राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ना.शरदराव पवार यांनी धक्कातंत्र अवलंबत मनीषदादा जैन यांना रावेरची उमेदवारी देत त्यांना राजीनामा देण्याचेही आदेश दिले. मनीषदादांच्या माध्यमातून ‘७ शिवाजीनगर जळगाव’शी सलोखा राखत पवार यांनी जळगाव मतदारसंघातही लाभ होण्याचे गणीत तर मांडलेच, पण रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेचे असंतुष्टांना स्वप्न दाखवत लोकसभेत त्यांच्याकडून कसून मेहनत करण्याची तजवीजही त्यांनी केली आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी या दोन प्रतिस्पर्धी पक्षांच्या जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीबाबत उठलेल्या वावड्या अखेर विरल्या आहेत. भाजपने विद्यमान खासदारांवर विश्वास व्यक्त करत त्यांना पुन्हा रणांगणात उतारले असून राष्ट्रवादीने जळगावातून डॉ. सतीश पाटील तर रावेरमधून मनीष जैन यांना उमेदवारी जाहीर केली. यात सर्वाधीक आश्चर्य रावेरच्या जागेबाबत व्यक्त करण्यात आले. अरूणभाई गुजराती, रवींद्रभय्या पाटील, दिलीपराव सोनवणे आदी निष्ठावंत दिग्गजांना डावलून आयात केलेल्या मनीषदादांना दिलेली उमेदवारी ही आश्चर्यकारक असली तरी यातून मांडलेले राजकीय गणित समजून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदराव पवार यांचे राजकीय चातुर्य लक्षात घेणे गरजेचे आहे.
सध्याची लोकसभा निवडणूक ही शरदरावांच्या पंतप्रधानपदासाठी शेवटची असल्याचे मानले जात आहे. निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाल्यास दोन आकडी खासदारांचे बळ आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील मित्रमंडळीच्या पाठींब्याने देशाचे सर्वोच्च पद काबीज करण्याची त्यांची खेळी आहे. यातून एकेक जागेसाठी ते दक्ष आहेत. प्रारंभी दिग्गज मंत्र्यांना लोकसभेत पाठविण्याची घोषणा करून त्यांनी मातब्बरांच्या गोटात अस्वस्थता निर्माण केली. मात्र यादी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ यांचा अपवाद वगळता अन्य ज्येष्ठ मंत्र्यांना ‘दिलासा’ मिळाल्याचे दिसून आले. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी त्यांनी शेवटच्या क्षणाला सर्वांना धक्का दिला. डॉ. सतीश पाटील यांना आ. गुलाबराव देवकर यांच्याऐवजी तिकिट मिळाले हे स्पष्ट असले तरी मनीष जैन यांना तिकिट देतांना त्यांनी या एका निर्णयात अनेक हेतू साध्य केले.
गेल्या वेळी प्रचंड मतांनी पराभूत झालेल्या जळगावच्या जागेबाबत ‘खान्देश विकास आघाडी’ आणि पर्यायाने आ. सुरेशदादा जैन यांच्याशी हातमिळवणी करणे आवश्यक असल्याची जाणीव शरद पवार यांना असेलच. याचमुळे महापालिका निवडणूक राष्ट्रवादीने ‘अंगात’ आणली नाही. यानंतर ‘खाविआ’ला राष्ट्रवादीने विनाशर्त पाठींबा देऊन सुचक संकेत दिले. असे असले तरी ‘खाविआ’चा सक्रीय पाठींबा मिळवण्यासाठी आ. सुरेशदादा जैन यांच्या निकटचा एखादा मोहरा हाताशी धरण्याचे तंत्र अवलंबण्यात आले. यातूनच किशोर पाटील आणि विष्णू भंगाळे या दोन्ही माजी महापौरांनी लोकसभेत ‘इंटरेस्ट’ दाखविला. मात्र गोष्ट पुढे सरकलीच नाही. यानंतर राष्ट्रवादी श्रेष्ठींनी आ. सुरेशदादा जैन आपले राजकीय गुरू मानणार्या आ. मनीषदादा यांनाच थेट तिकिट देऊन ‘हुकमी एक्का’ हाती घेतला आहे.
खरं तर राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील मराठ्यांचा पक्ष ही प्रतिमा पुसून काढण्यासाठी लेवा पाटीदार या तशा अल्पसंख्य मात्र रावेर लोकसभेत बहुसंख्य समुदायाला जवळ करावे अशी स्थानिक नेत्यांची दीर्घ काळापासूनची मागणी आहे. मात्र याऐवजी शरद पवार यांनी मनीषदादा जैन यांच्यासारख्या अत्यल्पसंख्य समुदायातील तरूणावर जबाबदारी टाकली आहे. खुद्द मनीष जैन यांनी लोकसभेची कधीपासूनच तयारी सुरू केली होती. जामनेर या त्यांच्या तालुक्यासह प्रत्येक तालुक्यात त्यांचे समर्थक आहेत वा नजीकच्या काळात तयार करण्यात आले आहेत. याला मनीषदादांची अर्थशक्ती व राष्ट्रवादीच्या ‘व्होट बँके’ची जोड मिळाल्यास भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होऊ शकतो असा होरा मांडण्यात आला आहे. यासोबत जळगाव लोकसभा मतदारसंघात डॉ. सतीश पाटील यांच्या पाठीशी ‘खान्देश विकास आघाडी’ खंबरीपणे उभे राहण्याची ‘बोली’ करण्यात आली असावी. हे सारे होत असतांना मनीषदादांच्या उमेदवारांनी रावेर मतदारसंघातील तमाम इच्छुक मातब्बर हिरमुसले असून याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यताही लक्षात घेतली असावी. यातूनच मनीषदादांना विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले असावेत. यामुळे रवींद्रभय्या, अरूणभाई, चौधरी बंधू, दिलीपतात्या सोनवणे आदी दिग्गजांना विधानपरिषदेचा शब्द देण्यात येईल. कदाचित ‘कोण आपल्या तालुक्यातून सर्वाधीक लीड देतो त्यालाच विधानपरिषद’ अशी अटही टाकण्यात येईल. परिणामी ‘साहेबांचा आदेश आणि विधानपरिषदेचे स्वप्न’ या बाबींमुळे त्यांना झटून काम करणे भाग पडेलच! यातून रावेर आणि जळगाव या दोन्ही जागांवर सरशी होण्याचा अंदाज बांधण्यात आला असावा.
एका अर्थाने शरदराव पवार यांच्या ‘मास्टर स्ट्रोक’ने अगदी स्वकीयांसकट विरोधकांनाही गोंधळात टाकले आहे. यात ते यशस्वी झाल्यास दोन बहुमुल्य खासदारांनी राष्ट्रवादीचे बळ तर वाढलेच; पण ए.टी.नाना यांना आयात करून त्यांना खासदार करण्याच्या ना. एकनाथराव खडसे यांच्या खेळीची परतफेडही होणार आहे. अर्थात जळगाव आणि रावेरमध्ये राष्ट्रवादीच्या विजयात अत्यंत प्रबळ असणारे भाजपचे उमेदवार, मोदींची असणारी लाट, सत्ताधार्यांवरील नाराजी, मनसे-आप सारख्या पक्षांचे उमेदवार आणि अपक्षांसह अनेक अडथळे आहेत. यात शिवसेना, कॉंग्रेसच्या भुमिकाही महत्वाच्या राहणार आहेत. अर्थात या लोकसभा निवडणुकीत शरदराव पवार यांच्या राजकीय खेळीमुळे चांगलाच रंग भरणार आहे.
Right pan this election. ?.