चालू घडामोडी चित्रपट

सल्लूभाई धंदेवाला !

देशद्रोही याकूब मेमन याच्या फाशीबाबत अभिनेता सलमान खान याने अचूक ‘टायमिंग’ साधले आहे. यामागे ‘बजरंगी भाईजान’ला लाभ होणार असल्याचे गणित असल्याची बाब स्पष्ट आहे.

देशद्रोही याकूब मेमन याच्या फाशीबाबत आपली अक्कल पाजळत अभिनेता सलमान खान याने अचूक ‘टायमिंग’ साधले आहे. यामागे ‘बजरंगी भाईजान’ला लाभ होणार असल्याचे गणित असल्याची बाब स्पष्ट आहे. मात्र हे करत असतांना आपण समाजात दुहीचे बिज रोवत असल्याची जाणीव त्याला नसावी. अर्थात वाद निर्माण करणे आणि विनाशर्त माफी मागत मखलाशी करण्याचा राजकारण्यांचा ट्रेंड आता सेलिब्रिटींमध्येही बळावू लागला की काय? ही शंका येऊ लागली आहे.

Salman-Khan

खरं तर मुंबई बॉंबस्फोटातील आरोपी असणार्‍या याकूब मेमनला आताच फाशी देण्यामागे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा निर्णय हा राजकीय हेतूने प्रेरित आहे हे निश्‍चित. अलीकडच्या काळात अजमल कसाब आणि अफजल गुरू यांना अत्यंत गुप्त रितीने व अकस्मात फाशी देण्यात आली होती. देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा अगदी योग्य निर्णय होता. मात्र आता याकूबच्या फाशीची तारीख आधीच जाहीर करण्याचा निर्णय हा अनेक मुद्यांना लक्षात ठेवून करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. एक तर आधी फाशीचा निर्णय जाहीर केल्याने देशात यावरून भडका उडणार हे निश्‍चित होते. किंबहुना यावरून धार्मिक ध्रुविकरण होईल असे गणित मांडण्यात आले आहे. याचे भाजपला दोन पध्दतीने लाभ होणार आहेत. एक तर बिहार विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. तेथे नितीश व लालू एकत्र आल्याने भाजपला घाम फुटला आहे. याकूबला तातडीने फाशी देण्याचा निर्णय वादाच्या भोवर्‍यात सापडल्याचा भाजपला बिहारमध्ये सरळ लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप बॅकफुटवर आल्याचे दिसून येत आहे. सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्यांवरून विरोधक आक्रमक बनले आहेत. यावरून संसदेतील गतीरोध अद्याप कायम आहे. नाही म्हणायला रालोआच्या खासदारांनी हरीश रावत यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून कॉंग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तरी त्यात फारसे यश आले नाही. इकडे महाराष्ट्रातही भ्रष्टाचाराच्या आरोपावरूनच भाजपचे काही मंत्री विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. यामुळे फडणवीस सरकारही अडचणीत आले आहे. यातच शिवसेनेसारख्या मित्रपक्षाचा विरोधही प्रखर होऊ लागला आहे. यामुळे हे सारे मुद्दे बासनात टाकण्यासाठी याकूबच्या फाशीसारखा महत्वाचा मुद्दा कोणताही नव्हता. परिणामी नेमकी हीच खेळी भाजपने खेळली आहे. अपेक्षेप्रमाणे यावरून वाद सुरू करण्यात भाजपला काही अंशी तरी यश लाभले आहे.

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला असतानाही मेमनच्या फाशीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकार धर्माचा आधार घेऊन याकूबला फासावर चढवतं आहे असा आरोप केला आहे. बाबरी मशीद पाडणारे, राजीव गांधी व बेअंत सिंह यांची हत्या करणारे अजून मोकाट असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ओवेसी यांच्या मागणीतील काही मुद्दे विचारणीय आहेत. खरं तर ओवेसी राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भुमिका बजावण्यासाठी चाचपणी करत आहेत. महाराष्ट्रात काही प्रमाणात बस्तान बसविल्यानंतर उत्तरप्रदेश आणि बिहारच्या राजकारणात दमदार ‘एंट्री’ करण्याचा त्यांचा मानस दिसून येत आहे. याकूबच्या फाशीला विरोध करून ते साहजीकच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहेत. त्यांच्या पाठोपाठ अबू आझमी यांच्यासह अन्य मुस्लीम नेत्यांनीही हाच सुर आळविला. अर्थात यावरून भाजप व कॉंग्रेससारख्या पक्षांनी ओवेसी हे धार्मिक ध्रुविकरण करत असल्याचा आरोप केला. मात्र याच्या दोन दिवसानंतर आज बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान याने आपल्या ट्विटस्च्या माध्यमातून ओवेसींच्याही पलीकडचा टप्पा गाठला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणातून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वतोपरी असला तरी याकूब मेमनच्या फाशीच्या ‘टायमिंग’ला आक्षेप घेतला होता. सलमानने मात्र याकूब हा निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देत त्याचा भाऊ टायगर मेमन हा खरा आरोपी असल्याचे सांगून टाकले. यानंतर टायगरला शोधण्याचे फर्मानही काढले. एवढेच नाही तर शरीफ ‘साहेबां’नी टायगर त्यांच्याकडे असल्यास याची माहिती द्यावी अशी फिल्मी मागणीदेखील करून टाकली. सलमानच्या ट्विटबाजीतील अत्यंत गंभीर मुद्दा हा त्याने याकूब मेमनला दिलेले निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र होय. न्यायालयाने याकूबला दोषी धरत फाशीची शिक्षा सुनावली आहे. याचाच सरळ अर्थ त्याने न्यायालयाच्या निकालाचा अवमान केला आहे. या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही याच आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामुळे सलमानचे वक्तव्य धार्मिक आधारावर तेढ निर्माण होण्यास कारणीभुत ठरतांनाच यामुळे तो न्यायालयीन कचाट्यातही येऊ शकतो. अलीकडेच त्याचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट प्रसिध्द झाला आहे. तसा हा सिनेमा लोकप्रिय ठरला असतांना सलमानने आणखी गल्ला वसूल करण्यासाठी हा स्टंट केला असल्याची शक्यताही आहे. मात्र यातून यातून समाजाला वेठीस धरणे हे अयोग्य आहे.

मुळातच सलमान खान हा बॉलिवुडमधील ‘बॅड बॉय’ म्हणून गणला जातो. दारू पिऊन धिंगाणा घालण्यासह अनेक प्रकरणांमधील सनकीपणामुळे तो चर्चेत आला आहे. मुंबईतील ‘हिट अँड रन’ प्रकरणात त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे. राजस्थानातील काळवीट शिकार प्रकरणही त्याच्या मानगुटीवर बसले आहे. यामुळे स्वत: गुन्हेगारीचा शिक्का असलेल्या सलमानने याकूबची केलेली पाठराखण ही नव्या भेदाला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. खरं तर बॉलिवुडमधील मंडळीचे गुन्हेगारी विश्‍वासोबत असणारे संबंध लपून राहिलेले नाही. अंडरवर्ल्डचा पैसा मोठ्या प्रमाणात चित्रपटसृष्टीत असतो. यातून हत्या, खंडणी, धमक्या आदी प्रकार सर्रास घडत असतात. कलावंत आणि भाईमंडळी यांच्यातील संबंध अनेकदा अधोरेखित झाले आहे. यातूनच संजय दत्तसारख्या मातब्बर अभिनेत्याला कारागृहात जावे लागले आहे. मात्र गुन्हेगार असणार्‍या संजूबाबाला वाचविण्यासाठी बॉलिवुडची मंडळी कशी धावून आली होती हे आपण पाहिले आहे. सलमानलाही शिक्षा सुनावण्याच्या कालखंडात बॉलिवुडकर त्याच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र होते. आता तोच सलमान याकूब मेमनसारख्या देशद्रोह्याची पाठराखण करतोय ही बाब भयंकर अशीच आहे. मुळातच राजकारणी व क्रिकेटपटूंप्रमाणे बॉलिवुडच्या अभिनेत्यांनाही भारतीयांनी कायम डोक्यावर उचलून धरले आहे. यामुळे या सेलिब्रिटींनी काही जरी केले तरी त्यांची अंध भक्त मंडळी त्यांच्यासोबत असतो. सलमानला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी दाखविलेला उन्माद आपण पाहिलाच आहे. हेच चाहते आतादेखील त्याच्यासोबत असल्याचे आपण पाहत आहोत.

आज दुपारी सलमानने आपल्या ट्विटवरून हवा तो ‘परिणाम’ साधला गेल्याचे पाहून विनाशर्त माफी मागितल्याचा मनभावीपणा दाखविला आहे. अर्थाच चूक करून माफी मागत नामनिराळा राहण्याचा राजकारण्यांचा पवित्रा सलमान शिकल्याचे दिसून येत आहे. याहूनही कळस तर त्याचे वडील सलीम खान यांनी केलाय. एकीकडे सलमानचे ट्विट हे निरर्थक असल्याचे सांगत ते विसरून जाण्याचा सल्ला सिनीयर खान देताहेत. मात्र याचसोबत याकूबला फाशी देण्याऐवजी त्याला आयुष्यभर तुरूंगात ठेवावे असा सल्ला देण्यासही हे महाशय विसरले नाहीत. यामुळे हा नियोजीत ‘स्टंट’ असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. सलमान आधीदेखील अशाच प्रकारे वादात सापडला आहे. २०१० साली त्याने ‘२६/११’ या भयंकर दहशतवादी हल्ल्याबाबत एका पाकिस्तानी न्यूज चॅनलला मुलाखत देतांना मुक्ताफळे उधळली होती. काय तर म्हणे ‘‘अशा प्रकारचे हल्ले होतच असतात. मात्र या हल्ल्यात श्रीमंत लोक मोठ्या संख्येने मारले गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाला!’’ एवढ्यावर न थांबता त्याने या दहशतवादी कृत्यामध्ये पाकिस्तानचा हात नसल्याचे प्रमाणपत्रही देऊन टाकले होते. यावरून गहजब झाल्यानंतर त्याने तेव्हादेखील माफी मागत या प्रकरणातून हात झटकून टाकले होते. http://goo.gl/jA4OLV या लिंकवर आपण याबाबतचे वृत्त वाचू शकतात. यात एक योगायोग आपण समजून घेतला पाहिजे. १० सप्टेंबर २०१० रोजी सलमान खानचा दबंग हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. (हा ईदचाच कालखंड होता.) या कालावधीतच सलमानने हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर १२ सप्टेंबर २०१० रोजी त्याने माफी मागून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थात या दोन दिवसांमध्ये सलमानने पाकिस्तानबाबतच्या सहानुभुतीचा योग्य तो ‘संदेश’ दिलाच. १७ सप्टेंबर २०१० रोजी ‘दबंग’ पाकिस्तानात प्रदर्शित झाला. सलमानच्या पाकप्रेमाचा सरळ लाभ त्याच्या ‘दबंग’च्या गल्ल्यावर झाला हे सांगणे नकोच. पाकमध्ये या सिनेमाने दणक्यात व्यवसाय केला. आता तर ‘बजरंगी भाईजान’मध्ये तर कथानकातच पाकिस्तानला स्थान आहे. यातच हा चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर त्याने आधी पाकिस्तानात जाण्याची इच्छा प्रकट केली. आणि आता तर याकूब मेमनसारख्या देशद्रोह्याची बाजू उचलून धरली. याचा लाभ ‘बजरंगी’ला होणार असल्याचा विचार त्याने केला असावा.

खरं तर चित्रपटातील कलावंतांची पडद्यावरील प्रतिमा आणि त्यांचे प्रत्यक्षातील वागणे यात जमीन-अस्मानचे अंतर असते. मात्र भोळी जनता त्यांच्या रूपेरी पडद्यावरील प्रतिमेवर भाळते. म्हणून देशद्रोही कृत्यात सहभागी असणार्‍या संजय दत्तचे लाखो लोक समर्थन करतात. काही बावळट तर त्याला माफी मिळावी अशी मागणीदेखील करतात. इकडे सलमानसारखी मंडळी आपल्या मतलबासाठी समाजात दुहीचे बिज रोवतात. ‘दबंग’ ते ‘बजरंगी भाईजान’ हा सलमानचा विखारीपणाचा प्रवास निव्वळ व्यवसायातील लाभाच्या हव्यासापोटी झालाय हे स्पष्ट आहे. याचा समाजावर नेमका काय परिणाम होणार? याच्याशी त्याला काय देणे-घेणे?

About the author

shekhar patil

Leave a Comment