Featured चित्रपट

विलक्षण सकारात्मक: ‘लाईफ इज ब्युटीफुल’ !

Written by shekhar patil

काही माणसांकडे अजस्त्र सकारात्मक उर्जा असते. नियतीचे फासे कितीही उलट पडले तरी त्यातून काही तरी चांगले शोधण्याची हातोटी त्यांना साधलेली असते. जीवनाकडे निखळ आनंदी नजरेने पाहणार्‍यांना अगदी मृत्यूची छायादेखील भेदरवू शकत नाही. आपल्या निव्वळ उपस्थितीने कितीही विपरीत परिस्थितीला बदलवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. अशाच प्रकारे मृत्यूच्या तांडवातही सकारात्मक शोधू पाहणारा नायक आपल्याला पहावयास मिळतो ‘लाईफ इज ब्युटीफुल’मध्ये!

विख्यात इटालियन अभिनेता-दिग्दर्शक रॉबेर्तो बेनिग्नी याच्या मूळ चित्रपटाचे नाव ‘ला विटा इ बेला’ होय. हा मुळ इटालियन भाषेतील चित्रपट इंग्रजी सबटायटल्स व डबिंगसह जगभरात पोहचला. सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटासह एकंदरीत तीन ऑस्कर पुरस्कार याने पटकावले. ढोबळ मानाने ‘ट्रॅजिक कॉमेडी’ असणार्‍या या चित्रपटाला आपण दोन भागांमध्ये विभाजीत करू शकतो. पहिला भाग हा निखळ विनोदाने अन् सुंदर प्रेमप्रसंगांनी बहरलेला आहे. याची सुरूवात होते १९३९च्या कालखंडाच्या प्रारंभी. खेडेगावातून आपल्या काकाच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्यासाठी येणार्‍या गुईडो (रॉबेर्तो बेनिग्नी) याची एखाद्या परिकथेसारखी अक्षरश: टक्कर होते ती डोरा (निकोलेटा ब्रास्की) या सौदर्यवतीशी. पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडतो. मात्र दोघांमध्ये भली मोठी ‘दिवार’ असते. एक तर हा गरीब ज्यू असतो तर ती धनाढ्य इटालीयन कुटुंबातील. याचा काहीही ठावठिकाणा नसतो तर तिचा एका सरकारी अधिकार्‍याशी वाडनिश्‍चय झालेला असतो. अर्थात तिला काहीही करून मिळवायचीच या विचाराने झपाटलेला गुईडो यासाठी अक्षरश: जिवाचे रान करतो. अनेक दिव्य पार पाडल्यानंतर या दोघांचा संसार सुरू होतो.

यानंतर कथा पाच वर्षांनी पुढे सरकते. इथवर राजा-राणीचा सुखाने संसार सुरू असतो. त्यांच्या संसारवेलीवर जोशुआ नामक एक सुंदर फुलही बहरते. चार वर्षीय जोशुआच्या बाललीलांनी मुग्ध होणार्‍या गुईडोचे शहरात पुस्तकांचे दुकान असतो. डोरा शिक्षिका असते. यातच या विवाहामुळे नाराज झालेल्या डोराची आईचा संतापही निवळलो. इकडे व्यापक पटावर मात्र भयावह घडामोडी घडत असतात. १९४५च्या सुमारासच्या या कालखंडात तसे द्वितीय महायुध्द अंतिम टप्प्यात आलेले असते. इथपावेतो इटालीतील फॅसिस्ट सरकारनेही आपल्या जर्मन साथीदाराप्रमाणेच ज्यूंचे सामूहिक शिरकाण करण्यासाठी ‘कॉन्सनट्रेशन कँप’ उभारलेले असतात. यात दररोज शेकडोच्या संख्येने ज्यू स्त्री-पुरूषांचे जत्थे दाखल होत असतात. अशाच एका समूहाला घेऊन जाणार्‍या रेल्वे गाडीत गुईडो, त्याचे काका आणि त्याचा मुलगा जोशुआ यांना नंबर लागतो. यावेळी ज्यू नसल्याने डोराला जीव वाचवण्याची संधी असते. मात्र आपला पती आणि मुलासाठी ती स्वखुशीने यातना शिबिरात जाण्यासाठी तयार होते. गुईडो आणि त्याच्या सोबतच्या लोकांना आपण मृत्यूच्या दाढेत जात असल्याची जाणीव असते. मात्र बिचार्‍या निरागस जोशुआला मात्र भोवतीच्या कठोर वातावरणाची जराही जाणीव नसते. आपल्या मुलाचे भावविश्‍व उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी गुईडो एक अफलातून शक्कल लढवितो. तो आपल्या मुलाला सांगतो की, ‘‘आपल्या भोवताली सुरू असणार्‍या तमाम घडामोडी हा एक खेळ आहे. यातील प्रत्येक जण पॉईंट मिळवण्यासाठी खेळत आहे. यापैकी ज्याचे सर्वात प्रथम हजार गुण होतील त्याला खराखुरा रणगाडा भेटणार आहे.’’ निष्पाप लेकराचा यावर तत्काळ विश्‍वास बसतो. यानंतर तो जोशुआला या खेळाचे नियम समजावतो. दिवसभर लपून राहिल्यास अमुक गुण…जराही आवाज न केल्यास तमुक गुण असे नियम समजावल्यानंतर तो आपल्या मुलास हा ‘गेम’ काहीही करून जिंकायचाच असा आत्मविश्‍वास देतो. यानंतर सुरू होतो करूण खेळ! गुईडोवर संकटामागून संकटे येतात तरी जोशुआ मात्र पॉईंट मिळाल्याच्या आनंदात मग्न असतो. अखेर सैनिक गुईडोला गोळ्या झाडून ठार मारतात. इकडे अमेरिकन सैनिक या छावणीपर्यंत येऊन जोशुआ आणि इतर ज्यू स्त्री-पुरूषांची सुटका करतात. यावेळी निरागस जोशुआ हा आपण बाजी मारल्याच्या आवेशात अमेरिकन सैनिकासोबत रणगाड्यावरून जात असतो. इतक्यात त्याला त्याची आई दिसते. यावेळी आपल्या मातेच्या अंगावर उडी घेणारा जोशुआ आपण जिंकल्याच्या अत्यानंदात असतो. चित्रपट संपतांना एक विलक्षण अस्वस्थतेची आपणास जाणीव होते.

द्वितीय महायुध्दातील ज्यूंच्या नरसंहारावर (होलोकास्ट) आधारित अनेक चित्रपट आहेत. यापैकी ‘शिंडलर्स लिस्ट’सारख्या कलाकृती तर सर्वकालीन महान चित्रपटांच्या यादीत विराजमान झाल्या आहेत. ‘लाईफ इज ब्युटीफुल’देखील ‘होलाकास्ट’वर आधारित असला तरी या चित्रपटात अनेक अभिनव बाबी आहेत. या सिनेमात सकारात्मक शक्तीची महत्ता विलक्षण परिणामकारकरित्या वर्णन केली आहे. वास्तविक पाहता नरसंहार आणि विनोद यांचा कुठेही संबंध येत नाही. मात्र विषयाचे गांभीर्य कायम ठेवून बेनिगनी यांनी ज्या पध्दतीने चित्रपट सादर केला आहे ते पाहून त्यांना सलाम ठोकावासा वाटतो. या चित्रपटात नायिकेची भूमिका ही बेनिग्नी यांची वास्तविक जीवनातील पत्नी निकोलेटा ब्रास्की हीने अत्यंत ताकदीने निभावली आहे. या दोघांची ‘केमिस्ट्री’ अत्यंत भन्नाट. याशिवाय, बेनिग्नीची देहबोली ही अत्यंत बोलकी अन् समर्पक अशीच आहे. अगदी त्याला ‘शूट’ करण्यासाठी सैनिक घेऊन जात असतांना तो बॉक्समध्ये लपलेल्या आपल्या चिमुकल्याला पाहून डोळा मारत सैनिकांची नक्कल करतो हे दृश्य आपल्या मनात ह्दयात कालवाकालव निर्माण करते. जोशुआची भूमिका जॉर्जिओ कँटारिनी या चिमुरड्याने चोख बजावली आहे. मात्र चित्रपटात लक्षात राहतो तो लाख हिकमती करून आनंदी राहणार्‍या अन् भोवतालच्या जगालाही आनंद लहरीत चिंब करणारा गुईडो अर्थात रॉबेर्तो बेनिग्नी! याचमुळे त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ‘ऑस्कर’ही पटकावले. या चित्रपटाला खुप पुरस्कार मिळाले. व्यावसायिक पातळीवरही याला यश मिळाले. असे असूनही यावर टीकाही करण्यात आली. यात ज्यूंच्या नरसंहारासारख्या अत्यंत गंभीर विषयाला विनोदी व क्वचितप्रसंगी थिल्लरपणे सादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. इटलीतील काही कट्टरपंथी समूह तसेच डाव्या विचारसरणीच्या समीक्षकांनीही या सिनेमावर सडकून टीका केली. असे असले तरी जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये याची गणना होऊ शकते. मानवी आयुष्य हे नितांतसुंदर असून त्याच्यावर प्रेम करण्याची शिकवण देणारा हा सुंदर चित्रपट आहे. विख्यात शायर निदा फाजली यांच्या गझलेतील ओळी आहेत…

जितनी बुरी समझी जाती उतनी बुरी नही है दुनिया
बच्चो के स्कुल मे तुमसे शायद मिली नही है दुनिया॥

जीवनातील सत्यम, शिवम अन् सुंदरम शोधायचे तर तुमच्याकडे निरागस बालकांसमान मन हवे अथवा गुईडोसारखी अफलातून सकारात्मक दृष्टी; तेव्हा प्रत्येकासाठी आयुष्य हे ‘ब्युटीफुल’च असते हे सांगायला हवे का?

‘लाईफ इज ब्युटीफुल’चा ट्रेलर

मनाला चटका लावणारे दृश्य

About the author

shekhar patil

2 Comments

  • Life is really beautiful and we have to remember that in life every day is brand new day of rest of our life which brings immense beauty that we have to reveal by reciprocating goodness and repeatedly sending love in response to every negative… Nilesh Gore

Leave a Comment