चालू घडामोडी

सलाम…कलाम !

कलाम यांच्या निधनानंतर अवघा देश ज्या पध्दतीने शोकसागरात बुडालाय ते पाहता स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात त्यांना अढळ स्थान मिळाल्याचे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने एक उत्तुंग व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रखर राष्ट्रभक्त, देशाला प्रगतीपथावर नेणारा वैज्ञानिक, भारताला महाशक्ती बनविण्याचा ध्यास घेणारा स्वप्नदर्शी आणि यासाठी मार्ग आखून देणारा शिक्षक, सकारात्मक जीवनशैलीचे चालते-बोलते ज्ञानपीठ असणारे कलाम यांच्या निधनानंतर अवघा देश ज्या पध्दतीने शोकसागरात बुडालाय ते पाहता स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात त्यांना अढळ स्थान मिळाल्याचे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.

खरं तर तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहा राव यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेतांना अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्रीपदासाठी पाचारण करण्याची घटना भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. यातून अर्थशास्त्राचा एक प्रकांड पंडित देशाच्या आर्थिक उदारीकरणाचा अग्रदूत तर बनलाच पण त्यांनी पुढे देशाची धुरादेखील सांभाळली. राव यांनी जसा डॉ. सिंग यांच्यावर विश्‍वास दर्शविला, त्याचप्रमाणे अटलबिहारी वाजपेयी यांनी केंद्रात त्यांच्याच नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार असतांना एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची घटनाही भारतीय इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद करणारी ठरली. राष्ट्रपती बनण्याआधीच डॉ. कलाम यांची लोकप्रियता शिखरावर होती. मुळातच जागतिक पातळीवर भारताच्या अण्वस्त्रसज्जतेची ग्वाही देणार्‍या ‘पोखरण-२’मधील त्यांची महत्वाची भुमिका देशवासियांसमोर होती. यातून ‘विंग्ज ऑफ फायर’सारख्या पुस्तकानेही त्यांना लोकप्रियता लाभली होती. त्यांची विद्वत्ता, ऋजुता, साधेपणा आणि एकंदरीतच ऋषितुल्य व्यक्तीमत्वामुळे ते ‘आयकॉन’ बनले होतेच. अर्थात कलाम यांना राष्ट्रपतीपदासाठी गळ घालण्यामागे अटलजींची चतुर खेळीदेखील होती.

२००२च्या पुर्वार्धात गोध्रा-कांड आणि त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीतून शेकडोंचा बळी तर गेलाच होता; पण याचसोबत हिंदु-मुस्लीम समुदायात प्रचंड अविश्‍वासाचे वातावरण पसरले होते. या घटनेमुळे व्यथीत झालेल्या अटलजींनी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करण्याचे जाहीर आवाहन करूनही वातावरणातील धुम्मस कायम होती. यावेळी त्याच वर्षाच्या जुलै महिन्यात होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने डॉ. कलाम यांना विनंती केली. मुळातच त्यांच्यासारख्या सर्वसमावेशक व्यक्तीमत्वाला कॉंग्रेसनेही विरोध करणे टाळले. खरं तर त्यांची राष्ट्रपतीपदावरील निवड अविरोध होणे जवळपास निश्‍चित झाले होते. मात्र डाव्यांनी ऐन वेळेला कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना त्यांच्यासमोर उभे केले. अर्थात निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून ते राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले. भारताच्या राष्ट्रपती भवनाने आजवर स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ असे राष्ट्रपती पाहिले होते. डॉ. कलाम यांच्या रूपाने प्रथमच एक वैज्ञानिक, लेखक, वक्ता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे द्रष्टे व्यक्तीमत्व देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर आरूढ झाले होते.

कलाम यांच्या राष्ट्रपदीपदाचा कालखंड हा भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. खरं तर भारताचे राष्ट्रपतीपद हे प्रतिकात्मकरित्या राष्ट्राचे प्रमुखपद आहे. बहुतांश महत्वाचे अधिकार हे कार्यपालिका आणि त्याचा प्रमुख असणार्‍या पंतप्रधानाच्या हातात असले तरी याला राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते. त्यांच्या कालखंडात फारसे वादग्रस्त प्रसंग आले नाहीत. फाशीची शिक्षा ठोठावलेल्या दया याचिकांवर त्यांनी निर्णय घेण्यास केलेल्या टाळाटाळीचा उल्लेख अनेकदा होतो. मात्र आजवर बहुतांश राष्ट्रपतींनी हाच पवित्रा घेतल्याने कलाम यांच्यावरील आरोपात तथ्य नाही. २००५ साली तत्कालीन राज्यपाल बुटासिंह यांच्या शिफारसीवरून त्यांनी बिहारमध्ये राष्ट्रपती शासन लागू केले होते. मात्र न्यायालयात हा निर्णय रद्द करण्यात आला होता. एवढी बाब वगळता त्यांचा कोणताही निर्णय वादाच्या भोवर्‍यात पडला नाही. मात्र त्यांच्या राष्ट्रपदीपदाच्या कालखंडातील एक घटना कायम रहस्यमयी म्हणून गणली जाणार आहे. २००४च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली होती. कॉंग्रेसच्या सर्व मित्रपक्षांनी एकमुखाने सोनियाजींनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळावी अशी विनंतीही केली होती. यानुसार सोनियाजी या राष्ट्रपती भवनात डॉ. कलाम यांनी भेटण्यासाठी गेल्या. या दोन्ही मान्यवरांमध्ये प्रदीर्घ काळ चर्चा झाली. यानंतर सोनियाजींनी पंतप्रधानपदाला नकार देत डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे या पदाची धुरा सोपविण्याची घोषणा केली. या दोन्ही मान्यवरांमध्ये अशी कोणती चर्चा झाली की ज्यामुळे सोनियाजींनी पंतप्रधानपद नाकारले? हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठ्या सस्पेन्सपैकी एक आहे. याबाबत या दोन्ही मातब्बरांनी आजवर चकार शब्दही काढला नाही. आता तर कलाम काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर हे रहस्य फक्त सोनियाजींकडेच आहे.

डॉ. कलाम यांनी राष्ट्रपतीपदाला नवीन उंची प्रदान केली. त्यांनी संवैधानिक राष्ट्रप्रमुख म्हणून भुमिका तर पार पाडलीच पण भारतवासियांच्या हृदयातही घर केले. २००७ साली झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी कमकुवत असल्याने कलाम यांना पुन्हा संधी मिळाली नाही. इकडे कॉंग्रेसने महिलेस संधी देण्याच्या नावाखाली गांधी घराण्याच्या निष्ठावंत प्रतिभाताई पाटील यांना या पदासाठी पुढे केल्यानंतर कलाम यांनी माघार घेतली. अर्थात राष्ट्रपती भवनातून बाहेर पडतांना डॉ. कलाम यांची उंची हिमालयाएवढी झालेली होती. ‘इदं न मम’ या भावनेने फक्त आपल्या पुस्तकांच्या सुटकेस घेऊन आधीप्रमाणेच फकिरासारखे आयुष्य घालविण्यासाठी जाणारे कलाम हे कोट्यवधी भारतीयांना ‘आपले’ वाटले. खरं तर जगातल्या अनेक देशांमधील राष्ट्राध्यक्ष वा राष्ट्रप्रमुख हे निवृत्तीनंतर अध्ययन, लिखाण आदींना प्राधान्य देत असतात. भारतीय राजकारणी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीला चिपकून राहण्यासाठी आटापीटा करतात. मोजक्या भारतीय राजकारण्यांनी आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध हा जनतेत व्यतीत केला आहे. यात डॉ. कलाम यांचे नाव अग्रस्थानी विराजमान झाले आहे. राष्ट्रपतीपदावर असतांनाच त्यांची अतिशय सारगर्भ मात्र अत्यंत सोप्या भाषेतील विचार कोट्यवधींच्या हृदयाचा ठाव घेणारे ठरले. वास्तविक पाहता ते फर्डे वक्ते नव्हते. मात्र विविध विषयांवर सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेतील त्यांचे विचारधन अनमोल ठरले. महाविद्यालये, विद्यापीठे, सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आदींमधून डॉ. कलाम यांनी विविध विषयांवर मौलिक विचार मांडलेच. पण याचसोबत विविध मुलाखती, पुस्तके, लेख, संवाद आदींच्या माध्यमातूनही त्यांनी विपुल चिंतन केले आहे. आजवर अनेक मान्यवरांनी देशाच्या प्रगतीविषयी आपापले विचार मांडले आहेत. मात्र डॉ. कलाम यांचे ‘व्हिजन २०२०’ ही संकल्पना व्यापक पातळीवर स्वीकारण्यात आली हा त्यांच्या विचारांचा सर्वात मोठा सन्मान होता. याचप्रमाणे शिक्षण, गरीबी, निरक्षरता आदींवर त्यांनी मौलिक भाष्य केले आहे.

डॉ. कलाम यांच्या आयुष्यातील तीन महत्वाचे टप्पे आहेत. यातील पहिल्या भागात वैज्ञानिक म्हणून त्यांनी केलेली देदीप्यमान कामगिरी आहे. पोखरणच्या पहिल्या अणुचाचणीत त्यांचा थेट सहभाग नसला तरी ते याची साक्षीदार होते. जागतिक पातळीवर भारताच्या सामरीक शक्तीची द्वाही फिरवण्यासाठी ही अणुचाचणी उपयोगात आली. ऐशीच्या दशकातील उपग्रह, याला वाहून नेणारी वाहने, पृथ्वी, अग्नि आदींसारखे क्षेपणास्त्र आदींमुळे आपला दबदबा आणखी वाढला. नव्वदच्या दशकात आर्थिक उदारीकरणाला वेग आल्यानंतर अटलजींच्या सरकारने ‘पोखरण २’च्या माध्यमातून बलाढ्य राष्ट्रांना भारताची दखल घेण्यास पुन्हा भाग पाडले. याचे सर्वस्वी श्रेय मात्र डॉ. कलाम यांना मिळाले. दोन्ही पोखरणच्या दरम्यानच्या पाव शतकाचा कालखंड हा त्यांच्या वैज्ञानिक कर्तबगारीचा ठरला. यानंतर राष्ट्रपतीपद लोकाभिमुख करण्यात त्यांचा सर्वात मोलाचा वाटा राहिला. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कालच त्याचा ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून केलेला गौरव हा अगदी यथोचित आहे. डॉ. कलाम राष्ट्रपती असतांना भारतीय जनतेला प्रथमच या पदावर महनीय व्यक्तीमत्व आरूढ झाल्याचे समाधान लाभले होते. यानंतर २००७ साली कॉंग्रेसने प्रतिभाताई पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या कलाम यांचा वारसा चालवू शकणार का? हा मुद्दा समोर आला होता. तेव्हा सोशल मीडिया बाल्यावस्थेत होता. आज डॉ. कलाम यांच्या निधनानंतर सोशल मीडिया या मुद्यावरून तुटून पडलाय ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. याचाच अर्थ असा की, त्यांनी या पदाची उंची इतकी वाढवून ठेवली की भविष्यातील सर्व राष्ट्रपतींशी त्यांची तुलना अनिवार्य झाली. राष्ट्रपतीपद अत्यंत शालीनतेने सांभाळल्यानंतर त्यांनी तिसर्‍या टप्प्यात नंतरचे आयुष्य आपल्याकडील ज्ञान समाजाला देण्यात व्यतीत केले.

कलाम यांच्या विपुल चिंतनात नव्या पिढीला केंद्रवर्ती स्थान होते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी भारताचे भविष्य घडवू शकतात यावर त्यांचा गाढ विश्‍वास होता. कोणत्याही क्षेत्रात ‘कॅच देम यंग’ ही पॉलिसी केव्हाही योग्य असते असे त्यांनी एकदा भाषणात सांगितले होते. खुद्द आपल्याला तरूण असतांना विक्रम साराभाई यांनी ‘डीआरडीओ’त संधी दिल्याने आपण पुढे जाऊ शकलो होतो असे त्यांनी कृतज्ञतेने नमुद केले होते. याचमुळे देश बदलवायचा असल्यास भावी पिढीवर तसे संस्कार आवश्यक असल्याबाबत ते आग्रही होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे त्यांना मनापासून आवडत असे. अर्थात तरूणाईनेही त्यांना हृदयात स्थान दिले होते. डॉ. कलाम यांच्या समग्र चिंतनात विलक्षण सकारात्मकता आहे. जगभरात अलीकडच्या काळात ‘सेल्फ-हेल्प’ पुस्तकांची लोकप्रियता वाढली आहे. मराठीतही हीच पुस्तके मोठ्या प्रमाणात खपतात. जगात अनेक लेखक यातून नावलौकीकास आले आहेत. कलाम हे रूढ अर्थाने त्या प्रकारातील लेखक नसतांनाही त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी कोट्यवधी हृदयांना आंदोलित केलेय हे कुणी अमान्य करणार नाही. खुद्द त्यांचे आयुष्य हेच सकारात्मकतेचे विलक्षण उदाहरण होते. याच मार्गावरून चालत तरूणाईने खर्‍या अर्थाने बलवान भारत घडवावा असे स्वप्न त्यांनी फक्त दाखविले नाही तर त्याची पुर्तता करण्यासही प्रेरित केले. एका व्यापक अर्थाने त्यांच्याकडे निव्वळ वांझोट्या शब्दांचा फुलोरा नव्हता तर यात कर्तव्याची प्रेरणाही होती. डॉ. कलाम यांनी खूप बोलावे, विविध विषयांना स्पर्श करावा, वैयक्तीक पातळीवर यशाचे सुत्र सांगावे, सामूहिक पातळीवर आपला समाज आणि देश प्रगतीवर गतीमान करण्याचा मंत्र द्यावा अशी तमाम भारतवासियांची इच्छा होती. त्यांनी दिलेही खुप असले तरी लोकांना अजून हवे होते. सर्व जण कलामांचे चिंतन ऐकण्यासाठी उत्सुक होते. मात्र दैवाला हे मंजूर नव्हते. अगदी-

बडे शौक से सुन रहा था जमाना मगर…
तुम ही सो गये दास्ता कहते कहते !

याप्रमाणे त्यांचे जाणे धक्कादायक ठरले आहे. प्रत्येकाला आपले आवडते काम करतांना मृत्यूने कवटाळावे अशी इच्छा असते. योध्द्याला रणभुमिवर मरण यावे तर शेतकर्‍याला आपल्या शेतात शेवटचा श्‍वास घ्यावा असे मनोमन वाटत असते. यामुळे डॉ. कलाम यांची आपल्या भावी पिढीला मार्गदर्शन करतांनाच विदाई व्हावी ही परमेश्‍वरी इच्छा विलक्षणच मानावी लागेल! खर्‍या अर्थाने त्यांचा शेवटचा दिस गोड झाला! आणि जगालाही त्यांच्या कृतार्थ आयुष्याची जाणीव करून गेला.

About the author

shekhar patil

2 Comments

Leave a Comment