अनुभव

‘शिकलेल्या’ गाढवाची गोष्ट !

Written by shekhar patil

काही प्राण्यांवर मानवाने खुप अन्याय केलाय असे मला अनेकदा वाटते. यात गाढव, घुबड, माकड हे तर खूप बदनाम झालेले आहेत. मात्र खरा अभागी प्राणी हा गाढवच! म्हणजे बावळटपणा, मुर्खपणा, मद्दडपणा आदींना सरळसरळ ‘गाढव’ हे विशेषण मिळाले आहे. यामुळे मुर्ख माणसाला आपण तात्काळ ‘गाढव लेकाचा’ म्हणून टाकतो. आता गाढव हे घोड्यासारखे ऐटबाज नसले म्हणून काय झाले. बिचारे ओझे तर वाहतेच ना! तरीही त्याची खिल्लीदेखील उडविण्यात येते. जगातील बहुतांश भाषांमध्ये गाढवांवर वाक्प्रचार, म्हणी, शिव्या आदींची रेलचेल आहे. यात ‘गाढवापुढे वाचली गिता कालचा गोंधळ बरा होता’ यापासून ते अगदी थेट ‘साहेबाच्या पुढे आणि गाढवाच्या मागे चालू नये’ या आधुनिक म्हणीपर्यंतचे अनेक शब्द आपल्या अगदी ओठांवर असतात. ‘हितोपदेश’, ‘पंचतंत्र’, ‘इसापच्या नितीकथा’ आदी प्राचीन ग्रंथांपासून गाढवाला ‘गाढवपणा’ बहाल करण्यात आला आहे. आता येशू ख्रिस्त गाढवावरून स्वार होऊन जेरूसलेम मध्ये आले हे कुणी विचारात घेत नाही. विख्यात सुफी संत तथा अनेक लोककथांचा नायक मुल्ला नसरूद्दीन याचे वाहनदेखील गाढवच होते यालाही पध्दतशीरपणे बगल दिली जाते. असो. बिच्चारे गाढव! अरे हो मी हे आपल्याला सर्व का सांगतोय? अर्थातच गाढवाशी संबंधीत एक धमाल किस्सा आपल्यासोबत शेअर करायचाच म्हणूनच!

…तर झाले असे की, फेसबुकवर मित्र असणारे परभणी येथील ओमप्रकाशभाऊ गायकवाड यांनी तेथील उरूसातील पन्नालाल गाढवाच्या अफलातून ‘शो’बद्दल एक पोस्ट टाकली. त्यांनी अगदी मनोरंजक पध्दतीने पन्नालाल गाढवाच्या करामती आपल्या खुसखुशीत शैलीत नमुद केल्या होत्या. ते वाचून पटकन मला माझ्या जीवनातील एक अद्भुत किस्सा आठवला. मी त्यांच्या पोस्टवर कॉमेंट तर केलीच पण ही धमाल कथा जगाला सांगावी असे वाटले. यातूनच केलेला हा लेखन प्रपंच!

आनंद मेळा, मनोरंजन नगरी, उरूस, विविध जत्रा/यात्रा आदींमध्ये हवाई पाळण्यांसह अनेक थरारकतेचा अनुभव देणारी खेळणी, काही जादू व हातचलाखीचे प्रयोग आदींचा समावेश असतोच. यात हटकून आढळणारा एक प्रकार म्हणजे ‘पन्नालाल गाढव’ हे होय. यात अगदी प्रवाही शब्दांमध्ये लोकांना आकर्षित करून हे सर्वज्ञानी गाढव असल्याचे अनाऊन्स करण्यात येते. यात हुशारीने एक गाढव फेर्‍या मारतांना दाखवण्यात येते. तिकिट काढून आत आलेल्यांची गर्दी होताच हा खेळ सुरू होतो. यानंतर याचा मुख्य सुत्रधार विनोदी आणि खुमासदार शैलीत पन्नालालची स्तुती करतो. दरम्यान ते गोल रिंगणात फिरतच राहते. यानंतर तो त्याला प्रश्‍न विचारतो. यात येथे लाल रंगाचे टि-शर्ट घालून कोण आलेय? सारख्या बेसिक प्रश्‍नांपासून ते ‘बताओ पन्नालाल..कौन बच्चा आगे जाकर अफसर बनेगा?’, ‘कौन औरत बहोत होशियार है?’ सारखे प्रश्‍न विचारण्यात येतात. धमाल बाब म्हणजे ते गाढव अगदी अचूकपणे संबंधीत लोकांसमोर उभे राहते. यामुळे हा खेळ पाहून बहुतेक लोक थक्क होतात. तसेच माझे फेसबुक मित्र ओमप्रकाशभाऊदेखील झालेत. त्यांनी हा नेमका प्रकार काय? असा प्रश्‍न विचारला. यातील जवळपास पुर्ण उत्तर मला एका धमाल घटनेतून योगायोगाने माहित होते. तेच आपल्याला सांगतोय.

माझा एक मित्र जळगाव, भुसावळ, नंदुरबार आदी शहरांमध्ये ‘आनंद मेळा’ चालविणारा ठेकेदार होता. या माध्यमातून या विश्‍वाशी माझा निकटचा परिचय झाला होता. असेच एका वर्षी भुसावळ येथे आलेल्या पन्नालाल नावाच्या गाढवाच्या ‘शो’ने धमाल केली होती. मी वर वर्णन केल्याप्रमाणे तो सर्व बाबी अचूक ओळखत होता. एके दिवशी रात्री ‘आनंद मेळा’ संपल्यानंतर अर्थात अकरा वाजेच्या सुमारास एक वरिष्ठ सरकारी अधिकारी आपल्या पत्नीला घेऊन या ‘शो’ चालवणार्‍याकडे आला. त्यांच्या घरातील एक समस्या सोडवण्यासाठी ‘त्या’ गाढवाने मदत करावी असे साकडे त्या दाम्पत्याने घातले. म्हणजे ते दाम्पत्य नि:संतान होते. त्यांना आपल्या समस्येचे उत्तर त्या गाढवाकडून हवे होते. यावर त्या गाढवाचा मालक काकुळतीने म्हणाला की, ‘‘साहेब हे गाढव हुशार नाही हो. हे सगळे त्याला शिकवण्यात आलेय.’’ मात्र त्या अधिकार्‍याचा विश्‍वास बसेना. त्यांनी अगदी खूप रक्कम देण्याचे आमिष दाखविले. अखेर तो मालक थेट त्या अधिकार्‍याच्या पाया पडला. आम्ही हा सगळा गोंधळ पाहत होतो. मी त्या मालकाला खूप खोदून विचारले. तसा तो माझ्याशी चांगला परिचित होता. मी पत्रकार असल्याचे त्याला माहित होते. त्याने ‘त्या’ अधिकार्‍यासह मला सगळे काही सांगण्याची कबुल केले. फक्त हे पेपरमध्ये छापू नका अशी प्रेमाची अट त्याने टाकली. मी अर्थातच ती मान्य केली. त्या दाम्पत्याला त्याने दुसर्‍या दिवशी दुपारी बोलवले. तेव्हा मीदेखील गेलो. आता आनंदमेळ्यातील व्यावसायिकांसाठी दुपारचा वेळ हा अगदी आळसावलेला असतो. बहुतांश लोक झोपेतही असतात. अशा निवांत वेळी त्या माणसाच्या राहुटीत चहापाणी झाल्यानंतर आम्ही सर्व जण पन्नालाल गाढवाचा शो दाखवतात त्या शेडमध्ये गेले. त्याने आपल्या गाढवावरून मायेने हात फिरवला. आणि त्याने त्याला कसे शिकवले याची माहिती दिली.

तो व्यक्ती सांगू लागला- अशा स्वरूपाच्या गाढवाला तो वयात येण्याआधीपासूनच प्रशिक्षण सुरू होते. यासाठी त्याला सुरवातीला उपाशी ठेवण्यात येते. यानंतर एकच व्यक्ती त्याला चारा घेऊन जातो. अर्थात तो व्यक्ती दिसताच ते गाढव एकदम अलर्ट होते. हा व्यक्ती आपल्याला खाण्यासाठी घेऊन येतो हे त्याच्या मनात ठसते. अनेक महिन्यांपर्यंत हा प्रकार सुरू ठेवला जातो. यातून हळूहळू त्या गाढवाला त्या व्यक्तीचे इशारे समजू लागतात. शक्यतो हातातील एखादी साखळी, छोटीशी काठी, हात एवढेच नव्हे तर बोटांच्या संकेतानुसार तो वागू लागतो. यानंतर काही वर्षांच्या प्रशिक्षणात गाढव आणि त्या माणसांत बंध निर्माण होतो. यानंतर त्या गाढवाची अगदी जोरदार बडदास्त ठेवली जाते. याचा पुढील टप्पा त्या गाढवाला प्रत्यक्ष गर्दीत उभे करून त्याच्याकडून इशार्‍यावर कामे करण्याची सुरूवात होते. साधारणपणे असा ‘शो’ करणारे गोलाकार गर्दीच्या आतील रिंगणात गाढवाला फिरायला लावतात. दरम्यान, अनाऊन्समेंट होत असतांना तो माणूस गर्दीकडे निरखून पाहत या शो दरम्यान, कुणाकुणाजवळ गाढवाला उभे करायचे याचे आडाखे मनाशी बांधून ठेवतो. म्हणजे एखादे दाम्पत्य पाहून नवरा-बायकोबाबत मजेशीर प्रश्‍न त्याच्या मनात पक्का होतो. एखादे बालक पाहून ते भविष्यात मोठा व्यक्ती बनणार हे सांगणेही त्याला शक्य होते. गर्भवती महिला, टक्कल पडलेला पुरूष, विविध वयोगटातील लोक, याशिवाय अमुक-तमुक रंगाचा शर्ट, भाग्यवान व्यक्ती आदी बाबी तर त्याला सहजपणे दिसून येतात. यामुळे तो सातत्याने बोलत असतांना वा संगीत सुरू असतांना संबंधीत गाढव रिंगणात फिरते. यानंतर तो अगदी सुचकपणे आपल्या हातातील वस्तूचा अथवा हाताचा इशारा त्या व्यक्तीकडे करत असतो. इकडे गाढवाचे संपुर्ण लक्ष त्या माणसाच्या इशार्‍यावरच असते. यामुळे इशारा मिळताच तो त्या व्यक्तीजवळ जाऊन उभा राहतो. अनेकदा उपस्थित लोकांकडून त्यांचे घड्याळ वा मोबाईल फोन घेऊन ते अन्य लोकांना देऊन त्यांना लपण्यास सांगण्यात येते. यानंतर पन्नालालला संबंधीत वस्तू कुणी लंपास केल्या असा प्रश्‍न विचारण्यात येतो. अर्थात सुत्रधाराला ते लोक कुठे आहेत हे माहित असल्याने संबंधीतांसमोर ते थांबते अन् लोक थक्क होतात. एका अर्थाने गाढवाला दिलेले प्रशिक्षण आणि त्याच्या ‘रिंगमास्टर’चे प्रसंगावधान यातून पन्नालाल धमाल करत असल्याचे त्याने सांगितले. अर्थात त्याने माहिती देण्याचे थांबविताच आम्ही स्तब्ध झालो. मात्र यावर आमच्यापैकी कुणाचाही विश्‍वास बसेना. आतापर्यंत तो माहिती देणारा माणूसही फार्मात आला होता. तो म्हणाला ‘‘थांबा साहेब तुम्हाला प्रत्यक्षच दाखवतो!’’ झाले…तेथेच आमचा ‘शो’ सुरू झाला.

त्या माणसाने आम्हाला मोकळे उभे राहण्याचे सुचविले. यानंतर पन्नालालला मोकळे सोडण्यात आले. त्या माणसाने विना माईकने सायंकाळच्या शोसारखीच खुमासदार कॉमेंट्री सुरू केली. यानंतर त्याने सांगितले की, ‘बताओ पन्नालाल यहा पर घरसे झगडकर बच्चा कौन आया है?’’ ते गाढव माझ्यासमोर येऊन उभा राहिले. यानंतर त्याने अगदी उलट पध्दतीने पन्नालालला आज्ञांचे पालन करावयाला लावले. यात येथे नवर्‍याशी भांडणारी महिला कोण? असा प्रश्‍न विचारल्यानंतर ते गाढव संबंधीत अधिकार्‍यासमोर थांबले तर येथे वरिष्ठ अधिकारी कोण? या प्रश्‍नावर ते त्या अधिकार्‍याच्या पत्नीसमोर थांबले. अर्थात या सर्व घटनांमधून ते गाढव आपल्याच आज्ञा पाळत असून त्याला कोणतीही बुध्दी नसल्याचे त्याने आमच्यासमोर सिध्द केले. यानंतर पुढील टप्प्यात त्याने मुकपणेच आम्ही सांगितले त्या-त्या व्यक्तीसमोर पन्नालाल गाढवाला उभे केले. अर्थात हा संपुर्ण किस्सा पाहून त्या दाम्पत्यासह आम्ही सर्व जण खो-खो हसू लागलो हे सांगणे नकोच. संबंधीत अधिकारी आणि त्याची पत्नी तर ही माहिती मिळाल्यानंतर इतके खुश झाले की त्यांना लागलीच पाकिटातून हजार रूपये काढून त्या गाढवाच्या मालकाला दिले. अर्थात त्याने प्रेमपुर्वक नकार दिला तरी त्यांच्या आग्रहासमोर त्याला झुकावेच लागले. यानंतर लागलीच तेथेच आमची गप्पांची मैफिल रंगली. यात त्या माणसाने पन्नालाल आणि त्याच्या खेळाबाबत इतके किस्से सांगितले की हसून आमच्या मुरकुंड्या वळल्या.

अनेक सटोडिये पन्नालालच्या मालकाला आज कोणता आकडा येणार? हे विचारून हैराण करत असत. यासाठी ते रग्गड पैसा देण्यासही तयार असत. अनेक मुलांना आपल्याला अमुक-तमुक मुलगी कशी पटेल याचे उत्तर हवे असते. तर कुणी आपल्या दुश्मनाला धुळीस मिळवण्यासाठी पन्नालालने मदत करावी असे वाटत होते. या ‘शो’ साठी दुसर्‍यांदा येणारे अनेक तरूण वट मारण्यासाठी ‘आपण खुप विद्वान, सुंदर असून आपल्यावर खुप मुली भाळतात’ असा त्या गाढवाने दाखवावे अशी गळ घालतात. त्यासाठी पैसेदेखील देऊ करतात. त्यांना नाराज केल्यास ते धिंगाणा घालण्याची धमकी देतात अशी माहिती त्याने दिली. एकदा एका खेळात त्याने ‘‘पन्नालाल बताओ कौन दुसरे की बिबी के साथ इस शो मे आया है?’’ असा भलताच प्रश्‍न विचारला. आणि स्वत:च्याच पत्नीसोबत आलेल्या व्यक्तीसमोर ते गाढव उभे राहिल्याने अगदी हाणामारी होऊन ते प्रकरण पोलिसात पोहचल्याची आठवणही त्याने सांगितली. हे प्रकरण निस्तरतांना त्रास झाल्याचे तो म्हणाला. तो पुढे म्हणाला की, ‘‘साहेब आम्ही या प्राण्याला तयार करतांना बराच त्रास देतो हो…पण हे जनावर गाढव असले तरी इमानदार आहे…हुशार आहे. आज आमच्या कुटुंबासह अनेकांचे पोट त्याच्यावर चालते हो…तुम्ही लाख म्हणा अडला हरी गाढवाचे पाय धरी…मात्र साहेब आमच्यासाठी ‘हरी’ आमचा पन्नालालच आहे हो!’’ आणि असे बोलत असतांना तो त्या गाढवाला बिलगून अक्षरश: रडू लागला तेव्हा आमच्याही कडा पाणावल्या. निघतांना त्याने संबंधीत अधिकार्‍याने ही माहिती दुसर्‍याला देऊ नये आणि मी याची स्टोरी छापू नये असा पुन्हा आग्रह केला. विदर्भातील एका शहरात राहणार्‍या या माणसाचा अजूनही अधूनमधून संपर्क होत असतो. गेल्या वर्षीच त्याने फोन करून आपण या व्यवसायातून निवृत्त झाल्याचे सांगितले. आपण जनरल स्टोअर्स सुरू केले असून काही बांधकामाची कामेही करत असल्याचे त्याने सांगितले. सध्या आता हा माणूस अत्यंत समाधानाने आणि लौकीक अर्थाने समृध्द जीवन व्यतीत करत आहे. मी त्याला मोबाईलवरून ‘‘आता तर स्टोरी छापण्यास काही हरकत नाही ना?’’ असे विचारले असता त्याने होकार दिला. अर्थात आपल्या नावाचा उल्लेख कुठे करू नका अशी त्याने केलेली विनंती मी मान्य केली. यानुसार हा लेख आकारास आला. संबंधीत माणसाशी नंतर चर्चा करतांना देशभरात अशाच प्रकारे गाढवांना प्रशिक्षित करण्यात येत असल्याची माहिती दिली. आता धमाल योगायोग असा की, यातील बहुतांश गाढवांची नावे ही पन्नालालच आहेत. ही त्या व्यावसायिकांची काही तरी अंधश्रध्दाच असावी. अर्थात त्या व्यक्तीलाही याचे खरे कारण सांगता आले नाही.

(प्रस्तुत लेखामध्ये वापरण्यात आलेले गाढवाचे छायाचित्र हे प्रतिकात्मक असून ते आंतरजालावरून घेण्यात आले आहे.)

About the author

shekhar patil

14 Comments

 • असे असू शकते का? आपण मांडलेय खरे पण विश्‍वास बसत नाही. मात्र लेख नेहमीप्रमाणेच एकदम जोरदार झालाय यात शंकाच नाही…

 • माणसाला गाढव बनविणारं
  गाढव खरंच हुश्शाsर
  म्हणायचं होss..

 • खूपच छान आणि सविस्तर लेख असल्याने खूप आवडला.

 • धन्यवाद
  पन्नालाल गाढवाचा खरा इतिहास समजला

 • नगीनदास इंगळे, रावेर जि. जळगाव, महाराष्ट्र says:

  शेखर पाटील सर…..
  खरोखरच एकदम अफलातुन किस्सा….
  छान ,,,
  तुमच्या कडून नेहमीच काही तरी वेगळं, नवीन ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं…..

 • वरकरणी उथळ वाटणार्‍या विषयात आपल्या लेखनशैली मुळे उत्तरोत्तर उत्कंठा वाढवण्यात शेखर जी यशस्वी झाले. त्यात विनोदी प्रसंगांसह डोळे पाणावण्यापर्यंत अनेकविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. वाचकांच्या मनात आधीच रहस्योद्घाटन न करण्याचे अभिवचन देण्याची बाब सांगून लगोलग रहस्योद्घाटन करत बुचकळ्यात टाकून शेवटी ते पुर्व परवानगीनेच प्रसिद्ध करत असल्याचे मान्य करून पुन्हा एक धक्का दिला.
  असो. व्यवसायाचे गुपित उघड झाल्याने या लेखाचा वाचक त्या खेळातील उत्कंठेपासून कायमचा वंचित होऊन इतर कलाकारांच्या उत्पन्नावर अल्पसा का असेना परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  असो मला ही त्यायोगे मेहरबान या चित्रपटातील मेहमूद वर चित्रीत मुहम्मद रफी चा मेरा गधा गधो का लिडर हे गीत आठवले. त्याची लिंक शेयर करीत आहे.
  https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://m.youtube.com/watch%3Fv%3DX_URMh0Qyqc&ved=0ahUKEwjIs4Og6vfaAhVCPY8KHVcPANUQtwIIHTAA&usg=AOvVaw3U51usrdelVqQZHypWvP6U

 • जबरदस्त!
  मी पण हा खेळ अनुभवला आहे, पण त्या पन्नालाल चे रहस्य आपल्या लेखातून कळले.
  धन्यवाद.

 • शखरभाऊ,आपली लेखनशैली उत्तम आहे आणि मनोरंजन कसे करावे याची नाडी अचूक कळलीय आपणाला! खूप सुंदर लेख,मजा आली,आता तुमच्या साईटवरील इतरही गोष्टी वाचतो!💐💐

Leave a Comment