर्तनाबाबतही त्यांची नेहमी तक्रार असते. गेल्या भागात नमूद केल्याप्रमाणे देशदूतच्या वितरण विभागातील सहकार्‍यांचे वार्ताहर/एजंटसोबतचे संबंध पाहून मीदेखील त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचे ठरविले होते. या संदर्भात मी या मंडळीचे सुक्ष्म निरिक्षण केल्यानंतर मला अनेक बाबी लक्षात आल्या. एक तर वार्ताहरादी मंडळीच्या संपादकीय सहकार्‍यांकडून फार काही अपेक्षा नव्हत्या. त्यांच्याशी फोनवरून वा प्रत्यक्षात व्यवस्थित व सन्मान देऊन बोला, त्यांच्या बातम्या शक्य तितक्या लवकर लावा, त्यांच्या महत्वाच्या बातम्या महत्वाच्या ठिकाणी लावा; याच त्यांच्या माफक अपेक्षा होत्या. यामुळे मी त्यांच्याशी सुसंवादावर भर दिला. यातून माझे बहुतांश जणांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध झाले. त्यांच्या बातम्यांना न्याय देतांना त्यांच्या सुख-दु:खात सहभागी झाल्याने ते माझ्या कुटुंबाचाच हिस्सा बनले. वार्ताहरांच्या बैठकीत माझे नाव निघू लागले. अगदी आतापर्यंत काही वार्ताहर बैठकांमध्ये माझे नाव काढत असल्याचे मला समजते. मी सर्वांचे नाव घ्यायचे म्हटल्यास अजून एक भाग लिहावा लागले. मात्र या मंडळीच्या जवळ गेल्यानंतर मला समाजाच्या विविध स्तरांमधील लोकांचा जीवन संघर्ष कळला. विशेषत: लहान गावांमधील अनेक वार्ताहरांची परिस्थिती यथातथाच असल्याचे मला ज्ञात झाले. आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत असतांना गाव-शिवारात लक्ष ठेवून बातम्या देण्याचे काम त्यांना करावे लागते. लहानशा खेड्यांमध्ये जाहिरातींचा स्त्रोतही नसतो. यामुळे पत्रकारितेतून फार काही मिळण्याची अपेक्षा नसतांनाही हे लोक धडपड करून बातम्या पाठवत असल्याचे पाहून मला जाम कौतुक वाटू लागले. पत्रकारितेला करियर करण्यासाठी उत्तमोत्तम संधी आज उपलब्ध आहेत. मात्र जिल्हा दैनिकांचा कणा असणार्‍या ग्रामीण वार्ताहरांच्या दयनीय स्थितीचेही यातून भेदक दर्शन झाले. देशदूत परिवारातील अनेक वार्ताहरांशी माझे आजही संबंध असून त्यांच्याशी नित्यनेमाने बोलणेही होते.

देशदूतने दिलेला मला सर्वात महत्वाचा धडा- ‘तुम्ही ज्यांच्यासोबत काम करताहेत त्यांच्यात इंटरेस्ट घ्या’. या संदर्भातील एक घटना मला बरेच काही शिकवून गेली. गुढे (ता. भडगाव) येथील वार्ताहर रवींद्र पाटील यांचा एके दिवशी दुपारी भोजनाची वेळ होत असतांना फोन आला. मी काहीशा अनिच्छेनेच त्याच्याशी बोलायला लागलो. पाटील यांनी मला फोनवरून एका निवेदनाची बातमी घेण्याची विनंती केली. मी त्यांना दोन शब्द सुनावतांनाच तिकडून काकुळतीने शब्द आले की, ‘‘साहेब हा माणूस अत्यंत गरीब आहे. याला महात्मा फुले महामंडळातून कर्ज मंजूर झाले असले तरी चेक मिळण्यात दिरंगाई होत आहे. हा पैशातून ती व्यक्ती काली-पिली घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणार आहे.’’ मी आढेवेढे घेत बातमी तयार करून सायंकाळी जिल्हा पानासाठी दिली. दुसर्‍या दिवशी ती छापूनही आली. काही दिवसांनी अत्यंत ओथंबलेल्या आवाजात एका माणूस माझ्याशी फोनवर कृतज्ञतेने बोलला. अरे…त्या माणसाला चेक मिळून त्याने काली-पिली घेतली होती की! यामुळे मला खूप आनंद झाला. विशेष म्हणजे काही दिवसांनी तो तरूण पेढे घेऊन देशदूतमध्ये माझे आभार मानण्यासाठी आला.

या एका घटनेमुळे बातमीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पुर्ण बदलला. माझ्यासाठी एखादी रूक्ष आणि नेहमीचीच असणारी घटना ही एखाद्यासाठी अथवा एखादे कुटुंब, गाव वा वस्तीसाठी अत्यंत महत्वाची असू शकते हे माझ्या लक्षात आले. यानंतर माझ्या पानावरील प्रत्येक बातमी माझ्यासाठी सजीव बनली. यानंतर वार्ताहरांच्या बातम्यांना न्याय देण्याचे काम मी अधिक आपुलकी अन् सजगतेने करू लागलो. दरम्यान, पुरवणीमध्ये लिखाण सुरूच असले तरी ‘सायबरविश्‍वात सेलिब्रिटी’नंतर कोणतीही मालिका लिहली नव्हती. आता विषयांचे स्वातंत्र्य मिळाल्याने मालिकांमध्येही वैविध्य आले. २००४च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी मी सलग दहा दिवस ‘कालचक्र’ ही मालिका लिहली. यात वर्षभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील घटनांचा आढावा घेतला होता. ही मालिका अव्याहतपणे २००९च्या डिसेंबरपर्यंत दरवर्षी मी नित्यनेमाने लिहत होतो. यानंतर माझ्या आवडच्या अर्थात फुटबॉल या विषयावर चाळीस भागांची मालिका अवतरली. ‘फुटबॉलचे सितारे’ नावाच्या या मालिकेत या खेळातील दिग्गज खेळाडूंची ओळख करून देण्यात आली होती. याशिवाय, ऑलिंपिक, क्रिकेट विश्‍वचषक आदींवर मालिका आल्या. दरम्यान, राजकीय विश्‍लेषणही सुरूच असल्याने यावर मालिका लिहण्याचा योग २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आली. ‘निवडणुकीचे ताणेबाणे’ या चाळीस भागांच्या मालिकेत माझा अक्षरश: कस लागला; कारण लागोपाठ चाळीस दिवस लेख लिहणे हा जोक नव्हे. मात्र हे कामही मी पार पाडले. मात्र याहूनही मोठे आव्हान माझे वाट पाहत होते.

देशदूतचे संपादक सुभाष सोनवणे यांनी अनेकविध उत्तमोत्तम उपक्रम राबविले. यात अतिथी संपादक, ‘संपादक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत जळगावच्या प्रत्येक गल्लीबोळात स्वत: फिरून तेथील समस्या चव्हाट्यावर मांडणे; ऋषी पंचमीच्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सात मान्यवरांचा घरी जाऊन सत्कार करणे आदींचा समावेश होता. २००८ साली साहेबांच्या मनात जळगावच्या औद्योगिक क्षेत्राचे खरे चित्र जगासमोर मांडण्याची संकल्पना तरळली. यासाठी सहकार्‍यांच्या रिपोर्टींगवर अवलंबून न राहता त्यांनी स्वत: एमआयडीसीतील प्रत्येक कंपनीला भेट देऊन संबंधीत उद्योजकाच्या वाटचालीचा आढावा घेण्याचे ठरविले. या उपक्रमाला ‘उद्योजकांच्या भेटीला संपादक’ हे नाव देण्यात आले. साहेबांनी खूप उत्साहाने या उपक्रमास प्रारंभ केला. यात उद्योजकाची मुलाखत घेण्यासाठी त्यांनी माझी निवड केली. प्रारंभी या उपक्रमाच्या यशाबाबत मी साशंक होतो. एक तर जळगावच्या एमआयडीसीत ‘दम’ नाही, येथे चांगल्या कंपन्या आणि कामगारांना पगार नाहीत हे रडगाणे माझ्या कानावर होते. यामुळे लवकरच हा उपक्रम बंद पडेल हे अगदी मलाही वाटत होते. मात्र पहिल्याच दिवसापासून याला जोरदार प्रतिसाद मिळाला. यातच एमआयडीसीतील सकारात्मक बाजूही जगासमोर आली. देशदूतच्या इतिहासातील हा सर्वात मोठ उपक्रम ठरला. अर्थातच भाग्याने यात सहभागी होण्याची मला संधी मिळाली.

सोनवणे साहेब साधारणत: दुपारी दोनच्या सुमारास कार्यालयात येत असत. यानंतर ‘पंचनामा’ आटोपल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही या उपक्रमावर निघत असू. दररोज किमान एक वा शक्य झाल्यास दोन-तीन उद्योजकांच्या मुलाखती घेत असू. साधारणत: साडेपाच वाजेपर्यंत परत आल्यानंतर या मुलाखती मी तयार करून शेवटच्या पानावर लावण्यासाठी देत असे. जळगावची औद्योगिक वसाहत ही मरणप्राय नव्हे तर अत्यंत प्रगतीशील असल्याचे खरे चित्र आम्हाला दिसले. महत्वाची बाब म्हणजे उद्योजकतेची कोणतीही परंपरा नसणारे मराठी उद्योजक मोठ्या हिरीरीने उत्तम वाटचाल करतांना आम्हाला दिसले. सुमारे दोन वर्षाच्या कालखंडात आम्ही जवळपास साडेसातशे उद्योजकांची संघर्षगाथा जगासमोर मांडली. एका अर्थाने जळगावच्या औद्योगिक वसाहतीचे खरे चित्र ज्या दोन-चार लोकांना माहिती असेल त्यापैकी सोनवणे साहेब आणि माझा समावेश नक्कीच आहे. या उपक्रमामुळे आम्हाला अनेक प्रेरणादायी कथा ज्ञात झाल्या. माझ्या स्वत:च्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम झाला. अनेकदा एखाद्या उद्योजकाची मुलाखत घेतल्यानंतर सोनवणे साहेब त्याच्या वाटचालीसह त्याच्या व्यक्तीमत्वाचे विश्‍लेषण करत. जळगाव एमआयडीसीतील पाच उद्योजकांची नावे साहेबांनी मला नोंद करण्यास सांगितली होती. ‘‘येत्या काळात हे सर्व जण अंबानी नव्हे तर किमान भंवरलाल जैन तरी बनतील!’’ असे भाकितही त्यांनी केले आहे. विशेष बाब म्हणजे या पाचही जणांच्या प्रगतीवर माझे लक्ष असून ते प्रचंड वेगाने पुढे निघाले असल्याचे आजचे चित्र आहे. मराठी पत्रकारितेच्या इतिहासात अशा स्वरूपाचा हा एकमेव उपक्रम असावा. यात मी सहभागी होऊ शकलो हे माझे भाग्यच!

देशदूतला लागण्याच्या एक दिवस आधीपासूनच माझ्या नावावर लेख प्रसिध्द होऊ लागले तरी मी बातमी या विषयाकडे फारसे लक्ष देत नव्हतो. खरं तर पत्रकारितेची सुरूवात ही बातमीदारीतून होत असते. यात काही वर्षांचा अनुभव व सफाई आल्यानंतर कुणीही लेख लिहत असतो. बहुतांश पत्रकारांच्या लिखाणाचा विकास असाच झाला आहे. माझे याच्या अगदी उलट झाले. मी अनेक विषयांवर लेख लिहत असलो तरी बातमीकडे थोडेसे दुर्लक्षच होत होते. मी केलेल्या काही प्रतिनिधींच्या बातम्या मुखपृष्ठावर झळकत होत्या तरी मला स्वत:ला या प्रकारात रस नव्हता. २००५ च्या देशदूतच्या वर्धापनदिनाला (२४ डिसेंबर) रामदास फुटाणे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या मी केलेल्या वार्तांकनाला दाद मिळाली. दरम्यान, सोनवणे साहेबांनी सुरू केलेल्या अतिथी संपादक या संकल्पनेत आलेल्या मान्यवराने संपादकीय विभागाशी चर्चा करतांना आजवर कुणालाही न दिलेली माहिती द्यावी व ती आम्ही बातमी स्वरूपात प्रसिध्द करावी असे ठरले. या अनुषंगाने मला अनेक मान्यवरांच्या बातम्या करण्याची संधी मिळाली. यातील विख्यात संगणकतज्ज्ञ तथा लेखक अच्युत गोडबोले यांचा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही.

अच्युत गोडबोले हे देशदूत कार्यालयात अतिथी संपादक म्हणून आल्यानंतर त्यांना संपादकांनी संकल्पना समजावून सांगितली. यानुसार त्यांनी बोलण्यास प्रारंभ केली व मी ते टिपून घेऊ लागलो. एका मिनिटात त्यांनी माझ्याकडे रेकॉर्डर आहे का? अशी विचारणा केली. यावर आम्ही नकारार्थी उत्तर दिल्यावर ते काहीसे थबकले. ‘‘मी बोलतो काही, तर छापून येते काही; असले प्रकार वारंवार घडत असतात’’ असे नमूद करत त्यांनी मला काळजीपुर्वक त्यांचे बोलणे ऐकण्याचे सुचित केले. ते सुमारे पाऊणतास बोलले. दरम्यान त्यांनी मला तीन-चारदा खुणा करून व्यवस्थित मुद्दे घेण्याचे सांगितले. मी काळजीपुर्वक त्यांची बातमी तयार केली. ती दुसर्‍या दिवशी मुखपृष्ठावर प्रसिध्द झाली. सुदैवाने कार्यक्रमानिमित्त ते जळगावातच होते. ही बातमी पाहून त्यांनी देशदूत कार्यालयात फोन करून ही बातमी कुणी तयार केली याची विचारणा केली. यानुसार मिळालेल्या माहितीवरून त्यांनी माझे ‘बिनचूक’ बातमीबद्दल अभिनंदन केले. यामुळे बातमीबाबतही मला आत्मविश्‍वास आला. यातूनच मी दहा भागांची ‘पडद्याआडचे प्रतिभावंत’ ही वृत्तमालिका लिहली. दरम्यान २००९ची विधानसभा निवडणूक आली. यातील ‘पॉलिटिकल कँपेनिंग’मुळे बातमीतला शार्पनेस आणि शब्दांचे खेळ मला मोहवून गेले. आपण स्थानिक राजकारणावर अत्यंत मार्मिक भाष्य करू शकतो; आता लेखच नव्हे तर बातमीतसुध्दा तसुभरही मागे राहणार नाही हा आत्मविश्‍वास मला आला. एका अर्थाने माझ्या पत्रकारितेची सुरूवात लेखरूपी शिखरावर झाली. मात्र पायथ्याशी असणार्‍या बातमीलाही मी न्याय देऊ शकतो हा आत्मविश्‍वास आला.

दरम्यान काळ झपाट्याने पुढे सरकत होता. माझ्या संकल्पानुसार २ डिसेंबर २००७ रोजी मला देशदूत सोडावयाचे होते. मात्र सोनवणे साहेबांच्या अनुभवाचा आपल्याला शक्य होईल तितका लाभ व्हावा या हेतूने मी हा बेत पुढे ढकलला. २००९ साली जुन महिन्यातच सोनवणे साहेबांनी मालकांना निवृत्त होण्याबाबत सुचना दिली होती. मात्र मालकांच्या विनंतीवरून एक वर्ष थांबण्यास ते तयार झाले. दहा जून २०१० रोजी सोनवणे साहेबांचा करार संपणार होता. तत्पुर्वी सात जून २०१० रोजी मी देशदूतमधील आपल्या कारकिर्दीस पुर्णविराम दिला. २००४च्या जून महिन्यात गिरीश निकम सकाळला गेला. मलासुध्दा नंतर काही ऑफर आल्या. दरम्यान, माझे स्नेही प्रमोद बर्‍हाटे यांनी जळगावात आपले साप्ताहिक साईमत हे सायंदैनिकात परिवर्तीत करण्याबाबत माझ्याशी चर्चा केली. या अनुषंगाने २७ ऑक्टोबर २००७ रोजी ‘साईमत’ सुरू झाले. अगदी पहिल्या दिवसापासून यात माझी पडद्याआड भुमिका होतीच. यामुळे कोणत्याही मोठ्या दैनिकात जाण्यापेक्षा ‘साईमत’ला जाण्यास मी प्राधान्य दिले. माझ्या या निर्णयावर अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. आज साडेतीन वर्षानंतर माझा हा निर्णय योग्य असल्याचे सिध्द झाले आहे.

पक्षी आकाशातून उडतांना कोणतेही पदचिन्हे सोडत नाहीत. याचप्रमाणे आपण अगदी शांतपणे आपण देशदूतमधून विदा होणार असल्याचे मी अनेकदा भोजनाप्रसंगी सहकार्‍यांना सांगत असे. येथून जातांना मनात कोणती कटुता मनात राहणार नाही अन् आपले पाय अडखडणार नाहीत याची खात्री होती. झालेही असेच. मात्र ज्या आत्मविश्‍वासाने देशदूतबाहेर पावले गेली तो आत्मविश्‍वास आणि आत्मसन्मान फक्त आणि फक्त याच संस्थेत मिळाला याची कृतार्थ जाणीव मनाशी होती. याचमुळे २ डिसेंबर २००२ रोजी देशदूतमध्ये प्रवेश करतांना जो थरार मनाला जाणवला तोच ७ जून २०१० रोजी सायंकाळी साडेसहा वाजता देशदूतमधून बाहेर पडतांना मला जाणवत होता. पण…अवघ्या साडेसात वर्षात किती बदललो होतो मी! साडेसात हा शब्द आपल्याकडे तसा बदनाम झाला आहे. या कालखंडाला ‘साडेसाती’ म्हणून हिन व काहीशा भयगंडाने पाहिले जाते. मात्र माझ्या आयुष्यात देशदूतमधील साडेसाती ही बेभान सृजनपर्व म्हणून गणली जाणार आहे. भविष्यात मी पत्रकारितेत असो वा नसो या साडेसात वर्षांनी मला एक नवी ओळख, नवी उमेद दिली. यातच माझ्या आयुष्याला नवीन दिशाही मिळाली आणि प्रगतीची आशाही !!

(आठवणी बर्‍याच लांबल्यात…मात्र नाईलाज आहे. देशदूतमधील माझ्या वाटचालीचा आढावा मी प्रस्तुत केला आहेत. मात्र संपादक सुभाष सोनवणे, व्यवस्थापक एस.के. ठाकूर यांच्यासह माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या माझ्या सर्व सहकार्‍यांबाबत न लिहणे हे अन्यायकारक ठरेल. यामुळे शेवटचा भाग या सर्वांच्या नावे!)

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment