Featured slider अनुभव पत्रकारिता

शिल्पकाराच्या सावलीत !

Written by shekhar patil

आज देशदुतचे माजी संपादक तथा माझ्या आयुष्यावर अमीट प्रभाव टाकणारे सुभाष सोनवणे सरांचा वाढदिवस. याचे औचित्य साधून त्यांना केलेले हे वंदन…!

आधीच्या लेखांमध्ये मी नमुद केलेय. मला जीवनात भेटलेल्या तीन माणसांचा माझ्या आयुष्यावर अमीट प्रभाव आहे. माझे वडील, भुसावळ येथील गोपाळ नारायण फेगडे आणि दैनिक देशदुतचे माजी संपादक सुभाष सोनवणे. वडिलांनी एकंदरीतच माझा पिंड घडविला. जीवनातील सदाचाराचे महत्व त्यांनी स्वत:च्या आचरणाने दाखवून दिले. फेगडेआप्पा यांनी माझ्या अंतर्यात्रेला गती दिली तर सुभाष सोनवणे हे पत्रकारितेतील माझे गुरू. (ज्यांना आयुष्यात कधीही न भेटल्याची खंत आहे यात पहिला क्रमांक ओशो रजनीश यांचा. यानंतरच्या यादीत अनेकांचा समावेश आहे. अर्थात हा वेगळा विषय आहे.) फेगडेआप्पा यांच्यावर ‘मन ओथंबुनी येती’ या लेखातून स्मृतींना उजाळा दिलाय. आज सुभाष सोनवणे सरांचा वाढदिवस. याचे औचित्य साधून त्यांना केलेले हे वंदन…!

{ मी पत्रकारितेतील अनुभवांवर आधी लिहलेल्या खालील लेखांमधून सोनवणे सरांबाबतची थोडीफार माहिती आपल्याला कळू शकते. यावर क्लिक करून आपण ते वाचू शकतात. }

* पत्रकारितेतील पहिले पाऊल

* देशदुतचे दे धमाल दिवस

* सृजनशील साडेसाती

सुभाष सोनवणे साहेब सेवानिवृत्त झालेले असले तरी प्रत्येक सोमवारी आपले ‘भुंगा’ हे सदर लिहण्यासाठी देशदुतमध्ये येतात. परवाच अर्थात सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेला देशदुतच्या कार्यालयात सुभाष सोनवणे साहेबांना भेटायला गेलो. सरांजवळ बसलो. लागलीच रामसिंग, राजू पाटील आले. मी सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही काही मित्र मिळून एक छोटेखानी कार्यक्रम करत असल्याचे सांगितले. सरांनी तातडीने होकार दिला. लागलीच त्यांनी चहा बोलाविला. आता लालाजींचा चहा म्हणजे मोठे प्रकरण. देशदुतमध्ये असतांना हा माणूस मला नेहमी थंड चहा आणून द्यायचा. मी त्यांना गमतीने म्हणायचे ‘‘लालाजी तुम्ही मला थंड चहा देतात म्हणजे तुम्ही बियरबार खोलल्यास गरम बियर देणार की काय?’’ यावर ते दिलखुलास हसायचे. त्या दिवशी मात्र माझ्या या कॉमेंटशिवायही लालाजी हसले. सरांसोबत थोडीफार चर्चा झाली. अर्थात काही क्षणातच माझ्यासमोर पुन्हा देशदुतचे ते भारावलेले दिवस साकार झाले.

देशदुतमध्ये असतांना सर दुपारी साधारणत: दोन वाजेच्या सुमारास येत असत. याआधी एक ते दीड वाजेच्या दरम्यान आमचे भोजन झालेले असे. अर्थात आधीच पानांचा मजकुर डीटीपी ऑपरेटर्सकडे दिलेला असल्याने तसा हा वेळ निवांत असे. साहेबांची कार कार्यालयाच्या गेटमधून आत येतांना दिसताबरोबर रिसेप्शनवर हालचाल सुरू होई. लालाजी (छगनलाल जैसवाल), योगेश, किरण वा दुसरा कुणी शिपाई सर गाडीतून उतरून येण्याआधी त्यांच्या कॅबिनचा दरवाजा उघडून ठेवत. यानंतर सरांचा ड्रायव्हर चंदू त्यांची ब्रिफकेस घेऊन कॅबिनमध्ये येत असे. साधारणत: पाच मिनिटातच बेल वाजल्याबरोबर आम्हाला सांगावा आला हे लागलीच समजत असे. यानंतर सुमारे एक तासभर सरांची सोबत मिळत असे. प्रारंभी ‘पंचनामा’ होत असे. यात देशदूतमधील आजच्या अंकातील हुकलेल्या बातम्यांची एका वहीत नोंद करण्यात येत असे. याशिवाय दुसर्‍या दिवसासाठी बातम्यांचे नियोजन करण्यात येत असे. काही मुख्य बातम्या हुकल्यास संबंधीतांना सर बोलत. अन्यथा संपादकीयमधील आम्ही सहकारी बोलत असू. पंचनामा सुरू असतांना सर आणि आमच्या भन्नाट चर्चा रंगत. मग कधी सर खुलत आणि ‘लोकसत्ता’तील अफलातून आठवणी सांगत. तर काही चालू घडामोडींवरही भाष्य करत. पंचनामा आटोपल्यानंतर साधारणत: तीन सव्वातीनच्या सुमारास आम्ही सर्व सहकारी दिवसाची पाने लावण्यासाठी डीटीपी विभागात जात असत. पाच वाजेच्या सुमारास सरांना पाने दाखविण्यासाठी जावे लागायचे. इथपर्यंत सरांचे लिखाणही आटोपलेले असे. मग पुन्हा एक तासापर्यंत मोकळा वेळ असे. या वेळेत मात्र अगदी मनमोकळ्या आणि एैसपैस गप्पा होत. त्या काळी सहा वाजेला ई-टिव्हीवर बातम्या येत असत. इथपर्यंत सायंकाळचे सहकारीदेखील आलेले असत. यामुळे सर त्यांच्यासोबत बातम्या पाहत असल्याने साहजीकच आम्हीदेखील घरी निघण्याची तयारी करायचे. याचा अर्थ असा की, दररोज दुपारी दोन ते तीन आणि पाच ते सहा असे दोन तास आम्हाला सरांचे सानिध्य लाभत असे. रविवार वगळता सर फारसे सुटी घेत नसत. यामुळे सोमवार ते शनिवार आम्हाला सरांचा दररोज दोन ते तीन तास सहवास लाभत असे. तब्बल साडे सात वर्षे हा क्रम सुरू राहिला. दरम्यान, टप्प्याटप्प्यातून मला सोनवणे सर समजत गेले. अर्थात आमच्यातील बंधदेखील मजबुत झाला.

मला सुभाष सोनवणे यांचे प्रथमदर्शनी स्वरूप सालस, सरळ, निगर्वी असे वाटले. अर्थात त्यांच्यात एक करारी माणूसही दडलाय. वेळ प्रसंगी ते निर्णय घेतांना खूप कठोर बनत. अर्थात यानंतर स्मितहास्य करत ‘अरे आजच्या जगात फक्त साने गुरूजी बनून चालत नाही. वेळप्रसंगी दणका द्यावाच लागतो.’’ असे म्हणत. पहिल्या काही दिवसांमध्येच मला सरांचा बौध्दीक अवाका अफाट आणि अथांग असल्याचे लक्षात आले. मात्र निव्वळ आपल्या विद्वत्तेने जगाला दिपवून टाकणे हा त्यांचा उद्देश कधीही नव्हता. तसे त्यांच्या लिखाणातून कधी जाणवलेही नाही. एक तर ते सकाळीच विविध दैनिकांचे अगदी सुक्ष्म वाचन करत असत. ‘पंचनामा’ करतांना आमच्या सांगण्यात काही विसंगती आढळल्यास लागलीच अमुक-तमुक वर्तमानपत्राच्या या पानावर ती बातमी आली असल्याचे सांगून ते आम्हाला चकीत करत. अर्थात यामुळे आम्हीदेखील वर्तमानपत्र काळजीपुर्वक वाचू लागलो हे सांगणे नकोच. यातूनच लिखाणासाठी नवनवीन विषय सुचू लागले. बरेच विषय साहेबही देत. यामुळे सृजनाला गती मिळाली. याच प्रकारे माझ्यासोबत पत्रकारितेत कारकिर्द सुरू केलेल्या गिरीश निकम यालादेखील खुले आकाश मिळाले. गिरीश हा तसा हळवा आणि कविमनाचा. त्याचा कल साधारणपणे साहित्य, कला व संस्कृतीकडे. इकडे मला चौफेर विहार करणे आवडत असे. यामुळे मी इतके वैविध्यपुर्ण लिखाण केले की आजही कधी शांतपणे विचार केल्यास मला स्वत:लाच यावर विश्‍वास बसत नाही. २००४च्या मध्यावर गिरीश सकाळला गेला. यानंतर मी देशदूत सोडेपर्यंत माझ्यासोबत अनेक जण आले. यात नवी सहकार्‍यांसह जुन्यांचाही समावेश होता. (याबाबत मी आधीच लिहलेले असल्याने पुनरावृत्ती टाळतोय.) सुभाष सोनवणे साहेब आपल्या आठवणींमध्ये फक्त हरवून जात नसत. तर यातून आमच्यासारख्यांनी काय घ्यावे हे नेहमी सांगत. ‘लोकसत्ता’मध्ये अमुक एका कारणामुळे आपल्याला संपादकपद मिळाले नाही हे कायम सांगण्याऐवजी तेथील कार्यसंस्कृतीबाबत ते नेहमी चर्चा करत. देशदुतमध्ये आमच्यासारख्या नवोदितांना लिखाणाची संधी असल्याने आम्ही याचा उपयोग करावा अशी त्यांची नेहमी तळमळ असे. अर्थात त्यांच्या या संदेशाचे गांभिर्य मोजक्यांच्याच लक्षात आले. सुदैव..यात मी होतो! माझ्याशिवाय काही सहकार्‍यांनीही याचे सोने केले.

इतर लिखाण करणार्‍यांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले. चंद्रकांत भंडारी, प्रा. शालीग्राम बोरोले आदींसह अनेक स्तंभ लेखकांशी सरांचे अगदी जिव्हाळच्याचे संबंध बनले. काही स्तंभलेखक सकस लिहत असले तरी त्यात अनावश्यक फापटपसारा वा व्याकरणाच्या चुका असत. सर अत्यंत कुशलपणे कात्री चालवून उत्तम लेख तयार करत. अनेकांच्या लिखाणात त्यांना भरदेखील घालावी लागत असे. कोणतीही कुरकुर न करता ते हे काम करत. एका अर्थाने सोनवणे सरांनी देशदुतमध्ये लिखाण संस्कृती विकसित केली. याचसोबत देशदुतची लिखाणशैली विकसित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. मी रूजू होताच त्यांची अरूण फडके यांचा अगदी खिशातही मावणारा शब्दकोश विकत घ्यायला लावला. कार्यालयातील वाचनालयात असणारी डिक्शनरी, मासिके आदींचा वापर करण्याचेही त्यांनी सुचित केले. बातमी वा लेखात एकाच शब्दाची पुनरावृत्ती टाळावी. पर्यायी शब्द वापरावेत असा त्यांचा आग्रह असे. साहेबांचा शुध्दलेखनावर इतका भर असे की अनेकदा याबाबत आम्हालाही कंटाळा वाटत असे. आम्ही दिवसा लावलेल्या पानांवर सर चुका काढत. या चुका स्वत: दुरूस्त करून घेण्याचे त्यांचे सांगणे असे. स्वत: सरदेखील डीटीपी ऑपरेटरच्या मागे उभे राहून चुका दुरूस्त करून घेत असत. अनेकदा याची टवाळीदेखील करण्यात येई. यातून काही अफलातून किस्सेदेखील घडलेत. म्हणजे कुणी वार्ताहर होण्यासाठी अर्ज घेऊन आल्यानंतर सर त्याच्याशी बोलण्याआधी त्याच्या अर्जातील अशुध्द लेखन दुरूस्त करत तेव्हा समोरचा हबकतच असे. एकदा तर एक जण बातमी देण्यासाठी तक्रार अर्ज घेऊन आला. सरांनी सवयीप्रमाणे त्यातील चुका अधोरेखित केल्या तेव्हा त्या बिचार्‍याने वासलेला ‘आ’ पाहून आम्ही नंतर पोट धरू हसलो. अर्थात ‘टाईप्ड’ होणार्‍या आणि शुध्दलेखनाकडे दुर्लक्ष करणार्‍या मंडळींचा साहेबांचा प्रचंड तिटकारा होता. त्यांच्यासाठी सर नेहमी ‘बनचुके’ हा शब्द वापरत असत. पत्रकारितेत नवीन आलेल्यांना बनचुके होण्याचा मोठा धोका असल्याची त्यांना जाणीव होती. याबाबत आम्हा सहकार्‍यांना ते अनेकदा सुचित करत असत. क्वचित कुणी अळमटळम करत त्यांना फसविण्याचाही प्रयत्न करायचा. तो व्यक्ती बाहेर गेल्यानंतर साहेब खळाळून हसत म्हणायचे…‘‘अरे हा मला बनवतोय हे समजतेय रे…आपण उगाच समजत नसल्याचे नाटक करून त्याचा गैरसमज कायम ठेवावा इतकेच…!’’

देशदुतच्या कार्यालयात एक सक्षम कार्यसंस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न करणारे सुभाष सोनवणे सर हे वर्तमानपत्राचा एक सोज्वळ चेहरादेखील बनले. सरांसोबत कधीही बाहेर कार्यक्रमाला जाण्याचा योग आला नाही. मात्र त्यांनी समाजात काय मिळवले हे एका उपक्रमातून मला समजले. सरांसोबत सुमारे दोन ते अडीच वर्षे मी जळगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये ‘उद्योजकांच्या भेटीला संपादक’ या उपक्रमात सहभागी झालो होतो. यातील अनेक उद्योजक आम्ही आत गेल्याबरोबर साहेबांचे चरणस्पर्श करत भरभरून बोलू लागत. यात साहेबांच्या उत्कृष्ट लिखाणापासून ते ‘मी तुम्हाला ओळखतो…तुम्हाला ऐकलेय…तुमच्याविषयी ऐकून आहे’ अशा प्रतिक्रिया येत असत. समाजातील या यशस्वी आणि अभिजात वर्गात सरांना असणारा आदर हा त्यांच्या अखंड कार्यमग्नतेचीच पावती होता. अर्थात अभिजनच नव्हे तर सर्वसामान्यही सरांचे चाहते असल्याचे अनेकदा आम्हाला दिसून आले. देशदुतमध्ये सर्वसामान्य खान्देशी जीभाऊ आणि बायजाच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटावे ही त्यांची एकमेव धडपड होती. अशी भुमिका त्यांनी वारंवार व्यक्तदेखील केली. आणि याचनुसार ते वागले. यासाठी पारंपरिक पत्रकारितेतील चौकटी तोडण्यासही त्यांनी पुढेमागे पाहिले नाही. पाऊस-पाणी व हवामनविषयक बातम्या नियमितपणे याव्यात असा त्यांचा आग्रह असे. तेव्हा अनेक वार्ताहर आपापल्या गावात मोबाईलची रेंज नसल्याच्या बातम्या पाठवत. यावर ‘‘अरे याला गावातील अन्य असुविधा दिसत नाहीत का?’’ अशी विचारणा ते नक्की करत. म्हणजे गावात मोबाईलची रेंज नसणे ही काही जणांसाठी समस्या असली तरी इतरांसाठी रस्ते, पाणी, वीज, पथदिवे यादेखील समस्या असून याकडे दुर्लक्ष का? असा ते प्रश्‍न करत. कृषी वार्तापत्रांचाही त्यांचा आग्रह असे. अनेक जण याचे पालन करत असत. काहींची नजर मात्र मळलेल्या पाऊलवाटेच्या पलीकडे नसे. आधीच सांगितल्याप्रमाणे सर केवळ भुतकाळात रमत नसत. तर नव्याचे खुल्या दिलाने स्वागत करण्याची त्यांची तयारी असे. प्रारंभी दिवसभरात ‘टेलिप्रिंटर’वर आलेल्या पीटीआयच्या बातम्यांचे भाषांतर मी करून ठेवावे असा त्यांचा आग्रह होता. यानंतर इंटरनेटवरील ताजे संदर्भ काढून ठेवण्यासही ते सांगत. अनेकदा ते स्वत:च्या लेखाबाबत चर्चादेखील करत.

सुभाष सोनवणे साहेबांनी देशदुतमध्ये भांडवल बाजारातील गुंतवणुकदार तयार केले ही बाब अत्यंत विस्मयकारक आहे. शेअर बाजार म्हणजे सट्टा असा अनेकांचा समज असतो. बरेच जण हे उच्चवर्गियांचे खुळ असल्याची कल्पना करून घेतो. मात्र आपल्याकडील पडलेला पैसा अभ्यासपुर्वक आणि दीर्घकालीन नियोजनाने यात अडकवला असता याचा उत्तम परतावा मिळतो असे त्यांनी अनेकांना कळकळीने सांगितले. यातून किमान एक डझनपेक्षा जास्त सहकार्‍यांनी ‘डीमॅट खाते’ उघडून गुुंतवणूक सुरू केली. काही जणांनी याचा सखोल अभ्यासही केला. मी आधीच सांगितल्याप्रमाणे सुभाष सोनवणे सरांचा अर्थशास्त्राचा गाढा अभ्यास होता. यातच १९८०पासून ते सजग गुंतवणूकदारही होते. अनेक शेअर्समुळे आपल्याला कसा लाभ झाला हे सांगतांना सरांची कळी खुलत असे. ते अनेकदा शेअर्सच्या ‘डिव्हीडंट’ची कागदपत्रे दाखवून दीर्घकालीन गुंतवणुकीचे लाभ सांगत. सरांचा ‘पोर्टफोलिओ’ नेमका किती? याबाबत कार्यालयात अनेकदा चर्चाही रंगत असे. आश्‍चर्याची बाब म्हणजे सोनवणे सरांकडून सगळ्या बाबी शिकण्यात आघाडीवर असणारा मी यात मात्र मागे पडलो. अर्थात यामागे तत्कालीन कारणेदेखील होती. २००५ ते २००७ या सुमारे अडीच वर्षात आईच्या कर्करोगाने माझे आयुष्य पार विस्कटून गेले होते. आई या दुर्घर व्याधीतून सहीसलामत बाहेर आली हा आनंद आहे. मात्र यात मी एक चांगला गुुंतवणूकदार होण्यापासून वंचित राहिलो तो कायमचाच… सोनवणे साहेबांचा उल्लेख आल्याबरोबर क्रिकेटची आठवण होणार नाही हे अशक्य. साहेब क्रिकेटचे बेहद शौकीन. अगदी हाडाचे रसिक. हा खेळ ते अक्षरश: जगत असत. क्रिकेटचा सामना सुरू असतांना साहेबांच्या कॅबिनमधील टिव्ही सुरू असे. अनेक जण वेळ मिळेल तसे डोकावून जात. कुणी भारतीय संघाविरूध्द बोललेले साहेबांना चालत नसे. अशी कॉमेंट करणार्‍यावर ते रागवत असत. या खेळाचे अनेक बारकावे त्यांना माहित असत. यावर ते अनेकदा चर्चादेखील करत. एखादा सामना सुरू असतांना सायंकाळी क्रीडा उपसंपादक राजू खेडकर आल्यानंतर तर या गप्पांना बहर येत असे.

मी आधीदेखील सांगितलेय- देशदुतमध्ये पाच वर्षे थांबायचे हा निर्धार मी मनाशी केला होता. यामुळे काही चांगल्या ऑफर्सकडे मी ढुंकुनही पाहिले नाही. या संकल्पानुसार २००७च्या डिसेंबरमध्ये देशदुत सोडण्याचा मी निर्णय घेतला. मात्र सर आहे तोवर देशदुत सोडू नये असा माझ्या अंतर्मनाने कौल दिला. खरं तर २००५ पासूनच जुन महिना आल्यानंतर सोनवणे साहेबांचा कंपनीशी असणारा करार संपणार असल्याच्या गप्पा रंगत असत. प्रत्यक्षात मात्र व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत असे अन् गप्पाबाजांची दातखिळ बसत असे. २००९ नंतर मात्र साहेबांच्या बोलण्यातून कंटाळा व्यक्त होऊ लागला. आयुष्यभर वाचन आणि लिखाण करून अगदी शिसारी आल्यागत होत असल्याची भावना त्यांनी अनेकदा बोलून दाखविली. कुटुंबाला वेळ देणे आवश्यक असल्याचेही ते सांगत. इथपर्यंत हेमंत अलोने यांच्यासारख्या सक्षम आणि समर्पित सहकार्‍याकडे कार्यकारी संपादकपदाची धुरा सोपवून ते बर्‍याच प्रमाणात निश्‍चिंतही झाले होते. सरांची निरोपाची भाषा सुरू असतांना मलाही दुसरे क्षीतिज खुणावत होते. ७ जून २०१० रोजी देशदुतमध्ये साडे सात वर्ष काम करून मी बाहेर पडलो तेव्हा हृदय कृतज्ञनेने ओथंबलेले होते. शेखर पाटील या परिस्थितीने फाटक्या तर बुध्दीने सर्वसामान्य असणार्‍या तरूणाच्या व्यक्तीमत्वाला देशदुतने नवा आयाम दिला होता. यावेळी माझ्यासोबत आठवणींचा कधीही रिता न होणारा खजिना तर होताच पण सोनवणे साहेबांनी दिलेले संस्कारही होते. सरांनी कठोर परिश्रम शिकवले. कामचुकारपणाला थारा न देण्याचा मंत्र दिला. सातत्याने आपल्याला अपडेट ठेवण्यासाठी वाचन आवश्यक असल्याचे बिंबवले. आपल्या जाणीव जीवंत राहण्यासाठी संवेदनशीलता हवी. पत्रकाराने नियमित कामाशिवाय लिहणे आवश्यक असल्याचे तर कायम सांगितले. हे सर्व केल्यावर लांड्या-लबाड्या न करताही पत्रकारितेत यशस्वी होता येते हे त्यांनी स्वत:च दाखवून दिले. आज देशदुतमधून बाहेर पडण्याला पाच वर्षे पुर्ण होत आली असतांना सोनवणे साहेबांची शिकवण ही किती समर्पक होती हे मला अधिक उत्तम रितीने उमगले आहे. किंबहुना साहेबांच्या शिकवणीचे अनेक पैलू मला काळाच्या ओघात समजले. आज मी स्वत: एका वर्तमानपत्राची धुरा सांभाळत असतांना सुभाष सोनवणे साहेबांप्रमाणेच इतरांना घडविण्याचा प्रयत्न करत आहे. ‘साईमत’ची कार्यसंस्कृती ही सोनवणे साहेबांच्या शिकवणीतून विकसित झाल्याचे मी जाहीरपणे व अर्थात कृतज्ञतापुर्वक मान्य करतो. एका व्यापक अर्थाने शेखर पाटील याच्यातील पत्रकार हा सरांनी घडविलाय….

एव्हाना लालाजींनी आणलेला चहा संपला होता. यातच साहेबांचा आवाज आल्यावर मी भानावर आलो. सरांशी थोडे बोलून निघालो. अर्थात अन्य सहकार्‍यांनी थांबविल्याने वेळ झाला. इतक्यात लक्ष्मण मला पुन्हा शोधत आला. ‘‘साहेबांनी तुम्हाला बोलावले’’ असे त्याने सांगितले. मी गेलो…आणि साहेबांनी काय करावे….अहो त्यांनी चक्क त्यांच्या ‘भुंगा’ सदरातील लेखाबाबत माझ्याशी चर्चा सुरू केली. एका क्षणात पाच वर्षांचा गॅप भरून निघाला. यातून माझ्या आणि सरांच्या लेखनाबाबत झालेल्या असंख्य अभ्यासपुर्ण चर्चा जीवंत झाल्या. अर्थात ४२ अंश सेल्सियसच्या कडाक्यातही मी हवेवर तरंगत पुन्हा माझ्या ऑफिसला गेलो.

सुभाष सोनवणे साहेब हे स्वत:च्या आयुष्यात वटवृक्ष बनलेत. काही जण फक्त वाढत्या वयानुसार अनुभव व बँक बॅलन्सनेच वाढतात. उच्च पदावर जात असतांना त्यांच्यातला मायेचा झरा आटत जातो. मात्र सरांनी माझ्यासारख्या अनेकांवर मुलासारखे प्रेम केले. खरं तर एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत दुसरे रोपटे जगत नसल्याचे म्हणतात. अनेक कथित मोठी माणसे दुसर्‍यांना बहरू देत नाही. मात्र सुभाष सोनवणे नावाच्या वटवृक्षाने अनेकांना बहरण्याच्या अमाप संधी दिल्या. वेळप्रसंगी त्यांचा प्रखर उनरूपी अडचणींपासून बचाव केला. योग्य वेळेवर खतपाणी घातले. अन् त्याच्या संगोपनाकडे जाणीवपुर्वक लक्ष दिले. काही जण वेल बनून परोपजीवी बनण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना झिडकारण्यातही सरांनी विलंब केला नाही. सरांनी संगोपन केलेली काही रोपटी अनेक आव्हानांना तोंड देत रूजली आहेत. त्यात कोपर्‍यात कुठे तरी माझा समावेश असल्याची कृतज्ञता मनात आहेच.

मी देशदुतला असतांना रामसिंग परदेशी याच्यासह अनेक सहकारी सुभाष सोनवणे साहेबांच्या आधीचे संपादक शशिकांत टेंबे यांच्या निरोप घेतांनाच्या लेखाचा अनेकदा उल्लेख करत. ‘क्षण मावळतीचा येता डोळ्यात उभे का पाणी!’ या शीर्षकाचा त्यांचा लेख खरोखरीच भावविवश करणारा असल्याचे त्यांचे म्हणणे होते. शोधूनही हा लेख मला मिळाला नाही. मात्र ‘इदं न मम…’ या भावनेने देशदुतची धुरा सांभाळल्यानंतर अगदी निरपेक्षतेने आपल्या सहकार्‍याकडे सोपविणे ही बाबही इतरांच्या डोळ्यात पाणी आणणारी निश्‍चित आहे. आजचा जमान कठोर वास्तववादी आहे. पॅकेजची रक्कम मोजायची आणि तेवढेच काम करायच्या या युगात निष्ठा आणि कठोर परिश्रम या बाबी कालबाह्य होण्याचा धोका आहे. यातून व्यवस्थापनही कोरडे बनले आहे. मात्र सुभाष सोनवणे साहेब यांच्यासारखे लोक अजूनही या मुल्यांना जपणारे आहेत. याचमुळे देशदुतच्या व्यवस्थापनाने सेवानिवृत्तीनंतरही त्यांना दिलेला सन्मान हा संस्थेप्रती समर्पित असणार्‍या एका ध्येयवादी व्यक्तीमत्वाचा केलेला यथोचित गौरवच होय. पत्रकारितचा हा एक उज्ज्वल आणि सकारात्मक पैलू आहे. असो. आठवणी बर्‍याच लांबल्या तरी खूप काही राहून गेलेय. याबद्दल पुन्हा कधीतरी!…सुभाष सोनवणे सरांना उदंड आयुष्य लाभावे हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना…!

About the author

shekhar patil

Leave a Comment