चालू घडामोडी

व्यापार भावनांचा अन् शब्दांचा !

आपल्या अंतर्यामी आहे तेच बाहेर उमटावे. आनंदी असल्यास हसावे…मन भरून आल्यास रडून घ्यावे. भावना उचंबळून आल्यास नाचावे…उदास झाल्यास शांत बसावे. कधी मनातील घुमार्‍यांना शब्दांचा साज द्यावा तर कधी ते गितातून ओठांवर यावे. अर्थात आपले असणे आणि दर्शविणे यातील फरक नसावा. मात्र आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात असे शक्य आहे का?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच एका कार्यक्रमात जाहीररित्या गाळलेले अश्रू वादात सापडले आहेत. ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीने तर ओबामांनी तिखट कांद्यांला डोळ्यासमोर धरून अश्रू काढल्याचा आरोप केला आहे. यानंतर याबाबत विविध थिअरीज मांडण्यात येत आहेत. बर्‍याच जणांनी त्यांची तुलना हिटलरच्या नक्राश्रूंसोबत केली आहे. बहुतांश लोकांना त्यांच्या अश्रूंमध्ये काही तरी रहस्य अथवा कट-कारस्थान असल्याचा भास होत आहे. चार वर्षांपुर्वीची शिकागोमधील दुर्घटना आठवून रडणारे ओबामा ‘इसीस’च्या अमेरिकेतील शिरकावाबद्दल का बोलत नाहीत? असा अनेकांनी सवाल केला आहे. यावर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. असो.

माझ्या मते तरी अश्रू हा कोणत्याही सहृदयी व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आपण दु:खातही रडतो अन् आनंदातही. भावविभोर झाल्यानंतर आपसूकच नयनांमधून पाझर फुटतो. मात्र ज्यांचा व्यवसाय अश्रूंवर अवलंबून असतो त्यांना हुकमी वेळेस रडणे फार कठीण असते. यामुळेच मोजके अपवाद वगळता चित्रपट वा कोणत्याही परफॉर्मिंग आर्टमधील कलावंतांना यासाठी ग्लिसरीन वा तत्सम उपाययोजना करून अश्रू आणावे लागतात. काही क्षण हे गलबलून टाकणारे असतात. श्रीलंकेविरूध्दच्या सामन्यातील दारूण पराभव डोळ्यासमोर दिसत असतांनाही आपण प्रतिकार करू शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रडणार्‍या कांबळीच्या अश्रूंना कुणी खोटे म्हणणार नाही. आनंदाच्या अत्युच्च क्षणाला अश्रूंनी मोकळी वाट करून देणारे पवित्र वाटतात. दु:खात तर ते आपले साथीदारच असतात. मात्र अगदी कोणत्याही प्रसंगी हुकमी अश्रू आणणार्‍या मंडळींना अक्षरश: दंडवतच घालावेसे वाटते. अगदी ‘इमोशनल अत्याचार’ करून याचे ढोंग करणारे बिलींदर असतात. लोकांना भावविवश करून त्याचे भांडवल करणारे राजकारणी वा तत्सम सेलिब्रिटी मंडळी ही या प्रकारात चांगलीच पारंगत असतात. आपल्या वैयक्तीक आयुष्यातही भोवतीचे काही जण याच प्रकारे ‘छळणारे’ असतात. याच स्वरूपाचा दुसरा भयंकर प्रकार बळजबरीने हसण्याचा असतो. याचे सर्वात उत्तम उदाहरण विविध रिऍलिटी ‘कॉमेडी शोज’मधील परिक्षकांच्या माध्यमातून आपल्या समोर येते.

दुसर्‍यांच्या हास्य निर्मित करणार्‍या कृत्यांना बळेच हसून दाद देतांना बिचार्‍यांची होणारी कुचंबणा पाहिलीदेखील जात नाही. विविध विषयांवर खुमासदार मत प्रदर्शन करणारा नवज्योतसिंग सिध्दू मला एखाद्या कसलेल्या राजकारण्यापेक्षाही भाषेवर विलक्षण प्रभुत्व असणारा वाटतो. त्याचे नेहमीचे हसणेदेखील निर्मळ वाटते. मात्र बर्‍याच वेळा एखाद्या कलावंताच्या शेंडा वा बुडखा नसणार्‍या विनोदावर त्याला सात मजली हसतांना पाहणे किमान मला तरी अगदी भयंकर वाटते. म्हणजे जणू काही समोर नोटांना पाहून त्याला बळेच हसावे लागल्याचा मला भास होतो. हा प्रकार इतरांनाही अनेकदा करावा लागतो. प्रत्यक्ष आयुष्यात अनेक चेहर्‍यावर कायम हास्य मिरवत प्रत्यक्षात खुनशी वा मतलबी वृत्तीची बेरकी मंडळी आपल्याला भेटतेच की! निर्मळ हसणे वा रडणे कुणाच्याही हृदयाला स्पर्श करणारे असते. मात्र याला हेतू ठेवून केल्यास ओबामांपासून ते आपल्या परिचितांमधील मंडळींचा ‘अत्याचार’ आठवल्याशिवाय राहत नाही.

आता मी ज्या व्यवसायात काम करतो त्यातही असला बळजबरी सौदा आहेच. म्हणजे एखादी बातमी फुलवतांना त्यात मागणीनुसार कारूण्य, विनोदी वा विरश्री संचारल्यागत विविध भाव टाकावे लागतात. अर्थात आम्ही पत्रकार म्हणजे माहितीला नवरसांची फोडणी देणारे व्यापारी म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही. यामुळे कधी तरी स्वत:च्या भावना उचंबळून येतात तेव्हा शब्दच सुचत नाहीत. कारण आम्ही आधीच शब्दांची अतिरेकी उलाढाल करून गलीतगात्र झालेलो असतो. दुसर्‍यांच्या असणार्‍या-नसणार्‍या भावनांना हुकमी शब्दसाज चढविणारा कुशल पत्रकार ‘आपल्या’ भावना व्यक्त करतांना अक्षरश: चाचपडतो. यातच तो नकळत बाजारू अभिव्यक्तीच्या आहारी जाण्याचा धोका असतोच. माझ्या अंतरीच्या भावना उलगडून दाखविण्याचा हक्क असणार्‍या मोजक्या निकटवर्तीयांजवळ याबाबत अनेकदा उहापोहदेखील होतोच. परंतु अद्याप मार्ग निघाला नाही.

आपल्या अंतर्यामी आहे तेच बाहेर उमटावे. आनंदी असल्यास हसावे…मन भरून आल्यास रडून घ्यावे. भावना उचंबळून आल्यास नाचावे…उदास झाल्यास शांत बसावे. कधी मनातील घुमार्‍यांना शब्दांचा साज द्यावा तर कधी ते गितातून ओठांवर यावे. अर्थात आपले असणे आणि दर्शविणे यातील फरक नसावा. मात्र मंडळी आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात असे शक्य आहे का? आपल्याला काय वाटते.

About the author

shekhar patil

Leave a Comment