चालू घडामोडी राजकारण

संक्रमण कालखंडाचा नायक

आज आणीबाणीच्या चाळीशीबाबत व्यापक उहापोह करण्यात येत आहे. यावर येत्या काही दिवसांमध्ये लिहण्याचा विचार आहेच. आजच माजी पंतप्रधान व्हि.पी. सिंग यांचा जन्म दिनही आहे.

आज आणीबाणीच्या चाळीशीबाबत व्यापक उहापोह करण्यात येत आहे. आणीबाणी आणि याच्या पश्‍चातच्या कालखंडाचे विविधांगी आकलन यातून आपल्यासमोर आले आहे. यावर येत्या काही दिवसांमध्ये लिहण्याचा विचार आहेच. मात्र आजच माजी पंतप्रधान व्हि.पी. सिंग यांचा जन्म दिनही आहे. साहजीकच आज त्यांच्याविषयी.

भारतीय राजकारणात आणीबाणी ही एक विभाजन रेषा मानली तर एवढ्याचा महत्वाचे पुढील संक्रमण मंडलवादाचे होते. या दोन्हींशी व्हि.पी. संबंधीत होते. आणीबाणीच्या कालखंडात इंदिरा गांधी यांच्या कॅबिनेटमध्ये ते मंत्री होते. उत्तरप्रदेशातल्या राजपूत राजघराण्यातील सिंग यांना राजकारणातील पदांच्या अनेक संधी चालून आल्या. पुढे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपदही मिळाले. आपल्या या कालखंडात त्यांनी चंबळ खोर्‍यातील अनेक डाकूंना मुख्य प्रवाहात आणले. राजीव गांधी दिल्लीत विक्रमी बहुमताने सत्तारूढ होत असतांना त्यांनी व्हि.पीं.ना आपल्यासोबत घेतले. त्यांच्याकडे वित्त खात्यासारखी महत्वाची जबाबदारी दिली. खरं तर राक्षसी बहुमतामुळे राजीव गांधी हवेत होते. मात्र देशाचा कारभार हाकणे फारसे सोपे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. वित्तमंत्री असतांना सिंग यांनी ‘एनफोर्समेंट डिरेक्टोरेट’ अर्थात ‘ईडी’ला मजबुती प्रदान करत या खात्याला व्यापक अधिकार दिले. आज ‘ईडी’ अत्यंत बलवान असून याचे बिजारोपण सिंह यांनीच केले होते हे आपण विसरता कामा नये. वित्तमंत्री म्हणून त्यांनी आपले लक्ष आर्थिक गुन्हेगारांकडे वळविले. यातून धिरूभाई अंबानी, अमिताभ बच्चन आदींसारख्या राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांवर त्यांनी धाडसत्र सुरू केल्याने देशात खळबळ उडाली. भारताच्या इतिहासात आजवर सत्ताधार्‍यांच्या जवळ असणार्‍यांवर अशी कारवाई करण्यात आली नसल्याने त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. अर्थात राजीवजींनी त्यांच्याकडू वित्त खाते काढून घेत संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली. मात्र त्यांनी थेट ‘बोफोर्स घोटाळ्या’चे भुत उकरून काढले. अर्थात यानंतर जनमोर्चा, जनता दल आदींच्या माध्यमातून त्यांनी राजीवजींना पायउतार केले.

vp-singh

पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर व्हि. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा देशाच्या राजकीयच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात दुरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला. खरं तर आपल्या सत्तेच्या शेवटच्या कालखंडात राजीव गांधी सरकारने नर्म हिंदुत्वाचा मार्ग पत्करत अयोध्येतील राम मंदिराच्या पुजेला परवानगी दिली होती. अर्थात याचा लाभ कॉंग्रेसऐवजी जनाधारासाठी धडपडणार्‍या भारतीय जनता पक्षाने उचलला. परिणामी ऐशीच्या दशकाच्या उत्तरार्धात भाजपने राम नामाचा आधार घेत देश ढवळून काढला. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशव्यापी रथयात्रा काढली. याला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. देशात धार्मिक ध्रुविकरण गतीमान झाले. याच प्रक्षुब्ध वातावरणात व्हि.पीं.नी मंडलवाद लागू केला.

भारताच्या राजकीय इतिहासात एकचदा दोन परस्परविरोधी विचारधारांनी टोकाचे रूप धारण केल्याचे मोजके कालखंड आले आहेत. यात ‘मंडल विरूध्द कमंडल’ या वादाचा समावेश करावा लागेल. वास्तविक पाहता स्वातंत्र्योत्तर भारताच्या वाटचालीत उच्चवर्णीयांकडेच राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुत्रे एकवटली होती. घटनादत्त अधिकारांमुळे दलित समाजालाही आरक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची संधी मिळाली होती. मात्र देशातील जवळपास निम्मे लोकसंख्या असणारा व मागासर्वात मोडणारा जातीसमूह प्रगतीच्या संधींपासून वंचित होता. नेमक्या याच मुद्यावरून आणीबाणीनंतर सत्तारूढ झालेल्या जनता पक्षाच्या सरकारने सामाजिक न्यायाच्या भुमिकेतून खासदार बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. त्यांनी १९८० साली अहवाल दिला तेव्हा जनता सरकार केव्हाच इतिहासजमा झाले होते. इंदिराजी आणि राजीव गांधी यांच्या सरकारांनी या शिफारसी बासनात गुंडाळून ठेवल्या होत्या. मात्र व्हि.पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेतल्याने देशात साहजीकच अभुतपुर्व हलकल्लोळ उडाला.

व्हि.पीं.नी धार्मिक कट्टरतावादाला हवा देणार्‍या भाजपला वेसण घालण्यासाठी ‘मंडल कमिशन’ला समोर केल्याचा आरोपही करण्यात येतो. अर्थात काहीही असले तरी ‘मंडल’ने अवघा देश व्यापला. याचे समर्थक आणि विरोधक रस्त्यावर उतरले. यथावकाश ही धुम्मस कमी झाली तरी ‘मंडल’ने भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला हे कुणी नाकारू शकणार नाही. या कमिशनच्या शिफारसी लागू केल्यामुळे इतर मागासवर्गीय अर्थात ‘ओबीसी’ हा देशातील एक मोठा समूह तयार झाला. या समुहातील अनेक जातींना ‘मंडल’ने आत्मभान दिले. देशातील बर्‍याच राज्यांमध्ये हा समूह राजकीयदृष्ट्या बलवान बनला. अर्थात याच समुहातील अनेक नेत्यांनी स्थानिक ते दिल्लीतल्या राजकारणात धडक दिली. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच समुहातील आहेत ही बाब आपण लक्षात घेतली तर एकंदरीतच ‘मंडल’चा भारतीय समाजावरील व्यापक प्रभाव आपल्या लक्षात येईल. अनेक राज्यांमधून ओबीसी चेहरे राजकीय क्षितीजावर चमकू लागले आहेत. अर्थात ओबीसी आरक्षणाचा राजकीयच नव्हे तर शैक्षणिक आणि पर्यायाने आर्थिक क्षेत्रातही प्रभाव पडला. व्हि.पीं.नी भाजपच्या झंझावाताला काही काळ तरी अटकाव घातला. अडवाणी यांचा रथ लालूप्रसाद यादव यांनीच अडविला. अर्थात भाजपने पाठींबा काढत सिंग यांना पायउतार केले. अवघ्या ११ महिन्यांच्या पंतप्रधानपदाच्या कालखंडात व्हि.पी. सिंग यांनी भारतीय राजकारणाला नवीन वळण लावले. खरं तर त्यांच्याप्रमाणेच मोरारजी देसाई, चरणसिंग, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल व ए.डी. देवेगौडा यांची सरकारही अल्पजीवी ठरली होती. मात्र अल्प कालखंडात छाप पाडली ती व्हि.पीं.नीच!

व्हि. पी. सिंग यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत व विशेषत: पंतप्रधानपदाच्या कालखंडात सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले. मात्र मंडलवादाच्या पलीकडेही त्यांची महत्ता आहेच. आज आणीबाणीचा सर्वत्र उल्लेख होत असतांना गत चाळीस वर्षातल्या जन आंदोलनांचा विचार करता व्हि.पीं.च्या देशव्यापी आंदोलनास मिळालेला पाठींबादेखील विलक्षण असाच होता. राजीव गांधी यांची साथ सोडून त्यांनी देशभरात भ्रष्टाचारविरोधी शंखनाद केले तेव्हा जनतेने उत्स्फुर्तपणे ‘राजा नही फकीर है…देश की तकदीर है!’ अशी घोषणा दिली. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील मोजक्या आंदोलनांमध्ये याचा समोवाश करता येईल. जयप्रकाश नारायण आणि अण्णा हजारे यांच्याप्रमाणेच व्हि.पीं.नी अवघा देश ढवळून काढला होता. आपल्या वैयक्तीक आयुष्यात ते चारित्र्यसंपन्न होते. खरं तर १९८९च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी स्वत: पंतप्रधानपदासाठी आपले ज्येष्ठ सहकारी देवीलाल यांचे नाव सुचविले होते. मात्र देविलाल यांच्यासह अन्य सर्वांनी सिंग यांचीच या पदावर निवड केली. १९९६च्या निवडणुकीत व्हि.पीं.च्याच पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘युनायटेड फ्रंट’ला यश मिळाल्यानंतरही त्यांना पंतप्रधानपदाची संधी होती. अगदी सर्वानुमते त्यांचे यासाठी नावही सुचविण्यात आले होते. मात्र पंतप्रधानपदाच्या पहिल्याच अनुभवांनी पोळलेल्या सिंग यांनी याला नम्रपणे नकार दिला ही बाब आपल्या राजकीय इतिहासात लोकविलक्षण अशीच मानावी लागेल.

मध्यंतरी व्हि.पी. सिंग यांच्या जनता दलाची अनेक शकले उडाली. अनेक मातब्बरांनी राजकीय स्वार्थापोटी आपापले वेगळे संसार थाटले. काहींनी तर एकमेकांशीच दोन हात केले. मात्र तब्बल पाव शतकानंतर मुलायमसिंग, लालूप्रसाद, नितीशकुमार, देवेगौडा आदी व्हि.पीं.ची शिष्यमंडळी ‘जनता परिवारा’च्या नावाखाली एकवटली आहे. अर्थात अवघ्या देशाला आपल्या झंझावाताने हादरवून सोडणार्‍या नरेंद्र मोदी यांचा मुकाबला करण्यासाठी राजकीय अपरिहार्यतेपोटी या मंडळीला एकत्र येणे भाग पडले आहे. मात्र या माध्यमातून का होईना व्हि.पी. सिंग यांचा राजकीय वारसा पुढे चालू राहणार आहे. ही सर्व मंडळी आणीबाणीच्या कालखंडातील नायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून पुढे आलेली होती. मात्र त्यांना राजकारणात बस्तान बसविण्याची खरी संधी व्हि.पीं.नीच दिली हे नाकारता येणार नाही. एका अर्थाने नरेंद्र मोदी यांचा कमंडलवाद तर ‘जनता परिवारा’च्या मंडलवादात आगामी काळात पुन्हा राजकीय संघर्ष होणार आहे. यात कोण बाजी मारणार याचे उत्तर तर येणारा काळच देणार आहे.

जाता-जाता:- सहृदयी राजकारणी म्हणून ख्यात असणारे व्हि.पी. सिंग हे उत्तम चित्रकार आणि संवेदनशील कविदेखील होते. त्यांच्या मुक्तछंदातील काही कविता राजकीय आणि सामाजिक भाष्य करणार्‍या आहेत. यातील दोन निवडक आपल्यासाठी.

कुर्सी के हाथ होते हैं, पैर और पीठ भी

पर

सिर नहीं होता

यह सर आये कैसे?

चिन्ता न करो

कुर्सी का अ-सर इतना

कि सर के पुजारी

घेरा डाल देते हैं

और सर सर के मंत्र जाप से

बैठनेवालों को सर चढ़ा देते हैं

कुर्सी पर बैठनेवाले के सर की

इस बलि से

कुर्सी का एक सर उग आता है

सत्ता का एक गणेश पैदा हो जाता है

फिर कुर्सी का ही सर बोलता है

बैठनेवाला तो कुर्सी के पेट में समा जाता है

00000000——-0000000000000————–000000000000

आईने मे मेरी शक्ल और मुझमे एक फर्क है

जब मै चिखता हू

तो वह सिर्फ होंठ हिलाती है

शक्ल तो मेरी ही है

पर उसमे

मेरी आवाज नही

क्यो ?

मेरी चिख के पिछे

दिल है

आईने मे मेरी सुरत के पीछे

दीवार है…

About the author

shekhar patil

Leave a Comment