चालू घडामोडी राजकारण

सत्तेच्या सावलीतला ‘सहकार’

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. या निकालास अनेक कंगोरे असले तरी यातील महत्वाचा गाभा हा सत्ताकारण आणि त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच ना. एकनाथराव खडसे यांच्याकडे या महत्वाच्या संस्थेचा ताबा आला आहे. या निकालास अनेक कंगोरे असले तरी यातील महत्वाचा गाभा हा सत्ताकारण आणि त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांपेक्षा मुठभर मतदार असणार्‍या सहकार क्षेत्रातील निवडणुका अगदी भिन्न असतात. गाव ते राज्य eknathrao_khadseपातळीवरील सहकारात त्या-त्या ठिकाणच्या सत्तेचा प्रभाव अवश्य असतो. याचा विचार करता जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतही साहजीकच दीर्घ काळ सत्ता गाजविणार्‍या कॉंग्रेस व अलीकडच्या काळातील या पक्षासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधिराज्य गाजविणे स्वाभाविक होते. मध्यंतरी युती सरकार आले तरी सहकारात कॉंग्रेसची स्थिती मजबुत असल्याने त्यांना यावर कब्जा करणे शक्य झाले नाही. २००८ साली झालेल्या निवडणुकीत ईश्‍वरबाबूजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या पॅनलने विजय मिळवला होता. (तेव्हा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष अत्यंत प्रबळ होता ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.) त्या निवडणुकीत एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन एकत्र असल्यावरही युतीच्या पॅनलला सत्ता मिळवण्यात अपयश आले होते. मध्यंतरी राष्ट्रवादीतल्या सत्ता संघर्षात शिवसेनेच्या चिमणराव पाटील यांनी अध्यक्षपद भुषविले तरी या निवडणुकीत राष्ट्रवादी भुईसपाट होईल अशी कोणतीही स्थिती नव्हती. मात्र असे झाले. अर्थात यामागे अनेक कारणे आहेत.

अनेकदा सहकारातील जागा या दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांना देण्यात याव्यात अशी चर्चा होत असते. जिल्हा मध्यवर्ती बँकेसारख्या महत्वाच्या संस्थेत मात्र नेते सहजासहजी सुत्रे सोडण्यास तयार होत नाहीत. आज निवडून आलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर फिरवली असता खासदार ए.टी. पाटील हे निवडून आले आहेत. याशिवाय आ. गुलाबराव पाटील, आ. डॉ. सतीश पाटील, आ. उन्मेष पाटील, आ. शिरीष चौधरी आणि हरिभाऊ जावळे या पाच जणांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व आमदार विजयी झाले आहेत. यापैकी पहिल्या दोघांना रिंगणात उतरण्याची संधी मिळाली नाही तरी उर्वरित दोघे तांत्रिक चुकीमुळे रिंगणातून बाद झाले. याशिवाय आधी आमदारकीच्या निवडणुकीत उतरलेले चिमणराव पाटील, वाडीलाल राठोड, अनिल भाईदास पाटील, रवींद्र पाटील आदींनीही विजय मिळवला. याचाच अर्थ असा की आपापल्या तालुक्यावर पुर्णपणे राजकीय पकड असणारे वा तसा प्रयत्न करणारे जिल्हा बँकेत पोहचले आहेत. म्हणजेच ही लढाई पहिल्या फळीतल्या शिलेदारांमधीलच होती. अन् ती त्याच पध्दतीने लढली गेली.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे मुठभर मतदारांमध्ये निवडणूक लढविणे ही एक ‘कला’ आहे. यात पैसा, राजकीय वलय आणि क्वचितप्रसंगी दबावतंत्रही मुक्तपणे वापरण्यात येते. तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या मतदानाचा हक्क देण्यासाठी जो ठराव करतात तेथेच पुढील लढतीचा निकाल ठरत असतो. यामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांना वेळोवेळी जिल्हा बँकेतून मदत करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आदी कामे करणारे आधीपासूनच यासाठी ‘फिल्डींग’ लावतात. सध्याच्या संचालक मंडळात सर्वाधीक अनुभवी असणारे मावळते अध्यक्ष चिमणराव पाटील यांनी आपल्यासह आपल्या पुत्राला याच पध्दतीने बिनविरोध निवडून आणले. साहजीकच नाथाभाऊंनाही विरोध झाला नाही. याचप्रमाणे जिल्हा बँकेचा अत्यंत गाढा अभ्यास असणारे संजय पवार यांनी विरोधक मोर्चेबांधणी करत असतांनाच आपलीही जागा बिनविरोध पदरात पाडून घेतली. जळगावात सुरेशदादा जैन यांच्या गटाला सर्व पातळ्यांवर मात देणार्‍या राजूमामांनी सहज बाजी मारली. चोपड्यातून माजी आमदार कैलास पाटील यांची माघार मात्र अनपेक्षित होती. या घडामोडी खासदार ईश्‍वरबाबूजी जैन, डॉ. सतीश पाटील वा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लक्षात आल्या नसतील हे म्हणणे मुर्खपणाचे ठरणार आहे. यामुळे त्यांनी नंतर धोका दिल्याचा आरोप केला तरी यात तथ्य नव्हते. अर्थात या जागा बिनविरोध झाल्यानंतरही ते लढा देऊ शकत होते. मात्र खरी मेख इथेच होती. खासदार ईश्‍वरबाबूजी आणि त्यांचे पुत्र मनीष हे अडचणीत सापडले आहेत ही उघड बाब आहे. जैन पिता-पुत्राला कारागृहात धाडण्याचा नाथाभाऊंनी जाहीर विडा उचलला आहे. यामुळे गेल्या २० वर्षांपासून जामनेर तालुका विविध कार्यकारी सोसायटीतून निवडून येणार्‍या बाबूजींनी चक्क मैदान सोडत ना. गिरीश महाजन यांच्या हातात सुत्रे सोपवली. खुद्द बाबूजींच्या हक्काच्या हिवरखेडा सोसायटीतून ना. महाजन यांचा ठराव झाला तेव्हाच हे गणित सर्वांच्या लक्षात आले. नाथाभाऊंना टक्कर देण्यासाठी वा किमान त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ या न्यायाने त्यांनी ना. गिरीशभाऊंना पुढे केले. याचे प्रतिबिंब त्यांच्या एकतर्फी विजयातून दिसूनच आले आहे. आता ना. महाजन यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेत नाथाभाऊंच्या एकतर्फी वर्चस्वाला काही प्रमाणात तरी छेद देण्याचे त्यांचे मनसुबे असतीलच. ही बाब भविष्यात आपल्यासमोर येण्याची शक्यतादेखील आहे.

खासदार ईश्‍वरबाबूजी आणि आ. डॉ. सतीश पाटील यांनी रणांगणातून माघार घेत इतर शिलेदारांच्या बळावर गर्जना सुरू केल्या असतांनाच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी राजकीय चातुर्याचे दर्शन घडवत ना. एकनाथराव खडसे यांच्याशी हातमिळवणी केली तेव्हाच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा दारूण पराभव पक्का झाला होता. कुणाला ही बाब फारशी ज्ञात नाही. मात्र गेल्या २० वर्षांपासून इतर सहकारी संस्थांच्या मतदारसंघांमधून देवकर यांनी स्वत:सह अन्य दिलेले उमेदवारच सातत्याने निवडून आलेले आहेत. या मतदारसंघांमध्ये विविध कार्यकारी सोसायट्या वगळता अन्य सहकारी संस्थांचा समावेश होता. ते यात मुरब्बी असून यातील बहुतांश मतदार त्यांचे हक्काचे आहेत. या निवडणुकीचा विचार केला असता खुद्द देवकर हे इतर संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उभे होते. त्यांच्यासह महिला राखीव मधून उभ्या असणार्‍या तिलोत्तमा पाटील व रोहिणीताई खडसे-खेवलकर, ओबीसी प्रवर्गातून उभे असणारे खासदार ए.टी.नाना पाटील, अनुसुचित जाती-जमाती मतदारसंघातील आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे व विमुक्त जाती व भटक्या जाती मतदारसंघातील वाडीलाल राठोड अशा एकूण सहा जागा त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातील होत्या. या सर्व जागांच्या विजयाचे शिल्पकार हे गुलाबराव देवकर असल्याचे आपण सहकारातील कुणीही जाणकार व्यक्तीला विचारू शकतात. एका अर्थाने देवकरांची नाथाभाऊंशी हातमिळवणी हा या निवडणुकीला कलाटणी देणारा मुद्दा ठरला. खर तर देवकर यांचा भाजप नेत्यांसोबतचा आधीपासूनचा सलोखा हा कुणापासून लपून राहिलेला नव्हता. यामुळे ते सहजगत्या सहकार पॅनलसोबत आले. येथेच या पॅनलचा एकतर्फी विजय निश्‍चित झाला. यात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी प्रारंभी लढण्यासाठी सज्ज असल्याचा आव आणला तरी त्यांची राष्ट्रवादीपेक्षाही भयंकर गत झाली.

तालुका पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्या मतदारसंघाचा विचार करता यावेळी काही प्रमाणात बदल घडले. रावेरमधून नाथाभाऊंनी आपले कट्टर समर्थक नंदकुमार महाजन यांना संधी दिली. तर यावलमधून गणेश नेहते यांना उमेदवारी मिळाली. हे दोन्ही जण निवडून आले. आजवर कमनशिबी म्हणून गणल्या जाणार्‍या रवींद्रभैय्यांना ईश्‍वरचिठ्ठीतून मुक्ताईचा आशीर्वाद मिळाल्याने ते तरले. हा अपवाद वगळता सर्व विकासो मतदारसंघातील विजय हे एकतर्फी झाले. भुसावळात संतोष चौधरी यांचे पुत्र सचिन यांचा ठराव रद्द झाला नसता तर येथे चुरस झाली असती. याचप्रमाणे उन्मेष पाटील व शिरीष चौधरी यांच्या उमेदवारीनेही गणित बिघडण्याची शक्यता होती. मात्र तसे झाले नाही.

आता उरतो महत्वाचा मुद्दा- निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यापासूनच नाथाभाऊ हे आपली कन्या रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या हाती जिल्हा बँकेची सुत्रे देणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून खुले आरोप-प्रत्यारोपही झालेत. असे असूनही नाथाभाऊंच्या पाठीशी सेना-भाजपच नव्हे तर राष्ट्रवादीतले गुलाबराव देवकर यांच्यासारखे मातब्बर ( त्यांच्यासोबत तिलोत्तमा पाटील व नानासाहेब देशमुखही आले.) का एकवटले? हा प्रश्‍न उपस्थित होतो. यामागे महत्वाचे कारण म्हणजे आज राज्य सरकारमधील महत्वाचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची भुमिका ही अत्यंत महत्वाची आहे. अगदी आमदारांना जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मिळणार्‍या निधीपासून ते विविध आघाड्यांवर नाथाभाऊंची सोबत ही केव्हाही लाभदायक असल्याचा विचार या मंडळींनी केला असावा. आज सुरेशदादा बाहेर असते तर ईश्‍वरबाबूजी, ना. गिरीशभाऊंसह शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीची मोट बांधत नाथाभाऊंचा झंझावात रोखता आला असता असा युक्तीवाद काही जण करू शकतील. मात्र प्रत्यक्षात या जर-तरच्या बाबी आहेत. सत्य इतकेच की, आपल्या राजकीय कारकिर्दीत आजवर ना. एकनाथराव खडसे यांनी विविध शिखरांना स्पर्श केला तरी दगडी बँक त्यांच्या हातात कधी आलीच नव्हती. यामुळे मौका पाहून त्यांनी चौका नव्हे तर षटकारच हाणला. अर्थात सत्तेशिवाय हे शक्य होते?

थोडक्यात सांगावयाचे तर- ना. एकनाथराव खडसे यांच्याकडे जिल्ह्यातील सत्तेची सुत्रे एकवटली असतांना सर्वपक्षीय आमदारांना त्यांचा विरोध परवडणारा नव्हता; चिमणराव पाटलांच्या मुरब्बीपणापुढे आ. डॉ. सतीश पाटील सपशेल चुकले; बाबूजींनी ना. गिरीशभाऊंचा जिल्हा बँकेत प्रवेश करून स्वत: रणांगणातून हुशारीने अंग काढून घेतले. आणि हा सर्व गोंधळ डोळसपणे अनुभवत गुलाबराव देवकर यांनी मुरब्बीपणा दाखवत निर्णायक क्षणाला नाथाभाऊंना साथ देत शेवटचा घाव घातला. यातूनच सहकार पॅनलचा दणदणीत विजय साकार झाला.

About the author

shekhar patil

4 Comments

Leave a Comment