चालू घडामोडी राजकारण

शिवसेनेची संभ्रमावस्था

‘सामना’ सातत्याने भाजपविरोधी भुमिका घेत असतांना व विशेषत: विधीमंडळातही पक्षाचे आमदार सरकावर तुटून पडत असतांना ठाकरे यांच्या या पवित्र्याने शिवसेनेची संभ्रमावस्था उघड झाली आहे.

राज्याच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी विधीमंडळाच्या अधिवेशनातील पहिल्या टप्प्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने दाखविलेली एकी तुटल्याचे संकेत मिळत असतांनाच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपले मौन तोडत फडणवीस सरकारची पाठराखण केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणारे ‘सामना’ सातत्याने भाजपविरोधी भुमिका घेत असतांना व विशेषत: विधीमंडळातही पक्षाचे आमदार सरकावर तुटून पडत असतांना ठाकरे यांच्या या पवित्र्याने शिवसेनेची संभ्रमावस्था उघड झाली आहे.

भाजप आणि शिवसेनेतील आजच्या धुम्मसची बिजे अनेक वर्षांपुर्वीच रूजली होती. युतीच्या सुमारे पाव शतकाच्या वाटचालीत शिवसेनेने कायम मोठ्या भावंडाची भुमिका पार पाडली. यातून भाजपच्या स्थानिक व राज्यच नव्हे तर केंद्रीय नेत्यांनाही अनेकदा ठाकरी शैलीत प्रहार सहन करावे लागले होते. शिवसेनेने अनेकदा उघडपणे भाजपविरोधी भुमिका घेतली होती. अगदी युतीधर्म तोडून शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना मतदान केले होते तेव्हाही भाजपला स्वस्थ बसल्यावाचून काहीही पर्याय नव्हता. खरं तर राज्याच्या अनेक भागांमध्ये या दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होत होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेकदा ते एकमेकांविरूध्द उभे ठाकले होते. मात्र दोन्ही पक्षांनी युती अपरिहार्य होती. केंद्रात आघाडी सरकारमुळे भाजप ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करत होती. मात्र गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला नामी संधी चालून आली. खरं तर मोदी लाटेमुळे प्रचंड अडचणीत असूनही शिवसेनेला विक्रमी यश मिळाले. मात्र मोदी सरकारला स्पष्ट बहुमत असल्याने शिवसेनेचे उपद्रवमुल्य एका क्षणात संपले. परिणामी भाजपने सत्तेत अल्प वाटा देऊनही आदळआपट करण्यापलीकडे शिवसेनेला काहीही करता आले नाही. अर्थात तेव्हा राज्यात असलेल्या आघाडी सरकारचा गलथानपणा आणि एकंदरीतच भाजपला असणार्‍या अनुकुल वातावरणाचा अगदी योग्य अंदाज घेत भाजपने शिवसेनेला शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपावरून झुलवत ठेवत युती तोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. अर्थात यामुळे चवताळलेल्या शिवसेना नेत्यांनी आघाडीपेक्षा भाजपलाच टार्गेट केले. आजवरही याच पवित्रा कायम आहे. विधानसभेत शिवसेनेने बर्‍यापैकी कामगिरी केली तरी राष्ट्रवादीने न मागताही भाजपला पाठींबा जाहीर केल्याने त्यांची गोची झाली. यानंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली होऊन शिवसेना सत्तेत सहभागी झाली तरी त्यांना हवा असणारा वाटा मिळाला नाही. यातच भाजपने त्यांची सातत्याने कोंडी केल्याने शिवसेनेचे मंत्री मोकळा श्‍वासही घेऊ शकत नसल्याचे आजचे चित्र आहे.

हे सारे होत असतांना शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या ‘सामना’तून सातत्याने भाजपच्या स्थानिक आणि केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल करण्यात येत आहे. यात मुंबई महापालिकेतल्या विविध मुद्यांवरून शिवसेनेला कोंडीत पकडणार्‍या आशिष शेलार यांच्यावर तर अगदी खालच्या पातळीवरून टीका करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा देण्यात आली. आता विधानसभेच्या पावसाळी सत्राच्या प्रारंभी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपवर कडाडून टीका केली असतांना शिवसेनेचे मंत्री व आमदार स्वस्थ बसून राहिले. राष्ट्रवादीचे अतिउत्साही नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर उघडपणे शिवसेना आमच्यासोबत असल्याची घोषणाबाजीही केली. यानंतर सभागृहात पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर व गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफीवरून फडणवीस सरकारला फटकारले. यामुळे हा पक्ष अद्यापही विरोधी पक्षाच्या भुमिकेत असल्याचे दिसून आले. मात्र यानंतर अचानक उध्दव ठाकरे यांनी अचानक फडणवीस यांची पाठराखण करत आधीच्या आघाडी सरकारवर टीका केली. यामुळे शिवसेनेने पवित्रा बदलला की काय? असे वाटू लागले. मात्र पुन्हा ‘सामना’च्या अग्रलेखात भाजप व कॉंग्रेस पक्षाच्या गोंदीया जिल्हा परिषदमध्ये झालेल्या युतीवरून प्रहार करण्यात आले आहेत. परिणामी आता सभागृहात आपल्या मित्रपक्षाविरूध्द भुमिका घेणारे आमदार तर ‘सामना’तूनही याचाच कित्ता गिरवणार्‍या शिवसेनेचे पक्षप्रमुख मात्र जाहीरपणे भाजपची बाजू घेत असल्याचे विचित्र चित्र आज दिसून येत आहे. एका अर्थाने या पक्षाच्या संभ्रमावस्थेचेच हे निदर्शक आहे.

भाजपने शिवसेनेची पुरती कोंडी केली आहे. यामुळे केंद्र व राज्यात हा पक्ष आत्मविश्‍वास हरवून बसल्यागत वाटत आहे. यातच पक्षाची भुमिकाही सोयिस्करपणे बदलणारी असल्याचे दिसून येत आहे. परिणामी एके काळी आपल्या ठाम भुमिकेसाठी ख्यात असणार्‍या शिवसेनेला सातत्याने कोलांटउड्या माराव्या लागत आहेत. यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. यात युती एकत्रीतपणे लढणार की नाही? याबाबत दोन्ही पक्षांचे नेते संभ्रम निर्माण करण्याची भुमिका घेत आहेत. खरं तर युती एकत्रितपणे लढल्यास दोन्ही पक्षांना लाभ होईल. अन्यथा स्वबळावरील निवडणूक त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. मात्र मुळातच दोन्ही पक्षांचे संबंध आणि शिवसेनेची बुचकळ्यात टाकणारी भुमिका पाहता याबाबतही आताच सांगता येणे कठीण झाले आहे.

Uddhavji_thackre

About the author

shekhar patil

Leave a Comment