चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

वैविध्याचा कार्पोरेट फंडा

आपल्या कर्मचार्‍यांमध्ये जगभरातील वर्ण, वंश, भाषा आदींसहा लिंगानुपाताचे प्रमाण समान रहावे यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर कंपन्या यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करत आहेत.

आपल्याकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये जगभरातील वर्ण, वंश, भाषा आदींसहा लिंगानुपाताचे प्रमाण समान रहावे यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मातब्बर कंपन्या यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने ‘इंटेल’ या विख्यात कंपनीने डायव्हर्सीटीसाठी तब्बल ३० कोटी डॉलर्स खर्च करणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली.

diversity

गेल्या काही महिन्यांपासून गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहू, ऍपल, इंटेल, फेसबुक आदी आयटी कंपन्या आपल्याकडील लिंगानुपातासह विविध वंश आणि वर्णाच्या कर्मचार्‍यांची माहिती जाहीर करत आहेत. खर तर गेल्या उन्हाळ्यात गुगलसारख्या काही कंपन्यांनी हीच माहिती जाहीर केली तेव्हा या कंपन्यांमध्ये महिलांचे प्रमाण कमी होते. याशिवाय फक्त श्‍वेतवर्णीय मोठ्या संख्येने कार्यरत असल्याचे अधोरेखित झाले होते. यानंतर ‘फॉर्च्युन’ने चौदा आघाडीच्या टेक कंपन्यांनी जारी केलेल्या माहितीचा उपयोग करून लिंगानुपात, वर्णानुपात आदींवर आधारित ‘इंडेक्स’ तयार केला. यानुसार संबंधीत कंपन्यांना क्रमवारी देण्यात आली. यात ‘लिंक्डइन’ ही सोशल साईट पहिल्या क्रमांकावर होती. या क्रमवारीत इंटेल ही कंपनी गुगलसह संयुक्तरित्या नवव्या क्रमांकावर होती. यामुळे या क्रमवारीत सुधारणा होण्यासाठी इंटेलने ही गुंतवणूक केल्याचे मानले जात आहे. गुगलनेही मुलींना ‘कोड’ शिकण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

आजवर अनेक अध्ययनांमधून बहुविधतेमध्ये सृजनशीलता, कल्पनाशक्ती, नाविन्याचा ध्यास आदी बाबी विपुल प्रमाणात आढळून येत असल्याचे अधोरेखित झाले आहे. यामुळे कोणत्याही टेक कंपनीला जगभरातील ग्राहकांसमोर जाण्यासाठी आपल्या कर्मचार्‍यांमध्ये या समुह घटकांचा अंश असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे जगभरातील प्रत्येक धर्म, वर्ण, भाषा, संस्कृती असणारे स्त्री-पुरूष समान प्रमाणात कामाला असावेत अशी या कंपन्यांची धडपड आहे. खरं तर यातूनच प्रत्येक कंपनीला आपले ‘ग्लोबल व्हिजन’ विकसित होण्याची अपेक्षा आहे. जगाच्या विविध भागांमधील गुणवत्तेला हेरून त्यांच्याकडून वैश्‍विक मापदंडाचे उत्पादन करून घेण्याचीही ही धडपड आहे.

अमेरिका हा देश जागतिक ‘मेल्टींग पॉट’ म्हणून ओळखला जातो. विविध धर्म, वर्ण, वंश, देश, भाषा, संस्कृती आदींचा येथे संकर झालाय. आणि अमेरिकेला याचा अभिमानही आहे. याचेच प्रतिबिंब कार्पोरेटविश्‍वातही उमटावे यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वात वादाचा मुद्दा लिंगानुपाताचा आहे. गुगल, फेसबुकसारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये पुरूषांचे प्रमाण जास्त असून हे अन्यायकारक असल्याचे मानले जात आहे. समाजात जर जवळपास महिलांची संख्या निम्म्याच्या आसपास असेल तर या कंपन्यांमध्येही इतकेच प्रमाण हवे. मात्र स्थिती याच्या उलट आहे. याचप्रमाणे कर्मचार्‍यांमध्ये फक्त श्‍वेतवर्णीयांची वाढीव संख्यादेखील आवश्यक नाहीच. कृष्णवर्णीय, आशियाई, लॅटीन अमेरिकन एवढेच नव्हे तर ‘एलजीबीटी’ (गे, लेस्बियन आदी) यांनाही याच प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. ही भुमिका फक्त सामाजिक न्यायातूनच नसून कार्पोरेट कंपन्यांनी सर्व घटकांना आपल्यासोबत घेण्याचा व्यापक अर्थदेखील यात अभिप्रेत आहे. भारतात शोषित समाज घटकांना आरक्षण देण्याची भुमिका ही सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून घेण्यात आली आहे. अमेरिकेच्या कार्पोरेट कंपन्यांनी गुणवत्ता मान्य करतांनाही आपल्याकडील कर्मचार्‍यांमध्ये वैविध्य असल्याची घेतलेली भुमिका ही सामाजिक न्यायासोबत लाभाच्याही उद्देशाने स्वीकारण्यात आली आहे. मनुष्यबळ हे कोणत्याही कंपनीचे सर्वात मोठी शक्ती मानली जाते. मनुष्यबळाचा विकास करून प्रगती करण्याचा मंत्र जगभरातील कंपन्यांनी अंगिकारला आहे. मात्र या मनुष्यबळात वैविध्याचा समावेश असल्यास कोणतीही कंपनी त्या समुहाच्या क्रयशक्तीची मानसिकताही समजू शकते. एकंदरीत यात सामाजिक न्यायाचा फार थोडा भाग असून बाजारपेठेची मागणीदेखील असल्याचे आपल्याला स्पष्ट दिसून येते.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे अलीकडच्या काळात बिझनेस, व्यवस्थापन, शिक्षण आणि संशोधन आदी विविध क्षेत्रांमध्ये ‘कल्चरल इंटिलेजिअन्स‘ वा ‘कल्चरल कोशंट’ (सीक्यु) या संकल्पनांवर गांभिर्याने विचार होत आहे. विविध सांस्कृतीक क्षेत्रांशी संबंधीत असणार्‍या समुहांमध्ये कार्यक्षमता दाखविणे हा याचा ढोबळ अर्थ असला तरी व्यापक पातळीवर याचे संदर्भ आपल्या निदर्शनास येतात. आज प्रत्येक व्यक्ती हा ‘ग्लोबल सिटीझन’ बनला आहे. पृथ्वीतलावरील कोणत्याही कोपर्‍यात जागतिक सांस्कृतीची सरमिसळ आढळून येते. आज आपण आपल्याच शहरात पिझ्झा, पास्तापासून ते चायनिजपर्यंत विविध खाद्यपदार्थ खाऊ शकतो. अमेरिकन चित्रपट पाहू शकतो. चिनी वस्तू आपल्याला सहजगत्या उपलब्ध आहेत. मात्र स्थानिक पातळीवरील व्यक्तीला वर नमुद केलेल्या उदाहरणांशी संबंधीत असणार्‍या देशांमध्ये अगदी सुलभपणे काम करणे शक्य आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर ‘कल्चरल कोशंट’ देतो. जो कुणी विविध सांस्कृतीक वातावरणांशी अगदी सहजगत्या जुळवून घेतो त्याचा ‘सीक्यु’ उत्तम असे ढोबळ मानाने मानले जाते. आता मॅनेजमेंटमध्ये ‘सीक्यु’ला मान्यता मिळत आहे. यातूनच कंपन्यांना बहुसांस्कृतीक कार्यसंस्कृतीचे मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याचे मानले जात आहे. यामुळे टेक कंपन्या ‘डायव्हर्सीटी’बाबत गंभीर आहेत. अर्थात बहुतांश आयटीच नव्हे तर अन्य अमेरिकन कंपन्यांमध्येही अद्याप श्‍वेतवर्णीयांचेच वर्चस्व आहे. अगदी ‘फॉर्च्युन-५००’ या यादीत फक्त सहा कंपन्यांचे सीईओ कृष्णवर्णीय आहेत. याचाच अर्थ असा की, तेथील कार्पोरेट क्षेत्रात अद्यापही मोठ्या प्रमाणात एकाधिकारशाही आहेच. मात्र कंपन्यांनी वैविध्यावर विचार सुरू केलाय ही सकारात्मक बाब आहे.

या सर्व बाबींचा पार्श्‍वभुमीवर, आपल्याकडे नेमके काय चित्र आहे? बहुतेक प्रत्येक क्षेत्रात कोणत्या तरी घटकाची लॉबी आहे. मग ती जात असो, भाषा की प्रांत! काही कंपन्यांमधील कामगारांमध्ये विविधता असली तरी वरिष्ठ पदांवर लॉबिंगच असल्याचे आपण पहातो. आपल्या देशाची संस्कृती बहुरंगी आहे. आपण अनेकदा ‘विविधतेत एकता’ म्हणून आपलीच स्वत:ची पाठ थोपटून घेतो. मात्र कार्पोरेट क्षेत्रात कुणी ‘डायव्हर्सीटी’चा विचार केला काय? म्हणजे एखाद्या कंपनीतून तयार झालेले उत्पादन संपुर्ण भारताला वा जागतिक बाजारपेठेला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येते. मात्र त्या उत्पादनासाठी परिश्रम घेणारे हात, त्यासाठी संशोधन करणारी बुध्दीमत्ता, त्याच्या मार्केटींगसाठी लागणारी कल्पकता, उत्पादनात सुधारणेसाठी आवश्यक असणारी ग्रहणशीलता या बाबींसाठी देशाच्या प्रत्येक धर्म,जाती,भाषा, संस्कृती आदींचा समावेश असणारा कर्मचारीवृंद या कंपन्यांनी जाणीवपुर्वक जमा करणे आवश्यक आहे. मात्र असे होते का? किंबहुना झाले नाही तरी याबाबत कोणती कंपनी गंभीर आहे का? हे विषय संशोधनाचे आहेत. बहुतांश क्षेत्रांमध्ये परिघावरील समाज समुहांना कोणतेही स्थान नसल्याचे आपण पाहतो. भारतासारख्या विकसनशील देशांमधील सरकारी क्षेत्रातील आरक्षणावरील प्रश्‍नचिन्ह लावले जात असतांना अमेरिकेसारख्या महासत्तेतल्या अजस्त्र कंपन्या जाणीवपुर्वक वैविध्याकडे लक्ष देत असल्याचा विरोधाभासही यातून स्पष्ट झाला आहे.

diversity1

(दोन्ही प्रतिकात्मक छायाचित्रे-इंटरनेटवरून साभार)

About the author

shekhar patil

1 Comment

  • दादा नेहमी प्रमाणे हा देखील अत्यंत अभ्यासपूर्ण लेख आहे याचा भाग 2 लवकर लिहावा ही विनंती
    त्यात भारतातील कॉर्पोरेट लॉबिंग वर लिहावे ही देखील विनंती

Leave a Comment