चालू घडामोडी विज्ञान-तंत्रज्ञान

विक्रमादित्याची उपेक्षा

हा दोष प्रसारमाध्यमांचाच नव्हे तर विज्ञानाकडे उपेक्षेने पाहणार्‍या भारतीय जनतेचादेखील आहे. अर्थात काहीही असले यामुळे वेंकटरमन रामकृष्णन यांची महत्ता थोडीच कमी होणार आहे?

आपल्या पॉप कल्चरमध्ये प्रत्येक क्षेत्रांमधील नायकांना वलय मिळते. अगदी तंत्रज्ञानाचा विचार केला असता सत्या नादेला, सुंदर पिचाई आदींसारख्या व्यक्तीमत्वांचे गोडवे आपण कायम गात असतो. त्यांच्या भारतीयत्वाला विशेष करून गौरवाने नमुद करण्यात येते. मात्र याचप्रमाणे विज्ञान क्षेत्रातील मान्यवरांच्या पदरी पहिल्यापासूनच खूप उपेक्षा आहे. आज देशातील आघाडीच्या वैज्ञानिकांची नावे कुणालाही विचारली तरी चार-पाच लोकप्रिय नावांच्या पलीकडे आपली पोहच जात नाही. अगदी जागतिक पातळीवर विख्यात असणार्‍या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांबाबतही हीच बोंब आहे. या पार्श्‍वभुमिवर विश्‍वविख्यात शास्त्रज्ञ तथा ‘नोबेल’ विजेते वेंकटरमन रामकृष्णन यांची ब्रिटनमधील ‘रॉयल सोसायटी’च्या अध्यक्षपदी झालेली निवडही फारशी लक्षवेधी ठरली नसल्याबाबत कोणतेही नवल वाटले नाही.

आता वेंकटरमन रामकृष्णन यांची ही निवड किती महत्वपुर्ण आहे यासाठी काही बाबी सांगणे क्रमप्राप्त आहे. ‘रॉयल सोसायटी’ ही जगातील ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्था आहे. १६६० साली स्थापन झालेल्या या संस्थेची धुरा आजवर ६० विश्‍वविख्यात शास्त्रज्ञांनी सांभाळली आहे. यामध्ये आयझॅक न्यूटन, हंप्रे डेव्ही, अर्नेस्ट रूदरफोर्ड आदींसारख्या मानवी इतिहासाला नवीन वळण लावणार्‍या उत्तुंग व्यक्तीमत्वांचा समावेश आहे. आता याच उज्ज्वल परंपरेची ‘गादी’ चालविण्याची जबाबदारी रामकृष्णन यांच्यावर आली आहे. रामकृष्णन यांच्या अफलातून अकॅडमीक करियरकडे नजर टाकल्यानंतर त्यांच्या महत्तेचा अजून दुसरा पैलू समोर येतो. तामिळनाडूतल्या चिदंबरम जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असणार्‍या रामकृष्णन यांनी पदार्थविज्ञानातून पदवी मिळविली. बडोद्यातील राजा सयाजीराव विद्यापिठातून फिजीक्समध्येच स्नातकोत्तर अध्ययन पुर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या ओहियो विद्यापीठातून याच विषयात पीएच.डी. केली. अर्थात याच शाखेत ते उत्तम करियर करू शकले असते. मात्र असे न करता त्यांना नव्यानेच रस वाटू लागलेल्या जीवशास्त्राची पदवी त्यांनी संपादन केली. आणि बायोकेमिस्ट म्हणून प्रयोगशाळेत नोकरी पत्करली. म्हणजे फिजीक्सचा विद्यार्थी हा बायोलॉजीचा संशोधक बनला अन् त्यांना रसायनशास्त्राचे ‘नोबेल’ मिळाले आता बोला! सजीव पेशीचा अविभाज्य आणि अत्यंत महत्वाचा घटक असणार्‍या ‘रायबोसोम’वरील त्यांचे संशोधन ख्यातप्राप्त ठरले आहे. यासोबत त्यांच्या अन्य संशोधनांनाही मान्यता मिळाली आहे. मात्र ही वाटचाल पाहिजे तितकी सोपी नव्हती. रामकृष्णन हे आयआयटीच्या प्रवेशासाठीची ‘जेईई’ तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठीची प्रवेश परिक्षा चक्क अनुत्तीर्ण झाले होते. अर्थात देश एका टेक्नोक्रॅट वा कुशल डॉक्टरला मुकला असला तरी यातूनच एका वैज्ञानिकाचा जन्म झाला. अशा अनेक कठीण परिक्षांमधून तावून-सुलाखून निघत वेंकटरमन रामकृष्णन हे आज जगातल्या सर्वात प्रतिष्ठीत संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. पुढील पाच वर्षे ते यावरच काम करणार आहेत.

भारतात मुलभुत संशोधनाविषयी प्रचंड अनास्था आहे. विज्ञान क्षेत्राचा विचार केला असता आपल्या समाजात तंत्रज्ञ, डॉक्टर वा इंजिनिअर होण्याकडे सर्वांचा कल आहे. मात्र संशोधनाकडे कुणी वळू इच्छीत नाही. यामागे अनेक अडचणी आहेत. उत्तम दर्जाच्या प्रयोगशाळा, त्यांना लागणारा निधी, यासाठीचे नियोजन या सर्व बाबी अडथळा ठरणार्‍या आहेत. अर्थात यामुळे या क्षेत्रात उत्तम करियर होऊ शकेल की नाही? याबाबत बहुतांश प्रतिभावान तरूण साशंक असतात. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करून रामकृष्णन शिखरावर विराजमान झाले आहेत. त्यांनी भारताला वारंवार भेटी देऊन विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करण्याची दिलेली ग्वाही ही या दृष्टीने अत्यंत आश्‍वासक अशीच आहे. आज वयाच्या अवघ्या ६३व्या वर्षी रामकृष्णन यांनी आयुष्यातील सर्व शिखरांना स्पर्श केला आहे. ‘नोबेल’, ब्रिटीश सरकारचा ‘नाईटहूड’, भारत सरकारच्या ‘पद्मभुषण’ आदींसह अनेक पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत. भविष्यात ‘भारतरत्न’ही त्यांना मिळण्याची शक्यता आहेच. मात्र असे असूनही भारतीय प्रसारमाध्यमांनी त्यांनी फारशी दखल घेतली नाही. परिणामी या महान व्यक्तीमत्वाच्या देदीप्यमान कामगिरीचीही फारशी वाखाणणी होत नसल्याचे दिसून आले आहे. हा दोष प्रसारमाध्यमांचाच नव्हे तर विज्ञानाकडे उपेक्षेने पाहणार्‍या भारतीय मानसिकतेचादेखील आहे. अर्थात काहीही असले यामुळे वेंकटरमन रामकृष्णन यांची महत्ता थोडीच कमी होणार आहे?

आता थोडा गमतीशीर योगायोग. कधी काळी भारतावर हुकुमत गाजविणार्‍या ब्रिटनचा दरारा कधीच ओसरणीला लागला आहे. आता तर खुद्द ब्रिटनमध्येच भारतीयांचा डंका वाजू लागला आहे. तेथील धनाढ्यांच्या यादीत मित्तल आणि हिंदुजांसारखी भारतीय नावे अग्रस्थानी झळकू लागली आहेत. प्रत्येक क्षेत्रातील भारतीयांचे वर्चस्व पाहता आगामी काळात इंग्लंडचा पंतप्रधान भारतीय वंशाचा नागरिक होण्याची भाकिते वर्तविण्यात येत आहेत. अलीकडेच भारतावर राज्य गाजविणारी ईस्ट इंडिया कंपनीदेखील भारतीय व्यक्तीने खरेदी केली आहे. आणि आता विज्ञानातील सर्वोच्च संस्थेची धुरादेखील एका भारतीयाच्या हातात आली आहे. ही जितकी भारतीय प्रतिभेची महत्ता आहे तितकाच काळाने उगविलेला सूड तर नव्हे?

About the author

shekhar patil

Leave a Comment